ज्ञानेश्वरी अध्याय १६

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १६ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय सोळावा ।

दैवासुरसम्पद्विभागयोगः ।

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥१॥

जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥२॥

जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥३॥

लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥४॥

शब्दाचिया आसकडीं । भेद नदीच्या दोहीं थडीं । आरडाते विरहवेडीं । बुद्धिबोधु ॥५॥

तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान । भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा ॥६॥

जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥७॥

जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ॥८॥

जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरीं स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ तें ॥९॥

जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया । लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं ॥१०॥

ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ॥११॥

म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागती ॥१२॥

किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि ॥१३॥

जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥१४॥

न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी । काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी ॥१५॥

तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥१६॥

तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥१७॥

देवाचें महिमान पाहोनियां । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाईजे कां ॥१८॥

जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ॥१९॥

तया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं । सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे ॥२०॥

तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें । हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा ॥२१॥

परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया ॥२२॥

तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥२३॥

बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे ? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥२४॥

हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें । तें गंगा काय म्हणितलें । परतें सर ? ॥२५॥

जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं ? ॥२६॥

कीं आंधारें खतेलें अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणें तयातें पऱ्हा सर । म्हणितलें काई ? ॥२७॥

तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे । तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी ॥२८॥

जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी । जें उपसाहिलें तयासी । तें आम्हांही करीं ॥२९॥

परी मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलों अपराधु न गणीं । भलतें करीं परी अर्धधणीं । नुठी कदा ॥३०॥

मियां गीता येणें नांवें । तुझें पसायामृत सुहावें । वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलों दैवें ॥३१॥

माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प । तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ॥३२॥

पुण्यें पोशिलीं असाधरणें । तियें तुझें गुण वानणें । देऊनि मज उत्तीर्णें । जालीं आजी ॥३३॥

जी जीवित्वाच्या आडवीं । आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥३४॥

जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हांजोगी । वानावया जाली ॥३५॥

पैं निर्धना घरीं वानिवसें । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ? ॥३६॥

कां अंधकाराचिया ठाया । दैवें सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥३७॥

जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥३८॥

तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थें तुवां शिरयाणी । फेडिली ते ॥३९॥

म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें । निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे ॥४०॥

तरी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥४१॥

जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा । सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ॥४२॥

आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥४३॥

पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष । दाविलें चोख । आत्मतत्त्व ॥४४॥

आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट । ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला ॥४५॥

म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं । आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ॥४६॥

एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥४७॥

त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥४८॥

ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें । तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें ॥४९॥

भरूनि प्रपंचाचा घोंटु । कीजे देखतांचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा ॥५०॥

येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो । हा सम्यक्ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ॥५१॥

ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें । आदरें तया ज्ञानातें । वोंवाळिलें जीवें ॥५२॥

आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरीं पुढें पुढें । रिगों लागें हें घडे । प्रेम ऐसें ॥५३॥

म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं । ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी । तंव योग क्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं ॥५४॥

म्हणौनि तेंचि सम्यक ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्न । घडेल केवीं ॥५५॥

कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये । तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं ॥५६॥

मग जाणतयां जें विरू । तयाचीं वाट वाहती करूं । ज्ञाना हित तेंचि विचारूं । सर्वभावें ॥५७॥

ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥५८॥

ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥५९॥

आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥६०॥

सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायीं उभारणी । केली होती ॥६१॥

तेथ साउमा घेयावया उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । तरी तयां प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे ॥६२॥

तया निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें । लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी ॥६३॥

परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाच्या हिताहितीं । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥६४॥

जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका ॥६५॥

जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं । संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे ॥६६॥

ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणें येकोपजीवीं । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥६७॥

श्री भगवानुवाच ।

अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः ।

दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥१॥

आतां तयाचि दैवगुणां । माजीं धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसें ॥६८॥

तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी । कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया ॥६९॥

तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणें येणें ॥७०॥

अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें । भयवार्ता देशें । दवडणें जें ॥७१॥

पाणी बुडऊं ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें । तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय ॥७२॥

अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें । सम्यक्ज्ञानाचें आघवें । धांवणें हें ॥७३॥

आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥७४॥

कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे ॥७५॥

नातरी वार्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली । माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी ॥७६॥

तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥७७॥

इंद्रियवर्गीं दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो कांहीं केलिया । नुठी चित्तीं ॥७८॥

गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनीं जेवीं ॥७९॥

तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥८०॥

आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं । जे आपुलिया ठाकी । हांवें भरे ॥८१॥

तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें या रीती । निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी ॥८२॥

कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली । हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी ॥८३॥

तैसे निर्विकल्पपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥८४॥

आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें । वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां ॥८५॥

पत्र पुष्प छाया । फळें मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥८६॥

तैसें मनौनि धनधान्यवरी । विद्यमानें आल्या अवसरीं । श्रांताचिये मनोहारीं । उपयोगा जाणें ॥८७॥

तयां नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन । हें असो आइक चिन्ह । दमाचें तें ॥८८॥

तरी विषयेंद्रियां मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसें तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥८९॥

तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी ॥९०॥

आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची ॥९१॥

श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें । वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया ॥९२॥

पैं दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें । यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक ॥९३॥

तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारीं अधिकारें । आपुलालेनि ॥९४॥

जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणें यथागम । विधी यजिजे ॥९५॥

जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी । कीं दोहींसही सरोभरी । निपजे यागु ॥९६॥

तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें । परी विषय विष फळाशेचें । न घापे माजीं ॥९७॥

आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वयें ॥९८॥

अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥९९॥

आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥१००॥

नातरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया । कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ ॥१०१॥

हें बहु असो आरिसा । आपणपें देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥१०२॥

तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥१०३॥

तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र । आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व ॥१०४॥

पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों ॥१०५॥

तरी दानें सर्वस्व देणें । वेंचणें तें व्यर्थ करणें । जैसे फळोनि स्वयें सुकणें । इंद्रावणी जेवीं ॥१०६॥

नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता ऱ्हासु । चंद्राचा जैसा ॥१०७॥

तैसा स्वरूपाचिया प्रसरा । लागीं प्राणेंद्रियशरीरां । आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥१०८॥

अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे । तरी जाण जेवीं दुधीं हंसें । सूदली चांचू ॥१०९॥

तैसें देहजीवाचिये मिळणीं । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणीं । जागवीजे ॥११०॥

पाहतां आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडें । सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें ॥१११॥

तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥११२॥

आतां बाळाच्या हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य । तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ॥११३॥

अहिंसा सत्यमक्रोध्स्त्यागः शान्तिरपैशुनम् ।

दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥२॥

आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरवाचामानसें । राहाटणें तें अहिंसे । रूप जाण ॥११४॥

आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ । कां तेज परी शीतळ । शशांकाचें ॥११५॥

शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु । ते वोखदु नाहीं मा घडू । उपमा कैंची ॥११६॥

तरी मऊपणें बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें ॥११७॥

तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह । श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ॥११८॥

ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें । जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ॥११९॥

किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झकऊं नेणे । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥१२०॥

एऱ्हवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळीं कीड । आगीचें करणें उघड । परी जळों तें साच ॥१२१॥

कानीं लागतां महूर । अर्थें विभांडी जिव्हार । तें वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां ॥१२२॥

परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊ जैसें पुष्प । तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय ॥१२३॥

तैसें श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणें जें अविकार । तें सत्य येथें ॥१२४॥

आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी । कां मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥१२५॥

त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी । वसंतींही अंबरीं । न होती फुलें ॥१२६॥

नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पें । कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेवीं ॥१२७॥

तेवींचि कुमारु क्रोधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें । तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया ॥१२८॥

परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ॥१२९॥

अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे । जाण ऐसें श्रीनिवासें । म्हणितलें तया ॥१३०॥

आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु । त्यजिजे जेवीं वटु । बीजत्यागें ॥१३१॥

कां त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र । कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ ॥१३२॥

नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें ॥१३३॥

तेवीं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडूनि पाहीं । सांडिजे अशेषही । संसारजात ॥१३४॥

तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥१३५॥

आतां शांतीचें लिंग । तें व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देईं ॥१३६॥

तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें । हारपें निरुतें । ते शांति पैं गा ॥१३७॥

जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपें निबिडु । आपणचि ॥१३८॥

मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥१३९॥

तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं । मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ॥१४०॥

आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥१४१॥

का चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥१४२॥

नाना बुडतयातें सकरुणु । न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेंचि जाणे ॥१४३॥

कीं माय वनीं पापियें । उघडी केली विपायें । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥१४४॥

तैसे अज्ञानप्रमादादिकीं । कां प्राक्तनहीन सदोखीं । निंदत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ॥१४५॥

तयां आंगीक आपुलें । देऊनियां भलें । विसरविजती सलें । सलतीं तियें ॥१४६॥

अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥१४७॥

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥१४८॥

तैसें आपुलेनि गुणें । पुढिलाचें उणें । फेडुनियां पाहणें । तयाकडे ॥१४९॥

वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं । न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं ॥१५०॥

वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये । तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ॥१५१॥

पैं उत्तमाचियासाठीं । नीच मानिजे किरीटी । हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे ॥१५२॥

अगा अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण । मोक्षमार्गींचें सुखासन । मुख्य हें गा ॥१५३॥

आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निववितां न कडसी । सानें थोर ॥१५४॥

तैसें दुःखिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें । उत्तमाधम नेणें । विवंचूं गा ॥१५५॥

पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें । परी जातें जीवित राखे । तृणाचेंहि ॥१५६॥

तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलिये कृपें । सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें । थोडेंचि गमे ॥१५७॥

निम्न भरलियाविणें । पाणी ढळोंचि नेणे । तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरें पां ॥१५८॥

पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे । तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि ॥१५९॥

कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये । तैसा परसुखें जाये । सुखावतु ॥१६०॥

किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं । तैसें दुःखितांचे सेलभागीं । जिणें जयाचें ॥१६१॥

तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभें ॥१६२॥

आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें । परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें ॥१६३॥

कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥१६४॥

हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥१६५॥

तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हें न रुचे । मनामाजीं ॥१६६॥

बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥१६७॥

आतां माशियां जैसें मोहळ । जळचरां जेवीं जळ । कां पक्षियां अंतराळ । मोकळें हें ॥१६८॥

नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें । कां वसंतीच्या स्पर्शें । मऊ मलयानिळु ॥१६९॥

डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी । तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥१७०॥

स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगें ॥१७१॥

तो आवडे तेवढा घेतां । विरुद्ध जरी न होतां । तरी उपमे येता । कापूर कीं ॥१७२॥

परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसें ॥१७३॥

काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥१७४॥

आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा । कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥१७५॥

नाना चांडाळ मंदिराशीं । अवचटें आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥१७६॥

क्षत्रिया रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें । कां वैधव्यें पाचारणें । महासतियेतें ॥१७७॥

रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ॥१७८॥

तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें । उपजों उपजों मरणें । नावानावा ॥१७९॥

तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें । वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें ॥१८०॥

हें बहु असो देहपणें । नामरूपासि येणें । नाहीं गा लाजिरवाणें । तयाहूनी ॥१८१॥

ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड ॥१८२॥

आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटे गती ॥१८३॥

कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥१८४॥

एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें । तें अचापल्य वर्में । येणें होय ॥१८५॥

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।

भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥३॥

आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥१८६॥

वोखटें मरणाऐसें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥१८७॥

तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धांवों आवडे पाणधी । शून्याचिये ॥१८८॥

न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें ॥१८९॥

ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक तें ॥१९०॥

आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें ॥१९१॥

आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥१९२॥

यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य कां होऊनि धीरु । उभा ठाके ॥१९३॥

आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवीं ॥१९४॥

तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेयां पांडवा । गिळुनि घाली ॥१९५॥

ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी । धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा ॥१९६॥

आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगें पीयूखें । तया कलशाचियासारिखें । शौच असें ॥१९७॥

जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥१९८॥

कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥१९९॥

कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥२००॥

तैसीं बांधिलीं सोडिता । बुडालीं काढिता । सांकडी फेडिता । आर्तांचिया ॥२०१॥

किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति । आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ॥२०२॥

वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं । संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ॥२०३॥

पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें ॥२०४॥

आणि गंगा शंभूचा माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था । तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें ॥२०५॥

तें हें पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों ॥२०६॥

एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय ॥२०७॥

नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥२०८॥

कीं गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥२०९॥

कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥२१०॥

उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें । दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची ॥२११॥

काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केलें दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥२१२॥

आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥२१३॥

पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥२१४॥

तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषींघोरीं । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥२१५॥

नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥२१६॥

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।

अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥४॥

तरी तयाचि असुरां । दोषांमाजीं जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥२१७॥

जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं । ते तीर्थचि परी पतनीं । कारण होय ॥२१८॥

कां विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटां । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥२१९॥

पैं आंगें बुडतां महापूरीं । जे वेगें काढी पैलतीरीं । ते नांवचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैसी ॥२२०॥

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥२२१॥

तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा । लागीं होय ॥२२२॥

म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥२२३॥

आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥२२४॥

कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा । कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥२२५॥

तृणाचेनि इंधनें । आगी धांवे गगनें । थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधु ॥२२६॥

तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें । एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ॥२२७॥

अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडें मूर्ख ॥२२८॥

किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं ॥२२९॥

आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु । जगीं एक तेजसु । सूर्युचि हा ॥२३०॥

जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणें निर्विवाद । जगा पढियें ॥२३१॥

म्हणौनि जग उत्साहें । यातें वानूं जाये । कीं तें आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे ॥२३२॥

म्हणे ईश्वरातें खायें । तया वेदा विष सूयें । गौरवामाजीं त्राये । भंगीत असे ॥२३३॥

पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेनें आपांपती । वैरी केला ॥२३४॥

तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे । बापातें म्हणे मज हे । सवती जाली ॥२३५॥

ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥२३६॥

आणि पुढिलांचें सुख । देखणियाचें होय मिख । चढे क्रोधाग्नीचें विख । मनोवृत्ती ॥२३७॥

शीतळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा ॥२३८॥

विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥२३९॥

जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट । दुधाचें काळकूट । होय व्याळीं ॥२४०॥

अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ॥२४१॥

तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें । तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥२४२॥

आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणें ते वृष्टी । इंगळांची ॥२४३॥

येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत । ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ॥२४४॥

तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण । आतां आइक खूण । अज्ञानाची ॥२४५॥

तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा । कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥२४६॥

आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । कां परिसा पाडु नेणें । सोनया लोहा ॥२४७॥

नातरी नानारसीं । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखों नेणें ॥२४८॥

कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखीं । तैसे कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें ॥२४९॥

हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ । देखे तें केवळ । मुखींचि घाली ॥२५०॥

तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥२५१॥

तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन । एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें ॥२५२॥

इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें ॥२५३॥

कां तिघा वन्हींच्या पांती । पाहतां थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करूं न पुरे ॥२५४॥

धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण । तया तिहींची दुणी जाण । साही दोष हे ॥२५५॥

इहीं साही दोषीं संपूर्णीं । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥२५६॥

परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । कां येती निंदकापासीं । अशेष पापें ॥२५७॥

मरणाराचें आंग । पडिघाती अवघेचि रोग । कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती ॥२५८॥

विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे ॥२५९॥

कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥२६०॥

मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे । तैं न निघे म्हणौनि बुडे । संसारीं तो ॥२६१॥

अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटीं । बैसणें घे ॥२६२॥

हें असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं । आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ॥२६३॥

ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं । सांगितलिया चिन्हीं । वेगळाल्या ॥२६४॥

दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।

मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥५॥

इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण ॥२६५॥

येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ॥२६६॥

परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें । काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे ॥२६७॥

हे आसुरी संपत्ति तया । बंधालागीं धनंजया । जो साही दोषां ययां । आश्रयो होय ॥२६८॥

तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥२६९॥

म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ॥२७०॥

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन दैव आसुर एव च ।

दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥६॥

आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥२७१॥

जैसें रात्रीच्या अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं । दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं ॥२७२॥

तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥२७३॥

तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं । मागील ग्रंथीं बरवी । सांगितली ॥२७४॥

आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी । अवधानाची दिठी । दे पां निकी ॥२७५॥

तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा ॥२७६॥

तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जंव एकाधें शरीर । माल्हातीना ॥२७७॥

मग आविष्कारला लांकुडें । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे ॥२७८॥

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥२७९॥

आतां तयाचि प्राणियां । रूप करूं धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदीं ॥२८०॥

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।

न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥७॥

तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचें मन ॥२८१॥

निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पैं ॥२८२॥

कां दिधलें मागुती येईल । कीं न ये हें पुढील । न पाहातां दे भांडवल । मूर्ख चोरां ॥२८३॥

तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं । आणि शौच ते स्वप्नीं । देखती ना ते ॥२८४॥

काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटों शके ॥२८५॥

परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया । पवित्रत्व जेवीं भांडिया । मद्याचिया ॥२८६॥

वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥२८७॥

जैसें चरणें शेळियेचें । कां धावणें वारियाचें । जाळणें आगीचें । भलतेउतें ॥२८८॥

तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येंसि कीर वैर । सदाचि तयां ॥२८९॥

जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥२९०॥

आपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे । तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें ॥२९१॥

ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटे पाहीं । आतां बोलती ते नवाई । सांगिजैल ॥२९२॥

एऱ्हवीं करेयाच्या ठायीं चांग । तें तयासि कैचें नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परीस ॥२९३॥

उधवणीचें जेवीं तोंड । उभळी धुंवाचे उभड । हें जाणिजे तेवीं उघड । सांगों ते बोल ॥२९४॥

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।

अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥८॥

तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥२९५॥

वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे । सन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये ॥२९६॥

ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें ॥२९७॥

यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसें प्रतिमालिंगीं । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमें ॥२९८॥

येथ आपुलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें । हें वांचोनि वेगळें । पुण्य आहे ? ॥२९९॥

ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळीं न टकें । ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप ॥३००॥

प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें । तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं ? ॥३०१॥

बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय । तरी मासयां कां न होय । निसंतान ? ॥३०२॥

आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं । मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी ॥३०३॥

तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाहीं संतती । तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले ? ॥३०४॥

चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें ? । वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय ? ॥३०५॥

म्हणौनि देवो गोसांवी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवीं । करी तो भोगी ॥३०६॥

परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि तें वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥३०७॥

येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं । तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे ॥३०८॥

म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो ॥३०९॥

याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में । मिळती तेथ जन्मे । आघवें जग ॥३१०॥

आणि जें जें अभिलाषें । स्वार्थालागीं हें पोषे । पाठीं परस्परद्वेषें । कामचि नाशी ॥३११॥

एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं । ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते ॥३१२॥

आतां असो हें किडाळ । बोली न करूं पघळ । सांगतांचि सफोल । होतसे वाचा ॥३१३॥

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।

प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥९॥

आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु ॥३१४॥

किंबहुना उघड । आंगी लाऊनियां पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं ॥३१५॥

ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥३१६॥

मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा ॥३१७॥

जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर । कां पडावें होय शरीर । तैं रोगा उदयो ॥३१८॥

उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टोद्देशें । जन्मती ते तैसे । लोकां आटूं ॥३१९॥

विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥३२०॥

आणि मागांपुढां जाळणें । वांचूनि आगी कांहीं नेणें । तैसें विरुद्धचि एक करणें । भलतेयां ॥३२१॥

परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमें जेणें । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥३२२॥

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।

मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥१०॥

तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे । तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥३२३॥

तया कामाचा वोलावा । जीवीं धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥३२४॥

मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं ॥३२५॥

आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्याऐसा सावावो । मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ॥३२६॥

जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥३२७॥

मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती । दाहीं दिशीं पसरिती । स्पृहाजाळ ॥३२८॥

ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ॥३२९॥

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।

कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥११॥

याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥३३०॥

पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये सानें गगन । जें पाहातां त्रिभुवन । अणुही नोहे ॥३३१॥

ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी ॥३३२॥

तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवीं सूनि असार । विषयादिक ॥३३३॥

स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें । सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ॥३३४॥

कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें । नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला ॥३३५॥

मग तयाचि स्त्रीभोगा । लागीं पाताळ स्वर्गा । धांवती दिग्विभागा । परौतेही ॥३३६॥

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरयाणाः ।

ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान ॥१२॥

आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा । तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा ॥३३७॥

वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे ॥३३८॥

आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं ॥३३९॥

दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरीयां जैसा पांडवा । अहोरात्रींही विसांवा । भेटेचिना ॥३४०॥

तैसें उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमें । न माती केंही ॥३४१॥

तेवींचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थें कीं ना ? ॥३४२॥

म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पैं गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥३४३॥

एकातें साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वें हरिती । एकालागीं उभारिती । अपाययंत्रें ॥३४४॥

पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ॥३४५॥

ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करिती ॥३४६॥

परप्राणघातें । मेळविती वित्तें । मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥३४७॥

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।

इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥१३॥

म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ? ॥३४८॥

ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे । सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं ॥३४९॥

हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें । लाभा घेईन उरलें । चराचर हें ॥३५०॥

ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥३५१॥

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।

ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी ॥१४॥

हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ॥३५२॥

मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं । किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ॥३५३॥

मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । मातें पाहुनि ॥३५४॥

मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे । कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥३५५॥

तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥३५६॥

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।

यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥१५॥

कुबेरु आथिला होये । परी तो नेणें माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥३५७॥

माझिया कुळाचा उजाळू । कां जातिगोतांचा मेळू । पाहतां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥३५८॥

म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे । नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ॥३५९॥

आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥३६०॥

मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती । तयां देईन मागती । ते ते वस्तु ॥३६१॥

माजिरा अन्नपानीं । प्रमदांच्या आलिंगनीं । मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु ॥३६२॥

काय बहु सांगों ऐसें । ते आसुरीप्रकृती पिसें । तुरंबिती असोसें । गगनौळें तियें ॥३६३॥

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।

प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥१६॥

ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे । चावळती संकल्पें । जाण ते तैसें ॥३६४॥

अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या ॥३६५॥

अनियम आषाढ मेघ । कां समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥३६६॥

मग पैं कामनाचि तया । जीवीं जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळें जैसीं ॥३६७॥

कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जीवीं तैसें सर्वथा । कुटके जाले ॥३६८॥

तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणीं । वाढोंचि लागे ॥३६९॥

आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥३७०॥

पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे । तंव जितांचि आघवे । येती नरकां ॥३७१॥

म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥३७२॥

जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेलीं सागर । उतताती ॥३७३॥

जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ॥३७४॥

ऐसे नरकाचिये शेले । भागीं जे जे जन्मले । तेही देखों भुलले । यजिती यागीं ॥३७५॥

एऱ्हवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी ॥३७६॥

वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसियां । अहेवपणें ॥३७७॥

आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।

यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥१७॥

तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण । फुगती असाधारण । गर्वें तेणें ॥३७८॥

मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । कां उधवले आकाशें । शिळाराशी ॥३७९॥

तैसें आपुलिये बरवे । आपणचि रिझतां जीवें । तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच ॥३८०॥

वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवतें केलें ॥३८१॥

जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसीं । न करिती गा ? ॥३८२॥

म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें । यागाचींही टवाळें । आदरिती ॥३८३॥

ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा ॥३८४॥

देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें । ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा ? ॥३८५॥

पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥३८६॥

तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें । नागविती आघवें । अहेरावारी ॥३८७॥

ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥३८८॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः ।

मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥१८॥

मग पुढां भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगीं फोकारिती आण । वावो वावो ॥३८९॥

तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥३९०॥

तैसें मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥३९१॥

मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥३९२॥

ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥३९३॥

मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे । तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥३९४॥

तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥३९५॥

तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला । या दोहींचा मेळु जाला । जयांच्या ठायीं ॥३९६॥

ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियांते वीरेशा । न साधती गा ? ॥३९७॥

पहिलें तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेंचु करिती अभिचारा । लागोनियां ॥३९८॥

तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥३९९॥

आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं । तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे ॥४००॥

आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें । तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥४०१॥

सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥४०२॥

कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें । निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं ॥४०३॥

तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें । कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ॥४०४॥

तानहं द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान ।

क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥१९॥

ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां ॥४०५॥

तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं ॥४०६॥

जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा । ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें ॥४०७॥

मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं ॥४०८॥

तेथ क्षुधादुःखें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें । मरमरों मागुतें । होतचि असती ॥४०९॥

कां आपुला गरळजाळीं । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला ॥४१०॥

परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें । विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी ॥४११॥

ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तयां ॥४१२॥

तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हें पहिलें पेणें । तें पावोनि येरें दारुणें । न होती दुःखें ॥४१३॥

आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।

मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥२०॥

हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारीं । जोडिली तिहीं ॥४१४॥

पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥४१५॥

तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें । जेथे गेलें आंधारें । काळवंडैजे ॥४१६॥

जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणें जेणें ॥४१७॥

मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे । जयाचेनि नांवें सळे । महाभय ॥४१८॥

पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥४१९॥

ऐसें विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । तें ते होती भोगूनियां । तामसा योनी ॥४२०॥

अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे । कटारे मूर्खीं केवढे । जोडिले निरय ॥४२१॥

कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधलें घोर । पतन ऐसें ॥४२२॥

म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥४२३॥

आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं । ते त्यजावे हें काई । म्हणों कीर ? ॥४२४॥

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥२१॥

परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब । थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ॥४२५॥

सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥४२६॥

कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥४२७॥

ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरीं । जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना ॥४२८॥

अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥४२९॥

काय बहु बोलों सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥४३०॥

या कामक्रोधलोभां । माजीं जीवें जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥४३१॥

म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावींचि गा वोखटी । आघवा विषयीं ॥४३२॥

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।

आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥२२॥

धर्मादिकां चौंही आंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु । करावी जैं संघातु । सांडील हा ॥४३३॥

हे तिन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥४३४॥

जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणें न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥४३५॥

पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचें ॥४३६॥

इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसीं । ययांचा गा ॥४३७॥

जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे । तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ॥४३८॥

त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ॥४३९॥

तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं । संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ॥४४०॥

मग सत्संगें प्रबळें । सच्छास्त्राचेनि बळें । जन्ममृत्यूचीं निमाळें । निस्तरें रानें ॥४४१॥

ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें । तें तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें ॥४४२॥

तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तयें खेवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥४४३॥

ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥४४४॥

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत ।

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥२३॥

ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ॥४४५॥

जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें ॥४४६॥

न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें ॥४४७॥

कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचें असोस । वळघला रान ॥४४८॥

तो सुटकेचिया वाहिणीं । मग पिवों न लाहे पाणी । स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया ॥४४९॥

आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं ॥४५०॥

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥४५१॥

तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें । तंव तोचि आणिकीकडे । मरणें नेला ॥४५२॥

एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥४५३॥

म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेवूं पाहे सळें । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥४५४॥

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।

ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥२४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

याकारणें पैं बापा । जया आथी आपुली कृपा । तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥४५५॥

पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते ॥४५६॥

नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना । माजीं पैसे ॥४५७॥

हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरें जेवीं दिवा । पुढां कीजे ॥४५८॥

तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणें श्रुतिस्मृति माथां । बैसणें घापे ॥४५९॥

शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें । जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥४६०॥

ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा ? ॥४६१॥

पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥४६२॥

म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी । तंव हे कोणें न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसीं ॥४६३॥

जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें । जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि ॥४६४॥

आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें अपैसें । म्हणौनि आनारिसें । करूं नये ॥४६५॥

कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं । अकृत्य तें कुडें लोकीं । वाळावें गा ॥४६६॥

मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपुलेनि आंगें । आचरोनि आदरें चांगें । सारावें गा ॥४६७॥

जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥४६८॥

एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥४६९॥

इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥४७०॥

संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥४७१॥

तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥४७२॥

म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥४७३॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP