श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ४१ ते ४३

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


४१
ऐसे संतोषले देव । प्रसन्नरुपें माधव ।
मग बोलती ज्ञानदेव । विठठलाप्रती ॥१॥
धन्य धन्य तूं विठ्ठला । धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला ।
धन्य समारंभ येथिला । सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥
तुझेनि आम्ही धन्य । ये जगत्रयीं देवा मान्य ।
म्हणती भक्तांसमान । न देखों त्रिभुवनीं ॥३॥
तूं विश्वात्मा विश्वरुप । तूं जगाचें स्वरुप ।
तुज न लिंपे पुण्यपाप । सदा शुद्ध बुद्ध अससी ॥४॥
तूं आम्हां भक्तां सरिसा । सवें हिंडसी जगदीशा ।
तुजविण अष्टदिशा । मज शून्य वाटती ॥५॥
तरी तूं पाळिसी भक्त लळा । केला समाधीचा सोहळा ।
तो दाखविला मज डोळा । दिव्य दृष्टी देवोनी ॥६॥
तूं सत्वरजतमात्मक । तूं सकळ जीवांचा चालक ।
तूंचि त्रिमूर्ती अवघा एक । विराटस्वरुप सकळ ॥७॥
भक्तभाग्य भूमींतळीं । याकारणें तूं वनमाळी ।
दहा अवतार भूमंडळीं । नाना चरित्रें खेळसी ॥८॥
ऐसें महिमान अगाध । तें तुझें विश्वस्वरुप प्रसिद्ध ।
कोण भाग्याचा मी प्रबुद्ध । तो तूं मजकारणें आलासी ॥९॥
नामा म्हणे ज्ञानदेवें । ऐसी स्तुति केली स्वभावें ।
तंव कृपा करुनियां देवें । अभयकर दीधला ॥१०॥

४२
चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।
पीतांबराची दिव्य दीप्ति । पाडिली सृष्टीवरी ॥१॥
धन्य धन्य ज्ञानदेव । धन्य धन्य तो माधव ।
मग आरंभिला अनुभव । ज्ञानदेवाचेनि मुखें ॥२॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा । तूं अवतरौनि माजि चराचरा ।
हरिला महादेषथारा । तुझेनि कवित्वें ॥३॥
तुझें कवित्व माझ्या गोष्टी । जो परिसेल हे सृष्टी ।
तो येईल माझे भेटी । वैकुंठा पीठीं विष्णूच्या ॥४॥
तुवां जो ग्रंथानुभव । गीतें सांगितला भाव ।
तें मुख्य ठेवणें राणीव । अनुभवीच जाणती ॥५॥
तैसाची अमृतानुभव । सिद्ध पीठ केलें भाव ।
दाउनी मनोहर राणीव । निज गुह्य आमुचें ॥६॥
वसिष्ठगीतेची टीका । भावार्थ काढिला श्लोका ।
ग्रंथ संचिला नेटका । करुनि रचना दाविली ॥७॥
तूं महाब्रह्मींचा अंश । पदपदांतरीं केला प्रवेश ।
दाऊनियां उदास विशेष । या जीवांसी तारिलें ॥८॥
तरी तूं आतां एक वेळ । माझी स्तुती करी निर्मळ ।
जेणें करुनि तरती सकळ । वक्ते श्रोते ग्रंथकार ॥९॥
नामा म्हणे परमानंद । पावोनियां उद्‌बोध ।
केला ज्ञानदेव सावध । स्तुती उपरती मांडिली ॥१०॥

४३
ऐसें आळंकापुर पीठींचे । भक्त नांडती दैवाचे ।
जे कां सागर भाग्याचे । ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥
मग षोडश उपचारीं । पूजा ज्ञानदेव आदरीं ।
दिव्यवाद्यें मंगलतुरीं । ओवाळिती पंचारतियां ॥२॥
ज्ञान सोपान निवृत्ती । मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती ।
ओंवाळिती विष्णूमूर्ती । चतुर्भुज पैं ॥३॥
पीतांबरधारी श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।
उद्धव अक्रूर ढाळिती । चवरें वरी ॥४॥
प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । दिव्य स्वरुप प्रसन्न वदन ।
माजी मिरवे दिव्य सिंहासन । त्यावरी आरुढली ॥५॥
पुढें गरुड जोडल्या करीं । उभा पक्षांचा फडत्कारी ।
सूर्य लोपे तेजाकारी । अमृतकरु नाम एक ॥६॥
गोपाळ देव्हडे उभे । मंजुळ पावे वेणुप्रभें ।
शुभकाल सुप्रभें । माजी स्तुति मांडिली ज्ञानदेवें ॥७॥
नामा म्हणे ऐका । पुढें ग्रंथाची पीठिका ।
तो तारील सकळ लोकां । एक एक अक्षर आईकतां ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP