मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेश नमः । दक्ष तेव्हां मुद्‌गला म्हणत । धन्य मी अनुगुहीत । कीं तुम्हीं कथिलें अद्‌भुत । ब्रह्मप्रद चरित्र वक्रतुंडाचें ॥१॥
तें ऐकून वारंवार । तरीही तृप्ती न होत अनिवार । अमृतासम ते ऐकण्या अधीर । सांगा ब्रह्मदेवाची ती कथा ॥२॥
पापनाशिनी ही कथा सांगावी । विस्तारानें मजसी बरवी । श्रोत्यास पृच्छका वक्त्यास व्हावी । सर्व सिद्धि प्राप्त येणे ॥३॥
सूत सांगती मुनीं प्रत । ऐसें ऐकून दक्षाचे प्रार्थित । मुद्‌गल म्हणती सांप्रत । ऐक दक्षा महाभागा ॥४॥
धन्य तू निःसंशय जगांत । प्रीति वाटे तुज गणराजकथेंत । अल्पपुण्य ज्यांचें असत । त्यांसी नावडे ढुंढि कथा ॥५॥
तुझ्या आदरप्रश्नें तोषित । तुज ती दिव्य कथा संक्षेपात । गणेशमहात्म्याची मी सांगत । ऐक गणेशें काय केलें ॥६॥
प्रलयापूर्वी पाच सुराधिप निर्मित । त्यांच्या तपःप्रभावें प्रसन्न होत । त्या वरप्रभावें ते समर्थ होत । स्वकार्यांत सावधान ॥७॥
सृष्टि निर्माण कार्यांत । ब्रह्मदेव प्रवृत्त होत । परी गणेशानांवे न स्मरत । कार्यारंभी अर्चन विसरुन त्याचें ॥८॥
तो मनांत गर्व करीत । माझ्या सम अन्य नसे त्रैलोक्यांत । मीच निर्माता अखिल विश्वांत । एकमेव । अद्वितीय ॥९॥
मी जग निर्माण करित । तदनंतर विष्णु पालक होत । रुद्र त्यासी संहारित । शक्ती मोह निर्मीतसे ॥१०॥
सूर्य कर्मप्रकाश करित । तेजस्वी प्रभू तो जगांत । परी मी विश्व न सृजित । तरी तो सूर्य काय करीं? ॥११॥
माझी पात्रता पाहून करित । मजसी आज्ञा प्रथम संतुष्ट । सृष्टि निर्माण करण्या उचित । मानलें मजसी गणेशानें ॥१२॥
म्हणोनी माझ्यासम अन्य नसत । ऐसा गर्व धरी मनांत । तेव्हां विघ्नेशाचे गण बहुत । निर्माण झाले सभोवार ॥१३॥
ते सृष्टिरचका विधीस ताडिती । नाना रुपें घेऊन छळिती । त्रिनेत्रधर वा पंचनेत्र असती । पाठीलाही नयन त्यांच्या ॥१४॥
दशतुंड सहस्त्रमुखें दाविती । नानारुपें गुण घेती । महावीर ते मारिती । विधीस हातीं धरुनी ॥१५॥
बाळ खेळण्यासंगें खेळत । तैसे ते गण ब्रह्मदेवा छळित । तेव्हां गर्व सोडून शरण तो जात । विघ्ननायका गणेशाला ॥१६॥
गर्व सोडून हृदयात । जेव्हा ब्रह्मदेव स्मरण करित । तेव्हां गणनायक तुष्ट होत । विघ्नगण अन्तर्धान पावलें ॥१७॥
ब्रह्मदेव निर्विघ्न होऊन । परम तप आचरुन । षडक्षर मंत्रज्प करुन । वक्रतुंडा तोषविलें ॥१८॥
पादांगुष्ठाग्री उभा राहत । वायुभक्षणें तो जगत । तेजसा वृत्ति लावित । गणेशांत निश्चल तें ॥१९॥
ऐसें दिव्य सहस्त्र संवत्सर । तप केलें त्यानें उग्र । व्याकुळ झालीं भूतें समग्र । तेव्हां तोषला वक्रतुंड ॥२०॥
तेजोरुपी महाकाय प्रकटत । चतुर्भुज सिंहारुढ दिसत । त्रिनेत्रधर पाशांकुशयुक्त । वरद अभय मुद्रांकित ॥२१॥
पृथुवक्ष महोदर विराजित । सिद्धिबुद्धियुत चिंत्तामणि युक्त । नाना अलंकार संयुक्त । शेषभक्ति गजानना ॥२२॥
सिंदुर अरुण देहधारी । नाना वस्त्रें अंगावरी । भयभीत त्यास पाहुनी उरी । प्रथम झाला विधाता ॥२३॥
परी नंतर स्तवन करित । गणेशा चिंतून हृदयांत । नाना स्तोत्रें म्हणत । तेव्हा वक्रतुंड त्यास म्हणे ॥२४॥
विधात्या तू वर माग वांछित । तो मी देईन तुज निश्चित । ऐकून वच घनगंभीर तें त्वरित । म्हणे सौम्यरुपें वर देई ॥२५॥
तेव्हा सौम्यतेज युक्त होऊन । म्हणे विधात्यास गजानन । स्वानंदनगरीं माझे वसन । सदा ऐसेचि विलसतसें ॥२६॥
मृत्युलोकांत तू राहसी । तरी हें रुप कैसें पाहसी । तुझ्या तपानें भक्तिभावेसी । तोषून धरिलें सौम्यरुप ॥२७॥
तूं माझ्यापासून मागून घ्यावें । आता इच्छित मनींचे सांगावें । मी प्रसन्न होता काय व्हावें ॥ दुर्लभ तुला विश्वांत? ॥२८॥
गणेशाचें वचन ऐकून । ओंजळ करांची जोडून । प्रथम तयासी प्रणाम करुन । स्तुति स्तोत्र मग गाई ॥२९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमत्‍मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते ब्रह्मणस्पश्चरणं नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP