मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
परिशिष्ट ७ वे

संकेत कोश - परिशिष्ट ७ वे

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


आध्यात्मिक संकेत

१ . सर्वांभूतीं परमेश्वर आहे .

२ . राधा म्हणजे जीवात्मा व श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा .

३ . तीर्थ यात्रेस वाहनांत बसून गेल्यानें तीर्थ यात्रेचें फल मिळत नाहीं .

४ . पौराणिक व प्रासादिक ग्रंथ वाचतांना अशुभ कथानक आल्यास तेथें वाचनास खंड न पाडतां त्या कथानकाच्या पुढील शुम भाग वाचूनच ग्रंथ खालीं ठेवावा असा संकेत आहे .

५ . ज्या ग्रंथाच्या आदि , मध्य आणि अंती ईशस्तवने वा गुरुस्तवन असतें तो ग्रंथ परमेश्वरास तसेंच जनताजनार्दनास प्रिय व हितैषी ठरतो .

६ . गुरुगुह्य म्हणून जें असतें तें नेहमी अवगुंठनांत असावें . त्याचा स्पष्टार्थ गुरु प्रसादावांचून प्रतीत होऊं नये असा पूर्वापार संकेत आहे .

आंतरराष्ट्रीय संकेत

१ . ज्या त्या राष्ट्राची वकिलात त्या त्या राष्ट्राची भूमि असें मानण्याचा आंतरराष्ट्रीय संकेत आहे .

आयुर्वेदीय संकेत

१ . मनुष्याच्या गर्मवासाचा काल नऊ महिने नऊ दिवस पूर्ण असा मानला आहे .

ईश्वरी संकेत

१ . समय म्हणजे ईश्वरी संकेत ( धवलगिरि ).

२ . ज्यानें त्यानें अंग झिजवावें व खावें हा ईश्वरी संकेत आहे .

३ . दुष्ट प्रयत्नांत अखेर दुष्टांचाच नाश होतो .

४ . लग्न हा एक योगायोग आहे तें जुळवून जुळत नाहीं . ज्याचा संबंध जडावयाचा विधिसंकेत असेल तेथेंच तो जडत असतो .

काव्य - संकेत

१ . विचारप्रधान काव्याला गंभीरवृत्त वापरण्याचा संकेत आहे .

२ . ’ फटक्या ’ चा उपयोग उपदेशाकरितां करावयाचा असतो .

३ . विशिष्ट रस परिपोषाकरितां विशिष्ट वृतें वापरावयाचीं असतात .

४ . मुग्धा कोमल बालेला कळीची उपमा देण्याचा संकेत आहे .

कामशास्त्र संकेत

१ . स्त्रियांच्या शृंगाराला पतीनें पाहिल्यावांचून सार्थक नाहीं . ’- प्रियेपु सौमाग्यफला हि चारुता -’ कालिदास .

२ . जिचा पति परगांवीं गेलेला आहे तिनें व विधवेनें काजळ घालू नये ( केसरी ३ - २ - ६३ )

४ . स्त्रियांचें वय जास्त नसतेंच्र असा संकेत आहे ( म्हटलें तर आहे म्हटलें तर नाहीं . )

५ . विडा - रंगणें हा संकेत आहे . परस्पर अनुरक्त असल्याखेरीज विडा रंगत नाहीं .

गीतेचा संकेत

१ . संघर्ष मग तो कोणताहि असो तो न्याय व धर्म यांवर अधिष्ठित असावा असा गीतेचा संकेत आहे .

चित्रकलासंकेत

१ . मानवांतील मूलमूत भावनांचे चित्रण करावें असा चित्रकलेंतला संकेत आहे .

ज्योतिष संकेत

१ . मूळनक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचें तत्संबंधीं सांगितलेले धार्मिक विधी केल्याखेरीज आईबापांनीं मुखावकोकन करूं नये .

२ . सूर्योदयाचे क्षणीं जी तिथी असेल ती त्या सबंध दिवसाची तिथी मानली जाते .

३ . कोणाचा अंतकाल सांगावयाचा नसतो .

तंत्रशास्त्र

१ . मूळाच्या चतुर्घातानें फळाची सिद्धि होते असा तंत्रविद्येचा संकेत आहे .

धार्मिक संकेत

१ . पिंडाला काकस्पर्श झाल्याविना मृतात्म्याला सद्नति नाहीं असा संकेत आहे .

२ . तुळशीच्या शापाचा पाषाण म्हणजे शालिग्राम व त्याच्या पूजेला तुळशीदळ अवश्य असा धार्मिक संकेत आहे .

३ . संतति होत नसल्यास हरिवंशाचें पारायण करावें .

४ . गंगा म्हणजे पावन करणारी .

५ . बल हवें असेल तर बलभीमाची उपासना करावी .

६ . सवत्स धेनूला अतिभक्तीनें तीन प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लागतें .

७ . धर्मांला अविरोधी असाच अर्थागम असावा .

८ . महादेवास वहावयाचें बिल्वपत्र वर डेख करून उभे वहावें असा संकेत आहे . ( नासदीय सूक्तभाष्या )

९ . बारा वर्षानंतर भेटीचा योग आल्यास मग ते पिता - पुत्र , पति - पत्नि वा बंधु - बंधु कोणीही असोत त्यांनीं देवालयांत जाऊन कास्यपात्रांतील जलांत प्रथम परस्पर मुखावलोकन करावें असा संकेत आहे . ( ऋग्वेदी - ब्रह्मकर्म ) अशाप्रकारेअं पुराण काली राज चंद्रांगद व त्याची पत्नी इंदुमती यांची सविधि भेट झाली होती अशी कथा आहे . ( ग . पु . उपासना . अ . ५५ )

१० . आरण्यकें घरीं वाचावयाचीं नसतात .

११ . योगभ्रष्ट पुरुष , जन्मतः ज्ञानी असतो . उपजत प्रज्ञा असते .

१२ . ॐ मधील अ , उ , म , हीं अक्षरें जागृति , स्वप्न व सुषुप्ति यांची वाचक आहेत . ( मांडुकय )

१३ . मोक्षद्वारापासून निवृत्त झालेले जीवात्मे इतरांच्या मुक्तीसाठीं परत फिरतात ही निवृत्तीची यात्रा ते स्वेच्छेनें निवडतात . ( धवलगिरि )

१४ . सत्यशोधकाला शून्यावस्थेंतून जावें लागतें .

१५ . मायेपासून उत्पन्न होणारें जें अज्ञान त्यास मायीयमल असें म्हणण्याचा शैवागमाचा संकेत आहे .

१६ . वटवृक्ष , पिंपळ व औदुंबर या वृक्षांवर देवतांचा अधिवास असतो .

१७ . पिंपळाचे झाडावर मुंजा तसेंच चिंचेचें झाड हडळीचें निवासस्थान मानतात .

१८ . कवट हें फळ शंकरास प्रिय म्हणून तें शिवरात्रीस अवश्य खावें असा संकेत .

१९ . कार्यकारण भाव हा एक मानवी संकेत आहे . ( नासदीय सूक्त्भाष्य )

२० . खालच्या खोलींत कोणी कुराणाचें वाचन करीत असेल तर वरच्या खोलींतहि कोणीं त्याला ओलांडू नये असा संकेत मुसलमानांत पाळतात .

२१ . मक्केंतील पवित्र काबाला सात प्रदक्षिणा घालाव्या लागतात . या काबा भोंवतीं सतत कोणी ना कोणी प्रदक्षिणा घालीत असला पाहिजे अशी परंपरा आहे . ( तरुण भारत १९ - ५ - ६० )

२२ . यहुदी धर्मांत याव्हाचें देऊळ एका यरुसलेममध्यें असून तत्प्रीत्यर्थ यज्ञकर्म तेथेंच घडवें असा यहुदी धर्माचा संकेत आहे .

२३ . मुसलमानी धर्मांत अल्लाची प्रार्थना एका मक्केतील काबातच जाऊन पोचावी असा संकेत आहे . ( नासदीय सूक्तभाष्य )

२४ . ख्रिस्ती धर्मातल्या बाप्तिस्मा विधींत " पाष्मा " धुऊन टाकण्याकरितां लागणारें पाणी जॉर्डन नदीचें असावें असा संकेत आहे . जॉर्डन ही ख्रिस्त्यांची गंगा . ( नासदीय सूक्तभाष्य )

नाविक संकेत

१ . प्रत्येक जहाजावर अग्निप्रतिबंधक व अग्निशामक साधन सामग्री सिद्ध . असली पाहिजे आणि मधून मधून तिची चांचणी ( Fire Drill ) ) घ्यावयाची असते .

२ . यंत्रचलित वाहनें . उदा . मोटारी , जहाजें यांनीं निसर्गशक्तीवर अथवा जनावरांकडून ओढल्या जाणार्‍या वाहनांची आधीं सोय पहावयाची - वार्‍याच्या दिशेवर अवलेबून असलेल्या जहाजांना यंत्रचलित जहाजांनीं मार्ग करून द्यावयाचा असा संकेत आहे . ( नौका आणि नाविक कथा )

नाटय संकेत

१ विदूषक ब्राह्मणच असावा असा संस्कृत नाटय वाङ्मयांतला संकेत आहे .

२ संगीत नाटकांत सर्व पात्रें गाणारीं असलीं पाहिजेत . ( बहुरूपी )

३ नाटकांत कथावस्तु ( Plot ) तसेंच स्बभाव परिपोष व संघर्ष असला पाहिजे .

नैर्बधिक संकेत

१ . शंभर अपराधी सुटले तरी हरकत नाहीं , पण एका निरपराध्यास शिक्षा होऊं नये .

२ . न्यायासनासमोर आलेला आरोपी आरोप शाबीत होईपर्यंत गुन्हेगार म्हणून गृहीत धरूं नयें .

३ . न्यायदेवतेची तसबीर डोळे मिटलेली व हातांत सरळ दांडीचा तराजू असलेली दाखवलेली असते याचा अर्थ १ निःक्षपातीपणा , २ दयालुत्व व ३ चोखपणा हे गुण दर्शवावयाचे असतात .

४ . फांशीची शिक्षा ज्या टांकानें लिहिली जाते तो टांक तत्काळ मोडून टाकावयाचा असतो .

नृत्य संकेत

१ . नृत्यांत शरीराचे सर्व अवयव उघडे करून दाखवृं नयेत असा भारतीय नाटयशास्त्राचा कलासंकेत आहे . ( नासदीय सूक्तभाष्य )

२ . नृत्य व वादन एकाच वेळेला एकाच ठिकाणीं चालू असावें असा संकेत आहे . ( कला आणि कलास्वाद )

नामकरण संकेत

कन्येचें बारावे दिवशीं तर पुत्राचें तेरावे दिवशीं नामकरण करावयाचें असतें .

पौराणिक संकेत

१ . पृथ्वी ही विष्णुपत्नी असा संकेत .

२ . शंखध्वनि ऐकला कीं सर्व कामें स्थगित करावींत असा देवलोकींचा संकेत आहे .

मूर्तिशास्त्र संकेत

१ . श्रीविष्णूच्या हातांतील आयुधांच्या अदलाबद्लीनें श्रीविष्णूची नानारूपें मूर्तिबद्ध केलें जाऊं शकतात

२ . बुद्धमूर्ती कान लोंबलेले दाखवावेत असा परंपरेचा संकेत आहे . ( कला आणि कलास्वाद )

मंत्रशास्त्र संकेत

१ . मंत्रांची जितकीं अक्षरें असतात . तितके कोटी जप केला असतां मंत्र सिद्ध होतो .

युद्धसंकेत

१ . शत्रूचा निरोप घेऊन आलेला दूत अवध्य असतो .

२ . युद्धसमयी तहाची सूचना करणें झाल्यास श्वेतध्वज वापरावयाचा असतो .

३ . युद्धांत वानरांनीं मानवी बेषांत बावरायाचें नाहीं असा राम - रावण युद्धांत संकेत होता . ( वा . रा . युद्धा ३७ - ३३ )

४ . बेंबीच्या खालच्या बाजूस प्रहार करूं नये असा प्राचीनकालीं गदायुद्धांत संकेत असे .

५ . युद्धाखेरीज इतरत्र क्षत्रियानें हत्तीचा वध करू नये . ( रघुवंश - सर्ग )

योगशास्त्र संकेत

ज्योतीष्मती तथा कांगोणी नामक वनस्पतीचा तैलकल्प विशेषतः सूर्योदयापूर्वी केला असतां ब्रह्मांड भ्रमणाचा आवाज ऐकूं येऊं लागतो . ( राधामाधवविलास चंपू प्रस्तावना )

रंगभूमि संकेत

१ . मृत्यू , वध , युद्ध , रक्तपात व रतिचेष्टितांचे वगैरे प्रसंग रंगभूमीवर सहसा दाखवावयाचे नसतात .

२ . नाटकांतील तीन पडदे म्हणजे घर ( रसग्रहण )

राजनैतिक संकेत

१ . राज्याची दंडशक्ति ही मुलकी सत्तेच्या कह्यांत वागविण्यांत यावी .

२ . राजकारणांत गुप्तता राखली पाहिजे व त्याचा कांहीं पुरावाहि ठेवूं नये .

लोकशाही संकेत

१ . पक्षांतर करावयाचें असेल तर त्यानें नुसत्या पूर्वीच्या पक्षाचा राजीनामा देऊन भागणार नाहीं . तर लोकसमेमधील आपल्या जागेचाहि राजीनामा देऊन तो नव्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला पाहिजे असा लोकशाहीचा एक संकेत आहे .

२ . मंत्रिमंडळ कोणत्याही एका पक्षाचें असलें तरी त्यानें संपूर्ण विधिमंडळाचें प्रतिनिधित्व निवेदनावर चर्चा होत नाहीं आणि प्रश्नोत्तरांनाहि निर्बंघ घातला जातो असा संसदीय संकेत आहे .

३ . मंत्र्यांच्या निवेदनावा चर्चा होत नाही आणि प्रश्नोत्तरांनाहि निर्बंध घातला जातो असा संसदीय संकेत आहे .

४ . एकाद्या प्रश्नावर धोरण ठरवावयाचें तर त्याबाबत पुन्हां एकदां लोकमताचा कौल घेतला पाहिजे .

५ . मंत्रिमंडळाची जबाबदारी सामुदायिक असते .

वारकरी संकेत

१ . आषाढी , कार्तिकी , माघी अथवा चैत्री यांपैकीं एका तरी शुद्ध एकादशीस गळ्यांत तुळशीची माळ घालून नियमित पंढरीची वारी करणें .

२ . वारकरी म्हटला म्हणजे तो कोणत्याहि वयाचा व जातीचा असो एकमेकांस दोन्ही पायांवर हात व मस्तक ठेवृन नमस्कार करावयाचा असा सांप्रदायिक संकेत आहे .

३ . वारकरी भजनाचा प्रारंभ " रूप पहातां लोचनीं " याच अभंगानें करावयाचा असतो .

४ . नामसप्ताहांत वीणा खालीं ठेवावयाचा नसतो .

वैदिक संकेत

१ . वेद हे अपौरुषेय आहेत .

२ . गुरूजवळ अध्ययन केल्याविना विद्या प्राप्त होत नाहीं .

३ . महिन्यांतल्या दोन अष्टम्या , दोन चतुर्दशा , पौर्णिमा व अमावास्या असे सहा दिवस वेदाध्ययनास वर्ज्य मानिले आहेत .

४ . मृत्यूनंतर पूर्व जन्म घेण्याच्या आधींच्या काळांत जीवात्मा ज्याचा आश्रय करतो त्यास लिंग देह म्हणतात .

५ . वेदाक्षरांचा उच्चार हाहि एक प्रकाराचा वायु आहे . त्याला बाह्म वायुपासून पीडा होऊं नये म्हणून वेदवेत्ते ब्राह्मण वारा सुटला असता वेदाध्ययन करीत नाहींत . ( म . भा . शांति अ . ३२८ )

६ . सर्वशक्तींची योग्य तर्‍हेनें जोपासना करून मनुष्यानें त्याचा लय यज्ञमध्यें करावा असा रुद्रांचा संकेत आहे . ( माऊली मासिक )

७ . वेदाध्ययन इतिहास व पुराण ह्यांच्या साह्यानें करावें . " इतिहासपुणाम्यां वेदं समुपबृंहयेत् " ( म . भा . आदि १ - ६७ )

८ . ग्रंथारंमी कार्यसिद्धि व्हावी म्हणून श्रीगणेशाचे मंगलरूप आठबावे व यास तसेच गुरु व माता पिता यांस नमन करावे असा वैदिक संप्रदायाचा संकेत आहे .

वैद्यकीय संकेय

१ , वैद्यानें शत्रुमित्र यांचा विचार न करितां रोगचिकित्सा व उपाय करावा .

व्यावहारिक संकेत

१ . वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा , वैद्याचें प्रमाणपत्र व स्थापत्य विशारदांचा अंदाज या तीन गोष्टींत पुनर्विचार नाहीं .

२ . जिज्ञासूवृत्तीनें व निरहंकारपणें विचारल्याविना कोणी कोणास उपदेश करूं नये .

३ . लिलावांत एकाद्या वस्तूंचे मूल्य तीन म्हणून पुकारलें म्हणजे तो लिलाव पूर्ण झाला असें समजावयाचे म्हणजे एखाद्या गोष्टींचा त्रिवार उच्चार ही पूर्णतादर्शक निश्चिति .

५ . अतृप्ति हा मानवी सुखाला मिळालेला अतिकर्कश निर्दय शाप आहे .

६ . आपण विचारलेल्या प्रश्नाचें उत्तर त्वरित पाहिजे असल्यास जोडकार्ड लिहावें .

वृत्तपत्रीय संकेत

१ . विश्वासानें मिळविलेल्या गुप्त बातम्यांचें उगमस्थान प्रकट करावायचें नसतें .

२ . एक परमेश्वर आणि दुसरा वृत्तपत्र संपादक कधींच चुकत नाहींत .

व्याकरणशास्त्र

१ . कोणत्याही वस्तूंचा निर्देश करावयाचा झाल्यास प्रथमा विभक्ति योजावी असा वैयाकरणांचा संकेत आहे . " निर्देशे प्रथमा प्रोक्ता "

शिष्ट संकेत

१ . आपली गुरुभक्ति इतरांवर लादावयाची नसते .

२ . बैठकींत गप्पा गोष्टींत उपस्थितांस अनुलक्षून कांहीं अप्रिय बोलावयाचें नसतें अथवा ओरखाडे घ्यावयाचे नसतात .

शास्त्रसंकेत

१ . पंचमहाभूतांच्या अन्योन्य मिश्रणानें द्दश्य जगत् निर्माण होतें तेव्हां ज्यांत जें महाभूत आधिक्यानें असेल त्याच्या नांवानें तें द्वव्य संबोधावयाचें असा शास्त्र संकेत आहे . उदा . पार्थिव आग्नेय इ .

शिकार संकेत

१ . शिकारींत नर मारावा पण मादी मारूं नये . माकड वा वानर या प्राण्यांची हत्त्या करावयाची नसते .

शैक्षणिक संकेत

१ . प्रादेशिक भाषा हीच राजभाषा असली तरी जनतेला प्राथमिक शिक्षण तिच्या मातृभाषेंतूनच दिलें गेलें पाहिजे असा शैक्षणिक संकेत आहे . ( केसरी ८ जुलै १९६० )

सामाजिक संकेत

१ . स्त्रीच्या तोंडांत कुठलेंहि गुपित राहात नाहीं .

२ . समाजामध्यें स्त्रीपुरुषांनीं परस्परांचा सन्मान करणें झाल्यास पुष्यमाला हातांत द्यावी . गळ्यांत घालूं नये .

३ . वर ज्येष्ठ , वधूहि ज्येष्ठ आणि मासहि ज्येष्ठ असा त्रिवेणी संगम विवाहास वर्ज्य मानला आहे .

४ . अग्निशामक दलाचा घंटानाद ऐकला असतां साहाय्यासाठीं सर्वांनीं अविलंबें यावें असा मानव्याचा संकेत .

५ . गाढ झोपलेल्या माणसास उठवणें झाल्यास त्याला सावकाशपणेंच जागृत करावें .

६ . नवराबायकोचीं बोलणीं चोरून ऐकणारांस वटवाघळाचा जन्म येतो म्हणतात .

७ . विवाह कंकण सुटेपर्यंत वधूवरांनीं मातापिता , गुरु , विप्र व देव यांखेरीज कोणासही वंदन करूं नये . कारण तोंपर्यंत ते लक्ष्मीनारायण स्वरूपी असतात .

८ . मंगल कार्याचे प्रसंगीं स्वागताचें चिन्ह म्हणून मातीचा घडा भरून ठेवतात . याला पूर्णकुंभ म्हणतात . स्वागतासाठीं ह्रदय प्रेमानें भरलेलें आहे असा संकेत .

९ . श्रेष्ठ पुरुष जसें वागतात तसेच इतर लोकही आचरण करतात . " यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरोजन . । " ( भ . गी .

१० . स्त्रीवर सहसा हत्यार चालवूं नये .

११ . आवड आणि लाज , व्यसन आणि शीण , वेड आणि समंजसपणा यांचे साहचर्य असत नाहीं . ( ज्ञा . )

१२ . गृहप्रवेशाच्या वेळीं धान्यानें मरलेलें मापटें वधूनें आपल्या उजव्या पायानें लवंडावयाचे असते .

१३ . मानवी आयुष्य १०० वर्षें श्रुतींत सांगितलें असलें तरी साधारण मर्यादा साठच कल्पिली असल्यामुळें षष्ठयद्धिपूर्तीचा समारंम करण्याचा प्रघाता आहे .

१४ . चंद्राच्या एकापासून बारा पावलांपर्यंत प्राणी सृष्टीची गर्भावस्था कल्पिली आहे . ( ऋतुचक्र )

१५ . तरुण स्त्रीची ओढणी ( पदर ) डोक्यावर असली पाहिजे असा संकेत आहे . तशी तो डोक्यावर असणें विनयलक्षण मानलें आहे . ( कला आणि कलास्वाद )

सांप्रदायिक संकेत .

१ . सिद्धगुरु करतील तोच आचारधर्म असा संकेत त्या त्या पंथांत मानला जातो .

सामुद्रिक शास्त्र संकेत

१ . ज्याच्या पोटर्‍या मोठ्या त्याला भटकावें लागतें . असा सामुद्रिक शास्त्राचा एक संकेत आहे . ( व्यासपर्व )

सौजन्य संकेत

१ . पंक्तींत भोजनसमयीं सर्वांचें जेवण झाल्याविना पंक्तींतून उठूं नये .

२ . रस्त्यानें जातांना पुढील माणसाचें कांहीं रस्त्यावर सांडलें तर त्याचें लक्ष वेधावे .

३ . एखाद्याविषयीं मरणोत्तर अनुदार उद्नार काढूं नयेत .

संगीत शास्त्रांतील संकेत

१ . दीप राग गायिल्यानें दिवे लागतात .

२ . हिंदोल राग गायिल्यानें झोंपाळा आपोआप हालत राहतो .

३ . बागेश्री रागाच्या ध्वनिमुद्रिका रोज ऐकणारीं झाडें अधिक बहरतात .

४ . दीपक रागाच्या गायनाला गवई वर्ज्य मानतात .

५ . संगीतानें नाग मंत्रमुग्ध होतात .

६ . हरणें पक्षी वगैरे आकर्षित होतात .

७ . मेघांतून जलधारा सुरू होतात .

८ . धार काढण्याचे वेळीं गाईंना मंजुळ स्वर ऐकवले तर त्या अधिक दूध देतात . ( मनोहर डिसेंबर १९५९ )

९ . मेघ मल्हार राग आळवला म्हणजे पाऊस पडतो .

१० . साधना हीं कांहींतरी अघोरीच असलीं पाहिजे असा एक मूर्ख संकेत रूढ आहे . ( संगीताचीं घराणीं )

हस्तसामुद्रिक

१ . हातांवरील रेषांनुसार परिस्थिती घडावी असा हस्तसामुद्रिक शास्त्राचा संकेत आहे .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP