मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूर्य कथा पुढती सांगत । काशींत झालों पुन्हा जीवित । लोलार्क नामे झालों ख्यात । विस्मित झालों मानसीं ॥१॥
मी सर्वांचा आत्मा असत । तरी मजसी कैसे मरण येत? । मी मरता जगांत । जीवन कैसें संभवलें? ॥२॥
आतां मज कोणी केलें जीबित । माझ्या मनीची सरली भ्रांत । मी जगाचा आत्मा असत । गर्व हा मज व्यर्थ होता ॥३॥
म्हणोनि मी जाईन वनांत । सर्वसंग सोडून सांप्रत । ज्याच्या आधारें हें विश्व चालत । त्याचें भजन नित्य करीन ॥४॥
ऐसा विचार करीत । जेव्हां निघालो वनाप्रत । तेव्हां मार्गी ब्रह्मा भेटत । सांत्वन करी तो वेदवाक्यें ॥५॥
सूर्या ऐक रहस्य अद्‌भुत । सर्वांचा तूं शांतिदाता असत । तपश्चर्ये होशील शांत । वृथा परिश्रम कां करिसी? ॥६॥
तूं सर्व भूतांचा आत्मा असत । तुझ्या आधारें जग वर्तत । आत्म्यासी मरण न संभवत । ब्रह्मवेत्ते ऐसें म्हणती ॥७॥
नानाविध ब्रह्में उद्‌भवती । त्यांचा नायक तो ब्रह्मणस्पती । गणनायक जगाचा अधिपती । योगरुपें सर्वत्र असे ॥८॥
कश्यपात्मजा तो असत । तरी विश्व कैसे नष्ट होत । कश्यपघरीं तूं जन्मत । वरदान प्रभावानें ॥९॥
अज्ञानानें विसरलास । गणाधिपा न पूजिलेंस । म्हणोनि विघ्नें कष्टलास । जगदात्म्या तुज मरण आलें ॥१०॥
आतां त्याचें करी भजन । तेणें दूर होईल विघ्न । सूर्या संपूर्ण शुभ लाभून । गाणपत्य तूं होशील ॥११॥
योगशांती तुज लाभेल । ऐसें ब्रह्माचें वचन अमल । गणराजाचें विचेष्टित विमल । सांगा मज पितामहा ॥१२॥
स्वामी बोध केला मजप्रत । संशय दूर करावा त्वरित । जरी गणेश शांतियोगयुक्त । विघ्नें तरी तो कां आणतो? ॥१३॥
तें ऐकून ब्रह्मा म्हणत । विकारी प्राण्यासम विघ्नें निर्मित । तैसाचि गणेश दूर करित । विघ्नें हेंही कैसें घडे? ॥१४॥
महाप्राज्ञा सूर्या तुज सांगेन । सांप्रत तुज मी तें ज्ञान । जें ऐकता संशय हरुन । गणेशभक्त तूं होशील ॥१५॥
गणेश पूर्ण योगशांतिमय देव । नानाविध रची विश्व । हे निश्चित परी भ्रांतिस्वभाव । मोह भुलवी जग ब्रह्मासी ॥१६॥
त्यांचा मोह नष्ट करण्यास । योगशांति त्यांना देण्यास । योगमार्ग निर्मी सुरस । योगसेवेनें शांतिप्रद जो ॥१७॥
तेथ त्याचें कलांश गर्वित । ब्रह्माकार शिवादी स्वनामांत । त्यांचा गर्व हरण्या निर्मित । विघ्नें तेव्हां गजानन ॥१८॥
त्यांस शांतिप्रदानार्थ विघ्नदाता । विघ्नें तयांसी दावितां । गर्वहीन होत होऊन तत्त्वता । योगशांती इच्छिती ते ॥१९॥
योगशांति असे शाश्वत । मूलभूत सर्व जग ब्रह्मांप्रत । सूर्या महायोग साधित । तेव्हां शांतिरुप ते होती ॥२०॥
तदनंतर विघ्न हरण करित । ढुंढी देव तयांचें सतत । विघ्नेश्वरा भजती अविरत । भक्तिभावें तदनंतर ॥२१॥
योगशांतिमय पूर्ण निर्मित । म्हणोनी विघ्नें जगांत । देवर्षी साधू दुष्टांप्रत । विघ्नार्थ विघ्ने न निर्मी ॥२२॥
ब्रह्माचें ऐकून वचन । सविता म्हणे प्रसन्न मन । जेणें करावें योगसाधन । ऐसा विधि मज सांगा ॥२३॥
सर्वज्ञा मज गणेश प्राप्ती । जेणें होईल ऐसी योगरीती । गणेश मी होऊन निश्चिती । सांगावी मज भक्तातें ॥२४॥
ब्रह्मा म्हणे उत्तम प्रश्न । विचारिलास तूं कश्यपनंदन । जाणसी तरी सर्व विसरुन । एकमनें ऐक आतां ॥२५॥
मायाशक्ति असद्‌रुपा असत । भेदाकारा ती वर्तत । महामते सर्वात्मा सतत । सद्‌रुप तूं जाणावा ॥२६॥
त्यांचा निर्माता सदानंद । विष्णु साम्ययुक्त विशद । ज्यांत नसे सत्‍ असत्‍ आनंद । तो शिव त्रिहीन असे ॥२७॥
त्या चारांच्या संयोगें होत । स्वानंद जगीं परिकीर्तित । स्वानंदाहून परब्रह्म नसत । अन्य संयोगात्मक जें ॥२८॥
तोच गणराज मायाखेलक । संयोग अभेदभांवे पालक । जग ब्रह्मांत शांतिदायक । सदैव तो स्थित असे ॥२९॥
अयोगांत मायाहीन । गणेश ब्रह्मवाचक असून । सर्व संयोगहीन पावन । समाधि सुखदाता प्रभू ॥३०॥
संयोग अयोगांचा योग । गणेश हा शांतियोग । योग शांतिप्रद प्रयोग । शांतीची शांती तो ख्यात ॥३१॥
मनोवाणीमय सर्व असत । गकार अक्षरें उक्त । मनोवाणीविहीन वर्तत । तें तें जाण णकाराज ॥३२॥
त्या गणांचा स्वामी असत । गणेश ब्रह्मांचें ब्रह्म प्रख्यात । सामवेद ऐसें सांगत । त्यास भजावें सूर्या तूं ॥३३॥
त्याची द्विविधा माया असत । सिद्धिबुद्धिपुरा जगांत । त्यांच्या साधनें हा खेळत । नानार्थास्तव गणनायका ॥३४॥
चित्त पंचविध असत । बुद्धिरुप सूर्या हें विस्मित । सिद्धि ऐश्वर्य भोगयुक्त । पांच भेद तियेचेही ॥३५॥
त्यांचें बिंबिस्वर असत । तें नष्ट करी योगसेवेंत । तेणें शांति योग प्राप्त । तुज होईल निःसंशय ॥३६॥
ऐसें सांगून षडक्षर देत । गणेश षडक्षर मंत्र तयाप्रत । विधियुक्त पूर्ण जो आचरित । सूर्य जाउनी एका वनीं ॥३७॥
विधीस प्रणाम करुन । उग्र तपश्चर्या करुन । निराहार परायण होऊन । जपत होता मंत्र हृदयीं ॥३८॥
गणेशासी चित्तीं ध्यात । ऐशी वर्षसहस्त्रें जात । तेव्हां गजानन प्रसन्न होत । भक्तिभावें प्रकत होई ॥३९॥
आपुल्या गणांसहित । प्रकटून बोध दे सूर्याप्रत । विघ्नप साक्षात्‍ आदरयुत । भानूसी शांतियोग शिकवी ॥४०॥
गणेश म्हणे सूर्या सांप्रत । वर माग जे इच्छित । ते सर्व मी देईन तुजप्रत । महाभाग मी प्रसन्न ॥४१॥
गणेशवाणी ऐकत । तेव्हां सविता जागृत होत । तपश्चर्या सोडून पहात । प्रत्यक्ष पुढयांत गजानन ॥४२॥
भक्तीनें तो प्रणाम करित । परी वाटे त्यास भ्रान्त । म्हणे सत्य हें कां स्वप्न असत । स्तुति करी कर जोडून ॥४३॥
सूर्य म्हणे विघ्ननाथा नमन । दुरात्म्यांसी विघ्नकर्त्या वंदन । भक्तविघ्नहर्त्या अभिवादन । तुज करी मीं पुनःपुन्हा ॥४४॥
चतुबहिधरासी मूषकवाहनासी । नागयज्ञोपवीतीसी । नाभिशेषासी महोदरासी । सिद्धिबुद्धियुता नमन ॥४५॥
शूर्पकर्णासी सर्वासी । एकदंतासी गजवक्त्रधरासी । भालचंद्रासी चिंतामणिधरासी । रक्तांबरासी नमन असो ॥४६॥
रक्तवर्णासी अमेयासी । नानाभूषणयुक्तासी । नानालीलाकरासी । अनाधारा नमन तुला ॥४७॥
सर्वांच्या आधारासी  । स्वानंदवासी नमन तुजसी । इक्षुसागर खेलकासी । हेरंबा तुज मी वंदित ॥४८॥
लंबोदरासी ब्रह्माधीशासी । जगत्‍ ब्रह्मपात्रासी । निराकारासी सर्व पालकासी । साकारा ढुंढे तुज नमन ॥४९॥
साकारनिराकारा योगासी । योगशांतिप्रदा तुजसी । योगशांतिमया योगेशा तुजसी । योग्यांस योगदात्या नमन ॥५०॥
ऐसें सूर्य भक्तिसयुक्त । जेव्हां गणेशाचें स्तवन करित । बाष्पकंठ अकस्मात । रोमांचयुक्त तो होई ॥५१॥
सूर्याचा देह पुलकांकित । भक्तिमग्न तो शांत वसत । त्यास गणनाथ तेव्हां म्हणत । भक्तितरस परिप्लुत ॥५२॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र जगांत । भुक्तिमुक्तिप्रद निश्चित । माझी प्रीती वाढवील सतत । इच्छितप्रद सर्वांसी ॥५३॥
वाचक श्रोते लाभतील । मनोवांछित जें जें असेल । त्यांचा आनंद वाढेल । माझ्या वरदानप्रभावानें ॥५४॥
तुझ्या स्तोत्रें मी तोषित । तपानें मी प्रसन्न असत । माग वर जें हृदयी वांछित । देईन सर्व तें निश्चित ॥५५॥
ऐसें ऐकून गणेशवचन । भानू भक्तिपरायण । गणाधीशा हर्षनिर्भर मन । म्हणे दृढ करा भक्ति माझी ॥५६॥
जेव्हां जेव्हां स्मरण करीन । तेव्हां दर्शन देऊन । जें जें जेव्हां इच्छीन । तें तें सफल जगीं होवो ॥५७॥
तथास्तु म्हणून गजानन । त्वरित पावले अन्तर्धान । मीं तेथ राहिलों खिन्न । वालखिल्य ऋषींनो ॥५८॥
नंतर गणेशमूर्ती एक स्थापित । आदरें मीं ब्राह्मणसहित । भक्तिभावें पूजन करित । त्या स्थानीं मीं सर्वांसह ॥५९॥
नंतर स्वगृहीं परतून । मूर्ती गजाननाची बनवून । आता पूजी गजानन । सदैव मी परमानंदे ॥६०॥
हें सर्व माझें चरित । अनुभवयुक्त कथिलें सांप्रत । वालखिल्यांनो सांगा मजप्रत । आणखी काय इच्छा असे? ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते सूर्यवरप्रदानं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP