भगवंत - नोव्हेंबर २३

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे अजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे. तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की, आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली. कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यःकश्चित संसारातसुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे?
सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करु शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसालादेखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरुप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समाजावे. जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही,चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भीती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP