मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २४ वा

काशी खंड - अध्याय २४ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
मग ध्रुवासी म्हणे शार्ङ्गधर ॥ पूर्वीं बळी पराक्रमी झाला थोर ॥ तेणें पराभविला सुरेश्वर ॥ देवांसहित ॥१॥
ते वळंघले गिरिकंदरीं ॥ त्यांसी सर्व शस्त्रें झालीं भारी ॥ मग तीं ठेविलीं घरीं ॥ दधीचिऋषीचिया ॥२॥
तेणें घालूनि कमंडलूमाझारी ॥ ऋषी तें उदक स्वीकारी ॥ तीं जिरालीं उदरीं ॥ दधीचिऋषीचिया ॥३॥
मग विस्मय करी सुरेश्वर ॥ देवशस्त्रें जैसीं प्रळयींचा वैश्वानर ॥ तीं भक्षूनियां ऋषीश्वर ॥ तो चिरजीव जाहाला ॥४॥
ज्या शस्त्रांचेनि घातें ॥ मेरुमंदार पावती क्षयातें ॥ तीं शस्त्रें जाहालीं जीर्ण ऋषीतें ॥ ऐसें त्याचें उदर उठिण ॥५॥
हें विचारूनि शंकरें ॥ भिक्षा मागितली परस्परें ॥ सत्त्व राखोनि ऋषीश्वरें ॥ दिधल्या अस्थी संपूर्ण ॥६॥
तेणें तोषला त्रिनेत्र ॥ त्या अस्थींचें घडिलें शस्त्र ॥ त्यासीं नाम ठेविलें पवित्र ॥ सुनाभ ऐसें जाण पां ॥७॥
मग तें करावया तीक्ष्ण ॥ मार्तंडाची करूनि साहाण ॥ वोढिते झाले शिव नारायण ॥ शेषाचा दोर करूनियां ॥८॥
मेरु आणि मलयगिरी ॥ हे स्तंभ रोविले पृथ्वीवरी ॥ शेषमुख श्रीहरी ॥ करीं धरीत आपुल्या ॥९॥
पश्चिमेसी झाले देवगण ॥ पूर्वेसी हर नारायण ॥ मग ओढिते झाले साहाण ॥ तया मार्तंडाची ॥१०॥
पुच्छ ओढिती सर्व सुर ॥ मुख ओढिती शार्ङ्गधर हर ॥ ओढितां श्वासें दाटलें उदर ॥ महीधराचें तेधवां ॥११॥
अस्त्र-साहाणेचिया कसवटीं ॥ व्योमीं उसळती स्फुलिंगकोटी ॥ त्या पडल्या शेषाचे पृष्ठीं ॥ तेणें जाहाले नानावर्ण ॥१२॥
शेष वमीतसे विषलहरी ॥ धुधुःकारें मुखाबाहेरी ॥ तेणें विष्णु जाहाला निर्धारीं ॥ श्यामलांग ॥१३॥
शस्त्र-साहाणेच्या घांसणीं ॥ तेथें उद्भवला प्रलयाग्नी ॥ तेणें उष्ण जाहालासे तरणी ॥ द्वादशकळा ॥१४॥
शेषाचे पुच्छीं लागला वन्ही ॥ तेणें पोळला सहस्त्रफणी ॥ तंव शंकरें घातली मंदाकिनी ॥ केला शीतळ फणिवर ॥१५॥
विष्णुनें सोडिला मुखवटीं ॥ देवें ओढिली एक घिरटी ॥ ते चिरोनि मुखवटीं ॥ सहस्त्रफणा जाहाल्या ॥१६॥
श्रोतीं कीजे जरी परीक्षा ॥ ते अद्यापि असे साक्षा ॥ गंगा जाहाली सहस्त्रमुखा ॥ सिंधुसंगमीं भागीरथी ॥१७॥
ऐसें शस्त्र केलें हो तीक्ष्ण ॥ तिजे नेत्रींचें दिधलें जीवन ॥ मग नाम ठेविलें सगुण ॥ सुनाभ म्हणोनि तयासी ॥१८॥
मग शस्त्र तिडकियांचें चूर्ण ॥ एकवटूनि पंचानन ॥ मग त्याचें घडिलें सुदर्शन ॥ दुसरें चक्र जाणिजे ॥१९॥
देवसत्त्वें यथाभागांतरीं ॥ एकवटिता जाहाला त्रिनेत्री ॥ मग तीं घातलीं शस्त्रीं ॥ सुदर्शनीं पैं ॥२०॥
ऐसीं तीं सुनाभ सुदर्शनें शंकरें ॥ दोनी घडलीं तेजाकारें ॥ मग शिवें कापिलीं शिरें ॥ त्रिपुरदैत्याचीं ॥२१॥
मग ध्रुव वदे जी श्रीपती ॥ तुवा कैसा पूजिला पशुपती ॥ चक्र जोडलें तुजप्रती ॥ तें कैसें सांगावें मज ॥२२॥
हरि म्हणतसे ध्रुवासी ॥ म्यां पूजिलें भवानीवरासी ॥ तरी ते कथा परियेसीं ॥ एकाग्र मन करोनियां ॥२३॥
ध्रुवा कोणे एके काळीं ॥ जालंधर उद्भवला महाबळी ॥ तेणें जिंकोनियां महीतळी ॥ घेतली ते अमरावती ॥२४॥
तरी तो प्रौढीचा महादारुण ॥ तेणें जिंकिले सुरगण ॥ जो गंगा-सागरांचा नंदन ॥ महाबाहू पराक्रमी ॥२५॥
मग क्रोधायमान जाहाला पंचानन ॥ चक्र मोकली सुदर्शन ॥ तेणें केलें जी खंडन ॥ जलंधरमस्तकाचें ॥२६॥
मग शंकराचे मुकुटीं ॥ तें चक्र होतें वर्षें कोटी ॥ मीं पूजियेला धूर्जटी ॥ निशिदिनीं एकभावें ॥२७॥
जैसें शिखराविण मंदिर कीं प्राणेंविण शरीर ॥ तैसा मी शार्ङ्गधर ॥ शिवाचिया पूजेविण ॥२८॥
सत्त्वगुण तो श्रीहरी ॥ तमोगुण तो त्रिपुरारी ॥ म्हणोनि शिव-मुरारी ॥ भिन्न नसती सर्वथा ॥२९॥
ध्रुवा मी हिंडें पाताळभुवनीं ॥ धुंडीत असें कुंभिनी ॥ तैंही सहस्त्र कमळें मेळवूनी ॥ अर्चीं प्रीतीं शिवातें ॥३०॥
अनुसरण पाहोनि अलिकुळा ॥ ऐसें मेळवीं प्रयासीं कमळां ॥ मग शिवासह शैलबाळा ॥ प्रीति करी पूजनालागीं ॥३१॥
ऐसा मी षोडशोपचारी ॥ नित्य नित्य पूजीं शिवगौरी ॥ तंव कोणे एके अवसरीं ॥ एक कमळ उणें जाहालें ॥३२॥
मीं कमळें अर्पिली करूनि गणती ॥ तंव एक कमळ नाहीं निश्चितीं ॥ मग चिंताक्रांत होऊनि चित्तीं ॥ विचारिलें मानसीं ॥३३॥
तंव विचार सुद्दढ करून ॥ मग काढिलें एक लोचन ॥ त्या नेत्रकमळें पंचानन ॥ पूजिला तेव्हां आनंदें म्यां ॥३४॥
मग मजसी म्हणे पंचानन ॥ माग तुज जाहालों प्रसन्न ॥ मज मीं मागितलें सुदर्शन ॥ द्यावें आता मजलागीं ॥३५॥
तंव म्हणे भवानीकांत ॥ तूं माझा प्रिय भक्त ॥ तुजसी मी सर्वदा मिश्रित ॥ असें जाण सर्वां घटीं ॥३६॥
तरी हें मस्तकींचें सुदर्शन ॥ हरि म्यां केलें तुज समर्पण ॥ आणिक एक पद जें निर्वाण ॥ योजिलें तुज सर्वथा ॥३७॥
मेरूचे पाठारी चार कोटी ॥ ध्रुवपद असे हो जगजेठी ॥ तें मजसी पिंगटजटी । समर्पिता जाहाला ॥३८॥
मग ध्रुवासी म्हणे श्रीहरी ॥ ऐसी प्रसन्न जाहाला त्रिपुरारी ॥ तें पद ठेविलें अद्यापवरी ॥ तुजकारणें ॥३९॥
मी राहिलों वैकुंठभुवनीं ॥ तें पद अभुक्त असे अझूनी ॥ तें मी समर्पीतसें चक्रपाणी ॥ ध्रुवभक्ता तुजकारणें ॥४०॥
ध्रुवासी म्हणे श्रीहरी ॥ तें पद भोगीं कल्पवरी ॥ मग तूं पावसी निर्वाणपुरी ॥ वाराणसी ते ॥४१॥
ऐसी हरि-ध्रुवांची भेटी ॥ श्रवणें पठणें घडे पुण्यकोटी ॥ आणि पावन होय वैकुठीं ॥ ध्रुवचरित्र परिसतां ॥४२॥
आतां चला जाऊं झडकरी ॥ ध्रुवासी म्हणे मुरारी ॥ तुज प्राप्त करूं शिवपुरी ॥ अविमुक्ती जे ॥४३॥
मग हरि काय करिता जाहाला ॥ ध्रुव दक्षिणकरीं धरिला ॥ मग ध्रुव-लक्ष्मीसहित बैसला ॥ ताराक्षपृष्ठीवरी ॥४४॥
मग मधुवनाहूनि आनंदवनीं ॥ ध्रुवासी घेऊनि आला चक्रपाणी ॥ मग कैसी देखिली घामिनी ॥ त्रिपुरहराची ॥४५॥
देखोनि आनंद जाहाला हरीसी ॥ जेवीं जननी भेटतां बाळकासी ॥ हरि म्हणे ध्रुवा परियेसीं ॥ हे जन्मभूमिका माझी कीं ॥४६॥
पावलें पंचक्रोशीचें तीर ॥ तेथें विनतासुतासी करूनि स्थिर ॥ मग कथिता जाहाला शार्ङ्गधर ॥ ध्रुवाप्रती काय तें ॥४७॥
मग ध्रुवासी म्हणे सिधुजाकांत ॥ आतां स्थिर करीं चित्त ॥ अरे हे काशी परमादभुत ॥ त्रैलोक्यमंडळामाझारी ॥४८॥
अविमुक्तीचें सामर्थ्य थोर ॥ ते ब्रह्मादिकांसी अगोचर ॥ पहतां ब्रह्मांडें अपार ॥ ऐसी पुरी दुजी न देखों ॥४९॥
येथें असे ते मणिकर्णिका ॥ तियेचें स्नपन प्रिय त्र्यंबका ॥ हे अनंतब्रह्मांडव्यापिका ॥ पाहें या शिवालयीं ॥५०॥
ध्रुवा हें दशदिशामंडळ ॥ या दिशांचें ठायीं दिक्पाळ ॥ जैसें क्षितिस्तंभ कुळाचळ ॥ सत्य सौंदर्यें अचळ ते ॥५१॥
कृशानु यम निऋति वरुण ॥ समीर शीतकर ईशान ॥ त्यांचा स्वामी तो सहस्त्रनयन ॥ दिगधीश तो एक ॥५२॥
अपार सत्त्वें सामर्थ्यें त्याचीं ॥ तरी त्याचाही निर्मिता विरिंची ॥ सत्त्वशौर्यसामग्री सर्वांची ॥ विधि जाणे तो ॥५३॥
ऐसा तो सृष्टिकर विधाता ॥ चतुर्विध खाणींचा उद्भविता ॥ ध्रुवा त्याचाही मी निर्मिता ॥ संख्या जाणें तयाची ॥५४॥
जे कर्तव्य सृष्टीची सामग्री ॥ म्यां संख्या केलीसे नखाग्रीं ॥ अरे या त्रैलोक्याची उभारी ॥ जैसी चंद्रीं काळिमा ॥५५॥
माझा पार नेणती त्रैलोक्यजंत ॥ मीचि ब्रह्मांडाधीश महद्‍भूत ॥ मज जाणावया अनंतान्त ॥ ऐसें सामर्थ्य कवणासी ॥५६॥
ऐसा मी अनंत अगोचर ॥ मज न कळे या काशीचा पार ॥ मज प्रसन्न झाला भवानीवर ॥ या मणिकर्णिकातीरीं ॥५७॥
मज केलें रे ब्रह्मांडस्वामी ॥ ध्रुवा हे काशी माझी जन्मभूमी ॥ आतां पूजूं दंडपाणी ॥ भालाक्ष हर ॥५८॥
मणिकर्णिकेसी केलें स्नान ॥ ध्रुवें सारिलें कर्मानुष्ठान ॥ लिंग स्थापिलें पंचानन ॥ तया नांव ध्रुवेश्वर ॥५९॥
ऐसा हरिध्रुवांचा संवाद ॥ श्रवणपठणें  होय आनंद ॥ वैकुंठवासी सच्चिदानंद ॥ व्से जवळी सर्वदा ॥६०॥
ऐसी क्रमूनियां वाराणसी ॥ मग ध्रुवें क्रमिलें ध्रुवपदासी ॥ गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ तो हा ध्रुवलोक जाणावा ॥६१॥
आतां शिवशर्मा आणि गण ॥ पुढें चालते झाले तेथून ॥ तंव लोक देखिला कवण ॥ शिवशर्म्यानें ते वेळीं ॥६२॥
लोपामुद्रेसी सांगे अगस्ती ॥ आतां कथा परिसें पुढती ॥ जिच्या श्रवणें ऊद्धरती ॥ सप्त पूर्वज श्रोतयांचे ॥६३॥
विमान चालतां गगनोदरीं ॥ तंव जनोलोक देखिला युढारी ॥ शिवशर्मा पृच्छा करी ॥ विष्णुगणांसी स्वमुखें ॥६४॥
हा जनोलोक कैसा हो गणोत्तमा ॥ कैसा काय याचा महिमा ॥ हें मज सांगावें करूनि क्षमा ॥ सुशील पुण्यशील हो ॥६५॥
गण म्हणती गा द्विजमूर्ती ॥ जे कां नित्याचारें वर्तती ॥ लोभ आणि लाभाची प्रीती ॥ नाहीं द्रव्याविषयीं सर्वथा ॥६६॥
सप्तात्रीं करिती लोभ ॥ आणि हरिभक्तीचा थोर लाभ ॥ ऐसे असती स्वयंभ ॥ तेचि वसती या लोकीं ॥६७॥
द्रव्य मिळविती न्यायनीती ॥ हरिकथा जन्मपर्यंत गाती ॥ नित्य सत्पात्रीं दान देती ॥ तेचि वसती या लोकीं ॥६८॥
तंव पुढें चालिलें विमान ॥ मग महर्लोक देखिला जाण ॥ शिवशर्मा पुसे गणांलागून ॥ हा कोण लोक सांगा जी ॥६९॥
ध्रुवलोकाहूनि चार कोटी ॥ महलोक असे व्योमपुटीं ॥ तेथें जे वसती ते क्षितितटीं ॥ कोण कैसे नेणवे ॥७०॥
सत्पात्रावांचूनि न देती दान ॥ सच्छास्त्रावांचूनि न करिती श्रवण ॥ आचार-निष्ठेविरहित भोजन ॥ न भक्षिती सर्वथा जाण ते ॥७१॥
षड्र्स अर्पिती दीनासी ॥ मृदु मवाळ आसनें सुषुप्तीसी ॥ जे समर्पिती अनाथांसी ॥ ते वसती या लोकीं ॥७२॥
उष्णकाळीं शीत उपचार ॥ समर्पिती सुगंध परिकर ॥ स्त्रियाकुमरेंसीं भिन्न विचार ॥ नसती कांहीं ॥७३॥
मार्गीं दानें परिपूर्ण ॥ वाणी कूप तडाग जीवन ॥ मंदिरीं महामिष्टान्न ॥ एकले न भक्षिती सर्वथा ॥७४॥
तयां महर्लोकीं वसती ॥ गण शिवशर्म्यासी सांगती ॥ मग विमान चाले पुढती ॥ तंव देखिला कवण लोक ॥७५॥
ध्रुवलोकापासूनि सप्तकोटी ॥ तेणें लोक देखिले द्दष्टीं ॥ तरी ते अवनीस्थळतळवटीं ॥ कोण कोण कैसे ॥७६॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ हा तपोलोक सांगतों तुजसी ॥ महायोगीश्वर जे तीर्थवासी ॥ शास्त्रमार्गी नित्यनेमी ॥७७॥
गंगासंगमीं धूप्रपान ॥ शरीरीं सोशिती शीतउष्ण ॥ अल्प निद्रा देहदमन ॥ ब्रह्मचर्यव्रतस्थ जे ॥७८॥
बिंबोदयीं स्नान-संध्यासाधन ॥ वेदशास्त्रांचें अध्ययन ॥ अग्नीचें नित्य उपासन ॥ मध्यान्हीं पूजन अतिथीचें ॥७९॥
संकटें द्रव्य मेळविती ॥ पुण्यपंथीं सर्व वेंचिती ॥ जयांसी स्वल्पद्रव्यें तृप्ती ॥ ते अपरसूर्य ब्राह्मण जाणावे ॥८०॥
जे प्रतिग्रह न घेती अधमाचा ॥ वेद न उच्चारिती भ्रष्ट वाचा ॥ भक्तीं उपकारीभाव जयांचा ॥ सर्वकाळ सारिखा ॥८१॥
षट्‍कर्में यागहवनें ॥ किंचित मेळवूनि बहुत व्यय करणें ॥ दानीं विशेष वेंचणें ॥ ते अपरसूर्य ब्राह्मण ॥८२॥
करिती मध्यान्हीं वैश्वदेवउपासन ॥ द्रव्याचें सत्पात्रीं दान ॥ अनृत न करिती गेलिया प्राण ॥ ते ब्राह्मण अपरसूर्य जाणावे ॥८३॥
ऐसे जे चातुरवर्णिक ॥ आणि सर्वार्थीं जे सार देख ॥ तयांसी हा प्राप्त तपोलोक ॥ शिवशर्म्या जाण पां ॥८४॥
ऐसे जे क्षमाशांतिरूपवृत्ती ॥ त्यासी तपोलोकीं वसती ॥ विमान चालतां पुढती ॥ देखिला कोण लोक ॥८५॥
आतां श्रोतीं व्हावें सावधान ॥ कथा परिसावी कल्पषदहन ॥ शिवदास गोमा कर जोडून ॥ प्रार्थी श्रोतेजनांसी ॥८६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ध्रुवकाशीगमन-जनोलोक-महर्लोक-तपोलोकवर्णनं नाम चतुर्विंशाध्यायः ॥२४॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥     ॥ शुभं भवतु ॥     ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति चतुर्विंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP