मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २५

खंड २ - अध्याय २५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः। मुद‍गल कथा पुढें सांगती । धर्ममार्ग प्रजेसी तो शुद्धमति । शिकवी पृथुराजा जगतीं । विष्णुरुप विष्णुतुल्य ॥१॥
लोकांचें करित रंजन । आपुल्या पुरांत विराजमान । एकदा योगींद्र प्रसन्नमन । सनकादी विधिपुत्र ॥२॥
सूर्यसंकाश ते चार येत । सदा बालयान्वित । प्राचीनांचे पूर्वज असत । मान्य गतभ्रांती ते ॥३॥
त्यांस पाहून सहसा उठून । नरोत्तम संभ्रमें करी वंदन । साष्टांग भक्तिभावें करुन । तेव्हा वरती उठविती ते ॥४॥
अर्ध्यंपाद्यादिक पूजा करित । विधिपूर्वक तो प्रसन्नचित्त । त्यांचें पादसंवाहन करित । आदरपूर्वक त्या वेळीं ॥५॥
मधुर वाक्य विशारद बोलत । पृथु म्हणे धन्य धरणी होत । धन्य माझें नगर समस्त । आपुल्या आगमनें आज ॥६॥
धन्य वंश धन्य कुल । धन्य माता पितरें विमल । धन्य ज्ञान आश्रम अमल । तप विद्यादिक धन्य ॥७॥
आपुल्या चरणांचें दर्शन । होऊन सनाथ मी पावन । आपण दयाळु येथ येऊन । अनुग्रह थोर केला असे ॥८॥
पूर्वजन्मींचे पुण्य फलप्रद । झालें आज मजसी विशद । नाहींतर ब्रह्मरुप आपुलें सुखप्रद । दर्शन कैसें प्राप्त होय ॥९॥
निःस्पृह योगनिष्ठ जे मुनिवर । स्वपरायण सर्वज्ञ उदार । केवळ दृष्टीनेंच कायार्थ थोर । सफल करिती निःसंशय ॥१०॥
त्यांची आज्ञा हित करित । म्हणोनी आज्ञा करावी सांप्रत । तेणें कृतकृत्य होईन त्वरित । तरेन हा भवार्णव ॥११॥
पृथुचें वचन ऐकून । सनकादी तृप्त होऊन । त्याच्या भावभक्तीनें मुदितमन । योगींद्र ते योगभावित ॥१२॥
सनकादी त्यास म्हणत । नृपवर्या तू धन्य जगात । पृथु राजा तव विनयें चित्त । संतुष्ट झालें आमुचें ॥१३॥
आम्ही मान महामते असत । कार्यलिप्सा नसे मनांत । तुझ्या दर्शनार्थ आलों येथ । स्वर्गीं ऐकून यश तुझें ॥१४॥
जैसी कीर्ति ऐकिली होती । तैसीच येथ येत प्रचिती । म्हणोनि हर्ष वाटला चित्तीं । आतां ब्रह्मलोकीं परत जाऊं ॥१५॥
आज्ञा आम्हांसी द्यावी म्हणत । त्याचें वचन हें ऐकून विनवित । योगींद्रहो राज्य भोगिलें सतत । नानाभोगयुक्त ऐसें ॥१६॥
आता शांतिप्राप्तिसाठीं सांगावा । तपोधनहो योग बरवा । पृथूचा प्रश्न ऐकून सर्वां । योगीश्वरां मोद होय ॥१७॥
त्यास सुपात्र जाणून । शाश्वत ब्रह्माचें कथन । करिती तेव्हां तें मुनिजन । धनधन्य तूं नृपशार्दूलगा ॥१८॥
तुझी बुद्धि परम अद्‌भुत । राज्यभोगांतून विरक्त । योगशांतिमय पूर्ण असत । गणेश देव हे नृपेंद्रा ॥१९॥
त्यास भक्तीनें भजसील । तरी शांतिलाभ तुज होईल । हया योगाची प्रचीती सबळ । आम्हीं पूर्वीं घेतलीसे ॥२०॥
एकदां आम्ही मुनिजन समस्त । गेलों होतो शिवालयांत । तेथ वडाच्या मुळांशीं स्थित । ध्यानस्थ पाहिले शंकर ॥२१॥
त्यास प्रणाम करुन । विनयपूर्वक उभे राहून । स्तोत्रें बहुविध म्हणून । स्तविलें तें महादेवा ॥२२॥
आमुच्या स्तुतीनें झाले जागृत । ध्यानांती गणेशासी नमित । तें ऐकून आम्ही भ्रांत । विचारिलें त्या शिवासी ॥२३॥
कोण हा गणाधिप असत । आपण कैसे तयासी नमत । सहजरुप शिव सतत । स्वाधीन असुनी गणेशा स्तविता? ॥२४॥
आमुचें वचन ऐकून । शिव हर्षनिर्भर होऊन । आम्हांसी करी कथन । आद्य ज्ञान गाणपत्य ॥२५॥
ब्रह्म जें सहज स्वाधीन । तें कैसें पराधीन । कर्मयोगादी भेदें भिन्न । त्रिधा वेदांत वर्णिलें असे ॥२६॥
नानाविध जें ब्रह्म वर्णित । तें सारें मायेनें अन्वित । सकल कर्मांचा संयोग होत । म्हणोनि म्हणती कर्मात्मक ब्रह्म ॥२७॥
सकल ज्ञानांचा संयोग होत । तेव्हां ज्ञानात्मक ब्रह्म म्हणत । समूहवाची गण शद असत । त्यायोगें ब्रह्म समूहक ॥२८॥
अन्न प्राणादिक शब्द असत । ब्रह्माचे वाचक समस्त । ते सर्वरुप गणरुप प्रख्यात । त्यांचा स्वामी गणेश ॥२९॥
संयोग अयोगादी नाना योग । त्या योगांचा जो योग । त्याचें रुप हा गणेश सुयोग । यांत संशय कांही नसे ॥३०॥
योगात्मक गणेश असत । त्याचे गण आम्ही ख्यात । नमितों त्यासी भक्तिसंयुत । ऐसें सांगते शंकर ॥३१॥
माया विघ्नकरी म्हणती । बिंब भावेम भ्रांतिदा जगतीं । विघ्नराज सेवेनें जिंकिती । त्या मायेसी योगीजन ॥३२॥
माया जिंकिता ब्रह्मभूत । होती ते योगींद्र गणेशभक्त । गणेश आणिक मी भिन्न असत । हें मायामय वचन असे ॥३३॥
चित्त पंचविध वर्णित । विविधात्मका बुद्धि असत । तेथ जें ऐश्वर्य असत । परम अद्‌भुत ती सिद्धि ॥३४॥
तेथ बिंबभावें गणेश वसत । बुद्धीसिद्धीनें मोहित । सर्वत्र तो विराजत । बिंबाचा उगम तोचि असे ॥३५॥
बिंबीं भाव सोडून । गणेश सेवेंत रमवितां मन । पंचधा चित्त त्यागून । चिंतामणी स्वयें होय ॥३६॥
मीच गणपति असतां । संयोग अयोगाची काय वार्ता । शांतिनियोगाची प्राप्ती होतां । गणेशाहून मी न भिन्न ॥३७॥
शांतियोग ऐसा लाभत । तेव्हां योगींद्र ब्रह्मभूत होत । ऐसें हें गुहयध्यान तुम्हांप्रत । सांगितलें भक्तिभावें ॥३८॥
म्हणोनि मी गणेशाचा दास सतत । द्विजांनो त्यासी वंदित । ऐसें सांगून विराम पावत । महायोगी शंकर ॥३९॥
आम्हा सनकादींचा संशय फिटत । नृपा, महीवरी आम्ही संचरत । स्वर्गांत तसे पाताळांत । योगमार्गे गाणपत्य ॥४०॥
एकदांगनेश दर्शनीं इच्छा होत । म्हणोनी आम्ही शोध घेत । तेव्हां गणाधीश कश्यपाचा सुत । झाला होता ऐसें कळलें ॥४१॥
काशीराजा महा भक्त । त्याच्या घरीं देव जात । आपुले अवतारकार्य साधण्या त्वरित । म्हणोनी आम्हीं तेथ गेलों ॥४२॥
काशींत जाता गणेश दिसला । ब्रह्मचारी स्वरुपीं तो जाहला । भक्तिपूर्वक प्रणाम केला । बालरुपधर त्या देवासी ॥४३॥
सनकादिक ऋषि ऐसें सांगती । त्या नंतर गणेशाची करिती स्तुति । कश्यपप्रिय सुता विनायका नमिती । अदिती सुता गणेशासी ॥४४॥
ब्रह्मचार्‍यांशी नमन । मायाधारकासी वंदन । भक्तधीनासी अभिवादन । हेरंबा तुज पुनः पुन्हां ॥४५॥
तूं ब्रह्म अससी शाश्वत । ब्रह्मपति देव तेजयुक्त । योग अयोगादि भेदें क्रीडत । यांत संशय अल्प नसे ॥४६॥
आदि मध्य अंत्य रुप । तूं प्रकृति पुरुष निष्पाप । नाद अनाद स्थूल रुप । सूक्ष्म रुप तैसाची ॥४७॥
सुरासुरमय अससी । साक्षात्‍ नरनागरुप घेसी । जळ स्थळादि भेदें शोभसी । गजानना तूं विश्वांत ॥४८॥
सर्ववर्जित मायाहीन । माया मायिक रुप घेऊन । तुज जाणितो ऐसा कोण? । सापडेल या जगतांत ॥४९॥
शंभु मुख्यादि देव थकले । वेदांनींही मौन धरिलें । ऐसे तुझें रुप भलें । कोण वर्णन करुं शकेल ॥५०॥
आम्हीं धन्य आम्हीं धन्य । आमुचें जीवित झालें धन्य । योग्यांच्या कुलदेवदर्शनें धन्य । ढुंढिदेवा धन्य सारें ॥५१॥
ऐसें बोलून धरिलें मौन । केलें साष्टांग त्यासी वंदन । आमुच्या भक्तिभावें तुष्ट होऊन । गणाधीश म्हणती आम्हांसी ॥५२॥
आपण रचिलेलें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । महाभाग तो लाभेल । योगशांती सर्वत्र ॥५३॥
जें जें मनीं वांछील । तें तें सर्वही पावेल । स्तोत्र जो भक्तिभावें म्हणेल । वर त्यांसी मी देईन ॥५४॥
शिवासम आपणही जगांत । गाणपत्य व्हाल प्रख्यात । ऐसें बोलून पुन्हां घेत । बाळरुप गजानन ॥५५॥
कश्यपाचा सुत खेळत । आनंदे बालकांसहित । आम्हें काशीपतीस भेटण्या जात । सत्कार आमुचा त्यानें केला ॥५६॥
नरधिपा तुज सांगितलें । गणेशाचें हें रहस्य भलें । ज्ञानपूर्ण योगशांतिमय असलें । मनन त्याचें करी तूं ॥५७॥
ऐसें सांगून सनकादिक जात । तदनंतर ब्रह्मलोकांत । पुत्रासी राज्य वाटून देत । पृथु नंतर वनांत जाई ॥५८॥
तेथ योगक्रमानें गाणपत्य होत । पत्नीसहीत तो विनीत । अंतीं गणेशांत लय पावत । ऐसें पुण्यप्रद चरित्र त्याचें ॥५९॥
ओमिति श्रीमदान्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते पृथुचरित्रं नाम पंचर्विशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP