मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूर्य कथा पुढें सांगत । मोहासुर अति गर्वित । देवांचा जीव घेण्या सतत । कटिबद्ध नाना प्रकारें ॥१॥
त्यासाठीं परम दारुण असुर । पाठवून भरष्टवी चराचर । कर्ममार्गात विघ्नें अपार । निर्मून खंडन करिती त्याने ॥२॥
स्वल्प काळांत महीतल त्रस्त होऊन । झालें वेदोक्त कर्मविहीन । वर्णाश्रमाविहीन । नष्ट झालें धर्ममूळ ॥३॥
न स्वाहा न स्वधा मिळत । देवांसी तैसेंच पितृगणांप्रत । महर्षीचा प्रभाव न पडत । मोहासुरमूर्ति दैत्य स्थापिती ॥४॥
सर्वत्र मोहासुर मूर्ति पूजविती । त्याचे उत्सव रुढ करिती । उग्र दंड लाविती तैसे ताडिती । मोहासुरा जे न मानिती तयां ॥५॥
तेव्हां मुनिगण समस्त । अत्यंत भ्रष्ट होत । कांहीं मेले काहीं वनांत । परम दारुण स्थिति त्यांची ॥६॥
तेथ तें भयसंयुक्त । वेदोक्त क्रिय करित । परी सर्वत्र धर्मविच्छेद होत । दैत्यांस तेणें परम मोद ॥७॥
देवगण सर्व भययुक्त । उपोषणें त्यांसी घडत । यज्ञकर्म बंद होत । आहुती कोण तयां देई ॥८॥
तेव्हां ते विचार करित । मोहासुर विनाश कैसा होत । परी उपाय न कांहीं सुचत । देवांसी वा विप्रेंद्रांसी ॥९॥
मी त्या वेळ त्यांस म्हणत । सुरसत्तमांनो ऐका हित । अर्यमा मी तुम्हां सांगत । हितकारक ऐसा उपाय ॥१०॥
ज्यास नामरुप असत । त्यापासून मोहासुरा मृत्यु नसत । ही गोष्ट असे निश्चित । म्हणोनि अन्य उपाय ऐका ॥११॥
गणेश्वराच्या हातून । दैत्य हा पावेल निधन । तो योगमय साक्षात गजानन । त्याचें भजन करुया ॥१२॥
तो देव निजलोकस्थ मारील । निजबोधें दैत्य सबल । म्हणोनि त्याचें स्तवन विमल । सुरेश्वर हो करुंया ॥१३॥
माझें ऐसें ऐकून वचन । देव झाले हर्षित प्रसन्न । विष्णू आदी अनुमोदन । देती माझ्या विचाराते ॥१४॥
देव म्हणती योग्य सांगत । सूर्य हा अधिक बुद्धिमंत । सर्वांना जीवदाता संशयातीत । तो सांगतो तैसे करुया ॥१५॥
नंतर देव विप्र तापस आराधित । गणनायकासी भक्तियुक्त । एकाक्षर विधानें मंत्र जपत । विघ्न निवारण्या निरंतर ॥१६॥
आद्य मंत्र तो ध्यात हृदयांत । नाना तपें ते करित । उपोषणें करुन तोषवित । ऋषि देव विघ्नेश्वेरासी ॥१७॥
ऐसी शत वर्षे जात । तेव्हां गणनायक तुष्ट होत । देवांसी वर देण्या प्रकटत । भक्तिभावें प्रसन्न तो ॥१८॥
सौम्य तेजयुत गजानन । आखुवाहन तेजपूर्ण । चतुर्बाहुयुक्त मुदित मन । महोदर गणपति ॥१९॥
एकदंत विशालाक्ष शूर्पकर्णधर । सिद्धिबुद्धींचा पति उदार । शेषनाग नाभीवर । चिंतामणि त्याच्या गळयांत ॥२०॥
नागयज्ञोपवीतयुक्त । ऐसा तो गजानन प्रकटत । देव देवर्षींच्या पुढयांत । तेव्हां त्यांना मोद झाला ॥२१॥
यथाशास्त्र विधानें पूजा करित । भक्तिभावें त्यास वंदित । कर जोडोनि स्तुति करित । यथामति ते देव ऋषि ॥२२॥
गणनाथासी महोदरासी । अनाथासी सर्वनाथासी । बुद्धिसिद्धींच्या नाथासी । अनादीसी नमन असो ॥२३॥
ढुंढीसी हेरंबासी । स्वभक्ता सर्वदात्यासी । चतुर्बाहुधरासी । शूर्पंकर्णासी नमन असो ॥२४॥
लंबोदरासी विघ्नेशासी । विघ्नवारणसी गजानासी । आखुवाहासी महात्म्यासी । एकदंतासी नमन असो ॥२५॥
शेषनाभिस्थितासी । महागणपतीसी सर्वकारणासी । भक्त वांछिती ज्या विघ्नहरासी । मायाश्रयासी नमन असो ॥२६॥
मायाधारकासी महाभुजासी । अभक्तांच्या इच्छा दाहकासी । योगपतीसी योगदात्यासी । अव्ययासी नमन असो ॥२७॥
स्वानंदवासीसी योगाकारासी । नमन आमुचें महोदरा तुजसी । सर्वांच्या जठरांत तू राहसी । भोग भोगिसी नानाविध ॥२८॥
परी तुझ्या उदरांत भोक्ता नसत । अन्य कोणी भोगरत । म्हणोनी महोदर प्रख्यात । देह आत्म्यांत बोधब्रह्म तूं ॥२९॥
तुझें रुप ज्यासी ज्ञात । ऐसा कोण असे जगांत । परी भक्तवत्सला तूं माझ्या पुढयांत । प्रकटलास हें महाभाग्य ॥३०॥
भक्तवत्सल तू प्रकटलास । आम्हां कृतार्थ केलेस । धन्य आम्ही तूं दिसलास । सर्वोदर विलासकर ॥३१॥
महोदर तूं प्रसन्नात्मा । साक्षात्‍ ब्रह्मपति परमात्मा । गणाधीशा स्तुति करितां आत्मा । वेदादींचा जेथ हरला ॥३२॥
तेथ आम्हीं काय करुं स्तुति । योगगम्या सनातना मी मूढमती । परी तुझापुढें प्रणाम करुन चित्तीं । सदैव तुजला स्मरण करुं ॥३३॥
रवि म्हणे ही स्तुति ऐकत । गणेश तेव्हां सुतोषित । भक्तिभावें नियंत्रित । म्हणे तयांसी वर मागा ॥३४॥
सर्व देवेशांनो मागा ईप्सित । मुनींनो सांगा इच्छित । देईन सर्वही भक्तितुष्ट । तुमचें स्तोत्र मज प्रिय सदा ॥३५॥
जो हें नित्य वाचील । अथवा जो हे ऐकेल । त्यास सर्वसिद्ध लाभतील । यात संदेह कांहीं नसे ॥३६॥
गणेशाचें वचन ऐकत । देव मुनिगण हर्षभरित । प्रणाम करुन तया प्रार्थित । देवदेवेशा जर तूं प्रसन्न ॥३७॥
तरी तुझी भक्ति अविचल । दृढ करि चित्तांत विमल । मोहासुर माजला झाला सबल । तयासि हनन करावें ॥३८॥
त्या दुष्टानें स्थानभ्रष्ट केलें । आम्हां सर्वांसी धिक्कारिलें । कर्महीनत्व मुनींना आलें । ब्रह्मांड जिकिलें मोहासुरें ॥३९॥
लोक झाले अति दुःखित । त्यांना करावें पुन्हा सुखित । मोहासुरा मारुन जगांत । गर्वाचें घर खाली करावें ॥४०॥
स्वामी आम्हीं करितों नमन । मोहासुराचें करावें हनन । वांछा आमुची पुरवून । भक्तवात्सल्य प्रकट करा ॥४१॥
ओमिति श्रीदमात्न्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते देवर्षिवरप्रदानं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP