मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । पार्वती म्हणे तेव्हां वचन । हें सर्व तुम्हांपासून हर्षोत्फुल्ल मन । माझें झालें या वेळीं ॥१॥
पुनः पुन्हा गणराय कथामृत । सांगावें देवा हे पुनित । जें ऐकतां होत । श्रोता पावन भक्तीनें ॥२॥
पुरुषप्रकृती उभय मिळोनी । सृष्टी कैसी रचिती म्हणोनी । गणेश निजानंदी जाता तेथोनी । तें सर्वही सांगा मज ॥३॥
मुद्‌गल म्हणती पार्वतीचें वचन । ऐकून शंकर प्रसन्न वदन । रसयुक्त रम्यपावन । कथा सांगे गणरायाची ॥४॥
शंकर म्हणती पार्वतीसी । ऐक देवि कथानकासी । धन्य तूं पावन अससी । आदरें विचारिला प्रश्न हा ॥५॥
गणेश होता अंतहित । प्रकृति पुरुष प्रेमयुत । स्वसामर्थ्ये एक होत । परस्परांवरी आकृष्ट तें ॥६॥
तपाचरणें वर देऊन । मोहवी पुरुषार्थ दाखवून । नाना भावार्थ ते शोभन । प्रकृति आपुल्या सामर्थ्ये ॥७॥
प्रकृती नाना वैभवयुक्त । पुरुषोत्तमास पाडी मोहांत । पूर्णभावें अधीन होत । प्रकृतीच्या तो तेधवां ॥८॥
महामायेस पाहून । महात्मा पुरुष संमोहित मन । हावभाव युक्त उन्मन । भक्तींने तिच्या तोषला तो ॥९॥
सप्तात्मक वीर्य तिच्यांत । सहसा पुरुष करी निक्षिप्त । तेणें ती गर्भवती होत । तेज वाढलें अमर्याद ॥१०॥
उदरीं गर्भ वाढत । आपुल्या तेजें तो संयुक्त । प्रदीर्घ कालांतरें होत । पुत्रजन्म मोदकर ॥११॥
त्या पुत्राचें नाम महान । तेजोमय तो पावन । सर्वांतर्यामि महत्‍ तत्त्व म्हणून । सार्थनाम जाहला ॥१२॥
समाधिपूर्वक जाणावा । महान्‍ अंतरात्मा बरवा । सर्व तत्त्वांत श्रेष्ठ जाणावा । हृदयीं अधिष्ठान तयाचें ॥१३॥
त्या महताने निर्मिला । अहंकार रुप पुत्र भला । तो पुढे त्रिविध जाहला । भिन्न मूर्ती प्रतापवान ॥१४॥
मी सर्वत्र वसत । मम आधारें हें चालत । ऐशी वृत्ती सदा असत । म्हणोनि अहंकारनाम त्याचें ॥१५॥
बाह्यभावें झाला स्थित । सर्वत्र सर्वराट्‍ तो असत । महताचें जें जें इच्छित । तें तें करण्या सज्ज झाला ॥१६॥
त्रिविध झाला तो गुणयुक्त । सात्त्विक राजस तामस होत । ऐक शिवे अहंकार स्थित । तीन शक्तींनी युक्त म्हणोनी ॥१७॥
सात्त्विक ती ज्ञानशक्ती । तिनें भाव जागृत होती । राजसी ती क्रियाशक्ती । तिनें कार्य होत असे ॥१८॥
तामसी ती द्रव्यशक्ती । देहरुपा जीस म्हणती । त्यांतील प्रथम तामसी शक्ती । बोलावी प्रथम विश्वयोनी ॥१९॥
तिनें शब्दरुप निर्मिलें । त्यातून आकाश निर्माण झाले । आकाशें नंतर निर्मिलें । स्पर्शाचे भाव तेव्हां ॥२०॥
स्पर्शानें वायू निर्मिला । महा बलयुक्त तो जाहला । वायूनें नंतर रुपाला । तेजरुपा निर्मिलें ॥२१॥
तेजापासून रसाची उत्पती । रसापासून जळ निर्मिती । पाण्यापासून गंधोत्पत्ती । गंधातून भूमी जन्मली ॥२२॥
ऐसी तमोगुणमयी अद्‌भुत । सृष्टी तेव्हां उत्पन्न होत । तन्मात्र भूतसर्गही संजात । पंचपंचात्मक तेव्हां ॥२३॥
पंचभूतात्मक देह दिसत । सर्वत्र तेव्हां विनिर्मित । राजस शक्ती तें अद्‌भुत । पांच इंद्रियें क्रियारुप ॥२४॥
पंच ज्ञानेंद्रियें ज्ञानरुपधर । जिव्हा चक्षू त्वचा अपर । नासिका कर्ण पर । ऐसी हीं पांच जाणावी ॥२५॥
हातपाय गुद वाक्‌युक्त । लिंग पंचम ज्यात असत । ऐश्या कर्मेंद्रिय होत । सर्व क्रिया प्राण्यांच्या ॥२६॥
प्राण व्यान अपानक असत । उदान समान वै राजस समस्त । पंचप्राण तेजोयुक्त । ऐसे ग्रंथीं कथिलें असे ॥२७॥
सप्तधातू विभाग करित । क्रियारुप म्हणोनी म्हणत । ऐसी ही राजसी शक्ति असत । रहस्य प्रिये जाणावें ॥२८॥
सात्त्विक मायेनें निर्मित । इंद्रियांचे देव पुनीत । दिशा वायु वरुण कीर्तित । अश्विन देव सूर्यही ॥२९॥
ह्या ज्ञानेंद्रियांच्या देवता । ग्रंथांत असती ख्याता । अग्नि विष्णु प्रजापालनकर्ता । इंद्रमित्र तो पांचवा ॥३०॥
ह्या कर्मेंद्रियांच्या देवता । ग्रंथांत असती परिकीर्तिता । सात्त्विक सृष्टि युक्ता । दशदेव स्वरुपाची ॥३१॥
ऐशा तत्त्वरुप आदि देवता । ग्रंथांत उक्त ज्या आता । यथाविधी जरी जन्मता । ज्ञानहीन जाहल्या ॥३२॥
सृष्टि रचना करुन न शकती । ते आदिदेव निश्चिती । म्हणोनी उपदेश करिती । ज्ञानप्रदानार्थ तयांना ॥३३॥
प्रकृति पुरुष उभय देती । ॐ गं ॐ हा मंत्र अति प्रीती । अनुष्ठानविधीनें प्रचोती । गणपति मंत्राची ह्या म्हणती ॥३४॥
ते आदिदेव तेथेच स्थित । महातप सर्वही आचरित । तेणें संतुष्ट होत । गणवल्लभ गणेश तें ॥३५॥
त्यांच्यापुढें प्रकट होत । त्यांस पाहून ते हर्षित । स्तोत्र रचून स्तुति करीत । तत्तदेव गणेशाची ॥३६॥
नमन वक्रतुण्डासी । तैसेचि भक्तसंरक्षकासी । सर्वाधीशा गनपतीसी । अव्यक्तासी व्यक्तरुपा ॥३७॥
सत्य असत्य तूं असत । सम-विषम तूंच होत । ऐशा विघ्नेशा तुज नमित । भक्तिभावें पुनःपुन्हा ॥३८॥
आत्मा अनात्मा तूंच अससी । निर्गुण गुणरुपही होसी । नामरुपधर तूंच अससी । नामरुपविहीन तूंची ॥३९॥
अनंत उदरसंस्थ अससी । नाना भोगकर दिससी । भोगहीनही तू अससी । सर्वत्र स्वानंदाधिपति तूं ॥४०॥
माया धरा नमस्कार । मायाहीना प्रणाम नमर । मायिकांसी मोहकर । सर्वज्ञा तुला नमस्कार ॥४१॥
सर्व सिद्धेश्वर अससी । सिद्धपति तूं भाससी । सिद्धिहीन सिद्धीशा तुजसी । नमस्कार वारंवार ॥४२॥
जगन्मय जगद्‌हीन । कर्म फलदाता महान । कर्मरुपा तुजसी नमन । कर्महीना तुलाही ॥४३॥
ज्ञान्यांसी ज्ञानदाता जगतीं । ज्ञानहीन ऐसीही ख्याती । ससंवेद्य चतुर्विधमय भूतीं । चतुर्विध विहीन तूं ॥४४॥
पाशांकुशधरा एकदंता । अभयमुद्रा तूं दाखविता । भक्तांची होसी सुखदाता । प्रणाम तुला पुनः पुन्हा ॥४५॥
चतुर्भुज तूं जगतीं । सुपासारखे कान असती । दोन्द वाढोनी तुझी महती । एकदन्ता जगीं झाली ॥४६॥
मोठयांत मोठा तूं अससी । लहानांत लहान तूं होसी । गजमूख देवा ब्रह्मा तुजसी । ब्रह्मणस्पते नमस्कार ॥४७॥
ब्रह्मदाता ब्रह्म जगती । तुझी स्तुती करावी किती । अपार गुणराशी ही कीर्ती । गणेशा नमन शतशः तुला ॥४८॥
ऐसी स्तुती ऐकून । गणेश संतुष्ट होऊन । विनमर ऋषींस बोले वचन । पुढिले अध्यायीं वर्णिले तें ॥४९॥
इति श्री ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‍ मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते तत्त्वकृतस्तुतिवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP