मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
चोवीसावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चोवीसावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८६९
"आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय
सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले."
श्रींनी आपल्या वडिलांकडून ( रावजींकडून ) कुलकर्णी पदाचे सर्व दप्तर स्वतःकडे घेतले. जटा, दाढी वगैरे बैराग्याचा वेष टाकून श्री प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून गीताबाई त्यांना म्हणाल्या, "गणू, तू आपला व्यवहार इतकार चांगला करतोस हे पाहून माझ्या मनाचे समाधान झाले. आता कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू चांगली सांभाळशीलच, त्यामुळे यांना विश्रांती मिळेल." श्रींनी तसे करण्याचे लगेच कबूल केले. त्या काळी कुलकर्णीपणाला गावाच्या द्दष्टीने फार महत्त्व असे. कुळकर्णी हा चांगला असणे हे गावाचे भूषण समजले जाई. गावचे पुष्कळसे व्यवहार त्याच्याच तंत्राने चालत असत. कुळकर्णी सज्जन असेल तर सबंध गाव मोठया आनंदात राही आणि दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होई म्हणून कुळकर्ण्यांना या कामासाठी वतने तोडून दिलेली असत, त्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती बर्‍यापैकी असे. स्वतः कमावलेली जमीन असायची ती वेगळीच. कुळकर्ण्यांना गावात चांगला मान मिळे. याशिवाय सरकारी सारा वसूल करणे, जमिनीची मोजणी करणे, जमिनीच्या देण्या-घेण्याचे व्यवहार पाहणे, शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकणे व त्यांचे तंटे सोडवणे इ. कामे करीत असताना कुळकर्ण्यांचा अनेक लोकांशी संबंध येई. सज्जन कुळकर्ण्याच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण श्रींपाशी होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली असणारे गावातले लोक निवांत, सुखी झाले व इतका चांगला कुळकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवा़चे आभार मानले. मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्यास आली म्हणजे श्री दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जात आणि सर्वांचे समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करीत. दप्तर सांभाळायला लागून चार महिने होत आले. आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा विश्र्वास गीताबाईंना वाटून त्या आनंदात होत्या. तेवढयात एक दिवस श्री आपल्या आईला बोलले "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदूगुरूंना भेटूनही आता फार दिवस झाले. त्यांच्या भेटीला जावे असे माझ्या मनात सारखे येते. म्हणून हे काम मी आता
सोडतो " यावर आई काय म्हण्ते ते ऐकायला श्री तेथे उभे राहिलेच नाहीत आणि दुसरे दिवशी एक मनुष्य बदली देऊन कुळकर्णीपणाच्या व्यापातून श्री मोकळे झाले. आधीपासूनच श्रींचे गोमेवाडी, म्हसवड, पंढरपूर, कुरवली, गिरवी, कर्‍हाड वगैरे ठिकाणी जाणे होई आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते सतत असत.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP