कथामृत - अध्याय बारावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीरामचंद्राय नमः । सीतामाते नमोस्तुते ॥१॥
संत सज्जन श्रोते जन । गत अध्यायीं पतितपावन मुक्ति द्याया भक्तास म्हणुन । रुग्णा सन्निध पातले ॥२॥
पुष्पाहुनीही अति कोमल । यतिवर्याचे ह्रदय कमल । कराया येती यती सफल-। जीवन आर्त भक्ताचे ॥३॥
दास आर्त जो दर्शनाकरिता । उद्योगकर्मीं गुंतला पुरता । तदिच्छेच्या पूर्ततेकरिता । प्रकट जाहले तत्सदनीं ॥४॥
आर्त ऐसे जाहल्यावरी । भक्तमनोरथ तो श्रीहरी-। दयाळूपणे तो सफल करी । ऐसे अत्यंत ममताळू ॥५॥
चोळाप्पाचे घरीं असता । सर्वास वदले उठा आता । दुधणीस जाणे आम्हा आता । टेकडीवरी जाऊ चला ॥६॥
यतिवर्य तेथे असे काय । येथील सोडुनी सर्व सोय । कष्ट पडतील व्यर्थ हाय । किमर्थ तेथे जाणे असे ॥७॥
ऐकता हे यतींद्र उठले । ततक्षणीं ते बाहेर पडले । पाहता ऐसे लोक गेले । श्रीस्वामींच्या सांगाती ॥८॥
निर्मनुष्य त्या टेकडीवरी । सर्वासवे पोचली स्वारी । समय असता भर दुपारी । बैसले एक्या पर्णकुटीं ॥९॥
पदार्थ खाण्या नसे जवळी । क्षुधा, तृषा लागे आगळी-। व्याकूळ तेणे सर्व मंडळी । परंतु वदण्या धजती ना ॥१०॥
धैर्य करोनी एक वदला । क्षुधा, तृषा पीडिते सकलां । समर्थ येथे कशा बसला । चला जाउया परतोनी ॥११॥
प्रज्ञापुरीहुनि चोळाप्पाने । कृष्णाप्पासी धाडिले त्याने । उपवासाचे पदार्थ तेणे । वाढुनी ठेविले स्वामींपुढे ॥१२॥
कृष्णाप्पाने आपुल्या हाते । प्रेमे भरविले घास त्यांते । भक्षुनी स्वामी बैसले ते । निवांत तेथे त्या वेळी ॥१३॥
मध्यरात्र जाहली जरी । अन्नोदकाची सोय न तरी । क्षुधे तृषेने त्रस्त भारी । सर्व मंडळी ती झाली ॥१४॥
शिष्यांसि बोलती तदा स्वामी । क्षुधा लागली काय नामी । व्यथा आपुली जाणतो मी । चला मांडा पत्रावली ॥१५॥
क्षुधापीडित सर्व असता । थट्टा आमुची काय करिता । व्याकूळला हो जीव पुरता । दया करावी आम्हांवरी ॥१६॥
मांडिली का सर्व पाने । वाढितो तुम्हा स्वहस्ताने । सांगोनि ऐसे यतींद्राने । पाचारिले नृसिंहासी ॥१७॥
नृसिंह नामे पाचारिती । लोक सारे आश्चर्य करिती । या नांवाचे कुणी नसती-। गृहस्थ आल्या लोकांत ॥१८॥
अरे नृसिंहा विलंब किती-। लावितोसी यावयाप्रती । लोक क्षुधेने व्याकूळ अती । कळे न कैसे तुजसी हे ॥१९॥
अवती-भवती लोक बघती । आश्चर्य सारे मनीं करिती । तोंच स्वामी कीं गर्जती । आला आला म्हणोनिया ॥२०॥
प्रज्ञापुरीचे नृसिंहाराव-। जयांचे भोसले हे उपनाव । हत्ती, उंट, अश्च जमाव । लवाजम्यासह ते येती ॥२१॥
इतुक्यमाजीं काय झाले । किकूमभाई राजेंद्र आले-। श्रीमंत मोठे निजामींतले । सवे घेवोनि परिवार ॥२२॥
जावळ पु त्राचे करावया । येऊनी लागे समर्थ पाया । पामरावरी या करणे दया । स्वामींस प्रार्थी कर जोडुनी ॥२३॥
सधनद्वयां स्वामी वदले । लोक सर्वही हे भुकेले । खावयाचे पदार्थ पहिले-। काढा वाढा सत्वरी ॥२४॥
लाडू,बर्फी, मैसूरपाक । जिलब्या, हलवा, फेणी सुरेख । भजी, अळुवड्या चवदार ताक। वाढू लागले पानावरी ॥२५॥
पदार्थावरी मारिती ताव । जना सुटली खावया हाव । आग्रह करी स्वये उमराव । घ्याहो, घ्याहो म्हणोनी ॥२६॥
उच्चस्वरे श्लोक म्हणती । आनंदे जाहला सर्वा अती । तृप्ती जनांची होय पुरती । धन्य धन्य की यतिवर्य ॥२७॥
उजाड ऐशा टेकडीवरी । भोजना मिळे शिरा नी पुरी । आकंठ भोजन झालियावरी । संतुष्ट जाहले सर्वजन ॥२८॥
यथेच्छ जेवुनी तृप्त झाले । पानीं पदार्थ बहु टाकिले । त्रिदिन असा सोहळा चाले । मिष्टान्नावरि मिष्टान्न ॥२९॥
स्वामी विनोदे पुसति लोकां । इथे आणिले हे चुकले का । राग आपुला निमाला का-। आम्हावरील सर्वस्वी ॥३०॥
अत्यानंदे लोक गाती । योगेश्वरांची अगम्य महती । स्वप्नातही कल्पना नव्हती । मिळेल येथे मिष्टान्न ॥३१॥
कार्य संपता श्रीमंत निघती । समर्थचरणी वोळंगती । विनम्र भावे त्यां याचिती । कृपा असावी आजन्म ॥३२॥
श्रीमंत आणी सदाचरणी । निष्ठावंत जे ईशचरणी । तुम्हासारिखे लोकाग्रणी । स्वामी वदती प्रिय आम्हा ॥३३॥
दुसरे दिनीं प्रातःकाळीं ।स्थानीं चलावे हो मंडळी । गौडग्रामासि या वेळी । जाणे आम्हा आवश्यक ॥३४॥
गौडग्रामीं असे काय । लांब असोनी गैरसोय । चालोनि दुखती अती पाय । आता चलावे प्रज्ञापुरीं ॥३५॥
स्वामी कोठचे ऐकायला । उठोनि लागले चालयला । वदती आम्हा विलंब झाला । गेलेचि पाहिजे सत्वर की ॥३६॥
योगेश्वरांचे मनीं काय । कळायासी ना उपाय । त्वर्य एवढे असे काय । कुणास काही उमजेना ॥३७॥
वायुवेगे चालती स्वामी । सवे धावती शिष्य नामी । दीर्घ अंतरा कापुनी त्यांनी । गौडग्रामासि गाठिले ॥३८॥
ग्रामी पातले तया वेळी । मंडळी होती तिथे जमली । कुणबी बिचारा अश्रु ढाळी । बैल मेला म्हणोनिया ॥३९॥
समर्था बघता धीर आला । कवटाळिले तत्‍ पदांला । सर्पदंशे बैल मेला । कृपा करोनी उठवा हो ॥४०॥
कालपासुनी पडला असे । माझेहि उदरीं अन्न नसे । आजवेरी भरत असे-। याचे जिवावर मी उदर ॥४१॥
आक्रोश ऐसा बहू केला । आता वाचवा पामराला । निर्धन कुणबी तया वेळा । चरणीं लोळे स्वामींच्या ॥४२॥
करुणासागर मनीं द्रवले । गोंजारुनी त्या शांत केले । वृषभा त्यांनी पुकारिले । ऊठ ऊठरे निजसी का ॥४३॥
चमत्कार तो तदा झाला । पाय झाडुनी बैल उठला । निद्रेंतुनी ये जागृतीला । हाकं ऐकता स्वामींची ॥४४॥
लोकांत जाहला कल्लोळ । पाहता योगेश्वरांचे बळ । मृत पुंगव होउनी प्रबळ । उभा राहुनी डरकाळे ॥४५॥
विद्या संजीवनी साची । पाहुनी त्यां यतिवरांची । धन्य आम्हा गमे हाची । पृथ्वीवरी की परमेश्वर ॥४६॥
ऐसे कदापि ना देखिले । ना कदापि कुणि ऐकिले । सामर्थ्य बघुनी सन्मानिले । योगेश्वरांसी त्या ग्रामीं ॥४७॥
शिष्यांसि तदा पूर्ण कळले । गौडग्रामीं कासया आले । योगेश्वरे हे जाणिले । म्हणोनि धावले साह्यार्थ ॥४८॥
अगाध ऐसा सिद्ध महिमा । न कळेही तो निगमागमा । परमेश्वराची तयां उपमा । एकचि असे सुयोग्य की ॥४९॥
स्वामी निघता जावयाला । महा जयजयकार झाला । आशीर्वाद देउनी सकलां । निघाले वेगे यतिवर्य ॥५०॥
परतोनि आले प्रज्ञापुरीं । स्थिरावले ना तेथे परी । वदती जाणे आम्हा दुरी । लोहगावास की त्वरे ॥५१॥
संकटी असे आर्तभक्त । आम्हावरी अति आसक्त । तये घेतला ध्यास फक्त । आमुच्या की दर्शनाचा ॥५२॥
लागलीसे त्या तळमळ । दर्शनोत्कंठा असे प्रबळ । आम्हा न राहणे एकही पळ । ऐसे म्हणोनी उठले त्वरे ॥५३॥
चोळाप्पा वदे यतिवरांस । गाव असे ते वीस कोस । सवे न घेता कवणास । आपण जावे न एकटे ॥५४॥
तदा हांसुनी यती वदती । आम्हां न जाणे गावाप्रती । भक्त स्वयेची ये दुतगती । अत्यंत आतुर भेटावया ॥५५॥
सर्वास वाटले तदा होय । तोंचि जाहले तदा काय । विप्र येउनि धरी पाय । वाचवा मातें यतिवर्य ॥५६॥
वाटे आश्चर्य सर्वासी । म्हणावे तरी काय यासी । विप्र कोण हा समयासी । पातला येथे अकस्मात ॥५७॥
विप्र सांगे निज यातना । छिद्र कंठाचे बुजेना । उपाय केले जरी नाना । यातना होती असह्य की ॥५८॥
रडे स्फुंदे यातनांमुळे । कंठा लाविली चरणकमळे । कंठव्यथा ती दुर्धर पळे । आरोग्य लाभे अत्युत्तम ॥५९॥
धन्य धन्य हे चरणकमल-। स्पर्शता हरली व्याधि सकल । अत्यानंद चरण विमल-। ह्रदयीं तये कवटाळिले ॥६०॥
प्रत्यक्ष आपण महादेव । हाचि माझा वज्रभाव । गरिबाचे या अहो नाव । बापू कुलकर्णी हे असे ॥६१॥
स्वामी बोलती शब्द चार । पार्थिव गणेश पूजिले फार । गाणगापुरीं राहुनी थोर-। उग्र सेवा केली तुम्ही ॥६२॥
अभंग, कविता छान करिता । मिळेल लोकीं हो मान्यता । अभय तुम्हा दिले आता । चिंता अंतरीं न करावी ॥६३॥
हर्ष मानसीं उचंबळला । वदे दास हा ऋणी आपुला । आजन्म द्यावा ठाव मजला । आपुल्या पावन चरणांशी ॥६४॥
स्वामी तत्‍ शिरी कर ठेविती । निश्चिंत जावे ग्रामाप्रती । ईशचरणी राहील मती । पावाल तुम्ही संतपदा ॥६५॥
आशीर्वाद असा मिळता । परमानंद जाहला चित्ता । घालोनि चरणीं दंडवता । जाया निघाले गृहाप्रती ॥६६॥
पुढे एकदा काय झाले । मंगळवेढीं यती आले । समाधी सन्निध ते बैसले । दामाजिपंत संतांच्या ॥६७॥
कृष्णंभट कापशीकर । ईश्वरभक्त विप्र थोर । देवदर्शना सभोंवार-। सायंसमयीं हिंडती ॥६८॥
समाधिदर्शना जधी आले । तयी यतिवर्या विलोकिले । अपूर्व रुपा पाहूनी भुलले । नमन केले साष्टांग ॥६९॥
आपण येथे नवे दिसता । नित्य स्वामी कुठे वसता । आलात का दर्शनाकरिता । येथे आपुले कोण असे ॥७०॥
आम्ही हिंडतो त्रिभुवनांत । जाणतो ना जातपात । आहोत आम्ही संन्यस्त । नृसिंहस्वामी जन म्हणती ॥७१॥
कृष्णंभट तो विनवी तयां । आमुच्या सदनीं यतिवर्य या । सेवा आपुली करावया । भाग्य आम्हांसि लाभावे ॥७२॥
प्रेमाग्रहासी विलोकुनी । जाया निघाले तया सदनीं । कृष्णंभट हर्षले मनीं ।येता स्वामी गृहाप्रती ॥७३॥
आसना दिला पाट थोर । त्यावरी बैसले यतीश्वर । चरणी ठेवोनिया शिर । साष्टांग वंदिले स्वामींसी ॥७४॥
हाक मारोनि पत्नीसी । पहा आलेत हे संन्यासी । पत्नी पाहता, यतिवरांसी । चरण वंदिले नम्रत्वे ॥७५॥
रात्र जाहली असे फार । असे लागली क्षुधा थोर । फराळाचे काही कर । साध्वीस वदले कृष्णंभट ॥७६॥
फराळाचे न ये कामा । गोरसाची दशमी आम्हा । खाता संतोष आत्मारामा-। वाटेल हेची सांगतसो ॥७७॥
विप्र वदले निज पत्नीस । आणी उसने गोरसास । तुष्ट करणे संन्याशास । धर्मपालन करणे असे ॥७८॥
शिरसावंद्य आज्ञा पतिची-। मानोनि साध्वी कृष्णंभटाची । दारोदार हिंडली साची । मिळे न गोरस कोठेही ॥७९॥
वाटे उभयतां दुःख थोर। संतप्त होतील की यतिवत । नकार देणे जिवावर आले तदा उभयतांच्या ॥८०॥
तोंचि पुसती तयां । वेळ जातसे अहो वाया । बोलाविलेती गृहीं घ्याया । भोजन आम्हां रात्रीचे ॥८१॥
अति दुःखितां साश्रुनयना । साध्वी वदे यतिवरांना । चार वर्षे जाहली जाणा । गाय भाकड जाहली ॥८२॥
गोट्यांत जावे गोदोहना । पात्र भरोनि दूध आणा । क्षुधा लागली अत्यंत जाणा । विलंब आता न करावा ॥८३॥
श्रीस्वामींची आज्ञा प्रमाण । कृष्णंभट ते अति सुजा । गोठ्यांत जाती पात्र घेउन । प्रत्यक्ष स्वामी असती सवे ॥८४॥
गोठ्यांत जाता हंबरे गाय । चाटू लागली समर्थ पाय । कृष्णंभट्टास वदली माय । दोहन सत्वर करा ॥८५॥
सडास घालिता विप्र हात । दुग्धधारा सुरु होत । गाईपाठीवरी हात-। स्वामी फिरवितो प्रेमाने ॥८६॥
गोदे जाहले काय । वृथा निंदिती तुला हाय । कामधेनू असोनि माय-। कृष्णंभटाच्या कुटुंबाची ॥८७॥
धेनू वर्षता दुग्धधारा । आश्चर्य वाटले विप्रवरा । गिताबाई घालिती चारा । धार पाहता आश्चर्यली ॥८८॥
श्रींस घाली इच्छाभोजन । सामर्थ्य आपुले जाणिले न । क्षमा असावी दयाघन । याचिती उभयतां स्वामींसी ॥८९॥
कृष्णंभट अनाथ फार । स्वामींचा करि अति आदर । गंधाक्षता चरणांवर । सौभाग्यद्रव्ये समर्पिली ॥९०॥
गळा घातली पुष्पमाला । लाविला कपाळीं कुंकुम टिळा । तांबूल आणि दक्षिणेला-। अर्पिता जाहले नम्र पदीं ॥९१॥
श्रींनी ठेविला अभयहस्त व्हाल न कधी चिंताग्रस्त । मधुर वचनीं ते बोलत । करा संसार आनंदे ॥९२॥
पुढिल अध्यायीं वाचू कथा । वाचता मनाच्या जाती व्यथा । भक्तिभाव तो तीव्र होता । करितील भगवंत ॥९३॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामी कृपे सर्वथा ॥९४॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP