आत्मसुख - अभंग १७१ ते १८०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१७१
ब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहुनि चरण गोड तुझे ॥१॥
तें जीवें न सोडी अगा पंढरीनाथा । जाणसी तत्त्वतां ह्रदय माझें ॥२॥
परात्पर वस्तु ध्याईजे अपारापार । त्यांचे हें जिव्हार पाय तुझे ॥३॥
सच्चिदानंदघन जेथें हरपे  मन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥
नामा म्हणे तुझें पाउल हें सार । तें माझें माहेर विटेवरी ॥५॥

१७२
तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥
मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥
वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥
सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥
तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें  मन होईल भ्रान्त ॥५॥
नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥

१७३
देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥
फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥
तुज नलगे देणें मज नलगे मागणें । असेन अनुसंधानें चरणाचेनि ॥३॥
नामा म्हणे केशवा तूं सर्व जाणता । समयींच्या उचिता चुकों नको ॥४॥

१७४
तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं ॥१॥
बोल  बोले एक मनीं असे आणिक । तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥
तुजविणा सुख आणिकांचें मानी । तरी मज जननीज दोनी देवा ॥३॥
नामा म्हणे माझा सत्याचा साहाकारी । आस मी न करी आणिकांची ॥४॥

१७५
पाहुनि न दिसे लौकिक वेव्हारीं । ऐसा तूं अंतरीं लावीं मज ॥१॥
परि तुझ्या चरणीं  माझें अनुसंधान । तरी प्रेम पावन देईं देवा ॥२॥
मनाचिये वृत्तीं अखंड तूं राहोनी । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥
नामा म्हणे ऐसे पावसी तूं मातें । तरी मी जीवें तूतें व विसंबें ॥४॥

१७६
तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥
आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥
देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥

१७७
आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥
ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥
आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥

१७८
विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥
नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥
कामक्रोधलोभ वैरि पाठी लागियेती । झणीं त्याचे हाति देसी मज ॥३॥
नामा म्हणे होसि अनाथ कोंवसा । ब्रिदें जगदिशा वर्णिताती ॥४॥

१७९
अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥
तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥
राखीन मी नांव  तुझें सर्वभावें । चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥
जरी दैवहीन म्हणसी मजला । तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥

१८०
देह जावो हेंचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥१॥
क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥२॥
नाचूं वैष्णवांचे मेळीं । हांक विठ्ठल आरोळी ॥३॥
नामा म्हणे विठोबासी । जें तें घडो या देहासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP