कथामृत - अध्याय पंधरावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीललिता देव्यै नमः । चतुशृंगी नमोस्तुते ॥१॥
गातध्यायी की वाचिले । चळ अंब्याच्या मठीं वसले । रामदासी त्यां बंद केले । खोलींत एक्या मठामाजीं ॥२॥
बंद असता मठांतून । बाहेर आलें यति निघोन । भीमेकाठी शांत बसुन । उपदेश करिती लोकांसी ॥३॥
सामर्थ्य तयांचे पाहोनी । रामदासी विरला मनीं । तत्पदकमलीं शिरे ठेवुनी । शरण पातला योगेश्वरां ॥४॥
मोहोळ गावचा शिल्पकार । भाव स्वामींवरी प्रखर । म्हणे दिसावा परमेश्वर । स्वरुपे असावा खंडोबा ॥५॥
जाणोनि त्याची तीव्र आस । प्रेम उपजले योगेश्वरांस । खंडोबाच्या स्वरुपास-। घेउनी दर्शन दिधले त्या ॥६॥
चिंतोपंतांचे मनांतील । विकल्प जाणती यती सकल । आम्ही नसोत की विमल । तुम्हासारिखे अद्यापी ॥७॥
नको आमुचा हो विटाळ । विशुद्धमती तुम्ही टोळ । आम्ही ऐसे हे गबाळ । पंगत त्यजुनी उठती ते ॥८॥
सिद्धेश्वराचे तलावांत । जलाचा असता ठणठणाट । दयार्द्र जाहले दयावंत । वरुणदेवा पाचारिले ॥९॥
निशासमयीं अपूर्व घडले । मेघ वर्षता नको झाले । त्राहीभगवान्‍ तये केले । तलाव भरला तुडुंब तो ॥१०॥
निसर्गावरी समर्थ सत्ता । आश्चर्य पावले लोक बघता । वाचिली ऐशी अपूर्व कथा । धन्य धन्य ते यतिवर्य ॥११॥
मुकुंद नामे विप्र विमल । वर्तने अत्यंत धर्मशील । स्वामीपदीं भाव प्रबळ । स्वामी तयासी ईश्वर की ॥१२॥
वज्रनिष्ठा पाहिल्यावरी । कृपा करिती स्वामी त्यावरी । योगविद्या दिधली पुरी । जाहले योगी मौनी बुवा ॥१३॥
गुप्त होणे, प्रकट होणे । अनेक देह धारण करणे । योममार्गी अखंड रमणे । ऐसे वर्णिले मुकुंद की ॥१४॥
आता जाणू पुढे । जे स्वामींच्या जीवनीं घडे । जेणे मनाचे मालिन्य झडे । ऐसे कथामृत सेवूया ॥१५॥
संसारींचा त्रिविध ताप । हरण होतसे आपोआप । चरित्रगंगा निवारी पाप-। म्हणोनि वाचणे संतकथा ॥१६॥
संतसेवा घडली जया । भाग्य त्याचे येत उदया । पाश तोडण्या मोहमाया । संतकृपा ती अवश्य ॥१७॥
संसारनदीच्या भोवर्‍यांत । जीव गरगरा फिरे सतत । द्वेष-मत्सर नक्र फिरत । जीवन भक्षण करावया ॥१८॥
वेळीच होउनी सावधान । ईश्वरोपासना करिल जाण । होईल त्याचे धन्य जीवन । प्रभूस प्रिय तो अत्यंत ॥१९॥
पुढे पहाहो काय झाले । सोलापुराहुनि यति निघाले । नका जाऊ म्हणोनि रडले । लोक तेथल्या नगरींचे ॥२०॥
नृसिंहस्वामी जनां वदती । अवश्य जाणे आम्हांप्रती । अक्कलकोटीं स्वस्थमती । नांदू तेथे अहर्निशं ॥२१॥
देहे आम्ही जरी गेलो । तरी तुमच्या ह्रदीं वसलो । स्मरणमात्रे की प्रकटली-। समजणे हे सुनिश्वित ॥२२॥
मनोवेगे स्वामी निघती । अक्कलकोटीं आलियावरती । खंडोबाच्या देवळीं करिती । वसती तदा योगेश्वर ॥२३॥
उशास घेवोनि पाषाण । भूमीस करिती यती शयन । पाहती प्रभातीं सर्वजण । टोळ, पुराणिक ते आले ॥२४॥
टोळ लोकां तदा वदती । अहो हे नसती सामान्य यती । आम्हांस आली असे प्रचीती । साष्टांग वंदिले स्वामींसी ॥२५॥
पुराणिक प्रार्थिती स्वामींसी । देवा चलावे भोजनासी । चरण आपुले मम गृहासी-। लागोत ऐसे प्रार्थितसे ॥२६॥
तडी तापसी संन्यासी । यांची घडावी सेवा मसी । ऐशी याचना ईश्वरासी । अहोरात्र मी करित असे ॥२७॥
वदोनि ऐसे पुराणिक । स्वामींस विनविती नम्रपूर्वक । स्वभावेते अति भाविक । आग्रह करिती नम्रत्वे ॥२८॥
भाव बघोनी अति कोमल । जावया उठले श्रीदयाळ । लागली मातें क्षुधा प्रबल । चला येतसो आनंदे ॥२९॥
पुराणिकांसे हर्ष वाटे । स्वर्ग उरे त्यां दोन बोटे । स्वामींसवे लागले वाटे-। जाण्या आपुल्या गृहाप्रती ॥३०॥
समर्थ येता गृहाप्रती । पाद्यपूजा सर्व करिती । पंचारतीने ओवाळिती । आनंद दाटे तत्सदनीं ॥३१॥
निराबाइने भोजनाची । तयाई केली त्वरित साची । पाने मांडोनि कदलींची । पदार्थ वाढिले पानांवरी ॥३२॥
बुवा करिती प्रार्थनेसी । देवा उठावे भोजनासी । हातीं धरोनि स्वामींसी । प्रथम स्थानीं बैसविले ॥३३॥
उदबत्यांचा घमघमाट । रंगावलीचा अपूर्व थाट । यतींस मांडिले चांदिचे ताट । चंदनी पाट बसावया ॥३४॥
अंजुलीबद्ध बुवा वदती । स्वामी, जाहला विलंब अती । क्षमा असावी आम्हाप्रती । प्रारंभ करणे हो भोजना ॥३५॥
करु लागले स्वामी भोजन । पुराणिकां वाटले धन्य । पदार्थ आणा सत्वरी अन्य । म्हणे पुराणिक साध्वीसी ॥३६॥
बेसनाचे खमंग लाडू । साध्वी निरा लागली वाढू । मनीं आला विकल्प कडू । वाटती स्वामी अन्नार्थी ॥३७॥
लाडू होते बहुत जरी । लपविले तिने त्यांतले परी । अर्धाच लाडू पानावरी-। वाढिला तिने स्वामेंच्या ॥३८॥
हांसुनी स्वामी तिला वदती । अन्नार्थी वाटतो आम्ही येती । यास्तव लपविले काय असती-। लाडू चुलीच्या मागे की ॥३९॥
ऐकता निरा हे ओशाळली । सर्व मंडळी थक्त झाली । पदर पसरुनी अश्रु ढाळी । चुकले मार्ते क्षमा असो ॥४०॥
अंतर्साक्षित्व पूर्ण पटले । क्षमा मागुनी चरण धरिले । दयावंते अभय दिधले । होईल वदती कल्याण ॥४१॥
तेथुनी गेले योगेश्वर । नगरखेशिच्या ओट्यावर-। बसले जाउनी दिगंबर । स्वस्थचित्ते एकले की ॥४२॥
अहमदअल्ली रिसालदार । सवे घेउनी मित्र चार । करीं गुडगुडी झोकदार । स्वामी सन्निध पातला ॥४३॥
चेष्टा कराया प्रवर्तला । स्वामींस गुडगुडी देत वदला । यथेच्छ ओढा गुडगुडीला । बघूया तरी दम तुमचा ॥४४॥
अग्नि नव्हता तियेमाजीं । तैशीच दिधली करांमाजीं । हातीं घेताचि स्वामीजी । जाणिला तयांचा खल हेतू ॥४५॥
न ओढिता ना फुंकता । गुडगुडीमाजीं अग्नीं पेटता । अहमद भ्याला हे पाहता। वदे अवलिया दिसतो हा ॥४६॥
तये घातला दंडवत । हांसुनी स्वामी तया वदत । अष्ट दिक्‌पाल दास असत । सांगू तैसेचि वर्तती ॥४७॥
क्षमा याचना सर्व करिती । स्वामी सर्वा अभय देती । फकीर, साधू इथे येती । सेवा करने त्यांची सदा ॥४८॥
सद्‌बोध स्वामी तयां करिती । नम्रत्वे ते मान्य करिती । सामर्थ्याची आली प्रचिती । शरण आले तात्काळ ॥४९॥
त्यांतील श्रीराम रंगारी । स्वामींस पुसे बहुत परी । आपुली येथे सोयरी तरी । असति कोण ते सांगावे ॥५०॥
समर्थ तेव्हा तया वदती । याच पेठेंत करी वसती । चोळाप्पा की तया म्हणती । बोलवा त्यासी भेटावया ॥५१॥
तेव्हा रामा पळे त्वरित । आणिले तये चोळाप्पास । चोळ्यास बघता यती वदत । विसरलासिका आम्हासी ॥५२॥
रामचंद्र तू सराफ द्विज । भक्त पूर्विचा असोनि, आज-। आम्हा विसरला काय ही मौज । संबंध आपुले आठवी तू ॥५३॥
क्षणांत आठवे सर्व त्यास । क्षमा असावी पामरास । केले साष्टांग नमनास । अश्रु तयांसी नावरती ॥५४॥
देवा तुम्ही कुठे होता । विसर मजला पडे पुरता । परम भाग्ये भेटला आता । लाभ मातें अपूर्व की ॥५५॥
हातीं धरोनी यतिवरांस । निघे मोदे स्वगृहास । येताच दोघे स्वसदनास । भार्या आश्चर्य पावली ॥५६॥
केवढे देवा भाग्य माझे । चरण देखिले डोळां तुझे । आदरे बैसवी त्यास बाजे । पाद्संवाहन करी चोळा ॥५७॥
लोक बाजुचे तदा जमले । धांदल स्त्रीची तेधवा चाले । पूजासाहित्य सिद्ध केले । अत्यानंदे पूजिले यती ॥५८॥
हर्ष गगनांत भावेना । प्रेमावेग तो आवरेना । चाले जयघोष गर्जना । आरती केली हर्षभरे ॥५९॥
सर्व बैसले भोजनासी । आग्रहे वाढिती स्वामींसी । हार, गजरा, दक्षिणेसी । तांबूल अर्पुनी पद वंदिले ॥६०॥
आप्पास, माय राधाबाई । पत्नी तयाची येसूबाई । संत साधू येता गृहीं । करिती सेवा अत्यादरे ॥६१॥
घरीं जरी गरिबी होती । अपूर्व श्रद्धा यतींवरती । आगत स्वागत नित्य करिती । संत येता गृहाप्रती ॥६२॥
कलियुगीं या असे प्रेम । पहाया मिळणे भाग्य परम । चोळाप्पाची अप्रतीम । भक्ती होती स्वामींवरी ॥६३॥
एके दिनीं काय झाले । चोळ्यासवे यति निघाले । नागफणींचे रान दिसले । थांबले तेथे अकस्मात ॥६४॥
चोळ्यासवे लोक चार-। होते निघाले खरोखर । वदती जाणे अति दुस्तर । सर्प, इंगळ्या असती इथे ॥६५॥
परंतु स्वामी न ऐकती । हांसत स्वये पुढे जाती । फण्याकंटकी पदीं तुडविती । ये ये म्हणती चोळाप्पा ॥६६॥
मित्र वदती नको जाऊ । विषपरिक्षा नको घेऊ । असती स्वामी नका भिऊ । वदे मित्रांसि चोळाप्पा ॥६७॥
भक्त भोळा असे चोळा । स्वामींमागे  तो निघाला । भुजंग, इंगळ्या बघे डोळां । परंतु चाले निर्धास्त ॥६८॥
भाव जयाचा गुरुपायीं । सर्प तयांसी करी काई । चोळाप्पाची ही पुण्याई । खरोखरीचा पुण्यवंत ॥६९॥
प्राप्त होवो अशी वृत्ती । मागणे मागू स्वामींप्रती । दयावंत ते दया करिती । प्रार्थकांवरी अहर्निश ॥७०॥
एकदा ऐसे नवल घडले । पोटदुखीने अति पीडिले । नृसिंहवाडिचे विप्र भले । रात्रंदिन ते तळमळती ॥७१॥
कोणत्या जन्मीं पाप केले । भोगणे आता भाग पडले । सोसणे म्हणे अशक्य झाले । मरण बरवे त्यापरिस ॥७२॥
आराम वाटावया त्याने । श्रीगुरुचरित्र पारायणे । अनेक केली ब्राह्मणाने । जपजाप्यही तैसेची ॥७३॥
औषधी, काढे, मंत्र-तंत्र। कराया फिरे तो सर्वत्र । गंडे, दोरे करोनि मात्र । श्रमला अत्यंत बापुडा ॥७४॥
दान-धर्म नी अनुष्ठाने । विप्रभोजने घातली त्याने । अनंत ऐशा उपायाने । व्याधी हटेना यत्किंचित ॥७५॥
गडबडी लोळे, रडे, पडे । निवारील जो मम सांकडे । तयाच्या मी चरणांपुढे । दंडवत पेढे समर्पीन ॥७६॥
निद्रिस्त असता एके रात्रीं । स्वप्नीं भेटले दिव्य यती । अभयदाने त्यास वदती । अक्कलकोटीं जाई तूं ॥७७॥
तेथे प्रत्यक्ष विश्वेश्वर । दत्तगुरुंचाचि अवतार । कृपा केलिया तुझेअर । व्याधिमुत्क बा होशील ॥७८॥
जाग येता हर्ष झाला । स्वप्न कथिले ज्योतिषाला । दुःखमुक्तिचा काल आला । जा जा सत्वर दर्शना ॥७९॥
अश्वावरी होउनी स्वार । अक्कलकोटीं निघे सत्वर । मनीं प्रार्थना वारंवार । काम होउदे परमेश्वरा ॥८०॥
प्रज्ञापुरीं तो प्रवेशला । कर जोडुनी पुसे सकला । दाखवा भेटवा महात्म्याला । ऋणी होईन आपुला ॥८१॥
चोळाप्पाचे पाहता घर । असोनि घोड्यावरी स्वार । रिघे तैसाचि विप्र थोर । अडके दारांत अश्च तो ॥८२॥
न अंतरी ना बाहेर । अडकले तें जनावर । विप्रे केला यत्न थोर । उपाय हरले सर्वही ॥८३॥
दर्शना होता तो अधीर । एकला जाई यतिसमोर । साष्टांग घालुनी नमस्कार । शरण रिघाला स्वामीसी ॥८४॥
दया कराजी दयावंता । आपुल्याविणे कोण त्राता । उदरा त्याच्या स्पर्श करिता । स्वामी विप्रास बोलती ॥८५॥
ब्राह्मणा कासया तळमळसी । पोटशूळ कां छळे तुजसी । परतोनि जावे निज गृहासी । सुखे वर्तणे यापुढती ॥८६॥
उदरिच्या कळा थंडावल्या । विप्र स्वमनीं आश्चर्यला । धन्य, धन्य ही संतलीला । सामर्थ्य असे अपूर्व की ॥८७॥
श्रीफल, दक्षिणा अर्पूनिया । साष्टांगणमने वंदोनिया । हर्षातिरेके निघे जाया । म्हणे असावी कृपादृष्टी ॥८८॥
आनंदोर्मी नावरे तया । पुनःपुन्हा पडे पाया । आज्ञा द्यावी म्हणे जाया । स्वामी पुसती पेढे कुठे ॥८९॥
पेढे आमुचे दिल्याविण । अडकळे घोडे सुटणार न । ठेवि आपुल्या मनीं खूण । बोल आपुले सार्थ करी ॥९०॥
धन्य धन्य हे यतिवर्य । संकल्प माझे जाणिती सर्व । यांचे पुढे कुणाचा गर्व-। टिकणार ना कदापीही ॥९१॥
अंतरीं द्विज तो ओशाळला । प्रभो असावी क्षमा मजला । सत्य करितो बोलिल्या बोला । केशरी पेढे समर्पुनी ॥९२॥
सवाशेर आणुनी पेढे । वंदुनी ठेविले स्वामींपुढे । सस्मित वदने तयाकडे-। पाहुनी सांगती श्रीस्वामी ॥९३॥
देणे कुणाचे बुडवो नये । बोलिल्या बोला विसरो नये । संतसंगती सांडो नये । निजहिजास्तव आजन्म ॥९४॥
जावे सुखे तूं घरट्याकडे । घेवोनिया तुझे घोडे । नको आम्हां ते बापुडे । तुझे असो दे तुजलागो ॥९५॥
ऐकुनी अत्यंत आनंदला । साष्टांग वंदिले यतिवरांला । अडला घोडा क्षणीं सुटला । स्वार जाहला द्विज त्यावरी ॥९६॥
स्वामी कनवाळू । शरणागतांचा सांभाळू । सकल जीवांचा प्रतिपाळू । करित असती अहर्निश ॥९७॥
यास्तव जाऊ श्रीस शरण । ह्रदयीं धरु पुण्यचरण । करु तयांचे नामस्मरण । हरतील सार्‍या मनोव्यथा ॥९८॥
जय जय श्रीस्वामीसमर्थ । तारक मंत्र हा असे सार्थ । यास जपुनी साधिला स्वार्थ । असंख्य महाभक्तांनी ॥९९॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृप सर्वथा ॥१००॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP