१६२१
( चाल-देव पावला रे० )
देखिला रे देव देखिला रे । ज्ञाने भक्तीचा रस चाखिला रे ॥ध्रु०॥
विश्वामध्यें विस्तारला । भावें भक्तांसी पावला । भक्तीलागीं लांचावला । भक्तां पद देतसे ॥१॥
जगामध्यें आहे ईश । म्हणोनि बोलिजे जगदीश । जयाचेनि सुंदर वेप । नाना रूपें शोभती ॥२॥
जनीं श्रोता वक्ता होतो । तोचि देखतो चाखतो । वृत्ती सकळांच्या राखतो । मनीं मन घालुनी ॥३॥
ज्ञानी ज्ञानें विवरला । एक त्नैलोकीं पुरला । धन्य धन्या तो एकला । नाना देह चालवी ॥४॥
सर्व करितो दिसेना । एके ठायीं हि वसेना । जवळीच निरसेना । दास म्हणे तो गे तो ॥५॥

१६२२
( राग-मैरव; ताल-धुमाळी ) ऐसा कोण वो साजणी । आकाशापरता धणी । पहावया थोर मनीं । सुख वाटे ॥ध्रु०॥
सकळ देवता हे । ऐलीकडे राहे । भूतांपरतें आहे । रूप त्याचें ॥१॥
रामदास म्हणे थोर । उगे उठे कां विचार । तेणें सुख पारंपार । सज्जनासी ॥२॥

१६२३
( राग-असावरी; ताल-दीपचंदी )
निवळ निवळ निवळ । बहू निवळ । असत चि दिसेना । भासत भासत भासत । सर्व विलसत । विलसोनि वसेना ॥ध्रु०॥
नव्हे उष्ण ना चांदिणें । रे तयाविण । सर्व कांहीं कळना ॥ नव्हे वन्ही ना सीतळ । सृष्टीं संचलें । अणुमात्न चळेना ॥१॥
तेणें सकळ जन चालती । बहु बोलती । तयांमध्यें चि आहे ॥ चपळ चपळ चपळ । बहु अचपळ । तया लक्षुनि पाहे ॥२॥
दास म्हणे भवछेदक । सुखदायक । तया देव म्हणावें  ॥ यहलोक परलोक पावन । दुःखमोचन । तेणेंविण सिणावें ॥३॥

१६२४
( राग-कानडा; ताल-दादरा )
माझें अंतर तो हरी कैसा । दाऊं रे तो हरि कैसा ॥ध्रु०॥
सकळ चळत कळताहे । निवळ कळत कळताहे ॥१॥
निवळ निवळ मन सुमन सुमन । सुकताहे मोहन हरी ॥२॥
लपत लपत संतसंगें कळत हित । अगणित गणित नसे चंचळ हरी ॥३॥
दास म्हणे वास सकळ भुवनी । ध्यास धरितां न घरे सुंदर हरी ॥४॥

१६२५
( राग व ताल-वरील )
सकळ प्राणनाथा रे । धन्य लीळा प्रणिपाता रे ॥ध्रु०॥
समजत जावें उमजत जावें । व्यर्थ चि आप्त परावें ॥१॥
रामें सुंदर धामें । सुंदर राम रहिम विराम ॥२॥
दासा म्हणे राम लपत गेला । राम जयां सांपडला ॥३॥

१६२६
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी;  चाल-अरे नर० )
सकळ तो जाणतो हरी । सकळ कळा विवरी ॥ध्रु०॥
येक भोगी येक सवेंचि त्यागी । तुन्य अनेक घरी ॥१॥
वर्तत लोकीं येकीं अनेकीं । धन्य कळा कुसरी ॥२॥
गुण सगुण निर्गुण खूण । पावन दास करी ॥३॥

१६२७
( राग-सारंग; ताल-धुमाळी ) हरी अनुमानेना । देह देव घडेना ॥ध्रु०॥
नाना निश्चये संशयकारी । हित घडेल घडेना ॥१॥
बहुतेका हे जन बहुचक जाले । प्रत्यय येकचि येना ॥२॥
दास म्हणे हे गचगच जाली । काशास कांहीं मिळेना ॥३॥

१६२८
( राग-केदार: ताल-धुमाळी )
जेणें ध्यावें तें ध्यान चि जालें  । मीपण तूंपण निवडोनी गेलें ॥ध्रु०॥
भवमयें आकळलेंसें कळलें । अंतर तें निवळलें वळलें ॥१॥
विघ्र अनावर अवचट टळलें । दास म्हणे तें सुकृत फळलें ॥२॥

१६२९
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
नरनारी रे देह्धारी । येक चित्त विकारी रे ॥ध्रु०॥
जग बोले रे जग चाले । गुणीं अंतरंग तें धालें ॥१॥
करी देवो रे घरी देवो । नेणतयाचा भावो रे ॥२॥
अनुमानें रे गुन रानें । घुंडीत जाती पुराणें ॥३॥
उमजावें रे समजावें । दास म्हणे मग जावें ॥४॥

१६३०
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-लावोनियां लोचन ० )
नयनीं दिसेंज तें नव्हें । नाकळे मनाचे धांवे । ऐसें तें स्वभावें स्वतःसिद्ध रे ॥ध्रु०॥
पाहणें सांडूनि पाहे । लाहणें नसोनि लाहे । निःसंग होऊनि राहे तोचि रे ॥१॥
सांगतां नये तें होय । दावितां न ये ते सोय । अनुमवेंविण काय सांगों रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । जाणावे जीवींचे खुणे । सांगतां होतसे उणें द्वैत रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP