मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ५७ वा

काशीखंड - अध्याय ५७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा ॥ दीर्घ चिंता उद्भवली महादेवा ॥ म्हणे काशीपुरीसी कोण पाठवावा ॥ जो कार्य करील ॥१॥
तंव शिवदक्षिणांगीं महाद्‍भुत ॥ दिग्गजमुंड होता चतुर्दंत ॥ तो सर्वगणाधीश उमासुत ॥ उभा ठाकला शिवापुढें ॥२॥
प्रणाम केला करसंपुटें ॥ भाळीं वंदोनियाम पादांगुष्ठें ॥ विश्वानाथा वंदिलें ललाटें ॥ गजेंद्रें तेणें ॥३॥
मग अधरपुटें अमृतवाणी ॥ उच्चारिता झाला रसनागुणीं ॥ तेणें प्रार्थिला शूलपाणी ॥ गणाधीशें ते काळीं ॥४॥
म्हणे मजसारिखा तुमचा भृत्य ॥ आणि तुम्ही कां होतां चिंताक्रांत ॥ मी विघ्न करीन निमिषांत ॥ दिवोदासराजयासी ॥५॥
मग शिव म्हणे गा गणवीरा ॥ मी जे पाठवितों काशीपुरा ॥ त्यांचिया धर्मवार्तेचा वारा ॥ तोही न देखों आम्ही ॥६॥
आणिका स्थळीं पाठवितों गण ॥ ते येताती न लागतां क्षण ॥ परी काशीमार्गीं करिती गमन ॥ त्यांची नायकेंचि वार्ता मी ॥७॥
तेथें आहे स्वर्गतरंगिणी ॥ ऐसी ते काशी विश्वमोहिनी ॥ जैसे जळजंतु आपुले स्थानीं ॥ न प्रवर्तती पैं ॥८॥
तरी परियेसीं गा गजानना ॥ तुम्हीं क्रमावें आनंदवना ॥ विघ्न करावें त्या नृपनंदना ॥ अहर्निशीं ॥९॥
आमुचा ऐसा मनोदय ॥ तुम्हांसी काशीमध्यें होईल जय ॥ आतां राजाचा काळसमय ॥ जवळी आला असे ॥१०॥
म्यां योगिनी सूर्य पाठविला ॥ सर्वगणें विरिंचि राहिला ॥ हा माझा परम संतोष जाहाला ॥ जे राहिले काशीमध्यें ॥११॥
थोर उत्साह जाहालासे आम्हांप्रती ॥ आतां तुम्हीं जावें गा गणपती ॥ आणिकासी पाठवितां मंदमती ॥ काशीवासास्तव ॥१२॥
तेथें तुम्हीं जाउनियां स्वभावें ॥ तें प्रकृतीचे कारणीं ऐसें पाहावें ॥ ऐसी आज्ञा केली महादेवें ॥ लंबोदरासी ॥१३॥
शिव म्हणे गा गजवक्त्रा ॥ आम्हांसी निर्विघ्न करावें पुत्रा ॥ दिवोदासावांचोनि सर्वत्रां ॥ करावी क्षमा ॥१४॥
विघ्नहरा त्रैलोक्यामाझारी ॥ तरी त्या दिवोदासासी विघ्न करीं ॥ ऐसें वदला तो त्रिपुरारी ॥ गजेंद्रासी ॥१५॥
मग शिवासी करूनि प्रदक्षिणा ॥ अभिवंदन केलें शिवाचे चरणां ॥ मग निघता जाहाला आनंदवना ॥ वरदकुमर तो ॥१६॥
शिवाआज्ञा वंदोनि मौळीं ॥ गणश्रेष्ठ निघाला तत्काळीं ॥ मूषकवाहन अविमुक्तिस्थळीं ॥ आला निमिषार्धें ॥१७॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ गजेंद्रें देखिली मंदाकिनी ॥ म्हणे तूं आमुची पूर्वजननी ॥ होसी माउलीये ॥१८॥
तेणें अभिवंदिली पूर्वमाता ॥ मग अविमुक्ति जाहाला देखिली ॥ जेवीं तटाकें पूर्ण सरिता ॥ गजबजिली दिव्यंकुमुदिनींनीं ॥१९॥
ऐसी ते पंचक्रोशीभूमी ॥ अर्ध पाताळीं अर्ध व्योमीं ॥ जैसा तो महायोगी शुभकर्मीं ॥ न लिंपे सर्वथा ॥२०॥
ते अविमुक्तीची श्रेष्ठ भूमिका ॥ दुर्लभ देवां मानवां त्रैलोक्या ॥ तेथें असे मणिकर्णिका ॥ शिवभूषणी ते ॥२१॥
सहस्त्र जन्मांचीं किल्बिषें दारुण ॥ पराभवती ॥ एकाचि आचमनेंकरून ॥ मग प्रवेशला गजानन ॥ कैसियापरी ॥२२॥
वृद्ध ब्राह्मणाचें रूप जुनाट ॥ धरिता जाहाला गण विकट ॥ करीं असे नक्षत्रपट ॥ मग भ्रमतसे गृहीं गृहीं ॥२३॥
तो ब्राह्मण व्यापला काशीपुरीं ॥ नक्षत्रपट दाखवी घरोघरीं ॥ ते सर्वही नर आणि नारी ॥ व्यापिली माया ॥२४॥
काळ तिथि सांगे नक्षत्र ग्रह राशी ॥ घातचंद्र दानें उपदेशी ॥ नाना मतें सांगे लोकांसी ॥ तीं वर्णू कैसीं आतां ॥२५॥
लोकांसी प्रतिवचनें बोले ते क्षणीं ॥ कांहीं प्रश्न करा चिंतोनि मनीं ॥ तेंचि सांगो तत्क्षणीं ॥ तरीचि सत्य ब्राह्मण मी ॥२६॥
मग ते प्रश्न चिंतिती लोकपाळ ॥ तो प्रश्न सांगे तत्काळ ॥ मग वश जाहाले जन सकळ ॥ त्या ब्राह्मणासी ॥२७॥
मग आणिक सांगे प्रत्युत्तरें ॥ स्वन्पीं दग्धती तुमचीं घरें मंदिरें ॥ एकासी म्हणे गवाक्षद्वारें ॥ गुहीं रिघतील तस्कर ॥२८॥
एकासी म्हणे ऐसें देखाला स्वन्प ॥ अपत्यासी भक्षील पंचानन ॥ एकीसी म्हणे जी व्यभिचार पूर्ण ॥ कराल स्वन्पीं तुम्ही ॥२९॥
एकासी म्हणे कराल भक्ती ॥ विधियुक्त पूजाल रे पशुपती ॥ एकासी नाना प्रतीती ॥ सांगतसे ब्राह्मण ॥३०॥
एकांसी सांगे चिंतिल्या खुणा ॥ त्याचि साक्ष वाटती त्यांचिया मना ॥ त्यांसी म्हणे देखाल रे स्वन्पा ॥ अशुभ तुम्ही कांहीं ॥३१॥
ऐसें रवि क्रमितां अस्ताचळीं ॥ लोक निद्रित होती सायंकाळीं ॥ त्यांसी चिन्हें बोलिलीं जीं बोलीं ॥ दाखवी आपणचि तीं ॥३२॥
दिवसा जें सांगितलें स्वन्प ॥ तें रात्रीसी दाखवी आपण ॥ सुषुप्तिअवस्थेंत भ्रमती जन ॥ ऐसें मोहिलें गणेशें ॥३३॥
मग प्रातःकाळ जाहाला मागुता ॥ स्वन्पखुणा सांगे श्रीमंतां ॥ मग ते मानिती सत्य वार्ता ॥ सांगीतली ब्राह्मणें ॥३४॥
मग महा आश्चर्य करिती लोक ॥ ब्राह्मणाचे थोर करिती कौतुक ॥ म्ग चिन्हें वार्ता मतें अनेक ॥ पुसती ब्राह्मणांसी ॥३५॥
एकासी काळ सांगे मृत्यूचे ॥ गर्भ सांगतसे कन्यापुत्रांचे ॥ मग प्रसूति जाहालिया तयांचे ॥ सफळ होती मनोरथ ॥३६॥
ऐशा ज्या ज्या प्रतीति सांगे दिवसा ॥ त्याचि स्वन्पीं देखती सद्दशा ॥ मग दीर्घ प्रीतिआदरें गणेशा ॥ पूजिती लोक ॥३७॥
सर्व लोकांसी केसा मोहनफांसा ॥ मग संचरला राजराणिवसा ॥ तंव त्या राजांगनेनें देखिला कैसा ॥ उत्तम ब्राह्मण ॥३८॥
मग बैसावया दिधलें आसन ॥ ब्राह्मणासी करिती अभिवंदन ॥ षोडशोपचारें पूजिला ब्राह्मण ॥ सन्मानेंकरूनियां ॥३९॥
त्या रात्रिसमयीं होत्या निद्रिस्था ॥ त्यांसी दाखवी तो स्वप्नव्यवथा ॥ तंव रविउदय झाला मागुता ॥ सांगों आला ब्राह्मण ॥४०॥
मृगाजिनीं घालोनि पद्मासन ॥ बैसला ब्राह्मण विचक्षण ॥ स्वप्न करविता झाला श्रवण ॥ राजांगनेप्रती ॥४१॥
ब्राह्मण म्हणे राजांगनेसी ॥ विपरीत स्वप्न झालें तुम्हांसी ॥ तें साक्षेपेंकरूपि तुम्हां सांगावयासी ॥ येणें जाहालें आम्हां ॥४२॥
राजकांता म्हणे द्विजोत्तमा ॥  हे पूर्वभाग्याची आम्हांवरी क्षमा ॥ जें तुमच्या चरणांचें दर्शन आम्हां ॥ हें पूर्वाजिताचें फळ ॥४३॥
सुफळ आमुचें तपसाधन ॥ तो तूं उदया आलासी पूर्वपुण्यदिन ॥ आतां अनुवादा तें स्वन्प ॥ किमर्थ भविष्य ॥४४॥
तंव ब्राह्मण झाला वदता ॥ जे तुम्हांसी जाहाली स्वन्पअवस्था ॥ तें अनुचित सांगों विचारितां ॥ राज्यविघ्न पैं ॥४५॥
तुमचे निद्रेचा वृत्तांत ॥ तुम्हीं स्वन्प देखिलें अकस्मात ॥ नगरप्रदेशीं देखिला आवर्त ॥ महापरचक्राचा ॥४६॥
ते क्षणीं बोलती अशुभवाचा ॥ कळस खचला शिवालयाचा ॥ दंड भंगोनियां पताकांचा ॥ पडिला भूतळीं ॥४७॥
आणि ध्वनीं महाघूका ॥ दुर्गीं बोभाइली भालुका ॥ मग नगरामध्यें येऊनि उलूका ॥ करिती दीर्घशब्द ॥४८॥
आणिक उद्धस देखिली नगरी ॥ रुदन करिती भौभाग्यनारी ॥ भागीरथी वाहवली महापूरीं ॥ शोणिताची पैं ॥४९॥
जीं मृग-श्वापदें महावनींचीं ॥ हाटीं थाटें देखिलीं त्यांचीं ॥ अवकाळीं अभ्रें पर्जन्याचीं ॥ देखिलीं महावृष्टि ॥५०॥
उत्तरेहूनि महाओधें आलिया ॥ अतिकृश उल्का अशुभ बोलिल्या ॥ नगरीं अंतरिक्षावरूनि गेलिया ॥ दक्षिणदिशेसी ॥५१॥
पवन मंद असतां ते काळीं ॥ उगेचि द्रुम उन्मळले तळीं ॥ ते शाखापत्रपुष्पीं भूमंडळीं ॥ उत्पाटले वायूविण ॥५२॥
चैत्यवृक्षीं कर्कश वायस ॥ सोम-सूर्यांविनें देखिलें आकाश ॥ ऐसा तो सर्व गणाधीश ॥ वदतसे राजांगनेसी ॥५३॥
ब्राह्मण म्हणे राजां गने ॥ शतपुत्रजनिते ज्ञाननिपुणे ॥ महापतिव्रतेसमानें ॥ तुळिजे तुज पैं ॥५४॥
शतपुत्रांमाजी मुख्य कुमर ॥ तो स्वप्रीं जाहाला वाजिया स्वार ॥ अकस्मात प्रकटला समीर ॥ तो वातें पडोनि मेला ॥५५॥
ऐसीं नाना स्वन्पें देखिलीं ॥ द्दश्य करोनि सांगीतलीं ॥ मग ब्राह्मणें आज्ञा मागीतली ॥ निघता झाला बिढारीं ॥५६॥
मग दिबोदासाची नायिका ॥ लीलावती नामें सुलक्षणिका ॥ तीसी अनुभवली स्वन्पपरीक्षा ॥ मग काय विचारी मनीं ते ॥५७॥
मग पाहोनि समयानुसार ॥ ती लीलावती राजसुंदर ॥ राजा देखोनि एकान्त विचार ॥ अनुवादे कामिनी ॥५८॥
लीलावती वदे जी चक्रवर्ती ॥ अपूर्व आलीसे द्विजमूर्ती ॥ जरी पाहों सप्तद्वीपवती ॥ तरी न मिळेचि ऐसी ॥५९॥
भूत भविष्य वर्तमानादिक ॥ कथीतसे चतुर्वेदादिक ॥ ऐसा तो त्रिलोकीं द्विजनायक ॥ देखिला असे आम्हीं ॥६०॥
जुनात तरी कल्पांतींचा ॥ वेद सकळ वाखाणी वाचा ॥ काय कीजे सहस्त्रवदनांचा ॥ महीधर शेष पैं ॥६१॥
तेजें लोपला तुमचा पूर्वज ॥ तो गभस्ति नामें कश्यपात्मज ॥ ऐसा तो त्रिलोकीं पूज्य द्विज ॥ द्दष्टीं देखिजे स्वामी ॥६२॥
सर्व विद्या जयासी वोळंगती ॥ सर्व देवां जयाची मंत्रशक्ती ॥ ऐसा तो देवगुरु बृहस्पती ॥ न तुळे तयासीं ॥६३॥
मेरु न तुळे त्याचिया गुरुत्वा ॥ क्षीरार्णव न तुळेचि महत्त्वा ॥ तुळितां शेषकूर्मांचिया सत्त्वा ॥ परीस अधिक तो ॥६४॥
ऐसा तो गुरुरत्नांचा शैल ॥ अंबुसागराहूनि निश्चिळ ॥ तयासी पहावया वाढ वेळ ॥ न कीजे स्वामी ॥६५॥
सर्व काळ संपूर्ण वेदाभ्यासी ॥ तो स्वामी सौभ्याघ्य सर्व द्विजांसी ॥ इंद्रियें जिंकी ऐसा पृथ्वीसी ॥ नाहीं योगेश्वर ॥६६॥
प्रतिग्रह अंगीकारीना मानसीं ॥ तृणतुल्य देखे दुष्टदानासी ॥ तो बहुप्रकारें आत्मसंतोषी ॥ मज न ये सांगतां ॥६७॥
मग तो पृथ्वीचा राज्यधर ॥ जनचकोरपीयूषआहार ॥ कीं तो पौर्णिमेचा अमृतकर ॥ वदता झाला कांतेसी ॥६८॥
म्हणे कांते जें प्रिय उत्तम तुम्हां ॥ तें अत्यंत प्रेमसुख आम्हां ॥ तूं माझिया मनाचिया निजधामा ॥ सुरतविलासिनी ॥६९॥
जो शब्द प्रसवे तुझिया आननीं ॥ तो माझिया मना कौस्तुभमणी ॥ तरी पाचारू पाठवा सज्ञानी ॥ त्या द्विजोत्तमासी ॥७०॥
मग लीलावतीनें महासुलक्षणा ॥ सखिया पाचारिल्या विचक्षणा ॥ ज्या प्रबोधूं जाणती ज्ञानगुणां ॥ त्या पाचारूं पाठविल्या ॥७१॥
मग त्या गेलिया त्याचे बिढारीं ॥ साष्टांग घातला तयाचे दारीं ॥ चरण वंदोनियां त्या आज्ञाधारीं ॥ केलें प्रत्युत्तर ॥७२॥
म्हणती स्वामी द्विजवरा ॥ आम्ही रायाच्या किंकरा ॥ राजयाचे आज्ञें आलों तुमचे द्वारा ॥ कांहीं असे विज्ञापना ॥७३॥
राजयानें ऐकिली तुमची ख्याती ॥ साष्टाग नमिलेंसे बद्धहस्तीं ॥ तरी भद्रीं बैसला असे नृपती ॥ पाचारीतसे तुम्हांसी ॥७४॥
ऐसें त्यांचें उत्तर ऐकोनी ॥ निर्विघ्न निघाला झडकरोनी ॥ बहु त्वरावंत भद्रस्थानीं ॥ पावता जाहाला पैं ॥७५॥
तो हेंचि कार्य होता इच्छीत ॥ रायें पाचारिला अकस्मात ॥ तंव दुरोनि देखिला येत ॥ द्विजमूर्ति ब्राह्मण ॥७६॥
राजा देखे द्विजाची दिव्य शोभा ॥ उदयाचळीं जैसी सूर्यप्रभा ॥ कीं काळवंडे गंधर्वगाभा ॥ शतएक संख्या ॥७७॥
ऐसा तो ब्राह्मण सर्वज्ञानी ॥ आला रायाचे भद्रस्थानें ॥ मग दिवोदासरायें देखोनि नयनीं ॥ उतरला सिंहासनातळीं ॥७८॥
सप्तपदें आला पुढारी ॥ चरण पाणी स्पर्शिले शिरीं ॥ मग बैसविला सिंहासनावरी ॥ बहु आदरेंकरूनियां ॥७९॥
तो सर्वसिद्धी जाणता शरीरीं ॥ राजयानें पूजिला षोडशोपचारीं ॥ मग दिवोदास पृच्छा करी ॥ बैसोनियां एकान्त स्थळीं ॥८०॥
नरेंद्र म्हणे द्विजमूर्ती ॥ तुम्हांसी राहाणें कवणे क्षितीं ॥ कां सेविली हे अविमुक्ती ॥ पुनरपि कोठें गमन ॥८१॥
तंव बोलता जाहाला द्विजवर ॥ जो सर्वसिद्धींचा दातार ॥ चतुर्वेदविद्येचा सर्वेश्वर ॥ उद्भविता तोनि ॥८२॥
ब्राह्मण म्हणे गा पुण्यश्लोका ॥ आम्ही हिंडतों या त्रैलोक्या ॥ आसनीं स्थिर नव्हे घटिला ॥ त्रिपंचवरी ॥८३॥
क्षणक्षणीं त्रिलोकां गमन ॥ आम्हां राहावया नाहीं एक स्थान ॥ तुमची दीर्घस्तुति झालिया श्रवण ॥ मग येणें झालें येथें ॥८४॥
आम्हांसी नाहीं गा दानाचा स्वार्थ ॥ गमनीं भेटे तुम्हांऐसा समर्थ ॥ तोचि लाभ आमुचा मनोरथ ॥ सुफळ सुखीं ॥८५॥
मग राजा वेद गा द्विजमूर्ती ॥ मी सप्तद्वीपवतीचा भूपती ॥ म्यां पृथ्वीराज्य केलें पुण्यकीर्तीं ॥ ऐशीं सहस्त्र वर्षें पैं ॥८६॥
ऐसें हें पृथ्वीराज्य अवघारा ॥ म्यां भोगिलें जी द्विजवरा ॥ तरी हें कथूनियां विचारा ॥ सांगावें आम्हांसी ॥८७॥
मग ब्राह्मणें प्रत्युत्तर केलें ॥ म्हणे जी राजेंद्रा संकलित काय प्रश्निलें ॥ तुमचें सामर्थ्य अपार न तुळे ॥ दिक्पतीशीं पैं ॥८८॥
जैसा तो अमरपदीं वज्रघर ॥ तैसा तूं क्षितिमंडळीं नृपवर ॥ सर्वसंपन्न परी पुण्यविचार ॥ प्रश्निलें काय ॥८९॥
परी इंद्राचे घरीं मोजितां ॥ ऐश्वर्याची काय गणिता ॥ तुमचें सामर्थ्य अपरिमिता ॥ न तुळेचि सुरेश्वरा ॥९०॥
तुम्ही व्यापक झालेति सर्व क्षितीं ॥ तुमची निर्धारितां तेजोदीप्ती ॥ वैश्वानर दिसे मंदज्योती ॥ तुमचेनि तेजें ॥९१॥
तुम्हां काशीमध्यें अखंड वास ॥ आणि तूं सप्तद्वीपवतीचा अधीश ॥ तुमच्या राष्ट्रीं नाहीं स्पर्श ॥ कृतांताचा पैं ॥९२॥
नेऋत न तुळे विरोधासी ॥ पृथ्वीपरिघ करी चातुर्मासीं ॥ तो वरुण तुमचिया स्पर्धेसी ॥ न तुळेचि सर्वथा ॥९३॥
सर्व जीवांचे घटीं जो स्वस्थ ॥ मृत्यूची साक्ष जो कश्यपसुत ॥ तो तुमचिये स्पर्धेसी मारुत ॥ न तुळे राजेंद्रा ॥९४॥
जे कुमुदिनीसी अतिप्रीती ॥ निर्धारितां शीतकराची ज्योती ॥ तरी ग्रामोग्रामीं दिव्यदीप्ती ॥ तूं झालासी चंद्रमा ॥९५॥
रुद्रशक्तीसमान नृपवर ॥ भांडारें तरी न तुळे कुबेर ॥ ऐसा तूं सर्वसंपूर्ण राजेश्वर ॥ काशीपुरीचा ॥९६॥
ऐसें तुमचें अपार सामर्थ्य ॥ आणिक प्रश्निलें काय स्वल्प व्यर्थ ॥ येणें तुमचा सुफळ मनोरथ ॥ काय पां होईल ॥९७॥
द्विजासी वदे भूपाळ ॥ हरिगणांऐसा पुण्यशीळ ॥ तरी तो आमुचा मृत्युकाळ ॥ असे किती दिन ॥९८॥
मग ब्राह्मण वदे दिवोदासा ॥ तुम्हांसी भेट होईट सत्पुरुषा ॥ तो अष्टादशावे दिनीं सर्व व्यवसा ॥ हरील तुमचा पैं ॥९९॥
तो अष्टादश दिनीं येईल आतां ॥ तुम्हांसी वाक्य होईल सांगता ॥ ते सत्य मानावी भविष्यवार्ता ॥ राजेंद्रा तुम्हां ॥१००॥
अष्टदाश दिन जाहालियावरी ॥ जो ब्राह्मण येईल तुमचे घरीं ॥ तो महाविचक्षण नित्याचारी ॥ नसेचि ऐसा आणिक ॥१०१॥
तो तुम्हां सांगेल ज्या ज्या खुणा ॥ त्या ह्रदयीं धरिजे नृपनंदना ॥ तो विधि सांगेल कार्यकारणां ॥ त्या कीजे गा तुम्हीं ॥१०२॥
ऐसीं नाना मतें भविष्यगती ॥ तेणें सांगीतलीं राजयाप्रती ॥ मग आज्ञा घेऊनि द्विजमूर्ती ॥ निघता जाहाला बिढारीं ॥१०३॥
रायें बहुत सन्मानेंसीं ॥ बोळविलें ब्राह्मणासी ॥ मग राजा प्रत्युत्तर कांतेसी ॥ वदता जाहाला पैं ॥१०४॥
राजा म्हणे माझिये प्रियकांते ॥ तूं ज्ञानगुणे महापतिव्रते ॥ स्वामिभक्तिणी तूं महासचेते ॥ शास्त्रश्रवणीं तूं ॥१०५॥
तुज सर्व परमार्थही अनुभवला ॥ भूत-भविष्यांचा मार्ग सुचला ॥ त्वां भला तो द्विज ओळखिला ॥ दिव्य परमार्थी ॥१०६॥
तुवां सांगीतले गुण सम्यक ॥ तो हा कोटिगुणें असे अधिक ॥ हा त्रैलोक्यांत द्विजनायक ॥ शोभला कांते ॥१०७॥
ऐसी त्या दिवोदास राजया ॥ गणाधीशें केली मोहनमाया ॥ मग राजयानें सर्वही ऐश्वर्या ॥ अनृत देखिलें ॥१०८॥
षण्मुख म्हणे गा महाऋषी ॥ ऐसी माया केली दिवोदासासी ॥ गणेशें वाक्य सांगीतलें त्यासी ॥ अष्टादश दिवसांचें ॥१०९॥
आतां अष्टादशावा जो दिन ॥ विष्णूसी पाठवील पंचानन ॥ राजयासी वदला तो ब्राह्मण ॥ गणाधीश गा अगस्ति ॥११०॥
अगस्ति म्हणे गा स्वामिनाथा ॥ माझी न सरे वियोगव्यथा ॥ तरी मज सांगावें गा सर्वथा ॥ काशीखंड हें ॥१११॥
काशीपुरीं असतां गणाधीशा ॥ कैसी माया केली दिवोदासा ॥ कैसा हरिला त्याचा राज्यव्यवसा ॥ ते कथा निरूपा मज ॥११२॥
मंदराचलाहूनि त्रिपुरारी ॥ तो कैसा आणिला काशीपुरीं ॥ आणि शिवें कैसा पाठविला मुरारी ॥ अविमुक्तीसी पैं ॥११३॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ हाचि प्रश्न करी दाक्षायणी ॥ ते कथा श्रुत करा मजलागुनी ॥ महादोषनाशिनी ते ॥११४॥
आतां विष्णु येईल काशीपुरीसी ॥ दिवोदास जाईल वैकुंठासी ॥ हा अध्याय श्रवण पठन जयासी ॥ तो काळकृतांतासी गणीना ॥११५॥
या अध्यायाची फलश्रुति सांगों आतां ॥ शतएक पूजा केली उमाकांता ॥ श्रवणें पठनें दोषदुरितां ॥ तत्काळ नाश होय ॥११६॥
गृहींचि होय श्रवण पठण ॥ यानंतरें दीजे कांहीं दान ॥ तो काशीमध्यें होय पावन ॥ गंगास्नान शत एक ॥११७॥
जें पुण्य तुळापुरुष केलिया ॥ प्रयागा शत एक गोदानें दिधलिया ॥ हा अघ्याय श्रवण पठन जाहालिया ॥ ऐसें घडे सामर्थ्य ॥११८॥
हा अध्याय करितां श्रवण पठन ॥ त्यासी कैंचें दुःख दैन्य ॥ अपुत्रिका संतान ॥ निर्धना होय धनप्राप्ति ॥११९॥
उगीचि काशी ऐशीं द्वय अक्षरें ॥ जो जंतु स्मरे निर्धारें ॥ त्यासी वंदिजे सुरवरें ॥ शरण ये कृतांत ॥१२०॥
या अध्यायाची फलश्रुती ॥ वाचे न बोलवे मजप्रती ॥ माथा तुकी उमापती ॥ याचिया पुण्यासी ॥१२१॥
कीं प्रयागीं शत गोदानें दिधलीं ॥ कीं द्वादशलिंगीं वाती लाविली ॥ कीं कोटी वरुषें समाधि साधिली ॥ अविमुक्तीसी पैं ॥१२२॥
कीं पृथ्वीप्रदक्षिणेचें पुण्य ॥ कीं विश्वनाथाचें दर्शन ॥ कीं सहस्त्र वेळां गयावर्जन ॥ करी तो गयेसी ॥१२३॥
ऐसें हे धर्मशास्त्र जया श्रवण ॥ तो वंशावळीसहवर्तमान ॥ कैलासपदीं होय पावन ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१२४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते गणेशकाशीप्रवेशवर्णनं नाम सप्तपंचाशत्तमाध्यायः ॥५७॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति सप्तपंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP