पूर्वार्ध - अभंग ४०१ ते ५००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


ब्रह्मविद्येंत कुशलता । योगविद्येमाजी सफलता । मुक्तानंदा जेथ आत्मवृत्ती-स्थिरता । मानी गुरु तो पूर्ण ॥४०१॥
ज्याचा सत्संग । बने साधनेचें अंग । सहजी आंगोपांग । साध्य होई ॥२॥
कठीण । सहजसुलभ बनुन । जाइ सारा सोपान । साधनेचा ॥३॥
केवळ सहवासानें । आत्मजागृति होण्यानें । बनशील खास तेणें । आत्मरमण ॥४॥
गुरु असे नित्यानंद । जाणुनि घे मुक्तानंद । प्राप्त करी सहवासानन्द । साथ सदा राही ॥५॥
मुक्तानंद श्रीगुरुबोध उत्तम । ना करी केवळ मुक्त जीवन । पुरुषांतला पुरुषोत्तम । तेणें होशील ॥६॥
मुक्तानंदा, ज्याच्यावर । ग्रुरु, कृपा पूर्ण करणार । सर्वजण त्याच्यवर । कृपा करीती ॥७॥
ध्यानानें ध्येयप्राप्ती । सहजासहजी साधे ती । मुक्तानंदा, बनव चित्ताप्रती । ध्यानमग्न ॥८॥
इच्छित फलदाता ध्यान । स्थिरचित्त बनवुन । मोक्षनगरीचेंही वाहन । हो ध्यानरत म्हणुन ॥९॥
प्राण स्थिर होइ । काया बने निरोगी । होते शरीरसंशुद्धि । अतः हो ध्यानपुजारी ॥४१०॥
होतसे व्यसनमुक्त । रसनाही स्वच्छ होत । बुद्धी कुशाग्र असे बनत । ध्यानातें पूजी ॥११॥
आरोग्याचें राही सदन । देहा बनवी बलवान । सुखनिद्रा दे ध्यान । स्वर्गही पूर्ण ॥१२॥
ध्यानानें आसनसिद्धि । लाभे स्फूतीं समृद्धी । सर्व इंद्रियतृप्तीही । कमी-पूतीं होई ॥१९॥
असाध्याला साध्य । अप्राप्ताला प्राप्य । करण्या पूर्ण सामर्थ्य । ध्यानाठायीं ॥४२०॥
ध्यानाविरहित । असे जें चित्त । तसेंच एकाग्रतारहित । जें मन राही ॥२१॥
असलें ज्ञानविहीन । मुक्तानंदा जीवन । मृगजलनदसमान । शुष्क राही ॥२२॥
ध्यानानें सर्वही ज्ञानकंद । तसाच परमानंद । पूर्णता लाभे मुक्तानंद । प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ॥२३॥
एकेका बिंदूनें । सागर बने । पैशापैशानें । रुपये हजार ॥२४॥
नित्यप्रती वृक्ष जो वाढे । बने फलफुलांचा आश्रय पुढें । मुक्तानंदा नित्य ध्यान जोडे । समाधानसागर ॥२५॥
करतां करतां ध्यान । अहंभाव जधीं हो लीन । जीवात्माही राही न । जाग्यावरी ॥२६॥
केवळ शुद्ध असा । नित्यानन्दमयसा । संवित परमात्मा कसा । मात्र राही ॥२७॥
तो शिव । तूं नसे काय । मी मांसमय । पागलपण हा सोड ॥२८॥
देवत्व देई ध्यान । आत्मप्राप्तीही, संपे आवागमन । मुक्तानंदा, असें ध्यान नित्यानंद ॥२९॥
मन राहतसे  होऊनि मस्ता । दिलखुश होई ध्यानांत । मुक्तानंदा, त्यापुढें होत । इंद्र्ही भिकारी ॥४३०॥
ध्यान शांतीचा मंत्र । ध्यान फळे शांतींत । ध्यान शांतीचें दैवत । मानवा प्राप्त कर शान्ती ॥३१॥
शान्तीविना कसलें जीवन । सुखही कोठलें शांतीवीण । मुक्तानंदा प्राप्त करी ध्यान । शान्ती प्राप्त तेणें ॥३२॥
स्त्री म्हणजे देह केवळ । पुरुषही देहच असेल । मी देह सदा जपशील । परी असें करूं नको ॥३३॥
देहासक्त नर । मूढ होकर । सोऽहम् न जपणार । आत्मानंदीं डुबून ॥३४॥
देहाहुनि तूं वेगळा । परमानन्दमय  सगळा । परतर शिव तूं आगळा । शिवोऽहम् जप सर्व वेळा ॥३५॥
जप ज्याचा करी । तैसा बने खरोखरी । शिव शिव भजावा तरी । देहातें न भज ॥३६॥
राही सदा जप करून । फलदाता यज्ञ जप महान । असे मंत्रमय जीवन । महामंत्र जपी सदा ॥३७॥
सिद्धि जप,  सिद्धि जपत । ऐसें महादेव बोलत । राही श्रद्धा ठेवत । ह्या वचनावरी ॥३८॥
जप अपुला ऋषी अजी । म्हणे गिरिराजजी । श्रीगिरिघर नागरजी । जपा ना ॥३९॥
जपयोग असे । तेणें प्राप्त होतसे । मानव इच्छितसे । तें तें फळ ॥४०॥
सर्व जपा, जप । जप असे रामाचें रूप । होतो पुरा फलद्रूप । होऊनि फलदायी ॥४१॥
अजपाजप । सोऽहम् जप । निरन्तर जप । पापमुक्ती तेणें ॥४२॥
अजपाजपाचा । जप कर साचा । कृपाप्रसाद नित्यानंदांचा । पावशील ॥४३॥
अंतरंगीं एकान्त वृत्तींत । पातिव्रत्य चित्तांत । राही जप करीत । सदैव असा तूं ॥४४॥
जपा करूनि निरन्तर । योगीजन होती ब्रह्माकार । जप कर, जप कर । म्हणुनि निरन्तर ॥४५॥
आपुल्या अन्तरीं । होइल स्वरूपदर्शन तरी । सोऽहम् जपतां नरनारी । शिवरूप बनती ॥४६॥
सहज जप जपुन । परमेश्वरप्रेरणा होऊन । त्याला घे जाणुन । तूं असा रे ॥४७॥
सहज जपांत । सदा विराजत । भगवान नित्यानंद रहात । अरे साधका ॥४८॥
सहज जपताम प्राप्त होणार । सुखद मोक्षनगर । पद लाभे अजरामर । मुक्तानंदा सहज जप कर ॥४९॥
अक्षय होतां जप । जाणी तो  सहज जप । सकारानें बाह्मजप । अकार अंतरजप ॥५०॥
सकारानें अन्तर पलट । अकार जप बाहेरूनी  उलट । निरन्तर जपानें पापपुण्यीं सूट । सोऽहम् अजपाजप ॥५१॥
अरे मानवा ज्या स्थानीं । विश्वलय होवोनि । जाती भ्रम भेद सारे विरोनि । नाठविशी कसा तयाला ॥५२॥
अद्वय निरामय परमानन्दा । तेंची तवा रूप नामप्रद  । ऐसा जप सुखद ॥ कां नसे करत ॥५३॥
देहातें मी मी समजुनी । मरणशील दुःखी छोटा बनुनी । सफलता पूर्ण पावोनि । जरी असशी ॥५४॥
सोऽहम् सोऽहम् जपुनी । अजरा अमर सुखी शांत बनुनी । सफलता त्यांतुनी । कां न पावशी ॥५५॥
पवित्र रामनाम उच्चारण । सोडोनि देऊन । सत्यातें त्यागुन । जपही सोडुन ॥५६॥
सदा जपी असत्यातें । सोडुनि अशा जिव्हेतें । विषवेल कोणती असते । तीहुनि अधिक ॥५७॥
सर्वयोगतन्त्राचा आधार । कुण्डलिनी खरोखर । सर्वयोग प्राप्त होणार । कुंडलिनी जागतां ॥५८॥
अधिकार औषध देण्याचा । डॉक्टर असेल त्याचा । पंडित कायद्याचा । वकीलच असे कीं ॥५९॥
प्रोफेसर अधिकारी । विद्यार्जना वितरी । गुरु कुण्डलिनी प्रवाहित करी । तयाचेंच कार्य ॥४६०॥
जगद्‍व्यापिनी कुण्डलिनी। सर्वतन्त्राचें मूळ असोनि । अनुभवास न येवोनि । असे जर ॥६१॥
कृपा तुझ्यावरी । तिनें न केली जोंवरी । मुक्तानंदा अकारण गुरुवरी । कां रुसतोसी ॥६२॥
ज्ञानीला जी प्रकट । चिती ती उत्कट । पूर्णपणें अप्रकट । तुझ्यामध्यें ॥६३॥
मुक्तानंदा असें असोन । मी बुद्धिमान । असणें वल्गना ही करोन । शरमेची गोष्ट ॥६४॥
जिची जरूरत । हरिहरासीही पडत । सहाय्यता जिची घेट । ब्रह्मादि देखाल ॥६५॥
जिच्या कृपेनें योगी । शुष्कता त्यागी । बने सर्वांगीं । रसमय ॥६६॥
ती रसमय कुण्डलिनी । व्यवहारी  आम्हा लागोनि । जरूरत कशास म्हणोनि । जर म्हणूं लागूं ॥६७॥
मुक्तानंदा असें । बोलणारे कसे । बुद्धिहीन  होतसे । नव्हे का ॥६८॥
शरीरा संगठित । वृद्धा ते जवान । धातूला बलपूर्ण । करोनि ॥६९॥
अमरतेची । अनुभूती करण्याची । कामगिरी कुण्डलिनीची । खरोखरी ॥४७०॥
षड्‍कर्म फळवुन । प्राणापाना करी गतिमान । कुम्भकातें देऊन । ऊर्ध्व स्थिती ॥७१॥
आत्म्यामधें रमण । करवीणें पूर्ण । कार्य हें संपूर्ण । कुण्डलिनीचेंच ॥७२॥
चतुर्योग करकरवुनि । देहेंद्रियांना स्थिर करोनी । तैसेंच एकाग्र करोनि । मनालाही ॥७३॥
परमानन्दमय । बनण्याची करी सोय । हें सारें कार्य । कुण्डलिनीचें ॥७४॥
षड्‍चक्रातें भेदोनि । ग्रन्थित्रय छेदोनि । धुवुनि टाकोनि । मलत्रय ॥७५॥
त्रिकुटीवरी । प्रभावित करी । कुण्डलिनीची न्यारी । करामत सारी ॥७६॥
अवस्थात्रयीच्या वर । पंचकोषाच्या पार । त्रिगुणातीत खरोखर । होवोनि ॥७७॥
सहज संवीदाचें जाण । जें असे स्फुरण । तें सारें कार्य प्रकरण । कुण्डलिनीचेंच ॥७८॥
सहस्त्रारामाजी । कोटी सूर्य तेजी । अनुभूति त्याची जी । करवुनी देई ॥७९॥
महाचैतन्यमण्डालांत । डोलायमान करवीत । कुण्डलिनी हो प्रभावीत । कार्य करी  ॥४८०॥
अतंरबाह्म मध्यरहित । शून्य इदम् अयम् विहित । बोलणें ऐकणें विना होत । सहजासहजी ॥८१॥
जो असे जसा । त्यासी घडवी तसा । मुक्तानंदा सारा असा । कुण्डलिनीचा प्रभाव ॥८२॥
प्रणवरूपी कुण्डलिनी । पूर्णानन्द कारिणी । नरनारीमयी विद्यायोगिनी । योगेश्वरीही ॥८३॥
सर्वश्री कुंडलिनी । योगाग्निमयी अग्नी । असे माया भक्षिणी । तशीच ॥८४॥
विद्या रक्षिणी । पूर्णेश्वरी असोनी । अन्तर कार्यरूपिणी । अशी असे कीं ॥८५॥
होतां कुण्डलिनी कृपजागृती । क्रिया अपसुख होंऊ लागती । पापतापनाशाची निवृत्ती ॥८६॥
 परमानन्द उपजे । अंतरबाह्य क्रिया । राजहठभक्ती मंत्रयोग क्रिया । रसमय जीवनाची प्रक्रिया । हो तेणें ॥८७॥
दिव्य ज्योतीचा उदय । मधुर नादमय । मुक्तानंदा जीवन हो अमृतमय । षड्‍रसपानानें ॥८८॥
कुण्डलिनीचा भावावेश । शिवशक्तिचा समावेश । ग्रुरुकृपेंने ब्रह्मप्रवेश । मुक्तानंदा हा साक्षात्कार ॥८९॥
दिव्य कुंडलिनी । त्रिकुटी भेदोनी । गतिमान होवोनी । जाई सहस्त्रारांत ॥४९०॥
कुण्डलिनी,शक्ति, । अन्तर विकास, गुरुकृपा ती । मुक्तानंदा सारे असती । समानार्थी ॥९१॥
जगत्‍ जनता चितीमय । चितीमय विश्व, लोकसमुदाय । मुक्तानंदा मारें  कांहीं होय । ही चितीही ॥९२॥
प्राणापान होते चिती । चित्तानें चिन्तन करवी ती । मुक्तानन्दा, जीवत्वही चिती । न अन्य कांहीं ॥९३॥
अखिल मा योगमयी । कुण्डलिनी मंत्रमयी । मंत्रस्वरूप होई । जी तेणें ॥९४॥
श्रीगुरुप्रसाद मंत्रानें । विकास पावे तत्परतेनें । विकसीत म्हणजे उल्लसीतपणें । ती असे कीं ॥९५॥
श्री भगवती । मंतमयी कुंडलिनी जागृती । उल्लसीत होण्याची प्रवृत्ती । दोन्ही एकच  ॥९६॥
मंत्र,  गुरु, कुंडलिनी, चिती । वस्तुतः असती । चिदविलासिनी शक्ति । पारमेंश्वरी ॥९७॥
मानव निवासी । प्रेम अशी । सर्वांहुली महानशी । संपदा होय ॥९८॥
भगवन्त-रूप । प्रेमस्वरूप । प्रेमस्वरूप । प्रेम गुरुस्वभावानुरूप । गुण महान ॥९९॥
करी प्रेमानें । भजन, पूजणें । ध्यान करणें । तेंही प्रेमानें ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP