श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग ४१ ते ५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४१
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥
मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥
बाप जगताचा स्वामी । आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥
नामा थोराचें लेंकरूं । छंड त्याचा अनिवारु ॥४॥
छंद नाम्याचा पुरविण्या । देव वेंची प्रेमनाण्या ॥५॥
हाटीं उदमीं भाविक । विठुराजा त्या ग्राहिक ॥६॥

४२
गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका ॥१॥
नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठीं । घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥
संतप्रेम भेटी देव गुज गोष्टी । जाणत्याच्या पोटीं सर्व वसे ॥३॥
करी पांडुरंग येई त्याच्या मना । निमित्ताकारणा भक्त शोधी ॥४॥

४३
ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे ॥१॥
धन्य ती आळंदी धन्य विष्णुदास । धन्य हा दिवस देव भेटे ॥२॥
ज्ञानदेवा आलें वैकुंठीचें रूप । पोचतां निरोप पुंडलिका ॥३॥
पुंडलिकें तेव्हां गरुड पूजियेला । ज्ञाना बैसविला विमानांत ॥४॥
पुढें तो गरुड मागें ये विमान । तुक्मिणी दुरोन दावी देवा ॥५॥

४४
आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥
शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥
पहाती नवल भक्त ते प्रेमळ । विश्चय निश्चय निढळ आहे ज्यांचा ॥३॥
देव म्हणे नाम्या घेई भेटीसुखा । ज्ञानदेव सखा उभा येथें ॥४॥

४५
ज्ञानदेवा पहातां डोळां । नामदेवा हर्ष जाला ॥१॥
घट्ट धरियेले पाय । तूं तो जाला सद्‌गुरुराय ॥२॥
नको करुं रे अव्हेर । मज धरूं नको दूर ॥३॥
सदा आठवत मना । तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥

४६
नाथा नको रे अंतरूं । तुझ्या कांसेचें वासरूं ॥१॥
कळा दुभती तूं गाय । तुझा वियोग असह्य ॥२॥
देह भोगितां प्राक्तन । मना ठेवी तयाधीन ॥३॥
ज्ञानदेवीं ही समाधी । जडो मनोवृत्ति अवघी ॥४॥
नामा भेटे ज्ञानदेवा । जनां प्रसाद मिळावा ॥५॥

४७
हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू ॥१॥
हरिदासांमाजी होसी तूं आगळा । प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तूं विठोचा लडिवाळ । नामया तूं कृपाळ आम्हांवरी ॥३॥
४८
अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान हा पाही । आली मुक्ताबाई चांगदेव ॥२॥
खेचर विसोबा असंद सुदामा॥ चोखा पुरुषोत्तमा आला असे ॥३॥
मैराळ जनक वत्सरा तो नारा । विठा सारंगधरा आला असे ॥४॥
परसा भागवता सांवता नरहरी । चोख मेळा द्वारीं भानुदास ॥५॥
नटनाटयकुसरी कान्होपात्रा द्वारीं । चवरें विंजणें हरी जाणविती ॥६॥
माचंगा अनंता नरसीपुरीं होता । तो हा पंढरीनाथा आला असे ॥७॥
मच्छिंद्र गोरक्ष चरपटी चौरंगीं । गोपीचंद योगी आला असे ॥८॥
इडा ती पिंगळा सूक्ष्म ती आवळा । षड्रस गोपाळा घेऊनि आला ॥९॥
तेथें टाळ दिंडी घेऊनियां नामा । भेटी पुरुषोत्तमा आला असे ॥१०॥

४९
रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥
नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥
धन्य हा निवृत्ति धन्य हा सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥३॥
खेचर सांवता धनय जनमित्रा । यांसि सकळ देता हरि ब्रह्म ॥४॥
पांडुरंग पिसा यालागीं जाहला । मुक्ताई पाजिला प्रेम पान्हा ॥५॥
नामा म्हणे खूण जाणती सज्ञान । अखंड तें ध्यान निवृत्तिदेवीं ॥६॥

(५०
सप्तश्रृंगालागीं  केली प्रदक्षिणा । आतां नारायणा सिद्ध व्हावें ॥१॥
मार्गीं आदिमाया पूजिली आनंदी । म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥२॥
चालतां चालतां  दिवस जाले फार । होईल उशीर समाधीसी ॥३॥
तीन रात्र तेथें राहिले गोपाळ । मग म्हणती सकळ चला आतां ॥४॥
नामा म्हणे देव बैसले गरुडावर । उठावले भार वैष्णवांचे ॥५॥

५०
धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्‍यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥
विमानांची दाटी पाहती सुरवर । वर्षताती भार सुमनांचे ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांति घ्यावया कल्पवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP