परिभाषाधिकार - मंगलाचरण

जुन्या किंवा नवीन अशा कोणत्याही करण ग्रंथापेक्षा या ग्रंथातील गणित जास्त सूक्ष्म आहे , कारण यात मंदकर्णलब्धी काढण्यात जास्त सूक्ष्मता साधली आहे .


॥ श्रीगणेशायनमः ॥

॥ श्रीदिनकरायनमः ॥

॥ अथ करणकल्पलता प्रारंभः ॥

पूर्वान्मुनीन्नमस्कृत्य गुरुंश्च ज्ञानबुद्धिदान । ज्ञात्वा सूर्यादिसिद्धांतैर्बीजैर्लल्लादिचोदितैः ॥१॥

गणितेन च वेधैश्च ग्रहाणां वास्तवी र्गतीः । ब्रवीमि गणितं तेषां सुसूक्ष्मं सुलघुक्रियम ॥२॥

--- पूर्वीच्या मुनींनां आणि ज्ञान व बुद्धि देणार्‍या गुरुनां नमस्कार करुन आणि सूर्यादिसिद्धांत व लल्लादिकांनीं करावयास सांगितलेले बीजसंस्कार , गणित व वेध यांच्या सहाय्यानें ग्रहांच्या वास्तविक गतींचा विचार करुन त्यांचें सूक्ष्म व सुकर असें गणित मी सांगतो .

विनाश्रमैरिच्छसि सूक्ष्मतां चेत । शास्त्रं विना वास्तव खेटचारम

सनिश्चयं भाविचमत्कृतीश्च । चेज्ज्ञातुमिच्छा करणं पठेदम ॥३॥

अर्थ - श्रमाशिवाय सूक्ष्मतेची व शास्त्रज्ञानाशिवाय वास्तविक ग्रहगती जाणण्याची , तसेंच निश्चयेंकरुन पुढील ग्रहणादि चमत्कार समजण्याची तुला इच्छा असेल तर मग मी सांगितलेलें हें करण पठण कर .

आदिर्गृहाणां विषुवे गृहीतो वर्षतु पौष्णं परिषान्नियोगात

रेखोज्जयिन्या अपि मध्यरेखा कालोमितो रव्युदयाच्च मध्यात ॥४॥

अर्थ - या ग्रंथांत राशिचक्राचें आरंभस्थान विषुव हेच घेतलें आहे , परंतु परिषदेच्या ठरावाप्रमाणें वर्ष रवैत म्हणजे रेवती योग तार्‍याजवळ सूर्य असतो तेव्हां सुरु होतें असें मानिलें आहे . उज्जयिनी रेखा ही मध्यरेखा मानिली आहे व काल , रवीच्या मध्यम उदयापासून योजिले आहेत .

समस्यते ह्यत्र वियोजनार्थैः मया तृतीयैव विभक्तिरेका

प्रागुज्जयिन्या अधनं गृहीतो कालो हि रेखांतरसंज्ञकोऽत्र ॥५॥

अर्थ - वजा करणें या अर्थाचे जे शब्द आहेत त्यांशीं फक्त तृतीयांत शब्दांचाच समास केला आहे . उज्जयनीच्या पूर्वेच्या स्थळांचा रेखांतर काल मी ऋण मानिला आहे .

जवो द्युभुक्तिश्च विलंबनंच बिंबं च योज्यानि कलात्मकानि

अनुक्तलिंगाहि गतिर्ग्रहावा स्फुटानि योज्या उदयश्च दृश्यः ॥६॥

अर्थ - जव , दिनगति , लंबन व बिंब हे गणितांत कलात्मक योजावेत . ग्रह व त्यांच्या गती ह्यांच्या मागें कांहीं विशेषण नसल्यास स्पष्टग्रह व स्पष्टगति यांचा उपयोग करावा . तसेंच उदयशब्दांस विशेषण नसल्यास दृश्य उदयाचा उपयोग करावा .

घातेन योगेन च येहि सिद्धाः ग्राह्या गृहा द्वादशराशितष्टाः

भोगादिशुद्धौ रविभैः प्रयोज्यम विशोधकादल्पतरं तदन्यत ॥७॥

अर्थ - गुणाकारानें किंवा बेरजेनें ज्या राशी येतील त्या १२ नें तष्ट करुन घ्याव्या . पुढें जे भोगादि सांगितले आहेत त्यांची वजाबाकी करितांना वजा करावयाची संख्या मोठी असल्यास ज्या संख्येतून वजा करावयाची असेल ती संख्या १२ राशीनीं युक्त करावी .

बीजोक्तरीत्या इहतु प्रयोगे न ह्येष कार्यः खलु चक्रयोगः

कार्यस्तु चेच्छोधकमंतिमेस्यात । पदे तदन्यत्प्रथमे पदे च ॥८॥

अर्थ - परंतु भोगादिकांची वजाबाकी करतांनां जर बीजगणिताच्या रीतीचा उपयोग करावयाचा असेल तर वर सांगितल्याप्रमाणें बारा राशी मिळवूं नयेत . तथापि वजा करावयाची संख्या जर शेवटच्या पदांत असेल व ती जी मधून वजा करावयाची आहे ती जर पहिल्या पदांत असेल तर १२ राशी वर सांगितल्याप्रमाणें मिळवाव्या . ह्याचें उदाहरण पुढें येईल . ( त्रिपश्न श्लोक २ व महापात श्लोक १३ च्या पूर्वी पहा )

अल्पेन हीनं वर मंनरं तयोः । षडभाधिकंचेद भगणाद्विशोधितं

शुद्धिः प्रसाध्यांतरयोस्तयोर्द्वयोः । ते योजयित्वैव विभिन्नदिक्कयोः ॥९॥

अर्थ - दोन संख्यापैकीं लहान मोठींतून वजा केली म्हणजे त्या दोन संख्याचें अंतर येतें . अंतर सहाराशीपेक्षां मोठें असेल तर तें बारा राशींतून वजा करुन घ्यावें म्हणजे त्या दोन संख्याचें अंतर येईल . भिन्न दिशांच्या अंतरांची जर वजाबाकी करावयाची असेल तर ती त्यांची बेरीज करुनच करावी . ह्याचे उदाहरण पुढें येईल . ( लोपदर्शनाधिकार पहा . )

भखेटभोगा ध्रुवचारलग्न - । क्षेपोच्चकेंद्रायन भागपाताः

भोगादिसंस्कार फलानिचैव भोगादयः स्युः सह वैषुवांशैः ॥१०॥

अर्थ :- नक्षत्रांचे किंवा ग्रहांचे भोग ध्रुवक , गति , लग्न , क्षेपक , उच्चें , केंद्र , अयनांश , पात व भोगादिकांनां ज्यांनीं संस्कार करावयाचा असतो तीं फलें व विषुवांश हे भोगादि होत .

त्रिभिस्त्रिभिर्मैः पदमेकमेकम । अंत्यं द्वितीयं च समं तदुक्तम

पदे तदन्ये विषमाभिधे च । पदैश्चतुर्भिः खलु चक्रमेकम ॥११॥

अर्थ :- तीन तीन राशींचे एक पद होतें . पहिल्या व तिसर्‍या पदास विषमपद म्हणतात . दुसर्‍या व चौथ्या पदास समपद म्हणतात . अशा चार पदांनीं एक चक्र होतें .

भुजो हि तद्यत्प्रथमे पदे स्यात । द्वितीयके चक्रदलाद्विहनिम

तृतीयके षडगृहशोधितं तु । हीनं चतुर्थे रवितुल्यभेभ्यः ॥१२॥

अर्थ :- पहिल्या पदांत जें असेल तोच भुज होय ; दुसर्‍या पदांत जें असेल तें ६ राशींतून वजा केलें असतां भुज होय ; तिसर्‍या पदांत जें असेल त्यांतून ६ राशि कमी केल्या असतां भुज होय . चतुर्थपदांत जें असेल तें १२ राशींतून वजा केलें असतां भुज होतो .

भुजस्य जीवा ह्यथ कोष्टकात्स्यात यस्मिन्मयासा प्रतिलिप्तमुक्ता

भुजेन हीनं त्रिभमेव कोटिः स्यात्कोटिजीवा हिभुजज्यकावत ॥१३॥

प्रसाधिता या हि भुजस्यजीवा स्वमाद्ययोः सा पदयोः प्रकल्प्या

अंत्याद्ययोः साधितकोटिजीवा धनं प्रकल्प्येतरथात्वृणे ॥१४॥

अर्थ :- भुजाची जीवा , कोष्टकांतून निघते , त्या कोष्टकांत १० कलेच्या अंतरानें जीवा दिल्या आहेत . राशींतून वजा केला असतां कोटि होतें . कोटिची जीवा भुजाच्या जीवें प्रमाणेंच निघर्ते ॥१३॥ साधिलेली भुजाची जीवा पहिला दोन पदांत धन समजावी व दुसर्‍या दोन पदांत ऋण समजावी . कोटिची पहिल्या व चतुर्थपदांत धन समजावी . आणि दुसर्‍या व तिसर्‍या पदांत ऋण समजावी . ॥१२॥

भोगादिशुद्धीतरदत्र कार्यम बीजोक्तरीत्या गुणको हि कुर्यात

ऋणस्यसाध्याः पदबाहुकोटयः कृत्वा तदादौ रविराशियुक्तम ॥१५॥

अर्थ :- येथील भोगादिकांच्या वजाबाकीखेरीज इतर सर्व गणित बीजगणितांत सांगितलेल्या रीतीप्रमाणे धन ऋण यांचा विचार करुन करावें . ऋण कोणांचें पद , बाहु ( भुज ) किंवा कोटि काढावयाचा असल्यास तसें करण्यापूर्वी त्यांत १२ राशि मिळवाव्या .

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP