मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र चाळिसावी

श्यामची आई - रात्र चाळिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला." आई  वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वत:च्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरण घाली. त्यांना पाणी घाली. त्यांची पाने किडे खातात की काय, ते पाही. आईच्या हातची किती तरी झाडे परसात होती! मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले; पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला?
पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात"झाडांना पाणी घाल" म्हणे; तर क्षणात" ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे." असे म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. सार्‍यांची तोंडे उतरुन गेली होती; म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता!
"तो पाहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा. लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला --ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा, तर कुणाजवळ--पण आता पुरे. ये, मला भेट!" आईचे वातात बोलणे चालले होते.
"अक्का! अक्का!" मावशी आईला हाक मारीत होती; शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती.
"नमू! तुझे तेल परत नाही केले. रागवू नको हो. श्याम! ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर!" आईचे शब्द ऐकून सार्‍यांचे डोळे भरुन आले होते. कोणी बोलेना. सारे स्तब्ध.
"तुमची मांडी हीच माझी अब्रु; दवंडी देतात. द्या, म्हणावं --- तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला, कोण माझी अब्रु नेणार? कोणता सावकार अब्रु नेईल? माझी अब्रु---ती का दागदागिन्यांत, घरादारांत, शेताभातांत आहे? त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम यांत माझी अब्रु! द्या रे त्यांची मांडी द्या!" असे म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. सार्‍यांनी तिला निजविले.
वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. "पाणी, पाणी!" आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले.
"अक्का!" मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही, काही नाही, असे हात हालवून दाखविले. थोडा वेळ आई शांत होती. "घेतलंय माझं डोकं मांडीवर?" आईने विचारले. "होय हो. हा पाहा, मी तुझ्याजवळ आहे. बोलू नको." असे वडील म्हणाले.
काही वेळ गेला. "मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास, तर मग ये---तुम्हांला ओळखता नाही आला, म्हणून आईला का नाही ओळखता येणार?"
अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, " राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव. जा."हेमगर्भाची मात्रा शेवटचे क्षणाला देतात. दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे  चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते!
त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे. परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्यफराळ करीत. सोजी खात. आई त्यांना म्हणाली," आज चतुर्थी ना? जा, स्नान करा. थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करु हो स्वत:चे. जा, खाऊन घ्या." तुटक-तुटक मोठ्या कष्टाने बोलत होती. वडील उठले. स्नान करुन देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले. आईने धाकट्या पुरुषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरुन हात फिरविला. अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली. "बाळ, चांगला राहा. हट्ट नको करु. दादा, अण्णा आहेत तुला. मावशी आहे. चांगला नीट वाग!" पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरुन हात फिरवत होती.
"सखू! सार्‍यांनी खाल्लेत का?"आईने विचारले.
"होय हो अक्का. " मावशी म्हणाली.
"सखू! सारी तुझी हो. माय मरो, मावशी जगो. पुरुषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू सारी तुझी." आई शेवटची निरवानिरव करीत होती.
"होय हो अक्का." मावशी म्हणाली." श्याम गरीब, गुणांचा. चंद्री, गजू देव आहे सार्‍यांना तो!" आई तुटक बोले. किती तरी वेळाने एकेक शब्द बोले.
सारी आईच्या भोवती बसली होती. दूर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, " क्षमा ---बोलल्ये चालल्ये विसरा!" आजी विरघळून गेली. किती तरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी.
"सखू! नानांना म्हणावं, क्षमा करा. त्यांची मी मुलगीच आहे. बयोला, म्हणावे, क्षमा करा." पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरवी; मध्येच डोळे मिटी.
‘श्याम!" एकच शब्द.
"अक्का! त्याला आज बोलावत्ये, हो" मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, "भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा."
मरताना गाय दान द्यावी, असे आहे. गाय नसेल,तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली.
आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरुषोत्तमाच्या अंगावरुन हात फिरवी. मध्येच बोट वर करी. देवाकडे जात्ये, असे सुचवी. बर्‍याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, " तुम्ही जपा, हाल करु नका. मी सुखाने या मांडीवर---"जास्त बोलवेना.
सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाआप्पा आले. त्यांनी नाडी पाहिला. ‘अर्धी घटका’ ते खिन्नपणे म्हणाले व गेले. शेजारच्या जानकीवयनी व राधाताई आल्या होत्या. नमूमावशी बसली होती. इंदू होती.
तेथे स्मशानशांती होती. आई आता जाणार, कोणाला शंका नव्हती.
"तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत; गजू भेटून गेला. " वडील म्हणाले.
"त्यांची आठवण काढीत असतील ना?" जानकीवयनींनी विचारले.
आईचे ओठ हलले, असे वाटले. काही बोलावयाचे का होते? काही सांगावयाचे का होते? परंतु बोलवत नव्हते. ते ओठ राम म्हणत होते, की श्याम म्हणत होते? राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. खाली जाणार्‍या जिभेला त्यांनी चटका दिला."सारी जपा!" आई म्हणाली.
"काही सांगावयाचे आहे का?" राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले. आईने ‘नाही!’ अशी खूण केली.
घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले---"सारे सांभाळ. देव आहे!"
शेवटची लक्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली. देवाघरी जाण्याची वेळ आली; मंगल वेळ आली.राधाताईंनी गंगा आणून दोन थंब तोंडात घातले. तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते.
थोडा वेळ गेला. "राम" ऐकू आले. आईने राम म्हटला! सार्‍यांना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणे आले; ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली: पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली! चंद्रीचे माहेर गेले! नाना, आजी यांची आवडी गेली! गडीमाणसे यांची बयो गेली; जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली!

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP