मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र बेचाळिसावी

श्यामची आई - रात्र बेचाळिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"गड्यांनो! आज शेवटीचे आठवण सांगावयाची आहे, हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हुदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे.
माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच. परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोर्‍या गाईवर आईचे व आईवर ता गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेल्या भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई.
मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असावयाची.  आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायांत शेपटीचे फलकार देत नाचावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईला तिला अतोनात लळा होता.
आईचे आजारपण वाढत चालले, तसतशी मथीही नीट खातपीतनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला, तरी ती दोन शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी त्या तिला दूध-तूप भरपूर मिळत असे. परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे.
ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी ती सारखी म्यांव म्यांव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला; तिच्या खर्‍या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली, तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूधपाणी ठेवत असू; तशी पध्दत आहे. परंतु मथी त्य दुधास शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्यांव म्यांव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले. तिसर्‍या दिवशी, ज्या जागी आईने प्राण सोडले, त्याची ठिकाणी मथीने --- त्या मांजरीने --- प्राण सोडले! माझ्या आईची मांजरी आईपाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हांस लाज वाटली. मी मनात म्हटले, " आई!  माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणाच्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही!"
"मित्रांनो! अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्याच जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली; परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करुन गेली. एका जपानी मातेने स्वत:च्या हुदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली, " माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते." माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल! हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. इतर बंधुभगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुध्दात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईचे स्वत:ला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावाची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. सार्‍या माझ्या, हो माझ्या. ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी  दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वत:चा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुध्दी, ती सोशिकता, ती मधुरता, माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो."

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP