मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ५९

खंड २ - अध्याय ५९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । यमाचें वचन ऐकत । सविता झाला विस्मित । धर्मशीलाचा क्रोध विपरीत । मातेचा शाप बांधेल ॥१॥
माता आपुल्या पुत्रास । भेदबुद्धीनें शापित । कांहीं कारण विपरीत । याच्यामागें असेल ॥२॥
तें अंतर्ज्ञानें जाणत । सूर्य यमासी सांगत । शाप मिथ्या करण्या नसत । बाळा शक्ती मजजवळी ॥३॥
मातेचा शाप निवारण्यास । तूं करी विनायकभक्तीस । तो प्रसन्न होतां तयांस । अशक्य कांहीं न जगीं ॥४॥
तुजला सुख लाभेल इच्छित । शापप्रभाव नष्ट होईल त्वरित । ऐसें सांगून सुताप्रत । पंचाक्षर मंत्र उपदेशी ॥५॥
विधियुक्त मंत्र गणेशाचा । वनांत जाऊन जप तयाचा । यमधर्म करी साचा । तपश्चयीं घोर करी ॥६॥
सविता छायेप्रत जात । छायेसी क्रोधें विचारित । संज्ञा कुठें सांग त्वरित । अन्यथा शाप देईन ॥७॥
छाया झाली भयभीत । सूर्यास सांगे सत्य वृत्तान्त । आपुल्या पित्याच्या घरीं असत । मज येथ ठेवूनी प्रभो ॥८॥
तिच्या सत्य भाषणें तुष्ट होत । सूर्य तिजला शाप न देत । क्रोधें विश्वकर्म्याच्या घरीं जात । दिवाकर सूर्यनारायण ॥९॥
त्यास प्रणाम करित । विचारी रक्तलोचन वृत्तान्त । विश्वकर्मा सांत्वन करित । युक्तिपूर्वक सूर्याचें ॥१०॥
विश्वकर्मा त्यास सांगत । संज्ञा आली मम गृहाप्रत । निर्भर्त्सना करुन पाठवित । परत मी ऐसा इतिहास ॥११॥
मीं तिज परत पाठविलीं । तदनंतर ती येथ न आली । मायाबळें असेल राहिली । गुप्तरुपें कुठे तरी ॥१२॥
तुझ्या उग्र तेजें तप्त । शुष्क शरीर होऊन अत्यंत । गेली असह्य होऊन जीवित । म्हणोनि सौम्य होई तूं ॥१३॥
तेज सौम्य करुन । करी संज्ञेचें समाधान । तेव्हां सूर्य तयासी वचन । म्हणे आपण विश्वकर्मा ॥१४॥
आपणाचि सौम्य तेज माझें करावें । नूतन रुप मज द्यावें । यंत्रात घालून कापावें । तेज माझें जें प्रखर ॥१५॥
घालून आपुल्या यंत्रांत । सूर्याचें तेज त्वरित । सौम्यत्व तयासी आणित । नंतर सूर्य परतला ॥१६॥
संज्ञेचा शोध घेत । तीस पाहे अश्विनीरुपांत । वनांत होती जी हिंडत । सूर्य तेव्हां युक्ति करी ॥१७॥
स्वयं अश्वरुप घेत । संज्ञेत पकडण्या जात । त्यासी परपुरुष मानून मनांत । धावा करी ती गणेशाचा ॥१८॥
सूर्य जेव्हां आपुले वीर्य तिच्यांत । आदरें झणीं अर्पित । आपुल्या श्वासंतून बाहेर टाकित । रवीचें वीर्य संज्ञा तें ॥१९॥
परपुरुषाचेम वीर्य समजून । विमनस्कपणें तें त्यागून । करी तयाचें निर्भर्त्सने । परी सविता मानसीं तोषला ॥२०॥
तिचा दृढ निष्ठाभाव पाहत । स्वरुप सविता दाखवित । तीस घेऊन स्वगृहीं जात । तदनंतर काय झालें ॥२१॥
संज्ञेनें जें सूर्यवीर्य टाकलें । त्यांतून दोन सुत जन्मले । अश्विनीकुमार ख्यात झाले । देववैद्य जे सुरुपयुक्त ॥२२॥
सर्वमान्य ते होत । श्रेष्ठ भिषग्वर्य त्रिभुवनांत । गणेशभक्तिभावें लाभत । संज्ञसेही परम सुख ॥२३॥
त्याचेंच अनन्य मनें भजन करित । यमही तप दारुण करित । निराहार तो राहत । गणेशजप ध्यान पर ॥२४॥
ऐशीं एक सहस्त्र वर्षें जात । तेव्हां गणेश प्रसन्न होत । त्यास वर देण्या प्रकटत । यमधर्म स्तुति करी ॥२५॥
गणपते तुज नमन । नाना मायाविलासयुक्ता वंदन । मायाधारक वेषयुक्ता आंभवादन । ब्रह्मरुपा पुनःपुन्हा ॥२६॥
मायामोह विहीनासी । साक्षीस जगदादीसी । ब्रह्मवेत्यासी ब्रह्मदीसी । अनंता तुला नमन असो ॥२७॥
हेरंबासी ढुंढीसी । विघ्नेशासी त्रिनेत्रधरासी । लंबोदरासी गजाननासी । देवपतीसी नमन असो ॥२८॥
देवांच्या गर्व हर्त्यासी । राक्षसांच्या मर्दकासी । भक्तिप्रियासी अनंताननासी । नाना सौख्यदात्या नमन ॥२९॥
अनंतहस्तासी अनंतशिरासी । ब्रह्मभूतासी शिवासी शिववंद्यासी शिवप्रदासी । वेधसा तुला नमन असो ॥३०॥
अखंड विभवासी मूषकध्वजासी । मूषकश्रेष्ठवाहनासी । एकदंतासी सर्वाकारासी । आदिमध्यांरुपा नमन ॥३१॥
पाशांकुशधारकासी । सर्वभोक्त्यासी देवासी । योगाकारस्वरुपासी । पुनः पुन्हा वंदन माझें ॥३२॥
तुझें करण्या स्तवन । समर्थ कोण सुमन । म्हणोनि मी भक्तियुक्त मन । तुज नमितों तुष्ट होई ॥३३॥
धन्य मी सर्वभावें जगांत । गणेश्वर पाहिला प्रत्यक्ष पुढयांत । आतां रक्षण करी मी शरणागत । भक्तवत्सला गणेशा ॥३४॥
ऐसी स्तुति ऐकून । गणनायक बोले वचन । सूर्यपुत्र यमासी प्रसन्न । वर माग महाभागा ॥३५॥
भानुज यम तेव्हां मागत । गजाननपदीं प्रेम अत्यंत । सुदृढ व्हावें सतत । मातेचा शाप नष्ट व्हावा ॥३६॥
जें जे मी इच्छित । तें तें व्हावें सफल जगांत । विघ्नपा ऐसें वरदान याचित । तथास्तु म्हणे गणपति ॥३७॥
गजानन म्हणे तयाप्रत । माझी भक्ति तुझ्या चित्तांत । दृढ होईल निश्चित । परी मातृशाप अटळ असे ॥३८॥
शापपयोगें किंचित्‍ दुःख होईल । तुझा पाय एक सुजेल । त्यांत किडे होऊन ते पडतील । पडतील भूमीवर ॥३९॥
तुझा पाय बरा होईल । सर्व दुःख नष्ट होईल । जें जें इच्छिसी तें तें मिळेल । सुलभपणें तुजलागीं ॥४०॥
प्राज्ञा दक्षिण दिशेंत । तूं दिक्पाल होशील निश्चित । धर्मराज नामें ख्यात । सर्वत्र सुपूजित ॥४१॥
स्वधर्मपालकांत श्रेष्ठ होऊन । धर्मकर जनीं प्रसन्न । जीवां कर्म योगें फळदाता पावन । होशील तूं यमधर्मा ॥४२॥
तुझी आज्ञा त्रैलोक्यांत । धर्मभावें पाळतील सतत । तूं केलेलें स्तोत्र अत्यंत । सिद्धिप्रद सर्वांसी ॥४३॥
जो वाचील अथवा ऐकेल । त्याचे मनोरथ पुरतील । यमयातना घोर वाचतील । स्तोत्र हे नित्य वाचितां ॥४४॥
अंती स्वानंद लोकीं नेईन । ऐशा भक्तावरी मी प्रसन्न । तूं जेथ केलें नित्य स्नान । माझ्या भक्तिभावयुत ॥४५॥
तें गणेशतीर्थ होईल । कुंड तें अत्यंत पावनकर । स्नानमात्रें त्यांत हरेल । सर्व पाप स्नानकर्त्याचें ॥४६॥
सुबुद्धि सत्वर लाभेल । प्राणी अन्तर्बाह्य अमल । ऐसें बोलून विमल । गणेश झाले अन्तर्धान ॥४७॥
यमधर्म त्या क्षेत्रांत । हेरंबाची मूर्ती स्थापित । बोलावून महापंडित । कुंड बांधिलें गणेशाचें ॥४८॥
गणेशपद लांछित । तेथ हा हेरंब गणप झाला ख्यात । गणेश तीर्थी पाशमुक्त । यम झाला तदनंतर ॥४९॥
रविनंदन तो सतत । गणपतीस ध्यात चित्तांत । समभाव सर्वत्र वाटत । सर्वमान्या महायशासी ॥५०॥
ऐसें हें दिव्य चरित्र । सांगितलें कुंडसंभव पवित्र । रचिता धन्य सूर्यपुत्र । सर्वसिद्धिकर क्षेत्र हे ॥५१॥
यमाचें हें माहात्म्य ऐकत । अथवा नर जो वांछित । शुभद तें होईल जगांत । सर्व इच्छा पुरतील ॥५२॥
आतां ऐक दैत्येंद्रा कथानक । प्रल्हादा भरुशुंडीचें उद्‌बोधक । पापघ्न वांछितार्थदायक । ऐसें म्हणे गृत्समद ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते कुंडसंभवचरित्रं नामैकोनषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP