श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग २१ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥
कांहीं ऋषीश्वर राहियेले तेथें । गेले बहुत ते आळंकापुरीं ॥३॥
गरुडावरी सिद्ध जाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वाचीं ॥४॥
नामा म्हणे देवा जावें आषाढीसी । आले एकादशी पंढरीये ॥५॥

२२
जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥
विठोबा रखुमाई बैसलीं गरुडावर । केला नमस्कार विष्णवांनीं ॥३॥
म्हणती तीर्थयात्रा जाली यथासांग । पाहिले प्रसंग समाधीचे ॥४॥
गेले योगिराज अनादि जे आदि । राहिल्या समाधि जगामाजीं ॥५॥
नामा म्हणे देवा गेले मुनिजन । राहिलें तें ज्ञान जगामाजीं ॥६॥

२३
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥
परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥

२४
नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥
समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥
सुखाचें साधन जालीं चौघेजणें । केलीं नारायणें बोळवण ॥३॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥४॥
नामा म्हणे आतां जावें पंढरपुरा । समाधीचा सारा विधि जाला ॥५॥

२५
शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥
आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥
नेणों कैसा होईल समाधीचा प्रसंग । बोलिलेति अंगें पांडुरंगा ॥३॥
मुकियाला वाचा दिधली श्रीरंगें । इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥४॥
नामा म्हणे देव माय बाप विठ्ठल । म्हणोनि माझे बोल स्वीकारिले ॥९॥

२६
काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें ॥१॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥२॥
चिन्म्य लहरी येती उन्मळुनी । दया नारायणीं थोर केली ॥३॥
समाधि चरित्र केलें यथामति । रखूमाईचा पति आर्जविला ॥४॥
समाधि चरित्र जो करील श्रवण । तयालागीं पेणें वैकुंठीचें ॥५॥
नामा म्हणे देवगुरु धरील चित्तीं । उद्धरील पति रुक्माईचा ॥६॥

२७
समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥२॥
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील ॥३॥
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥४॥
स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला ॥५॥
नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें । वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं ॥६॥

२८
आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा ॥१॥
उरकोनी सोहळा संगें संतमेळा । विठोबा राहिला आळंदीस ॥२॥
पाहे चक्रपाणि नाम्या डोळ्यां पाणी । कंठ तो दाटुनि उगा आहे ॥३॥
पुसे रुक्मिणीकांत कां रे तूं निवांत । नाम्या शोकाक्रांत कोण्या दुःखें ॥४॥

२९
नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां ॥१॥
ज्ञानाचा वियोग जडला ह्रद्‌‍रोग । भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥
ज्ञानदेव माझा दाखवा या वेळीं । जीव तळमळी त्याच्याविण ॥३॥
संत अंतरला सखा जाला दूर । आतां पंढरपूर कैसें कंठूं ॥४॥
तुमचें दर्शन ज्ञान कृपादान । पंढरीस येणें ह्याचसाठीं ॥५॥

३०
तरीच येईन पंढरीस । दृष्टी देखेन ज्ञानेश ॥१॥
ज्ञानदेवा भेटी व्हावी । ऐशी सोय देवा लावी ॥२॥
ऐशियाच्या कृपादानें । तुम्हां संगतीं नाचणें ॥३॥
पंढरीचें जें सुख । जाणे तो एक भाविक ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP