मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४५ वा

काशीखंड - अध्याय ४५ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा ऋषि अगस्ति ॥ योगिनी प्रवेशल्या अविमुक्ती ॥ वेष पालटोनियां भ्रमती ॥ काशीमध्यें ॥१॥
एकी त्या रसमात्रा घेऊनी ॥ संचरल्या काशीभुवनीं ॥ व्याधिव्यथेचिया जाहाल्या वैदिणी ॥ महा चमत्कारिक ॥२॥
तंव नगरलोक म्हणती त्यांसी ॥ जोंवरी दिवोदास राजा पृथ्वीसी ॥ तोंवरी जराव्याधी ते कैसी ॥ असेना कवणा लोकीं ॥३॥
दिवोदास राजा पृथ्वीमिधीं ॥ सर्व लोक असती निर्व्याधी ॥ तुम्हां कवण भ्रमतं मंदबुद्धी ॥ वृथा कां नगरीं ॥४॥
एकी नाडीज्ञान पाहूं म्हणती ॥। तंव ते लोक प्रत्युत्तर न देती ॥ एकी त्या सामुद्रिकगुनवती ॥ फिरती करातें पहावया ॥५॥
त्यांसी जन वदती प्रत्युत्तरीं ॥ दिवोदास राजा पृथ्वीवरी ॥ बत्तीस लक्षणी नरनारी ॥ घरोघरीं सालंकृत ॥६॥
एक त्या तत्त्वज्ञानी योगाभ्यासी ॥ नाना चिन्हें सांगती लोकांसी ॥ मग लोक प्रत्युत्तर तयांसी ॥ बोलती काय पैं ॥७॥
दिवोदासाचें राज्य मेदिनीं ॥ गृहीं असती महाज्ञानीं ॥ योगी ब्रह्मचारी वेदाध्ययनी ॥ घरोघरीं पंडित ॥८॥
एकी चमत्कारीं पूर्ण ॥ म्हणती धातूचें करुण सुवर्ण ॥ एक म्हणती गुटिका अंजन ॥ जाणतों आम्हीं ॥९॥
त्यांसी लोक म्हणती काशीमधीं ॥ तुम्ही सर्वहो वृथा मंदबुद्धी ॥ आमुच्या राजासी नवनिधी ॥ ओळंगों येती सर्वकाळ ॥१०॥
केउतियां तुमच्या धातुगती ॥ येथें सर्व जन असते सालंकृती ॥ धातु-अंजनें गुटिका ह्या मंदमती ॥ वृथा तुमचिया ॥११॥
एकी स्तंभने घेऊनि करीं ॥ भ्रमते तरुण पुरुषांचे द्वारीं ॥ त्यांसी म्हणते वेषधारी ॥ आम्हां जाणतों वीर्यस्तंभन ॥१२॥
तंव लोक वदती योगिनींसी ॥ आमुचे सर्व लोक योगाभ्यासी ॥ तरी वीर्यस्तंभन आम्हांसी ॥ सहजचि असे साध्य ॥१३॥
एकी मोहिनीवेषधारिणी ॥ आम्ही जाणतों दीर्घ भुलवर्णा ॥ तंव त्या पतिव्रता कामिनी ॥ वदती तयांसी ॥१४॥
म्हणती आमुचिया शुभ गुणांसी ॥ भ्रतार वश ते पतिव्रतांसी ॥ सर्व दांपत्ये पृथ्वीसी ॥ असतां अतिप्रीतीं ॥१५॥
वृथाचि तुमचीं वशीकरणें ॥ या मंदबुद्धी न अंगीकारिती कवणें ॥ सहजचि असती एकाग्रमने ॥ अतिप्रीतीं पुरुषासीं ॥१६॥
एकी त्या महामंत्रें मंत्रूनि विभूती ॥ रक्षाकारका जाहालिया बहुती ॥ भूतबंधनें आमुचें हातीं ॥ जाणती असों हे विद्या ॥१७॥
मग त्यांसी म्हणती नगरलोक ॥ आम्हीं पराभविले देव इंद्रादिक ॥ मग ते इष्टदेव अनेक ॥ केवीं बैसों शक्ती ॥१८॥
एकी सांगती उपचारकथा ॥ आम्ही जाणतों प्रसूतिव्यथा ॥ तंव त्यांसी वदती त्या समस्ता ॥ नरनारी अवघिया ॥१९॥
येथें नाहीं लिंगभेदकाम ॥ असे एकवीस विश्वे धर्म ॥ प्रसूतिव्यथा जाणोनि जन्म ॥ नाहीं दिवोदासराज्यीं ॥२०॥
मंत्रें स्त्रिया गरोदर होती ॥ अकल्पितचि होते प्रसूती ॥ तुम्ही वृथाचि या नगरांत मंदमती ॥ भ्रमतां हीनविवेका ॥२१॥
एकी त्या जाहाल्या कामातुरी ॥ ज्या बहुरुपा वेषधारी ॥ एकी त्या वेश्या होऊनि परोपरी ॥ महामदें चालती ॥२२॥
आमुच्या राष्ट्रीं लोक ब्रह्मचारी ॥ तुम्हांसी भ्रम तो ये पृथ्वीवरी ॥ कष्ट होती अंगा भारी ॥ निष्फळ होती मनोरथ ॥२३॥
एक त्या कोल्हाटीविद्या खेळती ॥ ब्रह्मवीणा रुद्रवीणा घेऊनि हातीं ॥ एक त्या नाना पुष्पें माळीणी होती ॥ जाती घरोघरीं ॥२४॥
मग त्या नगरींच्या महापतिव्रता ॥ रुद्रवीना वाहाती स्वामिभ्कता ॥ त्यांसी आपुला स्वामी पूजितां ॥ अल्पही अवकाश न होतसे ॥२५॥
एकी त्या जाहालिया कुजातिका ॥ भ्रमें भ्रतारांविषयीं शंका ॥ एकी द्रोहिणी कुट्टिणिका ॥ भ्रमती घरोघरीं ॥२६॥
त्यांसी म्हणती पतिव्रता ॥ आम्हीं भक्तीनें वश करितों भर्ता ॥ आमुचे स्वामी आमुचिया चित्ता ॥ सारिखेचि असती ॥२७॥
ऐशा त्या नाना वेष धरुनी ॥ काशीमध्ये भ्रमती त्या योगिनी ॥ अधर्म आणि असत्य कोणी ॥ न देखती येथें ॥२८॥
दशपंचही एका गृहीं ॥ त्यांहीं नगर धूंडाळिलें सर्वही ॥ परी त्यांसी न दिसेचि कांहीं ॥ छिद्र जाण रायाचें ॥२९॥
ऐसा तो लोकपाळ नृपनाथ ॥ सप्तद्वीपवतीचा तो समर्थ ॥ वृथा जाहला योगिनींचा मनोरथ ॥ न सांपडे छिद्र तयाचें ॥३०॥
मग एकवट झालिया सकळा ॥ परिवारेंसीं करुनियां मेळा ॥ मग विचारितां महाविशाळा ॥ एकमेकींसी त्या ॥३१॥
शिवकार्य नव्हे जरी आतां ॥ तरी मागुतें केवीं जावें पर्वता ॥ हें मुख भवानीकांता ॥ केवीं पां दाखविजे ॥३२॥
छिद्र न सांपडे दिवोदासाचें ॥ आपण कार्य नाहीं केलें शिवाचें ॥ तरी तो हर आमुचे वैखरीचें ॥ केवीं पां मानील सत्य ॥३३॥
शिवाचें कार्य नोहेचि पूर्ण ॥ क्रोधायमान होईल त्रिनयन ॥ आतं मंदराचळासी गमन ॥ हा अन्याय आमुचा ॥३४॥
आतां दीर्घ कार्य जें बरवें ॥ जेणें संतोषी होइजे महादेवें ॥ तरी काशीवांचूनी न रहावें ॥ आणिका स्थानीं ॥३५॥
येथें असे जे स्वर्गतरगिणी ॥ इच्या ठायीं राहिजे ॥ योगिनीं ॥ तेणें तपेकरुनि शूलपानी ॥ होईळ प्रसन्न आपणांसी ॥३६॥
मग उत्तरवाहिनीचे तीरीं ॥ राहिल्या योगिनी खेचरी ॥ षण्मुख म्हणे ते अवसरीं ॥ परियेसीं गा अगस्ती ॥३७॥
स्वामी म्हणे गा ऋषि कुंभजा ॥ त्या योगिनींची कैसी कीजे पूजा ॥ त्या सर्व चिंतीत बैसल्या वृषभध्वजा ॥ काशीक्षेत्रीं समस्ता ॥३८॥
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासूनी ॥ जोंपर्यत नवमी त्या दिनीं ॥ नवरात्र उपवास पारणीं ॥ कीजे अहर्निशी ॥ ३९॥
मग यज्ञ कीज नवम दिनीं ॥ पत्रपुष्पें पूजिजे त्या योगिनी ॥ धूतमद्यमांस पात्रें भरुनी ॥ समर्पिजे तयांसी ॥४०॥
षण्मुख म्हणे गा अगस्ति मित्रा ॥ चैत्र शुद्ध पौर्णिमादिनीं यांची यात्रा ॥ ते योगिनी पूजावया धात्रा ॥ सृष्टिकार्यास्तव येतसे ॥४१॥
तंव मंदराचळीं शूलपाणी ॥ काशीवियोगें उत्कंठितें मनी ॥ म्हणे म्यां पाठविल्या योगिनी ॥ त्यांही क्रमिला तोचि पंथ ॥४२॥
तरी आतां कवणासी पाठविजे ॥ जेणें आमुचें कार्य सिद्ध कीजे ॥ तेणें आम्हीं सत्वर पाविजे ॥ काशीवास तो ॥४३॥
ऐसा काशीचा आर्त शूलपाणी ॥ म्हणे त्या मंद झाल्या योगिनी ॥ तंव भक्तिसादर देखिला तरणी ॥ विश्वनाथें पुढें ॥४४॥
मग ब्रध्न म्हणे जी महेशा ॥ विपत्ती करीन त्या दिवोदासा ॥ काशीबाहेर घालीन हा भरंवसा ॥जाणिजे तुम्हीं ॥४५॥
ऐसें बोलिला त्रैलोक्यभानु ॥ तेणें संतोषला त्रिनंयनु ॥ मग शिवासी वंदूनिअय ब्रन्धु ॥ क्रमिता जाला काशीमार्ग ॥४६॥
ऐसा क्रमिता झाला तेजःपुंज ॥ तो कश्यप-अदितींचा आत्मज ॥ मेरुप्रदक्षिणा करी सहज ॥ दिनमणी तो ॥४७॥
देखोनि मंदाकिनीचें तीर ॥ सूर्य झालासे अमृतकर ॥ मग स्नान करोनियां काशीपुर ॥ प्रवेशला कैसा ॥४८॥
नाना रसमात्रा घेऊनिया सामग्री ॥ सूर्यवैद्य हिंडे काशीपुरीं ॥ परी कोणी न बहाती जिव्हाग्रीं ॥ व्याधिउत्तर ॥४९॥
लोक म्हण्ती वैद्या अविचारा ॥ आमुच्या राज्यीं नाहीं व्याधी जरा ॥ ठाउकें होईल नृपवरा ॥ तो विपत्ती करील तुम्हां ॥५०॥
जरी व्याधी तंव यमाचा पाश ॥ तरी तें झालें यमपुर उद्वस ॥ जों महाराज आहे दिवोदास ॥ ऐशीं सहस्त्र वर्षेवरी ॥५१॥
जरी व्याधि व्यापक पृथ्वीवरी ॥ तैं सबरांभरित असे यमपुरी ॥ आतां दिवोदासाच्या राष्ट्रीं ॥ सर्व व्याधिनिमुक्त ॥५२॥
ऐसे दिवोदासाचे सर्व जन ॥ सत्यलोक आणि वैकुंठावांचून ॥ त्यांसी अप्राप्त यमभुवन ॥ ऐशीं सहस्त्र वर्षेपर्यंत ॥५३॥
ऐसी ते सर्व काशीपुरी ॥ सूर्य हिंडला बहुकाळवरी ॥ परी व्याधिवार्ता हे प्रत्युत्तरीं ॥ न बोलती जन ॥५४॥
जैसा दग्धं बीजाचा अंकुर ॥ सुद्ध भूमीसी न करी विस्तार ॥ तैसा काशीभोंवता दिवाकर ॥ फिरोनि व्यर्थचि मनोरथ ॥५५॥
जैसा भृत्य पाठविजे कार्यार्था ॥ तो पैजेसी निघे पुरुषार्था ॥ कार्य नव्हे मग व्यथा ॥ बाधे चिंतेची तया ॥५६॥
तैसा सूर्य झाला चिंतातुर ॥ त्यानें पैज घेतली होती थोर ॥ कार्य पूर्ण न होतां शंकर ॥ केवीं पां मानवेल ॥५७॥
छिद्र न सांपडे दिवोदासाचें ॥ तेथें कर्तव्य न चले ब्रह्मादिकांचें ॥ अपार सामर्थ्य त्या लोकांचे ॥ अगम्य झालें सूर्यासी ॥५८॥
अरे या दिवोदासाचे राष्ट्रीं ॥ सर्व व्याधीं बुडविल्या सागरीं ॥ सर्व जन निर्व्याधी पृथ्वीवरी ॥ तूं भ्रमसी मंदमती ॥५९॥
ऐसा चिंतातुर जाहाला सविता ॥ म्हणे शिवापाशीं केवीं जाऊं आतां ॥ कवणिया पौढीं भवानीकांता ॥ दाखविजे मुख ॥६०॥
अन्यायी झालों शिवकार्यासी ॥ आतां केवीं जाऊं त्या शिवापाशी ॥ आघींचि वियोग जाहाला त्यासी ॥ त्या वाराणशीचा ॥६१॥
आधींचि तमोगुण भवांनीकांत ॥ काशीवियोग झाला महा अद्‌भुत ॥ त्यावरी परिसिलिया वृत्तान्त ॥ मग अग्नि शिंपिला घृतें जैसा ॥६२॥
आतां जो दीर्घ अन्यायी शिवाचा ॥ त्यासी त्रिभुवनीं ठाव कैंचा ॥ ऐसा समर्थ जो कोण त्याचा ॥ करी अंगीकार ॥६३॥
तरी एक वदलासे त्रिशूलधर ॥ वेदवाक्यें केलासे निर्धार ॥ जो शिवआज्ञेचा तस्कर ॥ तेणें राहिजे कोठें ॥६४॥
तरी या काशीचें नामस्मरण ॥ येथेंचि कीजे तप अनुष्ठान ॥ काशी हा मंत्र अक्षरें दोन ॥ जपिजे अहोरात्र ॥६५॥
म्हणोनि काशीविण त्रिभुवनीं ॥ त्यानें राहों नये आणिका स्थानीं ॥ मग तो योजिता झाला तरणी ॥ काशीमध्ये तपःसिद्धी ॥६६॥
ऐसे विचारी तो तेजकल्लोळ ॥ आतां होइजे काशीचा रक्षपाळ ॥ मग संतोषेल जाश्वनीळ ॥ तेणें तर्पेकरोनी ॥६७॥
मग काशीच्या अष्ट दिशा कोणीं ॥ द्वादशाविध झाला तरणी ॥ जैसा रत्नमाळेशीं दिव्य मणे ॥ घालिजे प्रसंगें ॥६८॥
तरी वाराणशीची प्रदक्षिण ॥ ते दिव्य रत्नमाळा जैशी जाणा ॥ त्या पंचक्रोशीचिया भ्रमणा ॥ सूर्य जाहाला द्वादश स्थानीं ॥६९॥
तंव स्वामीसी वदता झाला अगस्ती ॥ काशीमध्यें जे द्वादश गंभस्ती ॥ ते निरुपा जी सूर्यमूर्ती ॥ कवण कवण ॥७०॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ द्वादश सूर्य झाले वाराणसीं ॥ तरी ते निरोपूं तुम्हांसी तुम्हांसी ॥ कोण कोण ते ॥७१॥
काशीचिया प्रदक्षिणा गभस्त ॥ द्वादश स्थानीं झालासे आदित्य ॥ प्रथम नाम तें मयूखादित्य ॥ दुसरा यमादित्य तो ॥७२॥
तिसरा तो सांबादित्य नामें ॥ चौथा तो द्रौथा तो द्रौपदादित्य नामें ॥ वनवासीं सत्त्व राखिलें धर्मे ॥ त्याचेचि शक्तीनें  ॥७३॥
पांचवा तो नामें खखोल्क ॥ षष्ठ तो म्हणिजे उत्तराक ॥ अरुणादित्य आणि लोलार्क ॥ आणि वैनतेयादित्य ॥७४॥
वृद्धादित्य नामें महाकीर्ती ॥ वेदपुराणप्रसिद्ध तो गभस्ती ॥ केशवादित्य नामें महाकीर्ती ॥ द्वादशावा गंगादित्य बोलिजे ॥७५॥
स्वामी म्हणे गा मैत्रावरुणी ॥ ऐसी पंचक्रोशी हे प्रदक्षिणी ॥ द्वादशादित्य जाहाला तो महामुनी ॥ कश्यपात्मज जो ॥७६॥
तंव स्वामीसी प्रार्थी अगस्ती ॥ द्वादश रूपें जाहाला गभस्ती ॥ त्या द्वादश कथा मजप्रती ॥ निरूपा स्वामी ॥७७॥
मज काशीवियोग महा अधवर ॥ ते यागींचा आचार्य तूं थोर ॥ तृप्त करितोसी वैश्वानर ॥ शिवकथाभागदानीं ॥७८॥
कीं ती माझी वियोगतृष्णा ॥ तेथें तूं क्षीराणीव षडानना ॥ मी अनाथ जी एका आनना ॥ प्रार्थूं किती ॥७९॥
जैसा तो आषाढी मेघजीवनीं ॥ चातक वांच्छा करी काननीं ॥ मग तो वृष्टी करी व्योमीहूनी ॥ मोकली धारा अमित जैशा ॥८०॥
तैसा तूं स्वामी जलधर पूर्वापार ॥ शिवकथामृताचा वृष्टिकर ॥ तेणें चित्तसरितेसी आला महापूर ॥ नेलीं दोषादि वोसणें ॥८१॥
तंव स्वामी म्हणे गा महाऋषी ॥ तूं आनंदकर्ता माझिया मानसीं ॥ तरी मार्तंडाची कथा कैशी ॥ ती करवूं श्रवण तुज ॥८२॥
तो कश्यपाचा वीर्यगोळ ॥ अदितीनें झेलिला महा तेजाळ ॥ तो तृतीय नेत्रींचा वडवानळ ॥ शिवें दिधला अदितीसी ॥८३॥
षणमुख म्हणे झी कुंभजा ॥ कामधेनूनें शापिली शैलेंद्रेजा ॥ ते द्रपदाच्या घरीं विश्वबीजा ॥ अवतरली द्रौपदी ॥८४॥
जे पंचमूर्ति उद्भवले पांडव ॥ तो साक्षात अवतरला शिव ॥ दाक्षायणीस्तव महादेव ॥ झाला पंचमूर्ती ॥८५॥
तरी हे कथा दाक्षायणीप्रती ॥ अनागत संभाषिलें पशुपतीं ॥ तेंचि हें भविषय तुजप्रती ॥ निरूपितों कुभजा ॥८६॥
विरिंचिदेवाचा नंदन ॥ वसिष्ठ नामें महा सगुण ॥ तो बहुप्रयत्नें केला प्रसन्न ॥ द्रुपदराजयानें ॥८७॥
तेणें दोन पुत्र एक दुहिता ॥ मागीतली गा ऋषिमहंता ॥ ते महा सगुण पतिव्रता ॥ द्रौपदी नामें ॥८८॥
मग त्या मंदाकिनीचे तीरीं ॥ त्या कल्पाक्षराचे नगरीं ॥ तेथें याग मांडिला बरवियापरी ॥ द्रुपदरायें तेणें ॥८९॥
याज आणि उपयाज नाम ॥ हे दोघे बंधु ऋषि उत्तम ॥ त्यांचेनि मंत्रें मांडिला होम ॥ त्या मंदाकिनीचे तीरीं ॥९०॥
ऐसा नाना द्रव्यें हुताशन ॥ पूजिता जाहाला तो नृपनंदन ॥ मग पूर्णाहुतीसी कृशान ॥ झाला प्रसन्न तेधवां ॥९१॥
प्रथम यागींहूनि महावीर ॥ निघाला धृष्टद्युम्न कुमर ॥ खेटक मुकुट धनुष्य शर ॥ सहवर्तमान जो ॥९२॥
मग दुसरे आहुतीचे वेळीं ॥ सवेंचि निघाली द्रुपदबाळी ॥ ते अतिसुंदर गौर सांवळी ॥ उद्भवली ते यागीं ॥९३॥
धृष्टद्युम्र आणि शिखंडिया ॥ हे दोघे पुत्र आणि द्रौपदी तृतीया ॥ ते अवतरली महामाया ॥ आदिशक्ती ॥९४॥
ऐसी ते महासुंदरी ॥ कीं हैमवतीचि उद्भवली अध्वरीं ॥ ते महाशैलकुमरी ॥ शापदग्ध अगस्ती ॥९५॥
तंव अगस्ती म्हणे षडानना ॥ ते शैलजा अवतरली काय कारणा ॥ कवणें शापिलें कवण्या लांछना ॥ तें निरूपा मज स्वामी ॥९६॥
मग स्वामी म्हणे गा अगस्ती ॥ ऐसीचि महादेवासी प्रश्नी हैमवती ॥ तियेसी निरूपी जें पशुपती ॥ तेंचि सांगेन तुज आतां ॥९७॥
कोणे एके काळीं हैमवतीसी ॥ येणें जाहालें हिमवंत पित्यापासीं ॥ तंव तेथें देखिलें धेनुकेसी ॥ वेढिलें पंच पोळी ॥९८॥
ऐसें विपरीत देखोनि नयनीं ॥ महा हास्य करी दाक्षायणी ॥ म्हणे जळो जिणें ऐसिया कामिना ॥ व्यभिचारा पैं ॥९९॥
पंच वरां एक सुंदरी ॥ व्यभिचारिणी निर्लज्जा नारी ॥ जंव हा मेरू असे पृथ्वीवरी ॥ तंववरी भोगी ती निरयासी ॥१००॥
तंव कामधेनु वदे शापदान ॥ तुवां हास्य केलें पाहूनि न्यून ॥ तरी तुजही भोगितील पांचजण ॥ महापुरुष ते ॥१०१॥
ऐसें तिचें शापोत्तर ऐकोनी ॥ थोर दुःखित जाहाली दाक्षायणी ॥ मग ती स्मरारी शूलपाणी ॥ स्मरती जाहाली ॥१०२॥
म्हणे ऐसें काय जाहालें कटकटा ॥ धांवें धांवें गा नीलकंठा ॥ तुजवांचूनि कवणा आणिका ॥ स्मरावें म्यां ॥१०३॥
हैमवतीये जाणोनि शापदान ॥ मग विचारिता जाहाला पंचानन ॥ म्हणे सहज असे अवतार घेणें ॥ देवकार्यासी ॥१०४॥
मग शिवें आपुलिया तत्त्वाचे मंत्र ॥ पांचजणांसी दिधले होते पुत्र ॥ ते वर्तत असती जें सूत्र ॥ तें शिवाचें एक ॥१०५॥
अश्विनीदेव आणि कृतांत ॥ हे मार्तंडासी दिधले दोन सुत ॥ पवन आणि वज्रहस्त ॥ हे दिधले कश्यपासी ॥१०६॥
पांचवा तो नामें जाणावा वरुण ॥ तो कर्दमॠषीचा नंदन ॥ ऐसे पंचमूर्ति पंचानन ॥ अवतरला होता ॥१०७॥
ते शिवाचे भाग दशांशमूर्ती ॥ ते व्यासें मंत्र दिधले कुंतीप्रती ॥ मग यागीं अवतरली हैमवती ॥ द्रुपदरायाचे घरीं ॥१०८॥
ते द्रौपदी दशांशभागांतरीं ॥ जन्मली द्रुपदाचे अध्वरीं ॥ ते शापास्तव शैलकुमारी ॥ जाहाली कार्याकारणें ॥१०९॥
मग तो सदाशिव पंचमूर्ती ॥ ते पांच पांडव प्रसवली कुंती ॥ ते द्रौपदीचे पांचही पती ॥ भोगिते जाहाले बाहात्तर दिन ॥११०॥
मग बाहात्तर दिवसांउपरी ॥ यागीं स्नान करी ते सुंदरी ॥ ऐसे पांच एका संवत्सरीं ॥ भोगी ते द्रौपदी ॥१११॥
मग विपत्तीस्तव अरण्यीं ॥ पांचही पांडव आणि कामिनी ॥ वनवास क्रमितां काशीस्थानीं ॥ आले समस्त ॥११२॥
मग पांचहीजणांचा एक विचार ॥ त्यांहीं लिंग स्थापिलें पांडवेश्वर ॥ द्रौपदीनें स्थापिला द्रौपदीश्वर ॥ मग आराधिती मार्तंडासी ॥११३॥
षणमुख म्हणे गा अगस्ती ॥ मग द्रौपदीनें पूजिला गभस्ती ॥ तो वर देता झाला संज्ञापती ॥ द्रौपदीसी ते काळीं ॥११४॥
तंव अगस्ती प्रार्थी स्वामीसी ॥ गभस्ति ऐसें नाम कां सूर्यासी ॥ तें महा कृपावंता आम्हांसी ॥ कीजे निरूपण ॥११५॥
तंव बोलिला तो कूपोद्भव ॥ कश्यपासी जाहाला वीर्यद्रव ॥ तो महाकल्लोळ भानुदेव ॥ हस्तीं झेलिला अदितीनें ॥११६॥
तो जन्मला अदितीचे हस्तीं ॥ तेंचि गुणनाम झालें गभस्ती ॥ त्यासी प्रतिपाळी ते अदिती ॥ म्हणोनि आदित्य नाम ॥११७॥
तो द्रौपदीसी झाला प्रसन्न ॥ तिनें मागितलें वरदान ॥ आम्हीं सेवितां महा अरण्य ॥ व्हावें साहाकारी ॥११८॥
तंव द्रौपदीसी म्हणे ब्रध्न ॥ तुज थाली समर्पिली सत्त्वगुण ॥ ही प्रसवेल महामिष्टान्न ॥ तुम्ही असतां वनवासी ॥११९॥
जें जें मनीं कल्पिशील वहिली ॥ तें तें क्षणीं उद्भवील हे थाली ॥ आणिक तुवां अवघड काळीं ॥ स्मरावें मज भक्तीनें ॥१२०॥
तंव द्रौपदीसी बोले गभस्ती ॥ दंडपाणीसमीप जो उग्रमूर्ती ॥ तो द्रौपदादित्य तेजपूर्ती ॥ असे विश्वनाथा दक्षिणभागीं ॥१२१॥
तेथें असे ते द्रौपदी सुंदरी ॥ ते द्रौपदादित्यासी नमस्कारी ॥ तयासी पाहाती जे नरनारी ॥ ते सर्व व्याघिनिर्मुक्त ॥१२२॥
ते काशीमध्यें द्रौपती सती ॥ जे मनोभावें अर्चिती पूजिती ॥ त्यांसी धन धान्य-भक्ष्यविपत्ती ॥ नव्हे कोणे काळीं ॥१२३॥
जे द्रौपदीसी घालिती प्रणाम साष्टांग ॥ त्याचें ज्वरविवर्जित होईल अंग ॥ मनोमळ भंगोनियां चांग ॥ प्रकटती सत्त्वगुणें ॥१२४॥
तंव अगस्तीसी वदे शिवसुत ॥ ऐसा तो काशीमध्यें द्रौपदादित्य ॥ त्याचा तुज मूळ वृत्तांत ॥ निरूपिलासे कुंभजा ॥१२५॥
आतां मयूखादित्य तुजप्रती ॥ तो समूळ सांगेन गा अगस्ती ॥ शिवदास गोमा श्रोतयांप्रती ॥ प्रार्थी कथे पुढलिये ॥१२६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे देवोदासचरिते द्रौपदादित्यवर्णनं नाम पचचत्वारिंशाध्यायः ॥४५॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति पंचचत्वारिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP