मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २१ वा

काशी खंड - अध्याय २१ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
शनिलोक टाकूनियां मागें ॥ विमान जातसे मनोवेगें ॥ तंव लोक देखिला व्योममार्गें ॥ शिवशर्म्यानें ॥१॥
देखिलें सप्तऋषिमंडळ ॥ जैसें तेजाचें ओतिलें केवळ ॥ कीं कर्ते सृष्टिभूगोळ ॥ सातही जण सारिखे ॥२॥
शिवशर्मा पुसे गणोत्तमां ॥ मज प्रश्नाची करावी क्षमा ॥ कोण हा लोक सांगा आम्हां ॥ कृपा करूनि स्वामिया ॥३॥
हे सप्तही तेजमूर्ती ॥ पाहतां लोपे तरणी तारापती ॥ यांचिया स्वरूपाची आकृती ॥ कवण लक्षी सुजाण ॥४॥
हे सप्तही कोण ॥ आणि कैसे जाहाले निर्माण ॥ त्यांसी हा लोक पावन ॥ कैसा जाहाला नेणवे तो ॥५॥
शिवशर्म्यासी म्हणती विष्णुगण ॥ परिसावें पृच्छेचें कारण ॥ पृच्छा निर्मी पंचानन ॥ आपणापासाव ॥६॥
जरी म्हणसी हे कवण पृच्छा ॥ तरी हे महादेवाची इच्छा ॥ कामक्रोधमदमत्सरांचा ॥ करीतसे संहार ॥७॥
साक्षात ये पृच्छेची मूर्ती ॥ जे दक्षसुता बोलिजे पार्वती ॥ तियेसी उपदेशी पशुपती ॥ चतुर्वेद आणि पुराणें ॥८॥
आधीं पृच्छा उद्भवली ॥ ते शिवें पार्वतीसी दिधली ॥ त्या पृच्छेनें कथिलीं ॥ वेद शास्त्रें समस्त ॥९॥
पृच्छा अवगुणांतें हरी ॥ पृच्छा कुबुद्धीतें संहारी ॥ पृच्छा ते श्रेष्ठांची वैखरी ॥ शिवें स्वयें निर्मिली ॥१०॥
पृच्छा जोडी पुण्यराशी ॥ पृच्छा निवारी अयागमनासी ॥ पृच्छा हे तंव पुरुषासी ॥ परम हितकारक ॥११॥
जयासी नाहीं पृच्छेचा स्वार्थ ॥ त्याचा जन्म जाणावा व्यर्थ ॥ पृच्छा चुकवीतसे अनर्थ ॥ वडिलमुखें ॥१२॥
पृच्छा कर्माकर्माची करी शांती ॥ अज्ञानासी करी दीर्घमती ॥ पृच्छा हे बहु प्रेम चित्तीं देती ॥ श्रेष्ठ वडिलांसी ॥१३॥
म्हणोनि पृच्छेचें कारण ॥ शिवशास्त्रें होती श्रवण ॥ तेणें दोषांचें होय दहन ॥ जन्मांतरींच्या ॥१४॥
गण म्हणती गा द्विजवत्सा ॥ तुवां आरंभिली जे पृच्छा ॥ ते कामधेनु आपुल्या वत्सा ॥ अधिकचि ओळंधी ॥१५॥
पृच्छा करी तो बाळक ॥ वक्ता कवि तो म्हणावा जनक ॥ तव पृच्छ तें आमुचें कौतुक ॥ शिवशर्म्या ॥१६॥
पूर्वीं भवानी प्रश्न करीत ॥ तियेसी हर कथा निवेदीत ॥ तेंचि हें शिववाक्य निश्चित ॥ काशीखंड जाण पां ॥१७॥
तरी शिवशर्म्या परियेसी ॥ तुवां लोक देखिला हा सप्तऋषी ॥ तरी याची मूळ उत्पत्ति ऐसी ॥ सांगों तुज ॥१८॥
महाविष्णूचें जें नाभिस्थान ॥ तेथें जन्मला चतुरानन ॥ त्यापासव जाहाले उत्पन्न ॥ सप्तऋषी हे ॥१९॥
हे सप्तही ऋषी ब्रह्मकुमर ॥ यांचिया तपाची सामग्री अपार ॥ जो या सर्व सृष्टीचा विस्तार ॥ तो यांपासूनि होतसे ॥२०॥
मरीचि नामें तो प्रथम ॥ दक्ष पुलस्त्य उत्तम ॥ चौथा अत्रि क्रतु पंचम ॥ षष्ठ अंगिरा वसिष्ठ सप्तम ॥२१॥
वरिंचीनें केलें शिवध्यान ॥ षडक्षरी मंत्र जपिला पूर्ण ॥ मग करितां तर्पण ॥ मंत्रदशांशें ॥२२॥
करीं घेतली उदकांजळीं ॥ तंव स्वेद उतरला विधीच्या भाळीं ॥ त्याचा बिंदु पडला अर्ध्यांजळीं ॥ तेथें जाहाले दोन पुत्र ॥२३॥
प्रथम मरीचि विख्यात ॥ दुसरा वसिष्ठ विद्याभरित ॥ हे विधीचे अर्ध्यांत ॥ अंजळीमाजीं जन्मले ॥२४॥
ब्रह्मयाचे वाम नयनीं ॥ अत्रि जन्मला ते स्थानीं ॥ वाम करींच्या अंगुष्ठापासुनी ॥ जन्म पावला तो दक्षराज ॥२५॥
विरिंचिनाथाचिया ॥ भाळीं ॥ करें मर्दितां निघाली मळी ॥ तेथें जन्मला महाबळी ॥ पुलस्त्य नामें विख्यात ॥२६॥
विरिंचिनाथाचिया मुखांत ॥ जन्मला अंगिरा नामें सुत ॥ त्याचा पुत्र तो विद्याभरित ॥ देवगुरु म्हणवीतसे ॥२७॥
क्रतु जन्मला ह्रदयीं ॥ ऐसे ब्रह्मसुत जन्मले सातही ॥ यांपासाव सृष्टी सर्वही ॥ वर्तत असे अनुक्रमें ॥२८॥
दक्षराजा सासरा सर्वांचा ॥ कश्यपादि महादेवाचा ॥ तरणी तारापती दिक्पालांचा ॥ आदिकरूनी ॥२९॥
रावण पुलस्त्याचे कुळीं ॥ व्यास वसिष्ठाचे ओळीं ॥ कृष्णयादवादि भूपमंडळी ॥ ते अत्रीपासाव जाण पां ॥३०॥
सूर्यवंश मरीचीपासूनी ॥ बळी बाणासुरादि करूनी ॥ ऐसा सर्वव्यापक त्रिभुवनीं ॥ या सप्तरुषींचा विस्तार ॥३१॥
अंडज आणि जारज ॥ स्वेदज आणि उद्भिज्ज ॥ चतुर्विध खाणींचा निपज ॥ या सातजणांपासोनी ॥३२॥
हे सातही आले काशीपुरीं ॥ त्यांहीं लिंगें स्थापिलीं त्रिपुरारी ॥ मग प्रगटला स्मरारी ॥ त्या लिंगांमाजीं ॥३३॥
मग प्रसन्न जाहला त्रिशूळधर ॥ त्यांसी दिधला एकचि वर ॥ तुमचिया सामर्थ्यें व्यापार ॥ चालेल या त्रिभुवनाचा ॥३४॥
तुम्हीं जे केली लिंगस्थापना ॥ त्यासी मी करतों नामधारणा ॥ चतुर्वेद प्रसिद्ध पुराणां ॥ लिंगें तुमचीं विख्यात ॥३५॥
मग वदता जाहाला पंचानन ॥ तुमचा पिता चतुरानन ॥ तैसेचि तुम्ही कर्ते पूर्ण ॥ सृष्टिकार्याचे सकळही ॥३६॥
तुम्ही उपब्रह्मे सप्तऋषी ॥ ऐसी नामें ठेविलीं तयांसी ॥ मग त्यांपासाव सृष्टीसी ॥ जाहाली उत्पत्ति संपूर्ण ॥३७॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर जाहाला तयांसी ॥ मग शिवें स्थापिलें सप्तऋषी ॥ इहलोकीं साक्षेपें ॥३८॥
यांचियां सप्त जाणाव्या वनिता ॥ त्या तेथें असती पतिव्रता ॥ त्या कवण कवण आतां ॥ करूं निरूपण ॥३९॥
प्रथम अरुंधती पतिव्रता ॥ वसिष्ठऋषीची कांता ॥ ती जाणावी पूर्ण माता ॥ पराशर व्यासंची ॥४०॥
पुलस्तीची जे कामिनी ॥ प्रीति नामें शुभलोचनी ॥ ती बोलिजे पूर्ण जननी ॥ विश्रवा-रावणांची ॥४१॥
अंगिराची कांता स्मृती ॥ क्रतूची बोलिजे संतती ॥ महाप्रतिव्रता प्रसूती ॥ दक्षरायाची जाण पां ॥४२॥
मरीचि देवाची संभूतिया ॥ अत्रिऋषीची जाण अनसूया ॥ या सप्त पतिव्रतांचिया ॥ स्मरणें दोष नुरती पैं ॥४३॥
यांनीं तप केलें आनंदवनीं ॥ लिंग स्थापिलें शूळपाणी ॥ मग त्या पावल्या कामिनी ॥ सप्तॠषीश्वरांतें ॥४४॥
ऐसे हे सप्तऋषी जाण ॥ यांचिया सत्त्वें तरलें हें त्रिभुवन ॥ कथिलें मूळ उत्पत्तिकथन ॥ शिवशर्म्या तुज ॥४५॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव कवण लोक देखिला पुढारी ॥ श्रोतीं सावधान व्हावें अंतरीं ॥ एकाग्र मन करोनियां ॥४६।
तंव देखिलें ध्रुवलोकस्थान ॥ कथा परिसे त्याची पुण्यपावन ॥ जेणें दोषांचें होय दहन ॥ कर्मस्थांचें जाण पां ॥४७॥
लोक देखिला दिव्य तेजाळ ॥ हरिभक्त महापुण्यशीळ ॥ देखिलें ध्रुवाचें मंडळ ॥ शिवशर्म्यानें स्वनेत्रीं ॥४८॥
मग पुसता झाला द्विजमूर्ती ॥ सांगा जी या लोकाची उत्पत्ती ॥ कोण या लोकींचा अधिपती ॥ कोण्या वंशीं जन्मला ॥४९॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ कोण याची जननी आणि जनिता ॥ यासी एवढी महिमता ॥ कवणें देवें समर्पिली ॥५०॥
यासी प्राप्त जाहला हा ठावो ॥ ऐसा पूजिला कवण देवो ॥ हा फेडावा जी संदेहो ॥ कृपा करोनी स्वामिया ॥५१॥
तंव गण म्हणती हो द्विजा ॥ या कोकींचा असे ध्रुव राजा ॥ यासी आधिपत्य द्विजराजा ॥ उडुगणांचें ॥५२॥
जैसा तो चंद्र तारापती ॥ तैसाचि या लोकीं ध्रुव अधिपती ॥ तरी त्याची मूळ उत्पत्ती ॥ सांगो तुज द्विजोत्तमा ॥५३॥
श्रोतीं व्हावें सावधान ॥ हे कथा परिसा ध्रुवाख्यान ॥ जेणें तुटे भवबंधन ॥ चौर्‍यायशींचें ॥५४॥
गण म्हणती द्विजनाथा ॥ परिसें ध्रुवाची मूळकथा ॥ जेणें निवारे भवव्यथा ॥ श्रोतयां जनांची ॥५५॥
जे सवर्णा कांता सूर्याची ॥ ते छाया निर्मिली संज्ञेची ॥ ते सवर्णा मनूची ॥ बोलिजे माता ॥५६॥
तो मनु सूर्याचा सुत ॥ तयापासाव जाहाला प्रजापत ॥ तयापासाव जाहला विख्यात ॥ इक्ष्वाकु नामें जो ॥५७॥
इक्ष्वाकूचा कुक्षरती ॥ कुक्षरतीचा श्रीभानु नृपती ॥ तयापासाव पुण्यकीर्ती ॥ बाणराजा तो एक ॥५८॥
त्या बाणाचा नंदन ॥ तया नाम उत्तानचरण ॥ तो सप्तद्वीपवतीचा पूर्ण ॥ चक्रवर्ती बोलिजे ॥५९॥
त्या उत्तानचरणाच्या कामिनी ॥ सुरुचि सुनीति असती दोनी ॥ त्यांसी पुत्र जाहाले शुभगुणी ॥ ध्रुवंजय आणि ध्रुव ॥६०॥
सुरुचि ते मुख्य कांता ॥ ध्रुवंजय सुत तिचा तत्त्वतां ॥ सुनीति ध्रुवाची माता ॥ कनिष्ठ जाण ते नामें ॥६१॥
तें बृहस्पति नाम नगर ॥ तेथींचा तो राज्यधर ॥ शत योजनें विस्तार ॥ तया नगरीचा विख्यात ॥६३॥
क्षिप्रागंगेच्या पुण्यतीरीं ॥ महापुण्यवती नगरी ॥ राजा आणि मुख्य सुंदरी ॥ खेळताती सारिपाट ॥६४॥
त्या उत्तानचरणाचे कुमर ॥ ध्रुवंजय आणि ध्रुव सुकुमार ॥ दोधे प्रवेशले अतिसत्वर ॥ राजमंडपी तेधवां ॥६५॥
त्यांत परम सुंदर राजभद्र ॥ तेथें बैसला सपुत्र नरेंद्र ॥ सिंहासनीं आल्हादकर ॥ कांतेसहित ॥‌६६॥
तंव ध्रुवंजय बैसला सिंहासनीं ॥ तया चुंबन देतसे जननी ॥ मग दोहीं करीं उचलोनी ॥ धेतला आपणाजवळिकें ॥६७॥
तैसाचि ध्रुव वळंघत ॥ तंव सुरुचियें ताडिली लात ॥ सिंहासनाखालती त्वरित ॥ पाडिला तेव्हां भूतळीं ॥६८॥
म्हणे मज असतां कुमर ॥ तूं होऊं म्हणसी नृपवर ॥ सिंहासनीं बैसोनि राज्यधर ॥ होऊं आलासी कवणाचा ॥६९॥
अरे कोठें कल्पवृक्ष पुण्यतरू ॥ त्याजवळी केवीं शोभे पांगारू ॥ जवळीं असतां माझा कुमरू ॥ तंववरी कैचें तुज नृपत्व ॥७०॥
केउता मूर्ख कोठें तो ज्ञानी ॥ केउती गारगोटी कोठें तो चिंतामणी ॥ तपेंवीण वैकुंठभुवनीं ॥ जाऊं पाहासी मूर्खा तूं ॥७१॥
पाहतां राज्यपदाचें सुख ॥ भोगूं पाहे तो मशक ॥ महामिष्टान्न तें रंक ॥ पावेल कोठोनी भाग्येंवीण ॥७२॥
तंव घ्रुव म्हणे मातेतें ॥ राज्यमदें मातलीस हो जनिते ॥ मज ताडिलें पदघातें ॥ प्राती केली स्वपुत्रासी ॥७३॥
तो पुत्र कोणाच्या वर्यिचा ॥ आणि मी कवण कोणाच्या वर्यिचा ॥ परी हा भाव तुम्हां स्त्रियांचा ॥ महामत्सर दुर्घट ॥७४॥
ममत्व नाहीं तुझ्या पोटीं ॥ आम्हांसी पाहासी क्रूरद्दष्टीं ॥ इतुकियानें काय सृष्टीं ॥ होसी श्रेष्ठ तूं आतां ॥७५॥
राजा देखतसे स्वनयनीं ॥ परी सुरुचीसी न बोले कांहीं वचनीं ॥ मग ध्रुव बोले जनकालगुनी ॥ नीतिवचनें तीं ऐका ॥७६॥
स्त्रियांआधीन जे नर ॥ पीनकुटांतील कामातुर ॥ वृथा जन्म तयांचा संसार ॥ जाणिजे शून्य ॥७७॥
जैसीं महाद्रुमकोटरें ॥ तैसीं त्या नरांचीं शरीरें ॥ त्यांस घातलेंसें भुलारें ॥ मन्मथें कीं ॥७८॥
जो विसरें बाळकासी ॥ रत होय कामिनीसी ॥ तो जाय अधःपातासी ॥ यमपंथें जाण पां ॥७९॥
पूर्वपुण्याचें अधिकत्व ॥ राजमदें दाखवी प्रभुत्व ॥ पावती जें स्वामित्व ॥ हेंचि मूर्खत्व जाणिजे ॥८१॥
ध्रुव म्हणे गा उत्तानचरणा ॥ गर्वारूढ हे तुमची अंगना ॥ हे तंव कृतांताचिया भुवना ॥ जाऊं पाहातसे सत्वर ॥८२॥
ऐसा तो ध्रुव आक्रंदत ॥ मंदिरासी आला दुःखित ॥ मातेसी सांगे वृत्तांत ॥ ज्येष्ठ मातेचा संपूर्ण ॥८४॥
ह्रदयावरी ठेवूनि हस्त ॥ प्राणश्वास दाटला स्फुंदत ॥ मग सुनीतीनें पुसिले अश्रुपात ॥ अंचळेंकरूनियां ॥८५॥
मग ध्रुवासी म्हणे सुनीति माता ॥ तुज कोणीं गांजिले सुता ॥ येरू म्हणे सिंहासनीं वळंघतां ॥ मज ताडिलें चरणप्रहारें ॥८६॥
ध्रुवंजय घेतला आपुले जवळी ॥ मज लत्ताप्रहारें पाडिलें भूतळीं ॥ चरणघात बैसला बक्षःस्थळीं ॥ सुरुचि मातेचा ॥८७॥
ऐसा ऐकोनियां शब्द ॥ सुनीति न मानीच खेद ॥ म्हणे पुत्रा राजा उत्तानपाद ॥ आपणा श्रेष्ठ असे कीं ॥८८॥
जे उत्तानचरणाची अंगना ॥ ते आपुली स्वामिनी जाणा ॥ तिचे शब्दाची अवज्ञा ॥ आपण सर्वथा करूं नये ॥८९॥
सुनीति ज्ञानियांचा रावो ॥ चित्तीं न धरीच विषमभावो ॥ पुत्रासी म्हणे महाबाहो ॥ धरीं रे सुबुद्धी ॥९०॥
तेणें जोडतील सर्व सिद्धी ॥ प्राप्त होईल ज्ञानवृद्धी ॥ मग उपदेशिला मंत्रविधी ॥ ध्रुवासी तिनें साक्षेपें ॥९१॥
तंव ध्रुव म्हणे मातेसी ॥ सुबद्धि नाहीं सुरुचीसी ॥ आप पर तिचे मानसीं ॥ द्वैत चित्तीं वसे सर्वदा ॥९२॥
तंव पुत्रासी म्हणे सुनीती ॥ राज्यलक्ष्मी आणि शांतवृत्ती ॥ ज्याचे शरीरीं भावभक्तीं ॥ हें फळ पूर्वपुण्याचें ॥९३॥
पूर्वार्जिताचिया जैशा राशी ॥ फळें प्राप्त होती तैसीं ॥ तरी पुत्रा आतां परियेसीं ॥ पुण्यफळ तें कैसें ॥९४॥
ते उत्तानचरणाची कांता ॥ उपदेशिती जाहाली सुता ॥ जेणें परम योग्यता ॥ प्राप्त होय तत्काळीं ॥९५॥
सुकृतावांचूनि नव्हे राजा ॥ जो ओढवेल उपकारकाजा ॥ जयासी उत्तम कन्या पुत्र प्रजा ॥ हें फळ सुकृताचें ॥९६॥
निजधामीं युक्तिपद्धती ॥ दास दासी सालंकृतीं ॥ वस्त्रें भूषणें शुभ वृत्ती ॥ हीं फळें सुकृताचीं ॥९७॥
जयासी शांति क्षमा मान्यता ॥ गृहीं असे सर्व पूर्णता ॥ तयासी शिवें तत्त्वतां ॥ कृपा करूनि दिधलेंसे ॥९८॥
परद्रव्यावरी इच्छा नसे जाणा ॥ न अभिलाषी परांगना ॥ नित्य पूजी त्रिनयना ॥ हींही फळें सुकृताचीं ॥९९॥
सुकृताचें फळस्थान ॥ हें तंव गृहस्थाश्रमापासून ॥ जें जें सत्याचें आचरण ॥ हें सुकृताचें फळ बोलिजे ॥१००॥
विद्याभ्यास शास्त्रार्थ ॥ वाचेसी नाहीं अनृतार्थ ॥ परद्रव्याचा न करी स्वार्थ ॥ हें फळ सुकृताचें ॥१०१॥
गृहस्थाश्रमाचें आचरण ॥ नित्य शौच संध्या स्नान ॥ मग कीजे शिवाचें पूजन ॥ षोडशोपचारें यथासांग ॥१०२॥
मग सत्यार्थचि कल्पून ॥ सत्पात्रासी करावें दान ॥ मग तृतीय प्रहरीं भोजन ॥ करावें मंडळ रेखोनी ॥१०३॥
चालविजे व्यापारक ॥ द्रव्य मेळवावें न्यायक ॥ ऐसी कीजे वर्तणूक ॥ जेणें जनांस सुख वाटे ॥१०४॥
दान देतां अनाथदीनां ॥ तेथें न कीजे वंचना ॥ ते प्रीति पावो पंचानना ॥ ऐसा करावा संकल्प ॥१०५॥
पापपुण्यांचा करी निवाडा ॥ जनांसी न करी गुप्त पीडा ॥ तेणें घातल्या अर्गडा ॥ यमपंथीं सुकृताच्या ॥१०६॥
जोडावें न्यायिक द्रव्यार्था ॥ धर्मनीतीच्या कीजे स्वार्था ॥ दिवस जाऊं न द्यावा वृथा ॥ दानाविरहित सहसाही ॥१०७॥
नम्रतेचें धरावें द्दढासन ॥ वीर्य न वेंचावें ऋतुवांचून ॥ देहीं करावें भंजन ॥ कामक्रोधादिकांचें ॥१०८॥
जैसा क्षीरामृताचा नाश ॥ करी सत्वर लवणअंश ॥ तैसा पुण्याचा विध्वंस ॥ करी हा काम क्रोध ॥१०९॥
काम क्रोध मद मत्सर ॥ अहंकार दंभ क्रूर ॥ हा कामादि परिवार ॥ लक्ष्मीचा जाण पां ॥११०॥
ध्रुवासी म्हणे सुनीति माता ॥ याचा खेद न करीं सुता ॥ संहारीं यांचिया वार्ता ॥ ज्ञानखङ्गेंकरूनी ॥१११॥
परिसें यांचिया कांता कवणकवणा ॥ कामाची रती कुवासना ॥ क्रोधाची जाणावी अंगना ॥ महानिंदा दारुण ते ॥११२॥
मदमत्सरांचिया कामिनी ॥ कुबुद्धि ग्रहिलता या दोनी ॥ त्या प्रबुद्धें जाणोनी ॥ सांडाव्या पुत्रा सर्वथा ॥११३॥
अहंकाराची कांता ॥ मनीषा ते जाणावी तत्त्वतां ॥ ऐसा परिवार जाण सुता ॥ लक्ष्मीचा पैं ॥११४॥
लक्ष्मीची विलक्षण गती ॥ क्षणाक्षणा चंचळ वृत्ती ॥ पुत्रा हें न धरावें चित्तीं ॥ देखावी जैसी कां स्वन्पावस्था ॥११५॥
गृहस्थाश्रमीं असतां ॥ द्वैत न देखावें तत्त्वतां ॥ जेणें पाविजे सत्यसुकृतां ॥ तो ऐक इत्यर्थ ॥११६॥
लोभ मोह प्रपंच तिसरा ॥ अंगीकारीं तर्क विवेक विचारा ॥ या सहांचिया सहा सुंदरा ॥ परियेसीं पुत्रराया ॥११७॥
लोभाची कृपा सुंदरी ॥ मोहाची सुमती नारी ॥ प्रपंचाची जाण सुंदरी ॥ सुबुद्धी ते ॥११८॥
तर्काची कामिनी नम्रता ॥ शांति ते विवेकाची कांता ॥ विचार जाणावा भोक्ता ॥ युत्रा होय क्षमेचा ॥११९॥
सत्य आधिपत्य जाणावें त्यांसी ॥ पुत्रा द्दढ धरावें तें मानसीं ॥ जोडिती सुकृताच्या राशी ॥ अतःपर जाण पुत्रा ॥१२०॥
काम-क्रोधादि लक्ष्मीचा दळभार ॥ विवेक विचार सत्तांचा परिवार ॥ यांचा न करावा अव्हेर ॥ पुत्रा तुवां सहसाही ॥१२१॥
लक्ष्मीअंगें मनमलिनता ॥ सत्त्वाअंगें पाविजे सुकृता ॥ तरी तुवां अंगीकारावा सुता ॥ सत्त्वगुण विशेषें ॥१२२॥
तेचि सुकृताची खाणी ॥ जे वर्तणूक कीजे शुभगुणीं ॥ ऐसा ध्रुव बोलिला वचनीं ॥ सुनीतिमातेनें ॥१२३॥
मग ध्रुव म्हणे मातेसी ॥ कैसें जाणावें सुकृतासी ॥ मग सांगती झाली पुत्रासी ॥ सुनीति माता आदरें ॥१२४॥
तीर्थयात्रा महादान ॥ नीतिमार्ग सत्यवचन ॥ तोंयें पत्रें नित्य पूजन ॥ हरिहरांचे ॥१२५॥
अल्प निद्रा अल्प आहारी ॥ अल्प काम ब्रह्मचारी ॥ तपावांचूनि शरीरीं ॥ न जोडे सुकृत ॥१२६॥
म्हणोनि शुभें सत्त्वांचीं फळें ॥ अशुभें लक्ष्मीचिया मळें ॥ तपें जिंकिजे तीं मंडळें ॥ दिक्पाळचीं ॥१२७॥
ऐसें परिसोनि पातेचें वचन ॥ द्दढ जाहालें घ्रुवाचें मन ॥ मग देहीं स्फुरलें कारण ॥ तपश्रियेचें तत्काळ ॥१२८॥
मातेसी म्हणे ध्रुव कुमार ॥ मज द्यावा जी नाभीकार ॥ ज्या तपें साधितां हरिहर ॥ सत्वर भेटती मज ॥१२९॥
मग बोलती झाली सुनीतिमाता ॥ गुरुविणें नव्हे तपयोग्यता ॥ मंत्रेंविण अनुष्ठान करितां ॥ अयुक्त जाण पुत्रराया ॥१३०॥
तंव ध्रुव बोलतसे वचन ॥ मज द्यावें जी आशीर्वचन ॥ जेणें होय परिपूर्ण ॥ मंत्रसिद्धी गुरुमुखें ॥१३१॥
मग माता म्हणे रे कुमरा ॥ माझ्या मनाचिया श्रृंगारा ॥ आतां मंदिराबाहेरा ॥ केवीं जासी पुत्रराया ॥१३२॥
श्रीगुरूचें दासत्व ॥ तुजकरितां राखिलें सत्त्व ॥ तुजविण जीवित्व ॥ वृथा माझें जाण पां ॥१३३॥
मग ध्रुव विचारी मानसीं ॥ हे तरी जाऊं नेदी तपासी ॥ मग आज्ञा घेऊनि क्रीडावयासी ॥ बाहेर निघाला बाळ तो ॥१३४॥
त्या बृहस्पतिपुराबाहेरी ॥ आला क्षिप्रागंगेच्या तीरीं ॥ उतरता जाहाला पैलपारीं ॥ ध्रुवराज सुनीतिसुत ॥१३५॥
तपश्चर्या धरूनि मानसीं ॥ ध्रुव निघाला मधुपुरीसी ॥ मार्ग चालतां ध्रुवासी ॥ होती शकुन उत्तम ॥१३६॥
ध्रुव निघाला तपासी ॥ पावता झाला मधुवनासी ॥ पुढें मार्ग दावी तयासी ॥ स्वयें समीर ॥१३७॥
समीर जातसे झडझडां ॥ ध्रुव त्या मार्गें धांवे दुडदुडां ॥ तंव पावता झाला कडा ॥ मधुवनाचा ॥१३८॥
तें रम्य मधुवन शोभिवंत ॥ वृक्ष लागले नभचुंबित ॥ वातस्पर्शें डोलत ॥ लतापत्रांसमवेत पैं ॥१३९॥
मज गमला ऐसा विचारू ॥ तप साध्य करूं आला धुरू ॥ तया हरुषें तरुवरू ॥ पत्रसंकेतें बाहती ॥१४०॥
जाण त्या ठायासी जातां पवन ॥ हेलावे तें मधुवन ॥ जैसें त्या क्षीरार्णवाचें जीवन ॥ देतसे आनंदें लहरिया ॥१४१॥
मग भाव गमला त्या ठाया ॥ ध्रुवें मांडिली तपश्चर्या ॥ कीं तेथें प्रकटली वनश्रिया ॥ ध्रुवाचे भेटीकारणें ॥१४२॥
आणिक एक गमला विचारू ॥ तप साध्य करूं आला धूरू ॥ म्हणोनि लतापत्रें तरुवरू ॥ पंचारती ॥ करिती ध्रुवासी ॥१४३॥
समीरसंगें सुरवाडती ॥ द्रुम अंगें भूमि स्पर्शिती ॥ कीं त्या ध्रुवासी घालिती ॥ साष्टांग दंडवत ॥१४४॥
ऐसें तें मधुवन वर्णितां ॥ कथा विस्तरेल सांगतां ॥ जेथें राहाणें लक्ष्मीकांता ॥ तें स्थळ किती वर्णावें ॥१४५॥
कालिंदीचे दक्षिणपारीं ॥ शोभायमान ते मधुपुरी ॥ श्रृंगारें वर्णितां ते सुरनगरी ॥ न तुळे तुळितां ॥१४६॥
प्रवाळवेलींचे स्तंभ केले ॥ अवघे जांबूनदें वेष्टिले ॥ कळसाग्रीं अति तेजागळे ॥ पद्मरागें सुजडित ॥१४७॥
द्रुमलतांचिया लहरी ॥ जैसा वातस्पर्शें फडकती ध्वजांवरी ॥ कीं त्या गंधर्वनगरीं ॥ तडिताचि स्थिरावल्या ॥१४८॥
जेवीं उपमा त्या काशीपुरा ॥ तैशीच बोलिजे त्या मधुपुरा ॥ कीं वैंकुठीं राहाणें शार्ङ्गधरा ॥ काय तेंचि होईल हें ॥१४९॥
तंव जे मधुपुरी वनस्थळी ॥ त्यामध्यें वृक्षाचे तळीं ॥ ध्रुवें देखिले द्दष्टीजवळी ॥ सप्तऋषी ते ॥१५०॥
पवनें दाखविला दुरोनी ॥ कीं तेचि आले ध्रुवा देखोनी ॥ सूर्यवंशीं राजा म्हणोनी ॥ आशीर्वचन द्यावया ॥१५१॥
ध्रुवें देखिले ते ऋषी ॥ तेजें सूर्यप्रभा जैसी ॥ कीं उदेले सप्त शशी ॥ रजनीमाजी तत्काळ ॥१५२॥
सप्तही दंडकमंडलुधारी ॥ शिखा-सूत्र-मंत्रोच्चारी ॥ मृगाजिनीं बरव्यापरी ॥ उपविष्ट विधि जैसे ॥१५३॥
ते विरिंचिदेवाचे आत्मजात ॥ सप्तही उपब्रह्मे विख्यात ॥ प्रसन्न करूनि भवानीकांत ॥ जाहाले कारक सृष्टीचे ॥१५४॥
त्रैलोक्यमंडळ सप्तद्वीपवती ॥ शेषादि देव सुरपती ॥ ग्रह नक्षत्रें तरणी तारापती ॥ कर्तव्य हें थोर जयांचें ॥१५५॥
मरीचि वसिष्ठ विख्यात ॥ अत्रि अंगिरा आणि क्रतु सत्य ॥ दक्ष आणि पुलस्त्य विख्यात ॥ हे सप्तऋषी ॥१५६॥
ध्रुवें देखिले दुरोनी ॥ मस्तक ठेविला तयांचे चरणीं ॥ करकमळ जोडोनी ॥ वंदिले ऋषी सप्तही ॥१५७॥
तंव बोले वसिष्ठ अंगिरू ॥ तूं कोणाचें सांग लेंकरूं ॥ येरू म्हणे मी धुरु ॥ बाळक उत्तानचरणाचा ॥१५८॥
सप्तऋषी म्हणती ध्रुवासी ॥ येणें जाहालें कार्यासी ॥ ध्रुव म्हणे मम मानसीं ॥ संकल्प जाणा तपाचा ॥१५९॥
मज निरूपावी बुद्धी ॥ जेणें प्राप्त होय मज सिद्धी ॥ आणि पाविजे तो क्षीराब्धी- ॥ शेषशायी म्हणवी जो ॥१६०॥
म्हणे मंत्र द्यावा जी मजसी ॥ जेणें भेटे वैकुंठवासी ॥ मग बोलते झाले सप्तऋषी ॥ एकमेकांसी तेधवां ॥१६१॥
महायात्रा महादान ॥ कीजे थोर तपसाधन ॥ तेव्हां होइंजे पावन ॥ श्रीवत्सलांछनधारी तो ॥१६२॥
प्रथम मरीचि म्हणे ध्रुवासी ॥ लिंगस्थापना कीजे वाराणसी ॥ यत्न केलियावीण ह्रषीकेशी ॥ केवीं भेटेल ॥१६३॥
तंव ध्रुवासी म्हणे वसिष्ठ ॥ जेणें पूर्वीं पूजिला नीलकंठ ॥ पंचाग्नि गौरांजनीं होय शुद्धवट ॥ तैं भेटे पद्मनाभ ॥६४॥
तंव अंगिरा बोले वचन ॥ सहस्त्र वर्षें कीजे धूम्रपान ॥ तेव्हां घडेल दर्शन ॥ हरिहरांचें ॥१६५॥
तंव ध्रुवासी म्हणे पुलस्ती ॥ शिरकमळीं पूजिजे पशुपती ॥ जंव शरीर कीजे पूर्णाहुती ॥ तैं भेटती हरिहर ॥१६६॥
क्रतु आणि दक्ष म्हणती सुनीतिनंदना ॥ सहस्त्र एक कीजे मेरुप्रदक्षिणा ॥ कीं आनंदवनीं कीजे तपसाधना ॥ तैं भेटती हरिहर ॥१६७॥
तंव अत्रि म्हणे ध्रुवा अवधारीं ॥ काशीमध्यें पूजिजे स्मरारी ॥ ऐसें अनुष्ठान कीजे कोटीवरी ॥ तैंचि भेटती हरिहर ॥१६८॥
ऐसी सप्तऋषींची वाणी ॥ तीं शब्दरत्नें उद्भवलीं अंतःकरणीं ॥ तीं मनोभावें घातलीं श्रवणीं ॥ ध्रुवें ते समयीं ॥१६९॥
ऐसा सप्तऋषींचा विचारू ॥ परिसोनि संतोषला ध्रुरू ॥ मग घाली साष्टांग नमस्कारू ॥ ऋषींप्रति तेधवां ॥१७०॥
आतां ध्रुवासी सांगतील मंत्रविधी ॥ मग ध्रुव करील तपःसिद्धी ॥ ते कथा परिसतां आधि व्याधी ॥ हरतील दोष जन्मांतरींचे ॥१७१॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ध्रुवलोककथने सप्तऋषि-ध्रुवसमागमवर्णनं नाम एकविंशतितमाध्यायः ॥२१॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥     ॥ ॐ ॥     ॥ ॐ ॥     ॥ ॐ ॥     ॥ ॐ ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP