मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६५

खंड २ - अध्याय ६५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढती सांगत । तो दुर्मती दैत्यही ससैन्य येत । रथारुढ महातेजयुक्त । शस्त्रास्त्र सज्ज रणांगणी ॥१॥
दुर्मति गणपतीस पाहत । क्रुद्ध झाला अत्यंत । आपुल्या सैन्या आज्ञापित । देवांचें हनन करा म्हणे ॥२॥
नंतर देव दैत्य अतिदारुण लढत । सात दिवस अविरत । देवसेना भग्न होत । भयभीत पळे दश दिशा ॥३॥
शंकर कोपयुक्त लढत । विष्णु देवेंद्रही शौर्य दाखवित । परी त्या सर्वासी करी मूर्च्छित । अनेक देवा मारिलें ॥४॥
हा पाहून हाहाकार । गणराज रुष्ट होत फार । मूषकावरी बसून सत्वर । संग्रामार्थ स्वतः निघाला ॥५॥
त्यास पाहून आरक्तनयन । दुर्मति बोले उद्धत वचन । मूर्खभावें युद्धा आगमन । वृथा केलेंस गणेशा तूं ॥६॥
एकाच बाणानें ठार मारीन । पहा माझा पुरुषार्थ महान । ब्रह्मांड विजेत्यास जिंकणें न भाग । बालिश गप्पा तूं अज्ञानें ॥७॥
अग्न्यथा परत जा त्वरित । मग ना मारीन तुला रणांत । तूं बालक अससी अज्ञानांत । म्हणोनि दया दाखवीन ॥८॥
ऐसें त्या दुर्मतीचें वचन । उग्र उद्धट ऐकून । पुष्टीचा पति प्रतापवान । म्हणे हसोनी तयासी ॥९॥
अरे दुर्मते गर्व न करी । ऐक माझें वचन सत्वरीं । ठार मारीन तुज मी भारी । पौरुष महान माझें असें ॥१०॥
दुर्मती त्याचें बळ न जाणत । अविचारें धावून जात । गणेशाचा दात ओढित । क्रोधें मोडिला त्या वेळीं ॥११॥
महाबळ तो वाम दंत । मोडून टाकी रणांगणांत । धरणीपृष्ठावरुनी उचलित । तोचि भग्नदंत आपुला ॥१२॥
त्या दंतानेंच प्रहार करी । दुर्मतीचे शिर चूर्ण करी । पुष्टपति देवां सावध करी । म्हणे दैत्येश मारिला मीं ॥१३॥
दैत्यगण सारे पळून जात । आश्रयार्थ दश दिशांत । अनेक जात पाताळांत । भयभीत अत्यंत होवोनी ॥१४॥
देवेश्वर मुनी सावध होत । सर्व हर्षयुक्त । पुष्टिपतीची पूजा करित । स्तुतिस्तोत्र त्याचें गाती ॥१५॥
जय जयाजी गणाधीशा । विघ्नहरा अव्यया पुष्टीशा । ढुंढे सर्वोत्तमा सर्वेशा । जय अनंता गुणाधारा ॥१६॥
जय सिद्धिप्रदा शांतिप्रदायका । ब्रह्मेशा सर्वज्ञा योगात्मका । सर्व प्रियकर्त्या वेदज्ञा विनायका । जय जय स्वानंदवासी तूं ॥१७॥
जय जय वेदांतवादज्ञा । जय जय वेदांतकारणा । जय बुद्धिवरा प्राज्ञा । सर्व अमरां प्रिय अससी ॥१८॥
जय जय मायामया गजानना । लंबोदरा अव्यक्ता दुर्मतिनाशना । जय जय साक्षी भयनाशना । एकदंतहस्ता जय जय ॥१९॥
जय एक रदधारका । जय योगिस्थहृदया पावका । ब्राह्मणपूजित ज्ञानप्रदायका । जय जय कर्मतपोरुपा ॥२०॥
जय जय महाभागा पूर्ण मनोरथा । जय जय आनंदा निःस्वार्था । जय जय पाशांकुशप्रिया सर्वथा पशुधरा पावना जय ॥२१॥
जय भक्तां अभयप्रदां अध्यक्षा । जय भक्तमहाप्रिया महायक्षा । भक्तेशा विघ्नेशा करी रक्षा । महोदरी नाथा गणनायका ॥२२॥
सकलात्मका तुला नमन । भवमोचना तुज वंदन । अति सुखप्रदा अभिवादन । विनत आम्ही भक्तीनें ॥२३॥
ऐशी स्तुति करुन । गणाधीशा करिती वंदन । हर्षनिर्भर नर्तन । सुरषीं तेव्हां करिती सारे ॥२४॥
त्यांचा महोत्सव पाहत । तेव्हां महाप्रभु त्यास म्हणत । पुष्टिपती भक्तिप्रियंकर भक्तांप्रत । तुमच्या स्तोत्रें प्रसन्न मीं ॥२५॥
जो हें स्तोत्रें नित्य वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्याचें सर्व कार्य सिद्ध होईल । अंतीं सायुज्य मुक्ति मिळे ॥२६॥
ऐसें वरदान देऊन । गणेश्वर पावला अंतर्धान । देव मुनी विस्मित मन । आपापल्या गृहीं परतले ॥२७॥
पूर्वींसम सुखांत मग्न होत । स्वलोकांत ते आनंदांत । आपुले मुनिधर्म आचरित । आश्रमवासी समस्त जन ॥२८॥
स्वधर्मीं राहून भजती । गजाननासी पूजिती । शिव शक्तिसंयुक्त घ्याती । गणपतीस स्वहृदयांत ॥२९॥
गणेशाची मूर्ति करुन । करिती आदरें स्थापन । वैशाख पूर्णिमेस उत्सव महान । विजेयोत्सवाची ती स्मृति ॥३०॥
तेथ सिद्धि शिवास लाभत । म्हणोनि सिद्धाश्रम नाम ख्यात । देवर्षीसी परम पुनीत । तीर्थक्षेत्र तें स्थान ॥३१॥
तेथ उपासना करिती । देव ब्रह्मर्षि सिद्धि लाभती । सनकादी महात्मे होती । गणेशभक्तींत मग्न तेथें ॥३२॥
या संबंधीचा इतिहास । अगस्त्य ब्रह्मदेव संवादें सुरस । वर्णन करीन सोल्हास । एकदा अगस्त्य तप करी ॥३३॥
होता तो मग्न अपश्चर्येत । लोपामुद्रा पत्नी सेवारत । राजपुत्री ती पातिव्रत्ययुक्त । सुकुमार झाली आकर्षित ॥३४॥
सेवनोत्सुक ती होत । तेव्हां सर्वांग झालें रोमांचित । घाम फुटला रजप्रभावयुक्त । जटायुत मस्तक होतें ॥३५॥
तिज पाहून मुनिसत्तम । वर माग म्हणें मी देईन । तेव्हां ती म्हणे अधीर मन । राजभोगयुक्त ऋतू द्यावा ॥३६॥
राजैश्वर्य मिळविण्या तो जात । सार्वभौम राजाप्रत । दिलीप त्यासी विचारित । केवढी धनेच्छा तें सांगा ॥३७॥
तापसोत्तमां सांगा इच्छित । मागाल तें धन देईन निश्चित । मुनिसत्तम तें ऐकून म्हणत । उरलेलें धन दे पुष्कळ ॥३८॥
दिलीप त्यास पुनरपि सांगत । महाभागा संख्या सांगा त्वरित । मूनिशार्दूल तया म्हणत । दरिद्रया तुझें धन नको ॥३९॥
मी जरी तुझें घेतलें धन । तरी पीडित होतील प्रजानन । म्हणोनी माझ्या सर्व शोधण्या धन । राजांसह अन्य चलावें तूं ॥४०॥
तेव्हां दिलीप नृपति सांगत । अगस्त्य मुनीस वृत्तान्त । वातापि नामा दैत्य असत । द्रव्य अगणित त्याचे जवळीं ॥४१॥
देवांसी तो अजिंक्य असुर । अवध्य म्हणोनी करी अत्याचार । ब्राह्मणां मारी नित्य उग्र । पशुबळी देत इल्वलाचा ॥४२॥
कर्ममूळें उखडून टाकित । देवांचें निधन तो वांछित । अखिल ब्रह्माधार कर्म विनाशित । इल्वल त्याचा अनुज असे ॥४३॥
तो वरदान प्रभावें उदरांत । ब्राह्मणांच्या सत्वर जात । वातापी बोलावी तें येत । पोट त्यांचें फाडून ॥४४॥
नखानें ब्राह्मणांचें उदर । विदारण करी तो उग्र । ब्राह्मणां देऊन भोजन मधुर । वध करी वातापी ऐसा तो ॥४५॥
म्हणोनि योगींद्रा तूं जावें । त्या वातापीसी मारावें । द्रव्यनिधि सर्व लुटावें । जिंकावें वातापीस इल्वलासह ॥४६॥
दिलीपाचें ऐकून वचन । अगस्त्य हर्षयुक्त मन । राजे ब्राह्मणांसह तत्क्षण । वातापीकडे निघाला ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पुष्टिपत्युपाख्याने अगस्त्यस्य द्रव्यप्रयत्नो नाम पंचषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP