आत्मसुख - अभंग २०१ ते २१०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२०१
लाज सांडोनियां जालों शरणागत । ऐसियाचा अंत पाहसी झणीं ॥१॥
गुण दोष माझे मनीं गा न धर । पतितपावन जरी म्हणविसी ॥२॥
पडावें परदेसीं हे लाज कोणासी । जरी तूं न पावसी पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणीं मायबापा ॥२॥
नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणी मायबापा ॥४॥
२०२
तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये ।
पूजन करितां कर नाराध्ये । ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥धु०॥
नरहरि या नामें उदंड । केव्हांही नसावें रिकामें तोंड ।
खांदीं सतत करंडा वाहे । मस्तकीं अखंड निर्माल्य राहे ।
नेत्रीं आनंदजळ वाहे । यामध्यें देवा झणें कांहीं उणें होय ॥१॥
तुझेनि प्रसादें जठर पोसिलें । चरणोदकें तृष्णाहरण केलेंज ।
नामें नृत्य करितां मन हें निवालें । दंडवत घालितां श्रम हरले ॥२॥
गता शयनीं विसर न द्यावा श्रीरामा । यापरी निश्चित परमात्मा ।
तूं आलिया निवारिसी श्रमा । ऐसें  केशिराजा विनवितो नामा ॥३॥

२०३
तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥
तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥
मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥
नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥

२०४
देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥
धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥
तुजविण ओस दिसती दाही दिशा । आणि धांव जगदीशा मजसाठीं ॥३॥
नामा म्हणे काय बैसलों निवांत । धांवतो अनंत भक्तांसाठीं ॥४॥

२०५
भागलासि देवा धांव धांवणिया । दाखविसी पायां पांडुरंगा ॥१॥
गजेंद्र गणिका तुम्हां श्रमविलें । मी काय उगलें परदेशी ॥२॥
सोळा सहस्त्र आणि गोपी त्या उद्धरती । माझी कींव चित्तीं कां वा नये ॥३॥
नामा म्हणे आम्हां पुरे तुझा संग । वारंवार मगा वारी कोण ॥४॥

२०६
केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥
संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥
जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥
नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥

२०७
ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन ॥१॥
सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी । आणि  अंतरीं नाठवावें ॥२॥
आणिकासी गुज न बोले वदन । वदो नारायन सर्वकाळ ॥३॥
रामकृष्ण माझ्या शेषाचें स्तवन । शास्त्रेंहि पुराणें भाट ज्यांचीं ॥४॥
नामा म्हणे आतां ऐसें करी देवा । ह्रदयीं केशवा राहे माझ्या ॥५॥

२०८
काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥  
थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥
सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥

२०९
कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥
जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥
तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥
नामा म्हणे सत्ता करिती निकत । भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥

२१०
शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी ॥१॥
सांगणें नलगे सांगणें नलगे । सांगणें नलगे मायबाप ॥२॥
सांगतां समर्थ सवेंचि विसरे । त्याच्या अभ्यंतरीं नव्हे बोल ॥३॥
नामा म्हणे तैसा न होसी शहाणा । अठराहि पुराणें वेडावलीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP