३१
नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु ॥१॥
जें करकमळ सनकादिकां शिरीं । नामा तिहीं करीं कुरवाळिला ॥२॥
म्हणे सांडी सर्व खंती जीवींची काजळी । विश्रांति मजजवळी आहे तुज ॥३॥
वियोगाचेनि शोकें शिणलासी मार्गीं । देह मजलागीम वाळविला ॥४॥
कोमाईलें वदन निडारला नयनीं । नेणें कोणी तुझी तानभूक ॥५॥
गेलासी जवळुनी ज्या दिवसापासोनी । न दिसे माझें कोणी आवडतें ॥६॥
धीर न धरवे जीवा पाहें दाही दिशा । माझा विष्णुदास येईल केव्हां ॥७॥
तुज पाहे गरुडपारीं पाहे महाद्वारीं । पाहे भीमातीरीं चंद्रभागे ॥८॥
पाहे पद्मतीर्थीम पाहे वेणूनादीं । नलगे तुझी शुद्धी खंत वाटे ॥९॥
अनुदिनीं भोजन करितां उदकपान । तेव्हां आठवण होय तुझी ॥१०॥
मी म्हणे धांवत येसी न धरत । प्रसादाचें आर्त बहु तुज ॥११॥
धांवोनियां येसी आलिंगन देसी । पुसेन सांगसी सुख गोष्टी ॥१२॥
तेणें हर्षें निघती डोळियासी दोंदें । ह्रदय माझें कोंदे करुणारसें ॥१३॥
आवडतें आळुकें जननियेचें बाळ । जाण तें कृपाळ भूक त्याची ॥१४॥
तैसा पंढरीनाथ मोहें वोसरला । नाम्यातें पाजिला प्रेमपान्हा ॥१५॥

३२
ऐसी ते जेवणीं ब्रह्मरसधणी । पुरविली आयणी निजभक्तांची ॥१॥
नाम्याचें उच्छिष्ट स्वीकारिलें देवें । कवतुक अवघें पाहती द्विज ॥२॥
म्हणती आम्हां येणे कैसी केली भाव । बुडविलें सर्व क्रियाकर्म ॥३॥
नेणवे हा कोण दिसे सुलक्षण । नव्हे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र ॥४॥
चहूंवर्णा वेगली दिसे याची लीला । विस्मृति सकळां पडली कैसी ॥५॥
निर्धारें नाम्याचा होय मायबापु । सोडविलें संकल्पू त्याच्या हातीं ॥६॥
कायावाचाअमनें लोभ याचेवरी । घातलिया शिरीं मंत्राक्षता ॥७॥
एक म्हणती जाले होते ते निर्माण । आतां आपुलें आपण गौप्य करा ॥८॥
लौकिकीं ही मात प्रकट करा झणीं । न बोलावी कोणी कोणापाशीं ॥९॥
एक म्हणती आतां यासीच वाळावें । आपुलें टाळावें लोकनिंद्य ॥१०॥
अज्ञानासे दोष नाहीं प्रत्यवाय । शास्त्रीं हा उपाय सिद्ध असे ॥११॥
आत्मशुद्धिलागीं करा विचारणा । करा मंत्रस्नाना त्रिपदा जप ॥१२॥
म्हणोनि सत्वर चालिले अवघे । प्रार्थुनियां देवें बोलाविलें ॥१३॥
संकोचित मनें दिसती कवण्यागुणें । कोमाईलीं वदनें सकळिकांची ॥१४॥
काय शंका वाटे तुमच्या मनीं स्वामी । ते कृपा करुनि सांगा मज ॥१५॥
मनाचें मवाळ तुम्ही ब्रह्मबीज । गौप्य नये गुज करुं कांहीं ॥१६॥
मी तुम्हां सकळांचें असे कृपापात्र । सांगा जीवीचे आर्त करीन पूर्ण ॥१७॥
मग समर्पोनि दक्षिणासहित तुळशीदळ । वरी त्या पुण्यजळ प्रोक्षूनियां ॥१८॥
चरणावरी नामा घालोनि निरवी । म्हणे कृपा असों द्यावी याजवरी ॥१९॥

३३
जातीचे हे शिंपी विश्व जाणे यातें । प्रत्यक्ष सांगाते जेवविलें ॥१॥
उच्छिष्ट निजमुखीं स्वीकारिलें याचें । उरलें तें तुम्हां कैचें क्रियाकर्म ॥२॥
न कळे हा निर्धार भ्रांति वाटे आम्हां । काय तुमचा नामा अंगभूत ॥३॥
नवल हे आवडी लौकिका वेगळी । बुडविले सकळीं समूळ धर्म ॥४॥
कोणा लोभें तुम्हां लावियेला चाळा । कृपेचा कळवळा निरोपमु ॥५॥
विचारिता तुम्ही आहां वेषधारी । लीला वोडंबरी दिसे तुमची ॥६॥
वर्णाश्रमधर्म न दिसे तुमच्या ठायीं । निर्धारुचि कांहीं न कळे आम्हां ॥७॥
वंद्य निद्य तुम्हां न दिसेचि कोणी । दृष्टी दुजेपणीं न पडे तुमची ॥८॥
विश्व आपरुप दिसे तुम्हां सर्व । नेणवे हे माव ब्रह्मांदिका ॥९॥
आम्हीं विश्वाअसलों वरवेषां तुमच्या । परी भाव अंतरीचा न कळे कांहीं ॥१०॥
आपुलें स्वहित देखोनि आपण । पाप अथवा पुण्य विचारावें ॥११॥
सर्वभावें करुनि विधीतें पाळावें । सर्वीं सांभाळावें वेदवचन ॥१२॥
वर्णाश्रमपरत्वें बोलिले जे धर्म । तें तें विहितकर्म आचरावेम ॥१३॥
स्वामींचे वचन स्वामीनीं पाळावें । यश मिरवावें उभयलोकीं ॥१४॥
तरी हा तुमचा जिवलग नामा । निर्धारितां आम्हां कळों आलें ॥१५॥

३४
नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं ॥१॥
सर्वत्र चाळक एकचि चैतन्य । वंद्य निंद्य कोण म्हणे स्वामी ॥२॥
पुण्यपाप बाधा आम्हां नाहीं कदा । असो शुद्धबुद्धा निरंतर ॥३॥
देह म्हणाल जरी वोडंबर पांचांचें । अंबरीं आभासाचें अभ्र जेवीं ॥४॥
नामा ऐसें नाम कवणिया अवयवां । सांगा तुम्ही देवा साच करोनी ॥५॥
तेजीं कीं जीवनीं गगनीं कीं पवनीं । कीं दोष धरणीमाजीं होता ॥६॥
तो तुम्हांसी गोचरु जाला कवणें युक्ति । हे खूण निरुती सांगा मज ॥७॥
तुम्हीं वेदवक्ते सर्वशास्त्र द्रष्टे । परि नाहीं आत्मनिष्ठे पावलेती ॥८॥
भेदभ्रम तुमचा नाहीं मावलला । भ्रमुची उरला संदेहेसी ॥९॥
जे वेळीं संकल्प सोडिला पैं येणें । तुम्ही आपोशनें घेतलीं कैसीं ॥१०॥
ते वेळीं नाहीं केली ही विचारणा । अधिकार अन्ना आहे कीं नाहीं ॥११॥
याचिलागीम तुम्हां प्रार्थुनी खूण सांगे । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥१२॥
आशिर्वद तुम्हीं दिल्या मंत्राक्षता । त्या त्याचे माथा टाकियेल्या ॥१३॥
मज निरालंबासी तुम्हीं करोनि अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥१४॥
हें माझें बोलणें तुम्हीं ऐकोनि सकळिकीम । परी अझुनी ओळखी न धरा माझी ॥१५॥
निःसंदेह भोजन केलें आधि तुम्हीं । उरले शेष आम्हीं स्वीकारिलें ॥१६॥
यासी विधियुक्त कोण प्रायश्चित । सांगा कोण ग्रंथ साच करुनी ॥१७
या हरिदासाचे रज आणि तुमचें चरणतीर्थ । तेणेंचि पुनीत तनु माझी ॥१८॥
येरु तुमचा भावो तोचि फळला तुम्हां । नामा तरी आम्हाम निष्कलंकु ॥१९॥

३५
मग केशव म्हणे माझें परिसा वचन । गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥
व्रत तप दान सकळ कर्मक्रिया । एक भूतदया असे जेथें ॥२॥
तोचि सत्य मानी भक्त आणि ज्ञानी । न विसंबे निर्वाणीं जीवें त्यासी ॥३॥
ज्ञानाचेम सौभाग्य भक्ति आणि वैराग्य । तयाचेम आरोग्य प्रेमरस ॥४॥
त्यासी संजीवनु सदा संत संगू । त्यावरी अनुरागू वज्रकवच ॥५॥
धर्मअर्थकममोक्षे दृष्टि नाणी । वोळगती आंगणीं मुक्ति चारी ॥६॥
अनुहात गजरु होतसे नामाचा । दीप अलक्षाचा पाजळितु ॥७॥
इंद्रपदादिकें नाशिवंत होती । म्हणोनि आसक्ती न धरावी त्यांची ॥८॥
हे जाणोनि साच न धरावी त्यांची आस । अखंड माझा वास ह्रदयीं त्यांच्या ॥९॥
कामक्रोध वैरी दुराविले दुरी । मज ह्रदयमंदिरीं सांठविलें ॥१०॥
तेणें त्याच्या उच्छिष्टा जालोंसे अधिकारी । ब्रह्मारस सरी न पवी जेथें ॥११॥
म्हणोनि ये संसारी धन्य एक नामा । जेणें माझा प्रेमा अनुभविला ॥१२॥

३६
महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचें तारक । उपमेसि आणीक नाही दुजें ॥१॥
तें हें पंढरपूर प्रेमाचें भांडार । नामें निरंतर गर्जतसे ॥२॥
येवढें तीर्थ जवळी असतां पै समर्थ । कोण भाग्यहत दैन्य भाकी ॥३॥
जीवन्मुक्त ज्ञानी येथें पुंडलिक मुनि । बैसलासे ध्यानी परलक्षी ॥४॥
योग्यांचे ह्रदयींचे निजध्यान नेटकें । तें जयाचेनि सुखें वेडावलें ॥५॥
पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी । अमृत संजीवनी पुण्यराशी ॥६॥
आनंदरसकुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा । दर्शनें न या गा गर्भवासा ॥७॥
स्वर्गीम मंदाकिनी लाजोनि राहिली । पाताळीं प्रवेशली भोगावती ॥८॥
सहस्त्रभाग भेणें होउनी भागीरथी । सागरा मिळती जाली वेगीं ॥९॥
भक्तजन भाग्याची कीं सुख आरोग्याची । जें कां वैराग्याची जन्मभूमी ॥१०॥
तेथें हरिखे निर्भर नामा संताचें संगतीं । गीतीं कीर्ति विठोबाची ॥११॥

३७
सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥
जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥
हे माझी प्रसिद्धि जगीं ब्रीदावळी । हरिदासाचे कुळीं वोळंगे सदा ॥३॥
जन्मोनि ज्याचे कुळीं एक हरिदास । धन्य त्याचा वंश पुण्यशीळ ॥४॥
काया वाचा मनें न विसंबे त्यासी । ते माझ्या दैवासी दैव जाले ॥५॥
नामधारकाचें उच्छिष्ट जेथें पडे । उभा राहोनि पुढें झेली मुखें ॥६॥
तें मज गोमटें सेविताम सुख वाटे । म्हणोनि धाटें मोठें शरीर माझें ॥७॥
बहु कांति पुष्टि यश कीर्ति प्रभा । नित्य नवी शोभा होय तेणें ॥८॥
ते संत सोयरे भेटती जे वेळीं । ते माझी दिवाळी दसरा सण ॥९॥
म्हणोनी नामयातें जेवविलें सांगातें । बहु दिवस होतें आर्त पोटीं ॥१०॥
जालें तें सर्वथा नोहे पैं अन्यथा । पुढतीं सांगा आताम काय करणें ॥११॥

३८
तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म ॥१॥
ते ते आचरावे विहित क्रियाकर्म । जें जें वर्णाश्रमें आलें जया ॥२॥
तेचि एक धन्य जगीं देहधारी । असतां संसारीं जीवन्मुक्त ॥३॥
आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म । शौच नित्यनेम सत्यवाणी ॥४॥
तप शम भूतदया पूर्ण । अखंड अनुसंधान स्वस्वरुपीं ॥५॥
स्नानसंध्या जप होम अध्ययन विधि । देवतार्चन सिद्धि करुनी भावें ॥६॥
वैश्वदेव आणि अतिथीपूजन । नववें ब्रह्मयज्ञ आवश्यक ॥७॥
संपादुनि हे विधि सारावेम भोजन । त्यावरी श्रवन पुराणाचेम ॥८॥
सर्व काळ व्हावेम मानस । असावा विश्वास वेदवचनीं ॥९॥
तुम्हीं तंव सर्वज्ञ संपन्न चतुर । देखावा विचार विशुद्धीचा ॥१०॥
सांडुनि अभिमान व्हावें शुद्धमती । जोडावी ते कीर्ति उभय लोकीं ॥११॥
जावे चंद्रभागे करावेम मंत्रस्नान । द्यावें हेमदान सत्वशुद्धी ॥१२॥
पुण्यजना एकी क्षेत्रप्रदक्षिणा । करावी पावन उभयकुळें ॥१३॥
ऐकोनी पंढरिरावो बोलते जाले वाचा । आज्ञा ते शिरसा स्वामियांची ॥१४॥
परी काया वाचा मनें मागेन ते द्यावें । माझ्या सांभाळावें नामयासी ॥१५॥

३९
तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी । तुमची वाग्‌नदी ब्रह्मरुप ॥१॥
सत्य वचन जळ पवित्र तें निर्मळ । कृतार्थ तेणें केवळ जालोंसे मी ॥२॥
हा तुमचा विश्वास दृढ आहे मज । तुम्ही माझे पूज्य परम देव ॥३॥
स्नानाचा प्रकार आहे पंचविध । सांगेन विद्‌गद भाव त्याचा ॥४॥
अर्थीं ठेवुनी दृष्टी विवेक घ्यावा पोटीं । प्रत्यया येईल गोष्टी अनुभवाची ॥५॥
उत्तमाहुनी उत्तम सत्य वाग्‌स्नान । यापरतें पावन आणिक नाहीं ॥६॥
काया वाचा मनें हें दृढ धरिजे । हेळाची तरिजे भवसागरु ॥७॥
बाहेजु भीतरीं शुद्ध सर्वकाळ । हें दुजें निर्मळ सुद्धस्नान ॥८॥
हें जया सदैवा घडे भाग्ययोगें । मग तया न लगे साधन कांहीं ॥९॥
सकळ इंद्रियांचा करोनि निग्रहो । दंडावा विग्रहो वासनेचा ॥१०॥
हें तिजें निर्मळ घडे जया स्नान । न लगे अनुष्ठान करणें त्यासी ॥११॥
सर्वांभूतीं करुणा हेंचि पैं चवथें स्नान । साधितो सज्जन विरळा कोणी ॥१२॥
त्याचेनि दर्शनें जळती पापराशी । तो सर्वा तीर्थांसी तीर्थरुप ॥१३॥
पांचवें स्नान काया प्रक्षाळावी जळीं । करणें ते आंघोळी लौकिकाची ॥१४॥
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । हे दोष दुर्धर देहामाजीं ॥१५॥
विवेक वैराग्य धरावें मानसीं । रहावें संगतीसी संतांचिया ॥१६॥
अनंत जन्माचें हेंचि प्रायश्चित्त । ज्याचे वाचे नित्य रामकृष्ण ॥१७॥
शांति क्षमा दया निजबोध निवृत्ती । अखंड खेळती जयापाशीम ॥१८॥
तो एक संसारीं धन्य शिंपी नामा । आवडता आम्हां जीवाहोनी ॥१९॥

४०
प्रार्थूनि सकळां बोले देवरावो । फेडावा संदेहो वासनेचा ॥१॥
स्नानविधीलागीं जावें चंद्रभागे । संताचेनि संगें आम्ही तुम्ही ॥२॥
बाप भक्तप्रिय कैवारिया मुरारी । लीला वोडंबरी खेळ खेळूं ॥३॥
नामयाचा हात धरोनि करकमळीं । चाले वनमाळी समारंभें॥४॥
नरनारी कवतुक पाहती सकळिक । स्वर्गीं ब्रह्मादिक ठकलें ठेले ॥५॥
सकल संतमेळासहित शारंगधरु । पाठी दळभारु ब्राह्मणांचा ॥६॥
आले चंद्रभागे हरिनाम गर्जत । केला प्रणिपात पुंडलिकसी ॥७॥
प्रक्षाळोनि चरण केले प्राणायाम । बाप सकळ धर्म जनिता स्वयें ॥८॥
समस्त द्विजकुलां करोनी प्रदक्षिणा । आरंभिले स्नानविधि देवें ॥९॥
चाचर कुरळ केश रुळती पाठीवरी । पितांबरधारी शामतनू ॥१०॥
सुंदर कमळनयन मुख प्रभाराशी । तें ध्यान मानसीं सनकादिकां ॥११॥
गोमयमृत्तिका आणोनियां देखा । प्रक्षाळुनी उदका वेदमंत्रें ॥१२॥
करुनि प्रयोग सारियेलें स्नान । केला परिधान सोनसळा ॥१३॥
ब्राह्मणाचें तीर्थ मस्तकीं वंदिलें । अभिवंदन केलें हरिच्या दासा ॥१४॥
सारोनियां संध्या नित्य नेम सर्व । पुजिले भूदेव दिधलीं दानें ॥१५॥
म्हणे कृपादृष्टीं मज केलें सनाथ । पुरविलें आर्त ह्र्दयीचें ॥१६॥
येथुनी संशयो न धरावा मानसीं । मानावेम आम्हांसी आत्मरुप ॥१७॥
चालिले सत्वर आले महाद्वारां । आज्ञा द्विजावराम दिधली देवें ॥१८॥
तेथें हरिखे निर्भर नामा निजबोधें । नाचतो आनंदें गरुडपारीं ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP