मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २

खंड २ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढे सांगती । गणेशाची स्मरुन चित्तीं । ब्रह्मदेव सृष्टिरचना वांछिती । तेव्हा अद्‌भुत जाहलें ॥१॥
त्याच्या शरीरांतून पडत । बाहेर अविद्या क्षणांत । पंचधा भिन्ना स्वयं जात । पाहून ब्रह्मा विस्मित ॥२॥
मनीं दुःखितही होत । ती अविद्या भ्रांतिरुपा असत । अनंत विभवात्मिका आश्चर्ययुक्त । रक्त कृष्ण श्वेत ती ॥३॥
त्रिविध गुणांची जननी । जगत्त्रय विमोहिनी । तिने सर्व विश्वासी मोहुनी । भ्रांतियुक्त तें केलें ॥४॥
पाच प्रकारें जगांत स्थित । तम मोह महामोहरुपांत । तामिस्त्र अंधतामिस्त्र रुपें प्रकटत । विस्तारत सर्वत्र ॥५॥
तम अज्ञान स्वरुप असत । जेणें जग संच्छादित । देहस्वार्थ समायुक्त । भ्रान्त करी मानसातें ॥६॥
मोह कामनायुक्त निर्मित । नानापरीचें कर्म जगांत । कर्म भोगद शरीरविश्व होत । मोहाच्या प्रभावानें ॥७॥
महामोहें निर्मिलें विविध विकर्म । देहभोगार्थ नर करी पाप परम । तामिस्त्राचें फळ रोगदारिद्रयादी अनुपम । आधिव्याधि पीडी जगा ॥८॥
अंधतामिस्त्र प्रभावें पडत । यातनात्मक नरकांत । स्वकर्मदोषें जग भोगित । यातना बहुविध त्या स्थळीं ॥९॥
ऐशी अविद्या गणेशांतें स्मरुन । स्वार्थपर होत उन्मन । नंतर ब्रह्मा तिज निंदून । सृष्टिनिर्माणीं मन लावी ॥१०॥
विधीच्या शरीरातून संजात । चार पुत्र परम पुनीत । सनक सनंदन सनातन प्रख्यात । चवथा सनत्कुमार ॥११॥
त्यांच्या मातृस्वरुपांत । विद्या ज्ञानात्मिका विलसत । बोधरुपा निराकारा साक्षात । आत्ममयी परा शक्ती ॥१२॥
तिज पाहून हर्षयुक्त । पितामह ब्रह्मा होत । तिचे चार पुत्र योगरुप असत । सहज योगधर सनकयोगी ॥१३॥
समयोगधर प्रतापी सनंदन । ज्ञान योगमय योगी सनातन । कर्मयोग स्वरुप सनत्कुमार पावन । रुपक ऐसें जाणावें ॥१४॥
त्या चार पुत्रांस पाहत । जगदीश्वर हर्षयुक्त । गणेशा स्मरुन करा  म्हणत । निर्माणकार्य विश्वांत ॥१५॥
तेव्हां नानाविध योगमार्ग ते निर्मिती । महा ओजस्वी आपुल्या रीती । ती पाहून त्यांची निर्मिती । अभिनंदन करी तयांचे ॥१६॥
त्यानंतर त्यांसी सांगत । आतां योगसृष्टी नका करु जगांत । त्याचें वचन मानून संस्थित । चारही पुत्र शांत बसती ॥१७॥
परी ज्ञानमयी सृष्टि पाहून । विधिचित्तांत कोप निर्माण । क्रोधें त्याच्या ललाटापासून । जन्मला शंभू पुत्ररुपें ॥१८॥
तेजें प्रदीप्त पंचवक्त्रधर । दशबाहू तो त्रिनेत्र । चंद्ररेखा विभूषित अर्धनारीनर । जटाधर महाकाय ॥१९॥
प्राज्ञ त्रिशूलादिधर । व्याध्रांबर गजाजिनधर । सहसा उत्पन्ना होता रोदनपर । शंकर तेव्हा जाहला ॥२०॥
ब्रह्मा त्याचें सान्त्वन करित । म्हणे वृषभध्वजा तूं कां दुःखित । तेव्हां तो पुत्र रडत । म्हणे मजला स्थान देई ॥२१॥
ताता प्रभो मज द्यावें नाम । सर्वेशा कार्य सांगावें अनुपम । तेव्हां धाता त्यासी देई नाम । रुद्र ऐसें रोदनपरासी ॥२२॥
महेश्वरा तू सुखाधार । जन्मलासी शिवा सर्वेश्वर । वरदान प्रभावें माझा पुत्र । शंकर वेषधर तूं झालास ॥२३॥
पृथ्वी जळ तेज वायू असत । आकाश चंद्र सूर्य दीक्षित । आठ स्थानें तुझी जगात । शंकरा तूं अष्टमूर्ति ॥२४॥
तूं शर्व सर्वां फलदायक । अकरा नावें तुझी सुखदायक । देवा गजानना स्मरुन पावक । सृष्टिरचना महेशा करी ॥२५॥
ब्रह्मदेवाचें वचन मानून । गणपतीसी मनी ध्याऊन । नानाविध रुद्रगण । शंभूनें तेव्हां निर्मिले ॥२६॥
अनंत विविधाकार । अमृतात्मप्रधारक उदार । त्यांसी पाहून ब्रह्मदेव सत्वर । म्हणे मर्त्यं प्राणी निर्मी तूं ॥२७॥
जे जन्ममृत्युयुत । ऐसे प्राणी निर्मिण्या मी न इच्छित । ऐसें सांगून विधात्याप्रत । शंभू शान्त बैसला ॥२८॥
तो खांबासारखा अचल बैसत । म्हणोनि तया स्थाणू म्हणत । विधी त्यास परी तो शंभू स्थित । गणपतिभजनीं तल्लीन ॥२९॥
नंतर ब्रह्मा स्वमुखांतून निर्मित । वेदशास्त्र समन्वित । विविध पुराणेंही अल्पावधींत । कर जोडून ती स्तविती त्या ॥३०॥
वेदशास्त्र पुराणांसी विधि सांगत । गणपासी स्मरा चित्तांत । त्याचा वर मिळवुनी समस्त । प्रजा तुम्ही निर्मावी ॥३१॥
तैसें त्यांनी आचरिलें । विविध कर्मयुक्त जग सृजिलें । तें पाहून संतुष्ट झाले । ब्रह्मदेव तयांवरी ॥३२॥
नंतर ब्रह्मा यज्ञ करित । विष्णूचें चिंतन मनांत । आपुला पुत्र होण्या विनवित । विष्णूनेंही तें मानलें ॥३३॥
यज्ञांतून उत्पन्न होत । देव जनार्दन चार भुजयुक्त । कर जोडूनी ब्रह्मदेवा म्हणत । आज्ञा द्यावी काय करुं? ॥३४॥
तेव्हां पिता त्यासी सांगत । सृष्टिरचना करी तूं अद‌भुत । ब्रह्मदेव जेव्हां आज्ञापित । विष्णु माया करीतसे ॥३५॥
गणेशासी स्मरुन । विष्णू करी जगी निर्माण । कर्म समुद्‌भूत यज्ञ पावन । नाना फलप्रद संपूर्ण ॥३६॥
कल्पवृक्षासम ते यज्ञ । पाहून आनंदला ब्रह्मा प्राज्ञ । त्याच्या देहापासून अभिज्ञ । दहा पुत्र तें जन्मले ॥३७॥
मरीची भृगु अत्रि पुलस्त्य । पुलह ऋतु दक्ष अंगिरस स्तुत्य । वसिष्ठ नारद ऐसे वश्य । त्यांसी म्हणे ब्रह्मदेव ॥३८॥
विविध प्रजा निर्माण करा । स्वीकारुनी ती आज्ञा करितों त्वरा । उत्तम वनीं तप करिती निर्धारा । परी नारद म्हणे पित्यासी ॥३९॥
मी देवेशा सृष्टिनिर्मिती । करणार नाहीं निश्चिती । करीन मी गणेशाची भक्ती । मजला अन्यत्र रुची नसे ॥४०॥
मायामय सर्व हें मित्याभूत । भरमात्म्क त्यासाठीं जो श्रमत । तो ज्ञाता असोनि मुर्ख ठरत । यांत नसे मज संशय ॥४१॥
तेव्हां त्यासी पुनरपि सांगत । ब्रह्मदेव विविध प्रजा निर्मी सांप्रत । अंतीं वार्धक्यी भजनांत । पुत्रा निमग्न होई तूं ॥४२॥
तेव्हां नारद म्हणे प्रजापतीस । कां करिता या वृथा बोधास । कोण निर्मितो भ्रांतियुक्त सर्वांस । कोण सनातन आदिभूत? ॥४३॥
तेव्हां ब्रह्मा त्यासी शापित । म्हणे पुत्रा नारदा शूद्रयोनींत । जन्मून तदनंतर गंधर्व तूं । नानास्त्रोभोग विलासी ॥४४॥
नारदही झाला संतप्त । ब्रह्मदेवा शाप देत । तूं अपूज्य जगतांत । होशील वृथा कं शापिलें मज? ॥४५॥
तेव्हां नारद तप करित । एकाक्षर मंत्रें गणेशा तोषवित । ऐसीं दिव्यवर्षशतें लोटत । अन्तीं गणप प्रकटला ॥४६॥
म्हणे नारदा मनोवांछित । वर माग मी प्रसन्नचित्त । सर्वसिद्धींची स्तुति करित । ब्रहयाचा शाप निवारी म्हणे ॥४७॥
हाच वर मजला द्यावा । म्हणे गणराज भक्तवत्सल बरवा । तव पित्याचा शाप करावा । मिथ्या कैसा सांप्रत? ॥४८॥
मीच ब्रह्मदेवा दिला वर । सत्यवचन तूं होय निर्धार । म्हणोनि महाभागा हितकर । वचन माझें ऐक आता ॥४९॥
गंधर्व जेव्हां तू होशील । तेव्हा ज्ञान सांगतों अमल । तें जाणता स्त्रीसंगातही अचल । राहून माया तुज न बाधे ॥५०॥
तैसाचि तूं शूद्रयोनींत । जन्मशील जरी निश्चित । संन्याश्यांचा संग लाभून होत । निष्पाप तूं महाज्ञानी ॥५१॥
त्यांचेकडून मिळून ज्ञान । जाशील तूं वनीं पावन । तेथ वैष्णवमार्गी मती जोडून । भक्तिमार्गीं आसक्त ॥५२॥
नंतर देहपतन होईल । पुन्हां ब्राह्मणत्व तुज लाभेल । शंभूसी भजशील त्या वेळ । यात संदेह कांहीं नसे ॥५३॥
नारायण मुखांतून गुणगान । माझें ऐकून रममाण । माझा प्रिय भक्त होऊन । योगेंद्र गाणपत्य निःसंशय ॥५४॥
ऐसें वरदान देऊन । गणनाथ पावला अंतर्धान । नारद त्यासी नमून । शाप भोगून निधन पावे ॥५५॥
पुन्हां तो नारद जन्मत । शिवभक्ति परायण होत । नारायण जेव्हां उपदेशित । तेव्हां गाणपत्य जाहला ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणें द्वितीये खंडे एकदन्तचरिते नारदशापनिवर्तनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP