मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १९ वा

काशी खंड - अध्याय १९ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव लोक देखिला पुढारी ॥ विष्णुदूतासी पृच्छा करी ॥ शिवशर्मा तेधवां ॥१॥
लोक देखिले शिवध्यानीं ॥ सुबुद्धीचे महाज्ञानी ॥ पुण्यशील वेदांवांचूनी ॥ नेणती आणिक मार्ग ॥२॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ कैसी या लोकाची महिमता ॥ या लोकीं स्वामित्वकर्ता ॥ कोण असे सांग पां ॥३॥
गण म्हणती गा द्विजोत्तमा ॥ सर्व सृष्टिकर्ता जो ब्रह्मा ॥ त्यापासाव पावला जन्मा ॥ अंगिरा तोचि एक ॥४॥
त्या अंगिराची कांत ॥ स्मृतिनामें पतिव्रता ॥ ते प्रसवली सुता ॥ बृहस्पतीसी ॥५॥
सर्व देवांचा जो गुरु ॥ जो स्मृतीचा सर्वज्ञ कुमरू ॥ मग तो आला तप करूं ॥ आनंदवनासी ॥६॥
मणिकर्णिकेसी केलें स्नान ॥ नित्यकर्म सारूनि स्मृतिनंदन ॥ तो आला हो पंचानन ॥ पूजावयासी सत्वर ॥७॥
सहस्त्र एक सुवर्णकमळें ॥ शुद्ध श्वेत तेजागळें ॥ तीं मणिकर्णिकेचीं जळें ॥ नित्य समर्पीतसे ॥८॥
नित्य नित्य दर्भाग्रतोयपान ॥ पवित्र दर्भासनीं बैसून ॥ त्रिकाळ करी जपध्यान ॥ विश्वनाथाचें ॥९॥
केला तपाचा गिरिवर ॥ लिंग स्थापिलें बृहस्पतीश्वर ॥ मग प्रसन्न जाहाला तो शंकर ॥ त्या लिंगामाजीं प्रकटोनी ॥१०॥
पांच लक्ष संख्या पूर्ण ॥ इतुके संवत्सर होतां संपूर्ण ॥ आलें तपाचें अवसान ॥ तंव तेखता जाहाला शंकरातें ॥११॥
मम त्या बृहस्पतीश्वरीं ॥ प्रकट जाहाला त्रिपुरारी ॥ मग बोलता जाहाला नाभीकारीं ॥ अंगिरासुतासी सत्वर ॥१२॥
शिव म्हणे रे परमभक्ता ॥ तुवां वर मागणें आतां ॥ मज संतोषविलें सुता ॥ अंगिराचिया प्रियकरा ॥१३॥
बृहस्पती अवलोकी प्रेमेंसीं ॥ तंव देखिला काशीनिवासी ॥ करकमळ मौळी क्षितीसी ॥ ठेवूनि लोटांगण घातलें ॥१४॥
तंव शिवें धरिला दशमकरीं ॥ म्हणें ऊठ आतां तुझा मी आभारी ॥ तेणें देखिला कैसा त्रिपुरारी ॥ मृगांक जैसा कां ॥१५॥
मग तो अंगिरानंदन ॥ स्तविता जाहाला कर जोडून ॥ तें प्राकृत शब्दें पूर्ण ॥ न वर्णवेचि मज आतां ॥१६॥
गुरूनें स्तविला त्रिपुरारी ॥ तें काय वर्णूं वैखरीं ॥ परी संकलित अल्पोत्तरीं ॥ परिसा आतां श्रोते हो ॥१७॥
तेणें वाखाणिलें जें संस्कृत ॥ तें मज न येचि व्यासमत ॥ तरी किंचित वाणी प्राकृत ॥ ऐकावी श्रोतीं सावधान ॥१८॥
बृहस्पति वदे जी हरा ॥ मृगाकमौळी भवानीवरा ॥ तूं माझिया चित्तचकोरा ॥ भासलासी चंद्ररूपें ॥१९॥
तूं कृपेचा पूर्ण सरितापती ॥ तूं अविंधमुक्त ह्रदयशुक्तीं ॥ माझिया मनोमीनाची आवृत्ती ॥ तव गुणनीरधीमाजीं ॥२०॥
तूं देहधातूचा परिस ॥ तूं निजानंदसाखरेचा पूर्ण ऊंस ॥ तेथें लौल्यंगत माझा मनोअंश ॥ पिपीलिकावेषें जाण पां ॥२१॥
तूं कल्पद्रुम नीलकंठा ॥ तेथें माझा मनपक्षी कुरठा ॥ नित्य असे जी गंगातटा ॥ धैर्यशिवा साक्षात ॥२२॥
तूं मधुकंद जी शिववृक्षा ॥ तो अतिप्रिय माझिया मनपक्ष्या ॥ माझिया देहदर्पणीं विरूपाक्षा ॥ नित्य बिंबो स्वरूप तुझेसें ॥२३॥
माझें शरीर हें झालें प्रेत ॥ परी वदनीं वसतसे नामामृत ॥ तेणें झालों हो सचेत ॥ अजरामर पैं ॥२४॥
माझिया मानतरुवरा ॥ शिव तूं अमृतसरोवरा ॥ जेणें लतापत्रांसी आकारा ॥ आणिलें मुक्तिफळासी ॥२५॥
तूं सरोवर पूर्ण महेश ॥ तुमचे देखोनि सुतटास ॥ तेणें माझा मनराजहंस ॥ नित्य वसे शिवा स्वामिया ॥२६॥
दिव्य कुमुदिनी तुझी नामवल्ली ॥ ते विकासली तव चरणकमळीं ॥ माझें मन अलिकुळी ॥ त्यामाजीं लोपावें ॥२७॥
माझें मन ततुपट ॥ देह हे शिला सधट ॥ तुझिया नामजळें शुद्धवट ॥ स्वच्छ मळासी करावें ॥२८॥
शिवा तुझिया नामगंगेसी ॥ श्रवणस्नान घडे जयासी ॥ तरी सत्यचि तो कृतांता सी ॥ अजिंक्य पैं ॥२९॥
तुझ्या स्वरूपाचा अति रंग ॥ माझें मन पतंग ॥ तुझिया नामघोषीं कुरंग ॥ चित्त माझें लुब्धो कां ॥३०॥
जैसें नारिकेळीचें फळ ॥ तैसेंचि माझें वक्षःस्थळ ॥ त्यामाजी क्षीरामृत निर्मळ ॥ तें नाम एक तुझेंचि ॥३१॥
माझिया पनाचें आयतन ॥ तेथें तुझें असावें शयन ॥ माझें मन आहे आसन ॥ तेथें नित्य असावें तूं ॥३२॥
कीं माझें मन शुद्ध सुवर्ण ॥ बरी जडलें तव नाम दिव्यरत्न ॥ शिवा म्यां त्यासी करावें जतन ॥ ह्रदयमांदुसेमाजीं ॥३३॥
श्रोतयांची सभा सधट ॥ तेथें मांडिलीं श्रोत्रसुवर्णताट ॥ मध्यें ओगरिलीं अन्नें चोखट ॥ शास्त्रपुराणेंचि ॥३४॥
तेथें नवरसांच्या पत्रशाखा ॥ शिवनामामृतें ओगरिल्या विशेखा ॥ त्या आरोगितां श्रवणमुखा ॥ तृप्ति नव्हे कांहींच ॥३५॥
पुण्यशील श्रोते सर्वज्ञ ॥ तेचि आरोगिती हें अन्न ॥ तेणें होतसे जी भंजन ॥ कर्माकर्मक्षुधेसी ॥३६॥
बृहस्पति म्हणे शिवासी ॥ बहुत पुण्याचिया राशी ॥ जोडिजेती महासायासीं ॥ तेव्हां देखिजे तुम्हांतें ॥३७॥
शिवा तुझें नामचि घन ॥ तेथें चातक तें माझें मन ॥ तूं दिव्य मणी मी फणी शोभायमान ॥ मस्तकीं राहें माझिया ॥३८॥
धेनूच्या कांसे पयोमृत ॥ तेंचि माझें ह्रदय निवांत ॥ तयामाजीं जें सार नवनीत ॥ तेंचि नाम तुझें सदाशिवा ॥३९॥
तुझिया नाम-चंदनाची उटी ॥ वक्षःस्थळावरी लेइली गोमटी ॥ तेणें शीतल होतसे आगटी ॥ कर्मज्वराची पैं ॥४०॥
माझिया कर्मतृषेकारणें ॥ पराभविलें तव नामजीवनें ॥ कर्ममळ धरिला जो माझिया मनें ॥ तो तव नामाग्नि शुद्ध करी ॥४१॥
माझें ह्र्दयस्थान शिखर ॥ त्यामाजीं तूं लिंग स्थावर ॥ माझें मन बिल्वपत्र अरुवार ॥ तें तुज अर्पूं निजभावें ॥४२॥
तव नामामृताची प्रतीती ॥ ते भवव्याधीची करी शांती ॥ क्षुधा प्रज्वळली नाहीं तृप्ती ॥ तुझिया नामामृताची ॥४३॥
भस्मोदधुलित सर्वगात्रा ॥ दिव्यदेही पंचवक्त्रा ॥ दिव्यगंधलेपना त्रिनेत्रा ॥ स्मरहरा चिंतूं तुजलागीं ॥४४॥
जे तुझें नाम अखंड जपती ॥ ते भवार्णव पार तरती ॥ या अर्थी विकल्प चित्तीं ॥ असेचि ना ॥४५॥
जें तुझें नाम विसरती ॥ ते प्राणी नरकद्वारा जाती ॥ तिंहीं उडया घातल्या यमपंथीं ॥ पूर्वजांसहित ॥४६॥
शुद्ध माझें ह्रदयकमळ ॥ त्यामाजीं तुझें नाम परिमळ ॥ तेथें लुब्धलें अलिकुळ ॥ तें मन माझें ॥४७॥
सुवर्णाचळाचीं कोठारें ॥ तींच काय श्रोतयांचीं श्रवणद्वारें ॥ तेथें गर्जती दीर्घस्वरें ॥ तुझें नाम केसरी ॥४८॥
तेणें पराभविलीं कर्ममातंगें ॥ नातरी भेदातें भक्षिलें सत्सगें ॥ कीं भक्षिलीं कर्मकुंरगें ॥ तुझिया नामशार्दूलें ॥४९॥
तूं तिराकार अद्दश्य ॥ तूं निजबीजाची मूस ॥ परब्रह्म ओतिलें साभास । तोचि तूं शिवा एक ॥५०॥
शिवा तूं साक्षात चंदनतरू ॥ तेथें माझें मन रत कीरू ॥ कीं धातूंसी शोधक अंगारू ॥ तैसें नाम मज ॥५१॥
हा संसार महासागरू ॥ तेथें माझें ह्रदय-तारूं ॥ त्यामध्यें उत्तम रत्नें भरूं ॥ तुझीं गुणनामेंचि ॥५२॥
काम दंभ मद मत्मर ॥ हेचि जेथें जळचर ॥ त्यांसी पाश टाकिती थोर ॥ तुझिया लयलक्षाचे ॥५३॥
शिवा तुझी बहुत गुणवाणी ॥ ते मी काय बोलों वचनीं ॥ वाखाणितां शिणला सहस्त्रफणी ॥ तटस्थ राहिला तो ॥५४॥
तुळसीपत्राचे करूनि द्रोण ॥ जरी उपसवेल सागरांचें जीवन ॥ तरीच तुझें गौरव गुणवर्णन ॥ लक्षा येईल दयाळुवा ॥५५॥
तृणें भेदवेल जरी नम ॥ कीं पृथ्वी-भार वाहे दर्भ ॥ कीं दैत्याहातीं जिंकिजे पद्मनाभ ॥ तैंच लक्षा येतील गुण तुझें ॥५६॥
पश्चिमे भासे दिवाकर ॥ कीं उष्णता करी शीतकर ॥ कीं काशी प्रहरी शंकर ॥ तैं लक्षवती गुण तुझें ॥५७॥
ऐसा तूं त्रिभुवनकंद थोर ॥ अनंत ब्रह्मांडें तुझा पसार ॥ चतुर्वेदां अगोचर ॥ अकळ जाण ब्रह्मादिकांसी ॥५८॥
शिवा तुमची लक्षावी ज्योती ॥ तरी तुम्हीं केले तारणी तारापती ॥ जरी पाहावी तुमची संतती ॥ तरी त्रैलोक्य व्यापिलेंसे ॥५९॥
तुज जरी म्हणों शीतळ ॥ तरी तुमचें भाळीं वडवानळ ॥ तृतीय नेत्रींची ज्वाळ ॥ दाहीतसे त्रिभुवन ॥६०॥
तुम्हांसी अर्पूं जरी षड्रस पक्वान्न ॥ तरी तुमचे घरीं कामधेनूंची गोठण ॥ तुम्हांसी कीजे तोयस्नपन ॥ तरी मुकुटी गंगा तुमचिया ॥६१॥
जरी तुम्हांसी म्हणावें कृपावंत ॥ तरी प्रळसीं सर्व संहारीत ॥ जरी म्हणावें तुम्हां आदिअंत ॥ तरी तोही भास न साहे ॥६२॥
जरी स्मरावें तुमच्या नामा ॥ तरी तूं पिपीलिकादि सर्वात्मा ॥ परा पश्यंती मध्यमा ॥ वैखरी त्याही तूंचि पैं ॥६३॥
शिवा मी निर्लज्जथोरू ॥ तुम्हांसी मी कवण्या प्रकारे स्मरूं ॥ तुम्हांसी म्हणावें दिगंबरु ॥ तरी वामांगीं दाक्षायणी ॥६४॥
तुम्हांसी स्मरतां त्रिपुरारी ॥ थोर शंका वाटतसे अंतरीं ॥ जैसी जळार्णवाची लहरी ॥ द्वैत नव्हे जळीं सर्वथा ॥६५॥
तूं सर्व ज्ञानांचा मूळकंद ॥ तूं चतुर्विध वाचा बिंदुनाद ॥ म्हणोनि न करी अनुवाद ॥ वैखरी हे जाण पां ॥६६॥
ऐसें बोलोनि तो बृहस्पती ॥ मौनेंचि राहिला स्वस्थ चित्तीं ॥ मग घातलें बद्धहस्तीं ॥ साष्टांग दंडवत शिवासी ॥६७॥
न कळे शिवा तुझा पार ॥ नेणवे साकार निराकार ॥ तूं शिव तूंचि परस्पर ॥ बुडोनियां गेलों मायेनें ॥६८॥
स्तुति अनुवादला थोर ॥ हेलावला ह्रदयसागर ॥ येथें अविवेकाचें तारू थोर ॥ बुडोनि गेलें असें कीं ॥६९॥
त्या ह्रदयासागराच्या तीरीं ॥ बुडाली विषयाची नगरी ॥ तंव तो धरिला दश करीं ॥ शिवें दयाळूवें ॥७०॥
मग शिव म्हणे गा बृहस्पती ॥ तुवां केली जे पूर्ण स्तुती ॥ ते मज पावली प्रेमचित्तीं ॥ भावासहित पैं ॥७१॥
तरी या स्तुतीचें श्रवण पठण ॥ जो त्रिकाळ करील नियमेंकरून ॥ तयाजवळी मी पंचानन ॥ नित्य असें निजांगें ॥७२॥
बृहस्पतीश्वरलिंगाजवळी ॥ हे स्तुति करी जो त्रिकालीं ॥ आपुले आसनीं चंद्रमौळी ॥ वास्तव्य करवी तयातें ॥७४॥
शिव म्हणे गा स्मृतिनंदन ॥ तुज वाखाणितां वेद पुराण ॥ मंदत्वें लाजल्या जाण ॥ चारी वाचा त्या ॥७५॥
पाहातां चतुर्वाचा प्रमाण ॥ अधिक दिसे तव शब्दज्ञान ॥ तरी तूं पावलासी रे जाण ॥ आधिपत्य तयांचें ॥७६॥
तुझें पूर्वनाम बृहस्पती ॥ दुसरें नाम वाचस्पती ॥ ऐसा वर देता जाहाला पशुपती ॥ त्या अंगिरासुतासी ॥७७॥
आणिक बोलता जाहाला शंकरु ॥ शुक्र केला दैत्यगुरु ॥ जैसा कुळाचळांमाजीं मेरू ॥ आणि हिमाद्री तो ॥७८॥
आतां वाचस्पती तुज नाम ॥ होसी देवांची गुरु उत्तम ॥ वेदवाक्य आगम निगम ॥ जाणसी तूं देवगुरु ॥७९॥
मग सर्व देव आणि दिक्पती ॥ शिवें पाचारिला वज्रहस्ती ॥ तो वेगें आला ऐरावती ॥ वहन जयाचें ॥८०॥
ऐसा आला तो वज्रधर ॥ त्यासी आज्ञा करी शंकर ॥ हा अंगिराचा कुमर ॥ स्वामी होय तुमचा ॥८१॥
जैसा सागरांमाजीं क्षीरसागर ॥ तैसा वाचस्पती देवगुरु थोर ॥ याचिया आज्ञेंत सर्व सुर ॥ असावें तुम्ही सर्वदा ॥८२॥
शिव म्हणे गा सुरपती ॥ हा तुम्हां नमस्कारिजे वाचस्पती ॥ याचेनि यज्ञ सिद्धी पावती ॥ सकळ कार्यें तुमचीं पैं ॥८३॥
शक्रादि देव समस्त ॥ असावे याचे आज्ञेंत ॥ ऐसा निरूपी भवानीकांत ॥ देवगणांसी ॥८४॥
मग शिवाचे आज्ञें वज्रधरू ॥ बृहस्पतीसी करी नमस्कारू ॥ तो वंदिला स्वामी गुरु ॥ सर्व देवदिक्पाळीं ॥८५॥
ऐसा तो बृहस्पती वंदुनी ॥ देव निघाले जावया स्वस्थानीं ॥ मग बैसविला अमरभुवनीं ॥ बृहस्पती या लोकीं ॥८६॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर जाहाला बृहस्पतीसी ॥ तो हा अंगिरासुत तुजसी ॥ निरूपिला समूळ ॥८७॥
विमान चाललें शीघ्रगती ॥ तंव कोण देखिला पुढती ॥ पुनरपि पुसे गणांप्रती ॥ शिवशर्मा तो ॥८८॥
शिवदास गोमा प्रार्थी श्रोतां ॥ कथेसी श्रवण अर्पिजे आतां ॥ जेणें श्रवणें नाइकिजे वार्ता ॥ भवव्यथेची ॥८॥
॥ इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे बृहस्पतिलोकवर्णनं नाम एकोनविंशाध्यायः ॥१९॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP