कथामृत - अध्याय सोळावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसस्वत्यै नमः । गजगौरी देव्यै नमः । श्रीशिवशंकर नमोस्तुते ॥१॥
वाचिले की गताध्यायीं । आग्रहे निघती यती पायी । बोलण्याची नसे सोयी । त्वरित पातले प्रज्ञापुरीं ॥२॥
खंडोबाच्या देवळांत । उघड्यावरी निद्रिस्त होत । पाषाण उशाला एक मस्त । आकाश वरी पांघरिले ॥३॥
सेवक चिंतामणी टोळ । तये गाठिले सत्वर स्थळ । तेव्हा होती प्रभात वेळ । स्वामींस पाहता गहिवरले ॥४॥
भक्त पुराणिक टोळासवे । स्वामींस प्रार्थुनी भक्तिभावे । भोजना आपण गृहीं यावे । आग्रहे नेती स्वामींसी ॥५॥
भोजनसमयीं पंक्तिमाजी । निराबाइची लबाडी ताजी । प्रकट करोनी यतिवर्यजी । वदती आम्ही ना अन्नार्थी ॥६॥
पश्चात्तापे निराबाई । अती काकूळती येई । यतीचरणी ठेविता डोई । अभयदाने संरक्षिले ॥७॥
रिकामी गुडगुडी फुंकियली । अग्निज्वाळा प्रकट केली । टवाळांची तदा जिरली । सर्व जाहले भयभीत ॥८॥
कुटाळांसी । उपदेशिले । अवगुण तदा लया गेले । समर्थाचे दास बनले । दाविले ऐसे सामर्थ्य ॥९॥
पोटशूळ यति जर्जर । त्यांसी रक्षिले साचार । कारुण्यमूर्ती यतीश्वर । वाचिले ऐसे गताध्यायीं ॥१०॥
श्रीस्वामींचे चरित्र गहन । वाचावयासी उत्सुक मन । जाणोनिया मी संपूर्ण । वर्णीतो आता नवलकथा ॥११॥
समर्थाच्या दिव्य कथा । ऐकता हरती दारुण व्यथा । साधू आपुले हित सर्वथा । गुरुकथामृत प्राशोनी ॥१२॥
एके समयीं काय झाले । संन्यासी तीन उर्मट भले । अक्कलकोटीं प्राप्त झाले । संध्यासमय असती की ॥१३॥
दुसरी दिनीं प्रातःकाळीं । प्रातःकर्मे करोनि सगळी । फिरु लागले गल्लोगल्लीं । वेदांत-चर्चा करावया ॥१४॥
स्वरुपे काळे अति धिप्पाड । तिघे गोसावी महाद्वाड । विद्वत्तेची जया चाड । वाद करावा आम्हांसवे ॥१५॥
उग्रस्वरे बोलती दुजां । आम्हासवे नको गमजा । प्रत्यक्ष ज्ञानावतार समजा । आम्ही तिघे असामान्य ॥१६॥
चुकीची देता कुणि उत्तरे । क्रोधावेशे हाणिती त्वरे । म्हणती लोकां मूर्ख खरे । गर्वाधतेने छळिती जनां॥१७॥
ऐसा तयांचा चाले क्रम । उडविली तये धामधूम । पळोनि गाठिती लोक धाम । बघती र्पडितराक्षसां ॥१८॥
तिसरे दिनीं अकस्मात । श्रीपाद, चोळप्पा जिथे । वसत । येवोनि तेथे ते गर्जत । करा वाद हो आम्हांसवे ॥१९॥
श्रीपाद भटजी भयग्रस्त । आम्ही वाद ना करु शकत । आमुचे सद्‌गुरु समर्थ असत । वाद करावा त्यांच्या सवे ॥२०॥
चला समर्थ कोण । भेटवा आम्हां त्वरा करुन । वादीं तयांसी की जिंकुन । विजयपत्र ते मिळवू आम्ही ॥२१॥
श्रीपादसह गर्वाध गण । चालता गाठिती यती सदन । उर्मट, उन्मत्त धटिंगण । आले समोरी स्वामींच्या ॥२२॥
गर्वें शिष्ठाचार त्यजिला । दंडवतही नच घातला । उद्धटपणे प्रश्न पुसला । तयें श्रीपाद भटजीसी ॥२३॥
जाहले कदा हे संन्यासी । न्याय, व्याकरण वेदाभ्यासी । ब्रह्मपुत्रे, उपनिषेदांसी । जाणिती का सर्व हे ॥२४॥
वेष यांचा हा बावळा । विद्वत्तेची न दिसे कळा । योग्य उत्तरे सर्व वेळा । आम्हा काय हे देणार ॥२५॥
स्वामींस ऐसे उपहासिती । लोक तेधवा तप्त होती । तिघाम मारावया उठती । लोकांसि रोधिल यतिवर्ये ॥२६॥
वदती तुम्हा जन समर्थ । बघू तुमचे ज्ञानसामर्थ्य । नातरि तुमची स्तुति व्यर्थ-। सांगू आम्ही दाही दिशा ॥२७॥
गर्वाधतेचा होय कळस । यती रोखुनी पाहती त्यांस । निस्तब्धता ती ये तिघांस । वृक्ष वठले दिसती जणू ॥२८॥
जाता ऐसा बहुत वेळ । द्रवले मनीं यति दयाळ । भानावरी येत सकळ । दयादृष्टिने बघता यती ॥२९॥
गर्वाधता ती गेली लया । क्षणात लीनता आली तयां । चरण कवटाळिले ह्रदया । घळघळा गळती अश्रूंसरी ॥३०॥
विद्वत्तेचा गर्व व्यर्थ । समर्थ तुमचे नांव सार्थ । साधावया निज हितार्थ । शरण आपणां येत असो ॥३१॥
पश्चात्तापे चित्तशुद्धी-। होता जाहली शुद्ध बुद्धी । प्रभो आम्हा दुष्ट बुद्धी । कदा न स्पर्शो कल्पांतीं ॥३२॥
विद्यामदे जनां छळिले । संत सज्जनां हेटाळिले । अयोग्य वर्तन नित्य केले । क्षमायाचना करितो आम्ही ॥३३॥
सर्वस्वी जो शरण आला । त्याची चिंता की आम्हाला । मनीं न धरणे संशयाला । दृढ वचनासी परिसावे ॥३४॥
ऐकता यतींचे दृढ वचन । अत्यानंदे तयांचे मन । उचंबळोनी, पवित्र चरण । साष्टांग वंदिले पुनःपुन्हा ॥३५॥
सर्वावरी ते कृपादृष्टी-। ठेविती ना कुणा कष्टी । प्रेमामृताची दिव्य वृष्टी । स्वामी समर्थ करिताती ॥३६॥
समर्थचरणीं ठेवुनी मन । तयांचे जे चिंतन । अनुभव येती नित्य नूतन । सद्‌भक्त ऐसे वदताती ॥३७॥
स्वामीकृपेचा गुलकंद । मिळता होय परमानंद । प्रभुनामाचा जडो छंद । हेचि मागणे श्रीचरणीं ॥३८॥
चला वाचू पुढे आता । कथा वाचिता सार्थकता । मनोमालिन्य ते झडता । घडेल सेवा शुद्ध मने ॥३९॥
आळंडीचे थोर स्वामी । म्हणती जयां नृसिंहस्वामी । अष्टसिद्धी लाविती कामीं । ऐसा तयांचा अधिकार ॥४०॥
एके समयीं काय झाले । अक्कल्कोटीं दर्शना आले । दत्तावतार समर्थ दिसले । तत्क्षणीं घालिती दंडवत ॥४१॥
स्वामीसमर्थ विलोकिती । व्याघ्रांबर बसाया देती । कुशल प्रश्नां तयां करिती । प्रेमपूर्वक योगेश्वर ॥४२॥
तेजःपुंज ते दत्तावतारी । योगेश्वरांची पाहता स्वारी । नृसिंह यती संतुष्ट भारी । वदती हे तो परमेश्वर ॥४३॥
नृसिंहस्वामी समार्थासी । चरणी ठेवुनी मस्तकासी । विनम्रपणे प्रार्थिती त्यांसी । दीनावरी या करुणा करा ॥४४॥
निज कंठिसी रुद्राक्षमाळा । नृसिंहयतींच्या अर्पिती गळा । परंतु करिती प्रश्न आगळा । रंडी कभी छोडेगा ॥४५॥
प्रश्न ऐकता सर्व भक्त । जाहले मनीं आश्चर्यचकित । संन्यासी हे अनासक्त । ऐसे कैसे वर्तती हे ॥४६॥
श्रवणीं ऐसा प्रशन पडता । तात्काळ पदीं ठेविला माथा । सामर्थ्य द्यावे मज सर्वथा । मिठी तियेची तोडाया ॥४७॥
सस्मित वदने मस्तकावर । जगदीश्वरे ठेविला कर । वदती जगीं विख्यात फार-। व्हाल महात्मे म्हणोनिया ॥४८॥
प्राप्त जाहला आशीर्वाद । हर्ष वाटला मनिं अगाध । कृपासागरा निर्विवाद । कृपा असावी दासावरी ॥४९॥
योगेश्वरांच्या निरोपासी-। घेवोनी निघती जावयासी । स्थानीं आपुल्या आळंदीसी । नुसिंहस्वामी संतोषे ॥५०॥
नवलकथा ही पहा दुसरी । घडली असे ही पारनेरीं । यशवंत भोसेकर चाकरी-। करित होते सरकारी ॥५१॥
रात्री तयांसी स्वप्न पडले । दिव्य संन्यासी एक आले । प्रसाद घे हा तुला वदले । शाळिग्राम करीं दिला ॥५२॥
भक्तिने याचे करी पूजन । केशर, कस्तुरी, गंध लेपन । पुष्पे, तुलसी त्या अर्पुन । पंचारती करी नेम ॥५३॥
नित्य पक्वान्न नैवेद्यासी । दूध, फलांदी अर्पिणे त्यासी । विष्णुसहस्त्र नामासी-। नित्य म्हणोनी अर्पिणे त्या ॥५४॥
पूजा पंचामृती करोनी । भस्म, अंगारा, अंगि लावुनी । तुळशीमाळा कंठि घालुनी । विशुद्धाचरणी वर्तावे ॥५५॥
करोनि ऐसा हितोपदेश । अंतर्धान पावले ईश । यशवंत येता जागृती । परमानंद तो होय तया ॥५६॥
दिव्य घडला साक्षात्कार । म्हणती आमुचे भाग्य थोर । येउनी साक्षात जगदीश्वर । दिधली मार्ते उपासना ॥५७॥
लगबगीने तदा उठले । विष्णुनाम ते मुखीं चाले । प्रत्यक्ष नयेन त्या देखिले । सुंदर शाळीग्राम करीं ॥५८॥
शाळिग्राम तो मनोहर । पाहता आनंदले फार । प्राप्त चिंतामणी थोर-। म्हणोनि ह्रदयीं कवटाळिले ॥५९॥
अनंत जन्मिचे पुण्य फळले । यास्तव ऐसे अहा घडले । सफल आजला जिणे झाले । प्राप्त होय हा चिंतामणी ॥६०॥
वार्ता कळपा सभोवार । दर्शना दाटले लोक फार । सर्वास वाटे आश्चर्य थोर । ऐसे कदापि देखिले ना ॥६१॥
यशवंतराव हे पुण्यवंत । विरळ ऐसे जगीं संत । वदती साक्षात विष्णु प्राप्त-। लोक वंदिती यशवंता ॥६२॥
यशवंतराव भोसेकर । करु लागले मनिं विचार । जाउनी वंदू यतीश्वर । नांदई जे प्रज्ञापुरीं ॥६३॥
सांगू तयांसी वृत्तांत । घडला जो दिव्य स्वप्नात । आज्ञा करतील भगवंत । शिरसावंद्य मानीन मी ॥६४॥
यशवंतराव ते भोसेकर । तये गाठिले प्रज्ञापूर । साष्टांगे वंदुनी योगेश्वर । उभे राहिले कर जोडुनी ॥६५॥
त्यांस बघता वदले यती । काळी गोटी दाखवा ती । आज्ञा होता दिली हातीं । विनम्र झाले श्रीचरनी ॥६६॥
विस्मित जाहले भोसेकर । वदती अपूर्व हे यतिवर । स्वप्न दृष्टांत खरोखर । जाणती कैसा हे स्वामी ॥६७॥
तोच स्वामी सांगती तया । नित्य पूजेत ठेवोनिया । आराधना करोनीया । अत्यादरे सांभाळा ॥६८॥
व्हाल पुढे प्रख्यात संत । वंदील जनता की समस्त । होईल कीर्ती हो दिगंत । देव ऐशी म्हणोनिया ॥६९॥
सुखे जावे आपुल्या स्थानीं । वैद्य आपुली आज्ञा वदुनी । पारनेर या निजस्थानी-। येउनी नोकरी करिती ते ॥७०॥
काले मिळाली बढती तया । मामलेदार म्हणती जया । अनाथावरी दया-माया । नोकरीतही करिती ते ॥७१॥
विप्रभोजने, दान-धर्म । जपतप साधने नित्य कर्म। परम निर्मळ अंतर्याम । परोपकारी रमती सदा ॥७२॥
सेवातत्पर असे वृत्ती । न्यायनिष्ठेने वर्तती । कठोर शब्दे ना बोलती । अपराधी तो जरि असला ॥७३॥
संतवृत्तिचे भोसेकर । लोकमानसीं अति आदर । तयाचे चरनी ठेवुनी शिर । लोक वंदिती साष्टांगे ॥७४॥
सरकारसेवा चोख दरिती । वरिष्ठ त्यावरी तुष्ट असती । निःस्पृह म्हणोनी असे ख्याती । असे दरारा सर्वत्र ॥७५॥
देव मामलेदार म्हणुनी । प्रख्यात होते इये भुवनीं । वृत्ती तयांची देवभजनीं -। रंगलेली असे सदा ॥७६॥
दुजे दामाजीपंत असती । प्रेमे ऐसे लोक वदती । चरणी तयांचे वोळंगती । आशीर्वादासि घ्यावया ॥७७॥
स्वामिनिष्ठ ते मामलेदार । गोदातटाकी जाहले स्थिर । त्यजोनि निकरी नी संसार । संन्यस्त वृत्तिने वागती ते ॥७८॥
गोदातटाकी नाशिकासी । ठेविता आपुल्या शरीरासी । हळहळले की जन मानसीं । संत गेला म्हणोनिया ॥७९॥
आता वाचिता पुढील कथा । कळे स्वामींची अपूर्वता । अवतारी जे तयांची सत्ता । विश्वामाजीं अमर्याद ॥८०॥
अक्कलकोटीं एके दिवशी । राधा गणिका दर्शनासी-। येवोनि पुसे ती जनांसी । समर्थ कोठे असती हो ॥८१॥
लोक बोलती कुचेष्टेन । कशासि तुजला असे जाणे । परतोनिया गे बरे जाणे । भेटोणि लाभ ना होणार ॥८२॥
मला परंतु असे जाणे । तुम्हांस सांगा काय करणे । होईन पावन दर्शनाने । यास्तव जाणे उचित मला ॥८३॥
लोक तिजला उपहासिती । जासी कशासी मरायाती । परतोनि जावे तूं मागुती । आलीस मोठी दर्शना । ॥८४॥
परी एकास आली दया । स्वामी असती टेकडी या । म्हणे जाउनी पडे पाया । करोनि घेई उद्धार ॥८५॥
ऐकता मनीं आनंदली । टेकडीवरी जाण्या निघाली । येवोनिया ती बैसली । नमस्कारोनि बैसोनिया । गाउ लागली मधुर स्वरे ॥८७॥
तारुण्यमदे मुसमुसली । कमनीय कांती चाफेकळी । स्तनमंडले ती रसरसली । बांधा अत्यंत मोहक ॥८८॥
आरक्त गालीं खळि सुंदर । हिरवा तीळ तो हनूवर । भाली कोरिली चंद्रकोर । नखरे करी गाताना ॥८९॥
गौरवर्ण त्या निटिलावर । कुरळे कुंतल चेतोहर । भुरभुरती ते गालांवर । शोभे तेणे मुखचंद्रमा ॥९०॥
आलापताना मनोहर । प्रौढ वयाची नार चतुर । मोहित करण्या यतीश्वर । तिने केली शिकस्त की ॥९१॥
वारंवार मोडुनी नेत्र । कटाक्ष टाकी ती सर्वत्र । निश्चल बसले यती मात्र । मात्रा तिची चालेना ॥९२॥
चाले करण्या खुणाविती । कुटाळ, दुर्जन जे भोवती । तयांच्या नादे कामिनी ती । कामचेष्टा करु लागली ॥९३॥
कर ठेवुनी उरोजांवरी । उत्तान गायन जेव्हा करी । यतिवर्य वदले उग्रस्वरी । अवयव अर्पिण देवासी ॥९४॥
श्रीस्वामींचे नृसिंहरुप । अवलोकिता घाबरे खूप । क्षमा करा हो मायबाप । कुलटा असे मी अपराधी ॥९५॥
मिठी घालुनी स्वामिचरणा । प्रार्थना, विनंत्या करी नाना । चुकले, फसले जगज्जीवना । गरीब गाय ही सांभाळा ॥९६॥
परंतु पहा काय झाले । स्तनद्वय ते लुप्त झाले । रुप, यौवन सर्व गेले । दिसो लागली वृद्धा जशी ॥९७॥
दुःखा नुरे पारावर । गडबडा लोळे धरणीवर । प्रायश्चित हे भयंकर । दिलेती मजसी नारायणा ॥९८॥
आक्रोशता पुरे वाट । बघोनि पळती महा दुष्ट । थांबता वाटे ये अरिष्ट । भस्म करितील आपणा ॥९९॥
स्वामी मातें वाचवा हो । तारुण्य माझे मला द्याहो । फोडिता ऐसा तिने टाहो । सांत्वन करिती जगदीश्वर ॥१००॥
शिक्षा दिधली तुला मी गे । करावयासी पूर्ण जागे । जे जे केलेस तूं मागे-। व्यवसाय सर्वही सोडावे ॥१०१॥
पुनश्च देता रंगा-रुप । मत्त यौगन ते अमूप । नीच, दुर्जन छळतील खूप । नरकवासी सडशील ॥१०२॥
देवा नको ते पूर्व जिणे । काय करु मी तुम्ही वदणे । जेणे जिवाचे होय सोने । सांगाल जे ते करीन मी ॥१०३॥
ऐकतां यतिवर्य आनंदले । कंठिची माला देत वदले । काशी, प्रयागा करुनी भले । गंगास्नान करोनि ये ॥१०४॥
देवा आज्ञा मज प्रमाण । उद्याच करिते मी प्रयाण । श्रद्धापूर्वक करि वंदन । स्वामी मस्तकी कर ठेविती ॥१०५॥
धन्य, धन्य ती वारांगना । उद्धार केला तिचा जाणा । पतितपावन यतिवर्याना । ह्रदयीं धरु आजन्म ॥१०६॥
स्तवन करिता शिणे शेष-। तेथे आपण का विशेष । स्मरु अंतरीं हा जगदीश । आम्तोद्धार करावया ॥१०७॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०८॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP