मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ११ वा

काशी खंड - अध्याय ११ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ ॥
शिवशर्मा करीतसे प्रश्न ॥ स्वामी समूळ निरूपिला जी वरुण ॥ आतां पुढें क्रमितां कोण ॥ देखिला लोक स्वामिया ॥१॥
विमान जातां ते विष्णुगण ॥ धर्मकथापरायण ॥ जे जे प्रश्न करी शिवशर्मा ब्राह्मण ॥ ते ते सांगत तयातें ॥२॥
जें ऋषिवाक्य संस्कृत ॥ तें उघड कीजे सर्व जनांत ॥ जैसा अभ्रपटळीं शशी लेपित ॥ कवण देखे तयातें ॥३॥
म्हणोनि भाषा केली मर्‍हाटी ॥ ते परिसा कर्मकाष्ठआगटी ॥ विमान चालतां व्योमकुटीं ॥ देखिला तो कवण लोक ॥४॥
तंव विमानीं वदे शिवशर्मा ॥ एक पृच्छा असे जी गणोत्तमा ॥ जेणें महादुरितकर्मां ॥ होतसे पराभव ॥५॥
ते गंगा तुमची वाणी ॥ अधरतटीं हेलावे रसनागुणीं ॥ तेणें उद्धरिजे श्रवणस्थानीं ॥ हेंचि मोठें सामर्थ्य ॥६॥
आपणासी क्रमितां गगनोदरीं ॥ पुढीं दिसतसे कवण पुरी ॥ हे देखोनि माझे अंतरीं ॥ होतसे थोर आल्हाद ॥७॥
ये स्थानीं सुगंधाची उत्पत्ती ॥ कवण येथींचा अधिपती ॥ हा लोक प्राप्त झाला याप्रती ॥ तें कवण पुण्य आचरला ॥ हा ॥८॥
हा कवणाचा पुत्र ॥ यासी स्फुरला कवण मंत्र ॥ येणें आराधिला पंचवक्र ॥ तें कवण स्थान असे पैं ॥९॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ तूं बरा प्रश्न आम्हां केलासी ॥ तेणें थोर आनंद मानसीं ॥ होत असे आमुच्या ॥१०॥
तरी हा लोक सांगूं तुजप्रती ॥ या लोकींचा मारुत असे अधिपती ॥ नगराचें नाम गंधवती ॥ हा तंव असे वायुलोक ॥११॥
तरी या मारुताचें आदि अवसान ॥ शिवशर्म्या तुजं करूं निरूपण ॥ मग कथिते झाले विष्णुगण ॥ सुशील आणि पुण्यशील ॥१२॥
आतां ब्राह्मणा अवधारीं ॥ हा पवन महापरोपकारी ॥ आणिक हा त्रैलोक्यामाझारी ॥ व्यापक असे ॥१३॥
हा पवन परिमळें परम मंजुळ ॥ कीं अष्टगंधांचा पूर्ण गोळ ॥ उष्णकाळाचे ठायीं परम शीतळ ॥ परोपकारी जाणावा ॥१४॥
अष्टगंधें अंगीं चर्चिलीं ॥ तीं पवनेंविण वृथा गेलीं ॥ उटीसी शोभा आणिली ॥ उष्णकाळीं या पवनें ॥१५॥
सर्व सुगंधांचा परीक्षी ॥ सर्व जंतूंचा मृत्युसाक्षी ॥ याचेनि सर्व जीवांची ओळखी ॥ हा चिरंजीव असे सर्वदा ॥१६॥
हा पवन जंव शरीरीं वर्तत ॥ तंव तो प्राणी म्हणावा सावचित्त ॥ हा नसे तरी पुरला अंत ॥ आयुष्याचा जाण पां ॥१७॥
म्हणोनि हा मारुत केवळ ॥ सर्व आनंदाचें मूळ ॥ याजपासून सकळ ॥ विषयांचा उद्भव होतसे ॥१८॥
चौर्‍यायशीं लक्ष जीवयोनी ॥ चिरंजीव असती यापासुनी ॥ यासारिखा परोपकारी म्हणोनी ॥ या त्रैलोक्यमंडळीं असेना ॥१९॥
ज्या देवां प्रिय सुगंध जाती ॥ अतिउत्तम त्रिलोकीं असती ॥ त्यांची पवनापासाव उत्पत्ती ॥ झाली असे अवधारीं ॥२०॥
तरी त्य सुगंधी कोण कोण ॥ ज्या चौखाणी असती व्यापून ॥ त्या सर्व श्रुत करूं जाण ॥ श्रवणीं श्रोतयांच्या ॥२१॥
उद्भिजखाणीमाजी चंदन ॥ पुष्पयाती अनेक जाण ॥ धान्यामाजी मिष्ठान ॥ असे जें कां उत्तम ॥२२॥
अंडजखाणीमध्यें राजहंस ॥ सुगधं असे अहींस ॥ अरुणउदया निःशेष ॥ प्रकाशद्दी सुगंधित असे ॥२३॥
स्वेदजांमाजी परिमळ ॥ प्रतिस्थानीं आहे भूमंडळ ॥ आणि द्वीपांतरीं सुगंधजळ ॥ पृथक्‍ पृथक्‍  असे कीं ॥२४॥
जारजखाणी सांगों आतां ॥ सुगंध असे मृगीं तत्त्वतां ॥ परी या समस्तांसी उद्भविता ॥ तो पवन असे एकचि ॥२५॥
जैसें तें दधि मथितां ॥ निवाडा होतसे नवनीता ॥ तैसे सर्व सुगंध या मारुता- ॥ पासाव जाण उद्भवती ॥२६॥
म्हणोनि परोपकारासी ॥ वायु उपयोगा आणीतसे यांसी ॥ तरी या वायूची उत्पत्ति कैसी ॥ ते परिसावी द्विजोत्तमा ॥२७॥
अगस्तिऋषी करीतसे कथन ॥ परिसे लोपामुद्रा सगुण ॥ या वायूचें मूळ उत्पत्तिकथन ॥ तें कैसें अवधारीं ॥२८॥
आतां विंध्याद्रिगिरीचे पाठारीं जाण ॥ ब्रह्मन्यानें केलें अनुष्ठान ॥ सृष्टी करावया उत्पन्न ॥ चंडवात प्रगटला ॥२९॥
विधीनें मानसध्यान आरंभिलें ॥ नेत्रीं जीवन प्राप्त झालें ॥ तेंचि सरोवरासी नाम ठेविलें ॥ मानस सरोवर ऐसें ॥३०॥
मानस सरोवर म्हणिजे कैसें ॥ त्यासी उपमा दीजे आकाशें ॥ पूर्ण जीवनें आथिलें तैसें ॥ तोचि शरय़ूचा उगमू ॥३१॥
त्या सरोवरीं हेमकुमुदिनी ॥ जैशा त्या व्योमींच्या सौदामिनी ॥ त्यामाजीं कमळांची दाटणी ॥ तेजें जैसीं नक्षत्रें ॥३२॥
ऐशा त्या हेमकुमुदिनी जाण ॥ विरिंचीनें केल्या निर्माण ॥ त्यांवरी भ्रमर क्रीडती जाण ॥ हारी बैसल्या हंसांच्या ॥३३॥
ऐशा त्या पुण्यसरोवरीं ॥ कमळीं क्रीडती मुक्ताहारी ॥ तें सरोवर विंध्याद्रिपाठारीं ॥ असे रम्य जाण पां ॥३४॥
त्याची महिमा जाणोनि ऐसी ॥ तेथें आला दुर्वासऋषी ॥ स्नानविधि सारोनि वेगेंसीं ॥ अवलोकी तें सरोवर ॥३५॥
तंव देखे हेमकुमुदिनी ॥ मग दुर्वासा योजीतसे मनीं ॥ म्हणे हे कमळमाळा गुंफोनी ॥ उचित द्यावी वज्रधरा ॥३६॥
मग दुर्वासें त्या कमळांची ॥ माळा गुंफिली थोर युक्तीची ॥ तयासी पद्मपत्रांची ॥ गवसणी केली तत्काळ ॥३७॥
तेणें कळिका घेऊनि अपार ॥ तेथूनि निघाला ऋषीश्वर ॥ स्वर्गमंडळ क्रमितां अमरपुर ॥ पावला तो दुर्वास ॥३८॥
तंव सिंहासनीं बैसला वज्रधर ॥ जो अदितिकश्यपांचा पुत्र ॥ त्या सुरसभेसी गेला मुनीश्वर ॥ दुर्वासऋषी जाण पां ॥३९॥
बैसले दिक्पती देवगण ॥ नृत्यांगनांचें होतसे नर्तन ॥ आणि अप्सरा-गंधर्वांचें गायन ॥ होत निरंतर आनंदें ॥४०॥
दुर्वासा देखोनि वज्रधर ॥ प्रेमें सन्मानूनि ऋषीश्वर ॥ मग करिता झाला थोर आदर ॥ दुर्वासाप्रती तेधवां ॥४१॥
मग दुर्वासानें इंद्राजवळ ॥ पुढें ठेविली कमळमाळ ॥ होते जे सभेसी देव सकळ ॥ पुष्पें दिधलीं तयांसी ॥४२॥
मग काय करी तो सुरपती ॥ वहन आणूनि ऐरावती ॥ मग ते कमळमाळा दिव्यदीप्ती ॥ घातली कंठीं गजाचिया ॥४३॥
मग विचारिती देवगण ॥ भृत्यांकरवीं आणविती आपुलीं वहन ॥ मग तीं अर्पिती सुमन ॥ आपुलाले वहनांसी ॥४४॥
ऐसें देखोनि दुर्वासा ॥ म्हणे उचिता अपमान झाला ऐसा ॥ मग ऋषि म्हणे देवाधीशा ॥ सहस्त्रनयना तेधवां ॥४५॥
ऐरावतकंठीं घातली तुवां माळ ॥ तैसेचि वर्तले देव सकळ ॥ कैसें उत्तम झालें तुझें मौळ ॥ दिव्य कमळांपरी ॥४६॥
म्हणे रे गर्विष्ठा सुरपती ॥ तुवां निर्भर्त्सिलें आमुच्या उचितीं ॥ हीं दिव्यकमळें पशूंप्रती ॥ प्राप्त कैंचीं सर्वथा ॥४७॥
यांचा भोक्ता तो केवळ ॥ विष्णु ज्याच्या कंठीं वैजयंतीमाळ ॥ दर्दुर आला पद्मिनीजवळ ॥ तो केवीं जाणे गुणातें ॥४८॥
या कमळीं क्रीडती राजहंस ॥ जयांसी दिव्यमुक्तांचे ग्रास ॥ तेथींचें सुख वायस ॥ केवीं जाणती सांग पां ॥४९॥
रत्नजडित श्रृंगार रासभासी ॥ कीं मृगमद चर्चिला सूकरासी ॥ कीं दर्पण दावितां निर्नासिकासी ॥ उपजे खेद तयातें ॥५०॥
ऐसी हीं कमळें दिव्यदंडीं ॥ इंद्रा न शोभती तुझ्या मुंडीं ॥ रणशौर्याविरहित शस्त्रें खंडी ॥ मशक केवीं जाणे तो ॥५१॥
मग दुर्वास उठिला तेथूनी ॥ ह्रदयीं प्रज्वळिला क्रोधाग्नी ॥ म्हणे म्यां केवीं आणिला चिंतामणी ॥ पशुवालागीं मूर्खत्वें ॥५२॥
मग  दुर्वासें शापिलें त्यासी ॥ चतुर्दश रत्नें कायसी तुजसी ॥ सुंदर स्रिया जाण षंढासी ॥ प्राप्त होऊनि वृथाचि ॥५३॥
माझें उचिताचें त्वां केलें निर्भर्त्सन ॥ आतां घेईं माझें शापदान ॥ तुझे घरींचीं चतुर्दश रत्नें पूर्ण ॥ गळतील जाण सागरीं ॥५४॥
तंव सभेंत झाला हाहाकार ॥ शाप वदला तो ऋषीश्वर ॥ थोर गजबजिला वज्रधर ॥ महावातें वृक्ष जैसा ॥५५॥
तंव धांवलें देववर ॥ त्यांहीं प्रार्थिला मुनिवर ॥ म्हणती उश्शाप मागे वज्रधर ॥ रत्नांविण अशोभ हा ॥५६॥
मग समस्त सुरगणीं ॥ प्रार्थूनि तोषविला मुनी ॥ मग उश्शाप वदला वदनीं ॥ दुर्वास ऋषी तो ॥५७॥
सिंधूसी करा रे कुरवंडी ॥ मंदराचळाची करा रविदांडी ॥ काद्रवेयाची करा दोरपरवडी ॥ विष्णु रविस्तंभ ॥५८॥
माथां बैसेल त्रिपुरारी ॥ मग मथावा सुरासुरीं ॥ आपुल्या स्वार्थालागीं आदरीं ॥ रत्नें निघतील सुरेख ॥५९॥
ऐसा उश्शाप बोलोनी ॥ मग क्रमिता झाला तेथुनी ॥ तंव रत्नें गेलीं गळूनी । सागरामाजीं ॥६०॥
तीं रत्नें चतुर्दश कवणें ॥ निर्मिलीं शिवाचिया वहनें ॥ तीं रत्नजन्में संपूर्णें ॥ कथूं आदरें श्रोतयांसी ॥६१॥
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक ॥ धन्वंतरी कामधेनु मयंक ॥ रंबा अप्सरा देवदत्तशंख ॥ हालाहल पीयूष जें ॥६२॥
ऐरावत गज होता घरीं ॥ शुभ्र जैसा घडिला काश्मीरीं ॥ सुरो जे सर्व मोहकरी ॥ ऐसीं रत्नें चतुर्दश ॥६४॥
सागरीं गळालिया संपूर्ण ॥ विस्मित झाला सहस्त्रनयन ॥ ऐसे संवत्सर क्रमिले पूर्ण ॥ शत एक परियेसा ॥६५॥
मग पाचारिला देवगुरु ॥ त्यासी विज्ञापना करी सुरेश्वरू ॥ म्हणे मी राज्यभ्रष्ट निर्धारू ॥ रत्नांविरहित सर्वदा ॥६६॥
मग तो देवगुरु वेगेंसीं ॥ क्रमिता झाला सत्यलोकासी ॥ तेथें अभिवंदोनि विधीसी ॥ प्रार्थिता जाहला ॥६७॥
गुरु म्हणे गा विरींचिनाथा ॥ इंद्रासी रत्नयोगाची व्यथा ॥ तरी उपाय देखावा समर्था ॥ विधि स्वामी आपण ॥६८॥
मग तो बोलिला सृष्टिकर ॥ आतां प्रार्थावा शार्ङ्गधर ॥ मग विधि देवगुरु सुरेश्वर ॥ क्रमिते झाले वैकुंठभुवन ॥६९॥
तेथें प्रार्थिते झाले मुरारी ॥ विरिंची म्हणे हो चक्रधारी ॥ चतुर्दश रत्नें सागरीं ॥ गळालीं ऋषिशापें ॥७०॥
मग विष्णु म्हणे सृष्टिकरा ॥ आतां प्रार्थावें त्रिशूलधरा ॥ मग विरिंची हरिसहित शिवपुरा ॥ येते झाले तेधवां ॥७१॥
त्यांहीं शिवासी कथिला विचारू ॥ तत्काळ सज्जिला नंदिकेश्वरू ॥ मग त्रिदेव आणि इंद्र गुरू ॥ आले जाण अमरावतीसी ॥७२॥
अमरावतिये आला शंकर ॥ त्रिदेवीं स्थापिला एक विचार ॥ मथनीं योजिला नंदीश्वर ॥ हाहाकार झाला त्रिभुवनीं ॥७३॥
सर्व गणेंसीं आला शंकर ॥ ज्याचें वहन नंदिकेश्वर ॥ विष्णुगणेंसीं गार्ङ्गधर ॥ आला गरुडवाहनें ॥७४॥
हंसवहनीं आला सृष्टिकर ॥ दिक्पतींसहित आला वज्रधर ॥ ते कोण कोण मेळिकार ॥ करूनि आले साक्षेपें ॥७५॥
पूर्वेंचा तो सहस्त्रनयन ॥ जयाचें ऐरावत वाहन ॥ अग्निदिशेचा आला कृशान ॥ मेंढयावरी आरूढ ॥७६॥
यम आला महिषवाहनीं ॥ नैऋत्य सूकर पालाणुनी ॥ मगरावरी आरूढोनी ॥ वरुण आला तेधवां ॥७७॥
वायव्यदिशेचा समीर ॥ मृगारूढ आला सत्वर ॥ नरवाहनीं कुबेर ॥ उत्तरेचा अधिपती ॥७८॥
ईशानीचा आला ईश्वर ॥ पालाणोनि नंदिकेश्वर ॥ एवं दिक्पाळ समग्र ॥ वाहनीं बैसोनि चालिले ॥७९॥
वाजिवाहनें आला देवगुरू ॥ मृगवहनीं आला शीतकरू ॥ एवं ग्रह पाचारिले शुभकरू ॥ ते कवण कवण सांगा जी ॥८०॥
सोम सूर्य बुध शुक्र बृहस्पती ॥ हे आले पुण्यकीर्ती ॥ शनि मंगळ राहु केतु मूर्ती ॥ हे क्रूरे पापग्रह जाणावे ॥८१॥
ऐसे तेहेतीस कोटी देव आले ॥ मग विरिंची राहूसि बोले ॥ तूं दैत्य पाचारीं वहिले ॥ जे कां पाताळपुटींचे ॥८२॥
मग राहुनें केला हाकारा  ॥ तेथें झालें महाअसुरां ॥ संख्या नाहीं त्या दैत्यभारा ॥ आले कुलाचल जैसे कां ॥८३॥
ऐसें मीनलें देवदैत्यकुळ ॥ भरें दडपलें भूमंडळ ॥ सप्त पाताळपुटें सकळ ॥ होऊं पाहाती एकवट ॥८४॥
नामें सांगतां दैत्यकुळांचीं ॥ साठ कोटी संख्या त्यांची ॥ दक्षदुहिता माता जयांची ॥ दितिनामें कश्यपकांता ॥८५॥
तेहतीस कोटी देवजननी ॥ ते अदिति नामें दक्षनंदिनी ॥ ह्या साक्षात उभयतां भमिनी ॥ प्रसवल्या देवदैत्यांतें ॥८६॥
ऐसे मिळाले देव असुर ॥ अवघें कश्यपाचे कुमर ॥ तेरा स्त्रियांपासाव विस्तार ॥ सर्व सृष्टी जाण ही ॥८७॥
ऐसीं मिळालीं दोनी कुळें ॥ अवघे आले आपुल्या मेळें ॥ वेगळाले पडिले पाळे ॥ देवदैत्यांचे ते ठायीं ॥८८॥
चौसष्ट कोटी शिवगण ॥ महाबलिष्ठ दारुण ॥ संख्या चोवीस सहस्त्र योजनें ॥ तिंहीं रोधिली भूमिका ॥८९॥
दहा कोटी संख्या विष्णुदूतीं ॥ रोधिली बारा सहस्त्र योजनें क्षिती ॥ ऐसा आपुले मेळीं लक्ष्मीपती ॥ वेगळाचि उतरला ॥९०॥
सप्त कोटी ब्रह्मदेवाचा परिवार ॥ तो वेगळाचि पाळा सृष्टिकर ॥ तपस्वियांवांचूनि महावीर ॥ असेना ते ठायीं ॥९१॥
त्यांहीं नव सहस्त्र भूमि रोधिली ॥ तंव कृतांताचीं सैन्यें आलीं ॥ चतुर्दश कोटी संख्या झाली ॥ तो पाळा किती योजनें ॥९२॥
अठठयायशीं सहस्त्र योजनें क्षिती । इतुकी रोधिली यमदूतीं ॥ तेहतीस कोटी देवेंसीं सुरपती ॥ बाहेरी आला साक्षेपें ॥९३॥
आणिक संख्या जरी सांगतां ॥ तरी ग्रंथासी होय विस्तीर्णता ॥ पुढें देवांसी जाणें असे पर्वता ॥ मंदराचळासी ॥९४॥
मग बृहस्पति देवगुरू ॥ इंद्र पद्मताभ सृष्टिकंरू ॥ शिवासी पुसावया विचारू ॥ आले वेगें त्या ठायीं ॥९५॥
साष्टांगें वंदिला त्रिपुरारी ॥ आज्ञा मागती विरिंचि हरी ॥ तंव शिवाजवळी मेळिकारीं ॥ राहु आला महादैत्य ॥९६॥
राहु म्हणे जी भवानीकांता ॥ आम्हांसी हांकारिलें कोण्या निमित्ता ॥ तंव बोलिला सृष्टिकर्ता ॥ विरिंचि राहूसी ॥९७॥
सैन्य साठ कोटी महाअसुर ॥ इतुका राहूचा परिवार ॥ ऐशीं सहस्त्र योजनें अपार ॥ पाळा पडे राहूचा ॥९८॥
सिंधुमथनाचें कारण ॥ काढावया चतुर्दश रत्न ॥ तीं समस्त विभागून ॥ देऊं देव-दैत्यांसी ॥९९॥
मग राहु म्हणे ब्रह्मयासी ॥ जें रत्न बहु प्रिय आम्हांसी ॥ तें प्राप्त होईल तरी मथनासी ॥ येऊं आम्ही ॥१००॥
नाहीं तरी निष्कारण ॥ आम्ही न करूं सिंधुमथन ॥ विधि म्हणे रे रत्न तें कवण ॥ अंगीकाराल सांगा तें ॥१०१॥
तंव तो वदे राहु दैत्य ॥ आम्हांसी रत्न दीजे अमृत ॥ तयावांचोनि निश्चित ॥ आन रत्न नलगे आम्हांसी ॥१०२॥
तथास्तु म्हणे सृष्टिकर ॥ तुम्हां प्रिय त्याचा करा अंगिकार ॥ मग आज्ञा करी शंकर ॥ आणा रे पर्वत वेगेंसीं ॥१०३॥
तंव त्या क्षीराब्धीच्या तीरीं ॥ पर्वत असे मंडरगिरी ॥ तो आणावया गेला वज्रधारी ॥ देवांसमवेत ॥१०४॥
मग समस्त देवअसुरीं ॥ उत्पाटिला तो मंदिरगिरी ॥ मग गिरि म्हणे न्यावया वैरी ॥ कैंचा आला अमरेश ॥१०५॥
आम्ही आलों असों तपाप्रती ॥ शिवपूजनें आम्हां नाहीं तृप्ती ॥ कैसा हा तपस्वियां सुरपती ॥ देखों न लाहे सर्वथा ॥१०६॥
ऐसें जंव विचारी तो गिरी ॥ तंव तो उत्पाटिला महाअसुरीं ॥ तेहतीस कोटी बलात्कारीं ॥ आणिला देवीं जवळिकें ॥१०७॥
मागीं आणितां तो गिरिवर ॥ भारें दाटले देवअसुर ॥ मग खेदें क्षीण होऊनि फार ॥ गिरि टाकिला मार्गीं तो ॥१०८॥
समस्त देवां उपजला खेद ॥ त्यांच्या सर्वांगीं उठला स्वेद ॥ शक्ति सांडूनि गोविंद ॥ स्मरते जाहाले ॥१०९॥
खेद पावला तो वज्रधर ॥ म्हणे राहिला मथनें सागर ॥ आतां या पर्वताचा भार ॥ कवण नेऊं शके पैं ॥११०॥
पांच लक्ष योजनें उंची ज्याची ॥ तीन लक्ष योजनें रुंदी त्याची ॥ महत्तरता पाहतां गिरीची ॥ न चले बळ न्यावया ॥१११
तो दुसरा महामेरु ॥ पदमात्र न चले गिरिवरु ॥ हरि विचारी म्हणे कां उशीरु ॥ लाविला त्या वज्रधरें ॥११२॥
मग विचारिलें नारायणें ॥ गरुड पक्षियासह केलें धांवणें ॥ तंव देखिले सुरेंद्रगण ॥ अशक्त तेथें ॥११३॥
मग काय करी मुरारी ॥ पर्वत कवळी चहू करीं ॥ तो घातला गरुडपृष्ठीवरी ॥ आणिता झाला शार्ड्गधर ॥११४॥
जयाचे उदरीं चतुर्दशभुवन ॥ तो गरुडपृष्ठीवरी आरोढून ॥ पुढें पर्वत राखिला धरून ॥ वृक्षफळाचियापरी ॥११५॥
ऐसें देखोनि वज्रधर ॥ स्तविता झाला शार्ङ्गधर ॥ म्हणे स्वामी या गरुडबळाचा पार ॥ अगम्य आम्हां भासतो ॥११६॥
कवण जाणे शार्ङ्गधरा ॥ आश्चर्य वर्तलें सुरां असुरां ॥ पर्वत आणिला एकसरां ॥ सिद्धाश्रमासी सत्वर ॥११७॥
आतां पर्वत घालूनि सागरीं ॥ मथिजे मिळूनि सुरासुरीं ॥ आतां मथन मांडलें सागरीं ॥ ते कथा पुढारी परिसिजे ॥११८॥
शिवदास गोमा म्हणे श्रोतां ॥ कथेसी द्यावी सादरता ॥ परिसा मंथनाची कथा ॥ सावधान चित्तें ॥११९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे समुद्रमथनवर्णनं नाम एकादशाध्यायः ॥११॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
                                 
॥ इति एकादशाध्यायः समाप्त ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP