आत्मसुख - अभंग ९१ ते १००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


९१
नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥
आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥
साधक लोकांसी हेंचि पैं  साधन । ब्रह्म सनातन वश होय ॥३॥
नामा म्हणे सर्व सारांचें हें सार । जेणें निरंतर निरंतर सुख वाटे ॥४॥

९२
जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥
काय उतराई होउं तुज देवा । उदारा केशवा मायवापा ॥२॥
अंतरीं देऊन प्रेमाचा जिव्हाळ । मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥
नामा म्हणे वेदां न येसी अनुमाना । वर्णितां पुराणां पडियेलें ठक ॥४॥

९३
मन नेणेंज तुझ्या मनाचा विश्वास । येर तो हव्यास गोड वाटे ॥१॥
तुझें प्रेम नेणें तुझें प्रेम नेणें । सांग काय करणें केशिराजा ॥२॥
मज घातलें संसारीं पीडिलों कर्मभांडारीं । कृपा नरहरी करी मज ॥३॥
नामा म्हणे मी तों ठायींचाचि अपराधी । केशवा कांहीं बुद्धि सांग मज ॥४॥

९४
येइना अझुनी श्रीकृष्ण सदना । गोंवळा रक्षणा मायबाप ॥१॥
लावुनि  आशा फिरविशी दिशा । प्रेमभाव कैसा दावीं आतां ॥२॥
बाळेभोळे जन करिती विनंती । मोकलिसी अंतीं म्हणे नामा ॥३॥

९५
अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥
प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥
येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं । उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥
नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण । ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥

९६
विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥
मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥
तुजविण जिवलग दुजें कोण होईल । ते माझे साहिल जड भारी ॥३॥
तूं माझी माउली मी वो तुझा वच्छ । परतों परतों वास पाहे तुझी ॥४॥
माया मोहें कैसी न विसंबे सर्वथा । अंतरींची व्यथा कोण जाणे ॥५॥
नामा म्हणे विठ्ठ्ले कां गे रुसलिसी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥

९७
डोळुले  सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥१॥
तूं माझी जननी सखिये सांगातिणी । विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरलीसी ॥३॥
तूं माझी कुरंगिणी मी  तुझें पाडस । गुंतलें भवपाश सोडी माझा ॥४॥
मी तुझें वच्छ तूं माझी गाउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥५॥
नामा म्हणे माझी पुरवावी आस । पाजी तान्हुल्यास प्रेमपान्हा ॥६॥

९८
येई गे विठ्ठले अनाथाचे नाथे । माझे कुळदैवते पंढरीचे ॥१॥
पंच प्राणांचा  उजळोनि दिपक । सुंदर श्रीमुख ओवाळीन ॥२॥
मनाचा प्रसाद तुजलागीं केला । रंगभोग आपुला घेऊनि राहे ॥३॥
आनंदाचा भोग घालिल आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्य नांवें ॥४॥
आपुलें म्हण्वावें सनाथ करावें । भावें संचारावें ह्रदयांत ॥५॥
नामा  म्हणे माझे पुरवी मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा ॥६॥

९९
कृपावंत समर्थ म्हणूनि करी आर्त । येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥
मज कां विसंबली विठ्ठल माउली । तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥
तूं माझें जीवन नाम जनार्दन । ह्रदयीं भरी पूर्ण प्रेमरस ॥३॥
अमृताच्या करेंज कांसवीच्या भरें । कुरवाळीं त्वरें देह माझा ॥४॥
पूर्ण पान्हा देई निववीं ह्रदयीं । येई वो कान्हाई सांवळिये ॥५॥
नामा म्हणे पावे जीवा शीण न साहे । वेगीं लवलाहे पाजी पान्हा ॥६॥

१००
तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥
तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मत्र पांडुरंगे ॥४॥
कासवीची दृष्टी सदा बाळावरी । तैसी दया करीं पांडुरंगे ॥५॥
नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळिसी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP