मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २८ वा

काशी खंड - अध्याय २८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
मग संघट्टले दोघे अंगांसी ॥ दोघे प्रवर्तले मल्लयुद्धासी ॥ चरणप्रहारें ताडिती भूमीसी ॥ तेणें पडिल्या महाहरी ॥१॥
लाविती कळा हाणिती कोंपरीं ॥ वज्रमुष्टी ताडिती शरीरीं ॥ महात्राणें आदळिती धरेवरी ॥ शैल जैसे एकमेकां ॥२॥
ऐसे जे कां महावीर ॥ एकाहूनि एक बळी थोर ॥ भिडती लक्ष संवत्सर ॥ मल्लयुद्धें समरीं समरीं ते ॥३॥
मग सहस्त्रनयन देवेंसीं ॥ भिडों आला असुरांसी ॥ तुंबळ युद्ध जाहालें उभयतांसी ॥ तें सांगतां वाटे आश्चर्य ॥४॥
पडिला छत्रांचा अंधकार ॥ रजें झांकला दिनकर ॥ द्ळाधिपती मुचुकुंद वीर ॥ महाबलाढय तो एक ॥५॥
युद्ध मांडलें महाघोर ॥ तेथें मिळाला देवभार ॥ परी तो तारक महाअसुर ॥ अजिंक्य सकळ सैन्यासी ॥६॥
मग पालाणिला ऐरावती ॥ तेथें मुख्यनायक सुरपती ॥ मेषावरी बैसोनि महादीप्ती ॥ कृशानु पातला ॥७॥
महिषवाहन महाअद्‍भुत ॥ तयावरी बैसोनि आला कृतांत ॥ राक्षसांसहित निऋतिनाथ ॥ सूकरवाहन तो आला ॥८॥
पश्चिमेचा आला वरुण वीर ॥ जो कर्दमॠषीचा कुमर ॥ पालाणूनियां मगर थोर ॥ आला युद्धासी ॥९॥
शशकयानें आला मारुत ॥ जो महाप्रतापी कश्यपसुत ॥ उत्तरेचा शीतकर अत्रिसुत ॥ आला धांवत मृगवहनी ॥१०॥
ऐसे आले दिक्पती ॥ परम अद्‍भुत बळशक्ती ॥ परी तारकासुराची सामर्थ्यगती ॥ न तुळे कवणासी सर्वथा ॥११॥
देव आणि असुर थोर ॥ दोघांचा पितर ॥ परी माता वेगळ्या म्हणूनि महामत्सर ॥ दिती आणि अदिती ॥१२॥
म्हणोनि लागली दोघां फळी ॥ ते निवारेना कोणेकाळीं ॥ जे दैत्य उद्भवती महीतळीं ॥ ते वेढिती अमरपुरा ॥१३॥
आतां असो हें युद्धचरित्र ॥ झुंजता जाहाला मांधातृपुत्र ॥ तें न सांगों तरी धर्मशास्त्र ॥ क्षेत्रधर्म पवित्र सांगणें पडे ॥१४॥
ऐसें देवदैत्यांचें युद्ध दारुण ॥ बहुत दिवस जाहालें निर्वाण ॥ मुचुकुंद जाहाला बलक्षीण ॥ भिडला युगें अठठावीस ॥१५॥
अठठावीस युगें अहोरात्र ॥ झुंजला माधात्याचा पुत्र ॥ देवांचिया करीं शस्त्र ॥ उरलें नाहीं ते काळीं ॥१६॥
मग मुचुकुंदासी आशीर्वचन ॥ निद्रा देते जाहाले देवगण ॥ निद्रा भंगील तो दग्ध होईल पूर्ण ॥ जागृतीं ईश्वर भेटेल ॥१७॥
मग मुचुकुंदासी म्हणती प्रमथ ॥ निद्रेअंतीं भेटेल वैकुंठनाथ ॥ तैंचि नेत्राग्नीनें पराभविसी समर्थ ॥ कालयवन दैत्य तो ॥१८॥
मग देवीं सांडिली अमरावती ॥ गेले मंदराचळाप्रती ॥ दैत्य जाहाले जी अधिपती ॥ अमरभुवनाचे ॥१९॥
सिंहासनीं बैसला तारकासुर ॥ प्रजा पाळी जैसा वज्रधर ॥ तयाहूनि विशेष तारकासुर ॥ भोक्ता इंद्रपदाचा ॥२०॥
तारकासुर म्हणे राहु कपिस्कंधा ॥ आपण पराभविलें मुचुकुंदा ॥ आपणांहूनि भोक्ते अमरपदा ॥ नसती त्रिभुवनीं सर्वथा ॥२१॥
देवां लंघविलें उपवन ॥ राज्यभ्रष्ट केला सहस्त्रनयन ॥ आतां शस्त्र करीं धरी देवगण ॥ ऐसा नाहीं भुवनत्रयीं ॥२२॥
तुम्हीं जावें पाताळभुवनीं ॥ शेष काढावा पृथ्वीपासुनी ॥ तुम्हीं रक्षावी मेदिनी ॥ आपुले निजसामर्ध्यें ॥२३॥
तंव बोले हिरण्याक्ष असुर ॥ पाताळभ्रष्ट केला फणिवर फणिवर ॥ तुम्हांसी न कळतां हा विचार ॥ संपादिलें कार्य कवणे रीतीं ॥२४॥
मेदिनी टाकिली सागरीं ॥ महाभयें पळाले शेष हरी ॥ क्षिति धरिली दिशाकुंजरी ॥ आपुलेनि पुरुषार्थें ॥२५॥
ऐसे पराभविले देव समग्र ॥ पदीं बैसले महाअसुर ॥ मग प्रमथीं मांडिला विचार ॥ सुरेंद्रगुरूसीं एकांतीं ॥२६॥
गुरुसी म्हणे वज्रधर ॥ तारकासी निवटी ऐसा नसे वीस ॥ गुरु म्हणे हा दीर्घ विचार ॥ पुसावा जाण चतुर्मुखासी ॥२७॥
तंव बोलता जाहाला दिनकर ॥ ब्रह्मयाचा वरदपुत्र तारकासुर ॥ तरी त्याचा जो मृत्युविचार ॥ विधी न कथीचि तुम्हांसी ॥२८॥
मग बोलिला बृहस्पती ॥ आतां सर्वही स्मरा लक्ष्मीपती ॥ तयावांचूनि असुरशांती ॥ कोणे काळीं न होय ॥२९॥
मग देव गेले क्षीरसागरीं ॥ त्यांहीं प्रार्थिला तो श्रीहरी ॥ म्हणती तुजवांचूनि गा असुरारी ॥ परम त्राता कोण असे ॥३०॥
तुम्हांवांचूनि ह्रषीकेशा ॥ देवांसी झगटली उत्तरदशा ॥ विनाशकाळ तो क्षोभला कैसा ॥ अमरपदासी ॥३१॥
आतां धांवणें कीजे मुरारी ॥ देवां थोर गांजिलें असुरीं ॥ तारकासुरें अमरपुरी ॥ केली राजधानी सर्वांपरी ॥३२॥
ऐसा समस्त देवगणीं ॥ मणोभावें स्तविला चक्रपाणी ॥ तों वाचा जाहाली गगनीं ॥ श्रीरसमुद्रीं तेधवां ॥३३॥
तारकाचिया ऐश्वर्याचें कारण ॥ जंव आले नाहीं अवसानालागून ॥ तोंवरी ब्रह्मा हरि त्रिनयन ॥ अशक्त जाणा त्यापुढें ॥३४॥
शिववीर्याचा पवित्रु ॥ जैं उद्भवले षड्‍वक्रु ॥ तो तारकासुराचा शत्रु ॥ फेडील संदेह ॥३५॥
ऐसी वदली आकाशवाणी ॥ मग विचारिलें देवगणीं ॥ भोगारूढ असतील हरभवानी ॥ सहजगतीं ये समयीं ॥३६॥
परी कुमर शिववीर्याचा ॥ नव्हे उदरीं भवानीच्या ॥ तियेसी शाप असे पृथ्वीचा ॥ हे कथा भविष्योत्तरपुराणीं ॥३७॥
देवांसी जावया हाचि समय ॥ शिवसुतावांचूनि नाहीं जय ॥ तो तारकाचा करील क्षय ॥ हें भविष्य पूर्वींचे ॥३८॥
मग देवीं पाचारिला कृशान ॥ त्यासी आज्ञा करि सहस्त्रनयन ॥ शिवासी चेतवावा पंचबाण ॥ वीर्य द्रववावें बहुप्रयत्नें ॥३९॥
मग त्या कैलासभुवनीं ॥ देवआज्ञेनें जाता जाहाला वन्ही ॥ रूप घेतलें पालटूनी ॥ मयूराचें तेधवां ॥४०॥
दोन सहस्त्र संवत्सर ॥ सुरतीं होती गौरी-हर ॥ तिंहीं देखिला जी मयूर ॥ तांडव नृत्य करितां तो ॥४१॥
पिच्छें वाजवी नानावृत्ती ॥ जैशा कोकिलाकंठश्रूती ॥ तेणें सकाम चेते पशुपती ॥ सुरतीं विशेष तेधवां ॥४२॥
मग शिवें अव्हेरूनि दाक्षायणी ॥ चित्त स्थिराविले मयूरध्वनीं ॥ अकस्मात द्रवले शूलपाणी ॥ वीर्य पडलें क्षितीवरी ॥४३॥
तें मय़ूरें देखिलें द्दष्टीं ॥ तेणें वीर्य झेलिलें चचुपुटीं ॥ तें सामावूनि पोटीं ॥ अद्दश्य जाहाला क्षणार्धें ॥४४॥
मग उठिली भवानी ॥ कामें रत होती दाक्षायणी ॥ तिनें वीर्य देखिलें नयनीं ॥ पडतां अवनीवरी ॥४५॥
तें वीर्य देखोनियां गौरी ॥ अति क्रोधायमान झाली धरेवरी ॥ म्हणे भला गे चाळविला त्रिपुरारी ॥ लंपट मेदिनी कैसी तूं ॥४६॥
तुवां अभिलाषिला माझा पती ॥ म्हणोनि शाप घेईं माझा क्षिती ॥ तुज भोगितील बहुत भूपती ॥ चंद्रार्कवरी पाहें पां ॥४७॥
मग पार्वतीसी म्हणे मेदिनी ॥ म्यां नाहीं अभिलाषिला शूलपाणी ॥ विनादोषें दाक्षायणी ॥ शापिलें त्यां मजलागीं ॥४८॥
आतां तूं शाप घेईं माझा ॥ तुझे उदरीं नाहीं पुत्रप्रजा ॥ पुत्र होतील हो वृषभध्वजा ॥ तुजविरहित दाक्षायणी ॥४९॥
आतां असो हा विस्तार ॥ वीर्य घेऊनि गेला मय़ूर ॥ गरोदर झाला वैश्वानर ॥ शुचिष्मतीसुत तो ॥५०॥
अमोघ वीर्य त्या शिवाचें ॥ एक हैमवती पात्र तयाचें ॥ शरीर क्षीण झालें वन्हींचें ॥ वीर्यतेजेंकरूनियां ॥५१॥
तंव सप्तऋषींच्या अंगना ॥ प्रयागीं आल्या माघस्नाना ॥ अरुंधती वेगळीकरूनि जाणा ॥ इतरा तेथें पातल्या ॥५२॥
पुलस्त्याची प्रीती ॥ क्रतूची संतती ॥ अंगिराची नामें स्मृती ॥ गुरुमाता ती होय ॥५३॥
मरीचिदेवाची संभूता ॥ अत्रीची अनसूया पतिव्रता ॥ दक्षरायाची प्रसूता ॥ ऐशा त्या साहीजणी ॥५४॥
स्नानें करूनि त्रिवेणीसी ॥ जडत्वें पीडल्या त्या मानसीं ॥ त्यांनीं आलिंगिलें अग्नीसी ॥ साहीजणींनीं तेधवां ॥५५॥
तंव त्या उत्पत्तिप्रलयद्वारें ॥ संचार केला वैश्वानरें ॥  तों दिसतीं झालीं दीर्घ उदरें ॥ सहीजणींचीं ॥५६॥
तंव त्या साही झाल्या भयातुर ॥ म्हणती आमुचे स्वामी तपस्वी थोर ॥ ऐसें विपरीत देखोनियां साचार ॥ होतील परम क्रोधायमान ते ॥५७॥
आम्ही नेणों परपुरुषभोग ॥ नहीं वर्तलों आन मार्ग ॥ नित्याचारी असतां हा योग ॥ घडला कैसा नेणवेचि ॥५८॥
मग त्या भिवोनि स्वामींसी ॥ साहीजणी आल्या वाराणशीसीं ॥ स्नानें सारोनि मणिकर्णिकेसी ॥ भावें पूजिला विश्वनाथ ॥५९॥
मग त्या जान्हवीचे तीरीं ॥ उदरें चिरिती साही सुंदरी ॥ गर्भ सांडिले कूपामाझारीं ॥ काशीस्थळीं पैं ॥६०॥
मग त्यांहीं केल्या लिंगस्थापना ॥ तेणें शुद्ध जाहाल्या ऋषिअंगना ॥ मग त्या जात्या जाहल्या भवना ॥ सप्तऋषिमंडळामाझारीं ॥६१॥
मग ते षङ्गर्भ क्षणमात्रें ॥ एक पिंड षड्‍ वक्रें ॥ द्वादश भुजा द्विपाद हीं गात्रें ॥ उद्भवलीं तयासी ॥६२॥
ऐसा शत एक संवत्सरीं ॥ गर्भ आकारला कूपनीरीं ॥ तंव तो नारदमुनीश्वरीं ॥ देखिला तेथें स्ननेत्रीं ॥६३॥
म्हणे हा तंव शिववीर्याचा ॥ कुमर होय पार्वतीचा ॥ हा पूर्ण शत्रु होय तारकाचा ॥ उद्भवला कूपामाझारीं ॥६४॥
तंव नारद सांगे भवानीसी ॥ स्तनपान दीजे पुत्रासी ॥ मग भवानीनें तयासी ॥ लाविलें स्तनीं तेधवां ॥६५॥
भवानीपयाची जाहाली मुक्ती ॥ तेणें उद्भवली अद‍भुत शक्ती ॥ विकट आकारली मूतीं ॥ षडाननाची तत्काळ ॥६६॥
तो भवानीशंकरांचा जाण कुमर ॥ जो दैत्यवन छेदावया कुठार ॥ त्यासी त्रिपुरांतक त्रिशूळधर ॥ देत सुनाभ शस्त्रासी ॥६७॥
ऐसा विकट तो श्यामकर्ण ॥ षण्मुख अष्टादश लोचन ॥ द्वादश भुजा रुद्रनंदन ॥ उदेला तो अवनीवरी ॥६८॥
षडाननीं शशिदीप्ती ॥ असंभाव्य आयुधें अगाधशक्ती ॥ भाळीं त्रिपुंड्र शुभ्र विभूती ॥ मय़ूरवाहन शोभतसे ॥६९॥
करीं खङ्ग त्रिशूळ ॥ गदा कोदंड चक्र विशाल ॥ शंखस्फुरणीं मुखमंडळ ॥ शिवनाम घोषें गर्जतसे ॥७०॥
तयासी देखोनि गौरी-हर ॥ प्रेमें आनंदलीं थोर ॥ उचंबळले सप्तही सागर ॥ आनंदेंकरूनी ॥७१॥
मग जानूवरी बैसवूनि षड्‍वक्त्र ॥ शिवें तया उपदेशिला मंत्र ॥ महामारीनिवारण विचित्र ॥ आणि नानाविध युक्ती युद्धाच्या ॥७२॥
मग त्या मंदरपर्वतीं ॥ आनंदले देव सुरपती ॥ कल्पद्रुमातळीं क्षुधाथीं ॥ वरपडती जैसे ॥७३॥
मग बृहस्पती आणि वज्रधर ॥ त्यांहीं प्रार्थिला तो शंकर ॥ मग आणिला तो कुमर ॥ युद्धाकारणें समरंगणीं ॥७४॥
मग स्वामीसी करूनि प्रदक्षिणा ॥ पूजिला षोडशोपचारीं जाणा ॥ म्हणे यजमान होईं षडानना ॥ सर्व प्रथमांचा अधिपती ॥७५॥
तुम्ही मुख्य जी दळामाझारीं ॥ तारक वधिजे आतां झडकरी ॥ देवांसी दवडिलें गिरिकंदरीं ॥ अठठावीस युगेंपर्यंत ॥७६॥
उठा जी वेगें विकटमूतीं ॥ थोर गांजिलें आम्हां दैत्यीं ॥ शेष पळवूनियां वसुमती ॥ राखिली असुरीं सामर्थ्यें ॥७७॥
ऐसें ऐकोनि वचन ॥ कोपारूढ जाहाला षडानन ॥ द्वादश भुजा करिती स्फुरण ॥ आरक्त नेत्र विकासले ॥७८॥
मग ते मंदरपर्वताहुनी ॥ सर्व आले अमरभुवनीं ॥ महायुद्ध मांडिलें समरांगणीं ॥ तारकासुरासीं ॥७९॥
भार सज्जिले महाअसुरीं ॥ वाद्यध्वनी थोर गजरीं ॥ काहाल सनया रणमोहरी ॥ महानादें व्योमीं गर्जती ॥८०॥
मग तारकें पाहोनियां सुमुहूर्त ॥ बाहेर निघाला त्वरित ॥ तेव्हां मुकुट जाहालासे गलित ॥ मस्तकींचा ॥८१॥
पुढें केला तो सेनाधिपती ॥ तों तालजंघा बळाधिपती ॥ अस्रुर पावले शीघ्रगतीं ॥ देवसैन्यावरी ॥८२॥
सैन्याधिपति होतांचि शिवकुमर ॥ तेणें बलसागर जाहाला सुरेश्वर ॥ अशक्त जाहाले महाअसुर ॥ स्वामीचिया बळेंकरूनी ॥८३॥
तरणितेजें जैसा तृणांकुर ॥ वाढतां होतसे मंदविस्तार ॥ मग पावलिया जलधर ॥ मानिजे सुख तयांनीं ॥८४॥
तैसे तारकें तृणासमान ॥ मानिले होते सर्व देवगण ॥ तैसे स्वामितेजेंकरून ॥ असुर तृणासमान मानिले ॥८५॥
तंव स्वामीनें त्राहाटिला डमरू ॥ मग देवांचे पुढारले भारू ॥ सेनाधिपति कृतांतवीरू ॥ आणि वरुण तोही पराक्रमी ॥८६॥
दोनी द्ळें मिळालीं युद्धीं ॥ तारक आणि स्वामी दोघे दळाधिपती ॥ जाणों एकवटले सप्तही उदधी ॥ प्रलयकालीं समस्त ॥८७॥
लोटले कुंजरांवरी कुंजर ॥ रथियांवरी रथभार ॥ वारुवांवरी लोटती अश्वभार ॥ पदातियांवरी पदाती ॥८८॥
एकमेकां ताडिती महाअसुर ॥ यम वरुण आणि कुबेर ॥ तेथें जाहाले हो गिरिवर ॥ दैत्यकलेवरांचे ॥८९॥
तेथें मोडला दैत्यभार ॥ असुरांसी जाहाला हाहाकार ॥ मग दैत्य कथिते जाहाले विचार ॥ तारकासुरासी ॥९०॥
तेणें क्रोधावला तारकदैत्य ॥ तों रणभूमीसी आला शिवसुत ॥ मयूरवाहनीं मिरवत ॥ देवभारेंसीं ॥९१॥
मग मिळालीं सैन्यें दोन ॥ रजें झांकोळला दिनकर जाण ॥ हांकें कोंदलें त्रिभुवन ॥ उलंडूं पाहातीं सप्तसिंधु ॥९२॥
तंव उठावला ॥ जो महाप्रौढीचा अतिघन ॥ त्यावरी लोटता जाहाला वरुण ॥ कर्दमसुत बलाढय तो ॥९३॥
मग स्वामीनें डमरू त्राहाटिला ॥ तेणे मेरू थरारला ॥ थोर प्रळय प्रवर्तला ॥ सर्वजनांसी ॥९४॥
एकमेकांहूनि आगळी शक्ति ॥ तालजंघ मूर्च्छित पडिला क्षितीं ॥ मग असुरीं जोयिली युक्ति ॥ पळावयाची ॥९५॥
मग कोपला तो महाबाहू ॥ जो शरीरेंविण प्रौढीचा राहू ॥ म्हणे जळाधीशा पाहूं ॥ तुझी अगाध शक्ति अनिवार ॥९६॥
राहूसी देखोनि समरांगणीं ॥ तंव पुढें धांविन्नला वज्रपाणी ॥ दोघां जाहाली थोर संघट्टणी ॥ शस्त्रघायीं परस्परें ॥९७॥
हाणीतला वज्रप्रहार ॥ जैसा पर्वतावरी गिरिवर ॥ त्या महाप्रहारें तो असुर ॥ मद जाहाला एक क्षण ॥९८॥
तंव उठावला दैत्य महाकृतांत ॥ साहें साहें वज्रधरा म्हणत ॥ तंव आडवा जाहाला सूर्यसुत ॥ यमरावो विख्यात जो ॥९९॥
तंव यम आणि महाकृतांत ॥ युद्ध करिती अद्‍भुत ॥ तें विस्तारें सांगतां बहुत ॥ वाढेल ग्रंथा विस्तर ॥१००॥
ऐसे ते दोघे महावीर ॥ एकमेकां ताडिती निष्ठुर ॥ कृतांत पाडिला महाअसुर ॥ यमरायें ते ठायीं ॥१०१॥
ऐसा पाडिला तो कृतांत ॥ विजयी जाहाला सूर्यसुतं ॥ तेंचि गुणनाम जाहालें कृतांत ॥ यमधर्मरायासी ॥१०२॥
ऐसा पाडिला जी दैत्य ॥ रुधिरप्रवाहीं प्रेतें वाहाती बहुत ॥ कीं तें मीन तळपत ॥ महाजळडोहीं ॥१०३॥
ऐसे मारितां महाअसुर ॥ रुधिरें माखले सुरवर ॥ कीं ते जैसे ब्रह्मतरुवर ॥ वसंतकाळींचे शोभायमान ॥१०४॥
दैत्य पराभविले रणभूमीं ॥ सुरवर विजयी जाहाले संग्रामीं ॥ महावाद्यें गर्जती व्योमीं ॥ देवदळाची निरंतर ॥१०५॥
देवीं पराभविले महाअसुर ॥ जयवंत जाहाला शिवकुमर ॥ मग विचारीतसे तारकासुर ॥ राहु-हिरण्याक्षांसी ॥१०६॥
त्यांसी वदे तारकासुर ॥ आतां मी मारीन शिवकुमर ॥ मग जे जे प्रौढीचे महाअसुर ॥ ते पाचारिले जवळिकें ॥१०७॥
बाहुक आणि तो अश्वमुख ॥ तालजंघ आणि हिरण्याक्ष ॥ खगरोमा आणि चाणक्य ॥ क्रौंच महाद्‍भुत जो कां ॥१०८॥
ऐसे मिळोनियां असुर ॥ मग त्यांहीं वेढिला तो शिवकुमर ॥ मुख्य नायक तारकासुर ॥ कर्तिकस्वामीप्रती ॥१०९॥
कृष्णपक्षींच्या जैशा तारा ॥ निरभ्री दिसती ज्योतिकारा ॥ तैसे बाण प्रेरितां असुरां ॥ संख्या नसे पांहू जातां ॥११०॥
बाणदाटीचे पडलें अंधारें ॥ चंडवात उद्भवले पिसारे ॥ तेणें क्षितीहूनि उडाली कलेवरें ॥ व्योमीं भरलीं तीं ॥१११॥
मग काय करिता जाहाल स्वामिकार्तिक ॥ तेणें अतिमान स्फुरिला शंख ॥
जैसा जळें शांत होतसे पावक ॥ तैसे तेणें विराले ते बाण ॥११२॥
मग देत्य देखिले जी दृष्टीं ॥ त्रिशूळाची सोडिली मुष्टी ॥ त्रिशूळ येतां देखिले व्योमपुटीं ॥ महाअसुरीं तेधवां ॥११३॥
तो न साहवेचि त्रिशूळप्रहार ॥ असुरां आकांत ओढवला थोर ॥ रणांगणी आटिले असुर ॥ कोटि एक ॥११४॥
ऐसा जाणोनि महाआकांत ॥ तारक उठावला शक्तिमंत ॥ तेणें पाचारिला शिवसुत ॥ मग बोलूं आदरिलें तयानें ॥११५॥
तारक वदला स्वामीप्रती ॥ तुम्ही चर्चावी हो भस्मविभूती ॥ समरीं ते युद्धाची गती ॥ काय जाणा मूढ तुम्ही ॥११६॥
म्हणे स्वामी तुझीं षड्‍वक्रें ॥ द्वादश भुजांचीं जीं गात्रें ॥ रुंडमाळेची मुंडें पवित्रें ॥ पूजीन आतां मी ये वेळीं ॥११७॥
ऐसी तारक वदतां वाणी ॥ स्वामी कैसा देखिला तेणें नयनीं ॥ जैसा महातमासी तरणी ॥ दृश्य होतसे उदयाचळीं ॥११८॥
कीं जैसा त्रिपुरें देखिला त्र्यंबक ॥ कीं कर्पूरासी दृश्य होय पावक ॥ तैसा देखिला कार्तिक ॥ तारकासुरें स्वनयनीं ॥११९॥
ऐसी वदतां तारकासर वाणी ॥ तो असुर कैसा पाहिला स्वामींनीं ॥ जसिई महाव्याघ्रें हरिणी ॥ अकस्मात देखिजे ॥१२०॥
कीं शरभें सिंह देखिला भयानक ॥ कीं मृगेंद्रें देखिला जंबुक ॥ कीं सुपर्णै कंद्रुसुत देख ॥ लक्षिजे नेत्रीं त्यापरी ॥१२१॥
कीं शार्दूळें देखिलें कुरंगा ॥ कीं विनतासुत देखे उरगा ॥ कीं सिंह देखे मातंगा ॥ तैसा देखिला तारक तो ॥१२२॥
मग तारक वदे गा शिवसुता ॥ कोण वारील रे तुज मारितां ॥ वृथाचि कां वधविसी आतां ॥ बापुडे हे सुरगण ॥१२३॥
ऐसें वदला तो तारकासुर ॥ परी न बोले स्वामी प्रत्युत्तर ॥ जैसें तृण लक्षितां गिरिवर ॥ मनामाजी न गणीं सर्वथा ॥१२४॥
तारक म्हणे रे षडानना ॥ आतां साहे माझिया बाणां ॥ मग विंधिले अष्टादशलोचना ॥ सप्तबाणेकरुनियां ॥१२५॥
जैसा शुष्क तृणें हाणीतला कुंजर ॥ कीं द्रुमलतेनें गिरिवर ॥ तैसा न मानीच तो शिवकुमर ॥ बाण तारकसुराचे ॥१२६॥
मग तो क्रोधावला शिवनंदन ॥ तेणें प्रहारिले द्वादश बाण ॥ ते येतां वरिच्यावरी खंडन ॥ केलें तारकें निजसामर्थ्ये ॥१२७॥
मग तारकें सोडिले बाण सहस्त्र ॥ परम तेजस्वी अस्त्रयोगें तीव्र ॥ तेणें गजबजिले सुर ॥ नावके घाबरले ते काळीं ॥१२८॥
मग कोपला तो शिवकुमर ॥ तेणें चापासी लाविला त्रिमुख शर ॥ तारकाचे रथ वारु सत्वर ॥ छेदूनि पाडिले तेधवां ॥१२९॥
यानंतरें कोपला दैत्य ॥ खङ्गें ताडिला तो शिवसुत ॥ मयूर प्रहरुनि निश्चित ॥ विरथ केला स्वामी पैं ॥१३०॥
आतां अत्यंत मांडिलें निर्वाण ॥ दोघे करिते झाले संधान ॥ अष्टही दिशा पृथ्वी गगन । व्यापिलें बाणेंकरुनियां ॥१३१॥
जैसे शब्द प्रसवें आनन ॥ तैसे तूणीरांतूनि अमोघ प्रसवती बाण ॥ नातरी वृष्टी करिता जैसा वरुण ॥ अमित धारा वर्षत ॥१३२॥
थोर लागवेगें बाण सुटत ॥ जेवीं अभीं सौदामिनी कडकडत ॥ उसळती बाण तेव्हां अद‍भुत ॥ तेणें दग्धलीं नक्षत्रें संपूर्ण ॥१३३॥
तेथें संघट्टण होतसे बाणां ॥ वन्हिस्फुलिंग उसळती गगना ॥ तो प्रळय होतसे उडुगणा ॥ रिचवती धरामंडळी ॥१३४॥
व्योमीं सुटलिया बाणज्वाळा ॥ तेणें कंप सुटला ग्रहमंडळा ॥ अष्ट दिशांचियाही अचळां ॥ पोळती त्या मातृका ॥१३५॥
तप्त झाले सप्तही सागर ॥ तेणें उकडूनि मृत्यु पावले जलचर ॥ ऐसे तारकस्वामीचे शर ॥ सुटले तेव्हां असंख्यात ॥१३६॥
कंपायमान पृथ्वी थोर ॥ गर्जना करिती सुरासुर ॥ ऐसा प्रलय मांडिला घोर ॥ स्वामीनें तारकासुरासीं ॥१३७॥
शशी सविता पडिले आवती ॥ खंडिली मारुताची गती ॥ रथ भ्रमताते बाणावर्ती ॥ चक्राकार नभीं ॥१३८॥
मध्यें खेचरां होतसे वळसा ॥ दोघेही पडिले घोर आवेशा ॥ क्रोधें ग्रासूं भाविती आकाशा ॥ उलथों पाहाती भूगोळ ॥१३९॥
थरारले कुलाचलमेरु ॥ माघारे ओसरले देव असुरु ॥ मर्यादा सांडोनि सागरु ॥ रिघाला क्षितिपोटीं ॥१४०॥
विद्युल्लतेसमान बाणांची तोंडें ॥ तीं असुरांची करिती शतखंडें ॥ तारकाचे बाणही निधडे ॥ परी न गणी कार्तिक तो ॥१४१॥
एकाचे चरणा आणि एकाचे शिरकमळा ॥ बाणासवें नेती नभमंडळा ॥ किंवा ते चारा घेऊनि आपुलिया बाळां ॥ क्रमिताती पक्षीश्वर ॥१४२॥
स्वामीचे शर कापिते दैत्यांत ॥ तेणें शिरें आणि धडें भिन्न होत । सरिता दाटल्या अद्‌भुत ॥ शोणिताया त्या ठायीं ॥१४३॥
अश्वगजांचीं कलेवरें ॥ वोसणें दाटलीं अपारें ॥ ऐसा प्रळय शिवकुमरें ॥ मांडिलासे रणभूमीं ॥१४४॥
शिरंकमळांचे रोमांचळ ॥तेचि शोणितनदीमाजीं शेवाळे ॥ तेथें महामगर मीनकुळ ॥ गजाश्वमुखेंचि ॥१४५॥
आकाशाहूनि पडती शर ॥ ते उभे रुपती पिसार ॥ तेचि दर्भ नदीतीरीं साचार ॥ रुधिरेंकरुनि सार्द्र ते ॥१४६॥
तोडिला दैत्यांची अंगें ॥ जैसीं खचिलीं गिरीचीं महाश्रृंगे ॥ ऐसे रण केलें अनन्यरंगें ॥ शिवसुतें तें ठायीं ॥१४७॥
आतां श्रोते हो गारिमा युद्धाचा ॥ एवढा प्रताप स्वामीचा ॥ ठाव नुरेचि असुरांचा ॥ जेवीं पर्जन्य निक्षेपी धुळीतें ॥१४८॥
स्वामी वदे रे तारका ॥ केवीं पळविलेंसी अमरनायका ॥ जैसा सिंह गर्जतां जंबुका ॥ निघती पोटीं पाय त्याचे ॥१४९॥
मग तारक वदे शिवपुत्रा ॥ तूं यत्ने रक्षी आपुलें शरीरा ॥ आतां गलित करीन रे जैशा तारा ॥ रिचवती अवनीवरी ॥१५०॥
मग तारकें सज्जिलें शरासन ॥ चापीं प्रयोजिला प्रचंड बाण॥ करावया खंडण ॥ स्वामीचिया शरीराचें ॥१५१॥
सुटली धनुष्याची मुष्टी ॥ बाण संचारला व्योमपुटीं । वन्हिज्वाळांची करीतसे वृष्टी ॥ तो खंडिला स्वामीनें ॥१५२॥
मग स्वामीनें जैसा सहस्त्रकर ॥ चापीं योजिला दिव्य शर ॥ जेणें क्षया पावविला अंधकासुर ॥ महादेवहस्तें ॥१५३॥
तो बाण सुटला गगनोदरीं ॥ दग्ध करोनि पाडिला पृथ्वीवरी ॥ शण्मुखें देखिला समोरी ॥ मृत्यु उरग जैसा कां ॥१५४॥
आतां सर्वज्ञ जी श्रोतोत्तमां ॥ दोघे निर्वाणसंग्रामा ॥ ते कथा परिसतां नाशी कल्मषनामा ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१५५॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे तारकासुरयुद्धे षण्मुखज्नमवर्णनं नाम अष्टार्विशतितमाध्यायः ॥२८॥
शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ इति अष्टविंशतितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP