श्रीनागझरी माहात्म्य - अध्याय पाचवा

श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन , श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे .


श्रीगणेशाय नमः ॥

हे वसुदेव -देवकी -नंदना । आजानुबाहो कमलनयना । राहीरुक्मिणीच्या रमणा । पुंडलीकवरदा कृपानिधे ॥१॥

तुम्ही कृपा करुन भलें । संतचरित्र वदविलें । हे पांडुरंगे मम माउले । भीमातटविहारिया ॥२॥

देवा तुझ्या बळावरी । माझ्या उड्या सर्वतोंपरी । दासगणूचया ठेवा शिरीं । वरदकर आपुला ॥३॥

श्रोते तिलूकचंद नांवाचा । एक मारवाडी नागझरीचा । रहाणार होता साचा । डाका पडला तयाच्या घरीं ॥४॥

मध्यरात्रीचे सुमारास । चोरटे आले नागझरीस । तिलूकचंदाच्या गृहास । गराडा त्यांनी घातला ॥५॥

दहापांच चोर रस्त्यावर । उभे राहून भराभर । गोफणीचा वरचेवर । मारा करुं लागले ॥६॥

कांही चोर घरावरी । चढते झाले सत्वरी । टेहळणी ती करण्या खरी । दूरदृष्टी ठेवून ॥७॥

कांही चोर शिरले आंत । चोरावयासी चीजवस्त । कांहीं ते बसले सत्य । तिलूकचंदाचे उरावरी ॥८॥

दरोड्याच्या भयानीं । नौकर चाकर पळोनी । गेले घरा सोडूनी । तिलूकचंदाच्या विबुधहो ॥९॥

संदूक जें कां होतें बडे । तें फोडून पाहिलें रोकडें । चंद्रहार माळा दंडकडे । आंगठ्या पौंच्या बहुसाल ॥१०॥

सोनें -चांदीचा माल नेला । धुंडाळूनी पेट्यांला । बहुमोल होता तोही नेला । माल कपड्यांचा विबुधहो ॥११॥

या डाक्याचे तपासासी । फौजदार आला दुसरे दिवशीं । या फौजदार हुद्यासी । वर्‍हाडी म्हणती चीफसाहेब ॥१२॥

चोरीच्या तपासाचें । काम सुरुं झालें साचें । वहिमी आणविले आसपासचे । शिपाई धाडून चिफानें ॥१३॥

अस्तमानचे समयाला । चीफसाहेब येतां झाला । सहज समाधिदर्शनाला । गोमाजीच्या माळावरी ॥१४॥

दर्शन घेऊन केला नवस । श्रीगोमाजीच्या समाधीस । हा डाका सांपडल्यास । या महिन्यांत मजलागीं ॥१५॥

तरी शंभर रुपयांचा । भंडारा मी घालीन साचा । शिरा तूपसाखरेचा । ये ठायीं करुन ॥१६॥

तुम्ही पावतां नवसाप्रती । ऐसें लोक बोलती । त्याची दावा प्रचिती । मजलागीं ये वेळा ॥१७॥

मी नुकताच फौजदार । झालों खामगांवावर । हा गुन्हा सांपडेल जर । तरी कायम होईन मी ॥१८॥

त्यांतून पोराबाळांचा । बाप मी आहे साचा । तूं कृपासमुद्र करुणेचा । कृपा करा मजवरी ॥१९॥

तों रात्रीच्या समयासी । स्वप्न पडलें चिफासी । तूं न बसे नागझरीसी । जाई गव्हानाकारणें ॥२०॥

चोरीचा तपास लागेल । तूंही कायम होशील । फार काय सर्कल । पुढचे वर्षी होशील तूं ॥२१॥

गव्हानीं चोरी सांपडली । मालमत्ता मिळाली । तिलूकचंदाची सगळी । जेवढी गेली होती हो ॥२२॥

चीफसाहेब कायम झाला । खामगांव तालुक्याला । हा येत होता दर्शनाला । नागझरीस हमेशा ॥२३॥

असो कुकाजी पाटील स्वर्गवासी । झाले पंढरीक्षेत्रासी । आषाढ शुद्ध पक्षासी । संवतएकुणीसशें बेचाळीसीमधें ॥२४॥

या कुकाजी पाटलाचा । बंधु कडताजी होय साचा । हाही भक्त गोमाजीचा । होता कुकाजीचे परी ॥२५॥

या कडताजीकारण । पुत्र झाले सहाजण । खंडू गणपती नारायण । हरी मारुती कृष्णाजी ॥२६॥

परी कुकाजीनें त्याची खंती । वाहिली नाहीं तिळरती । बंधूच्याच मुलांप्रती । तो आपुलीं समजतसे ॥२७॥

कडताजीच्या मागें जाण । या साही मुलांचें संगोपन । पुत्रवत समजून । केलें होतें कुकाजीनें ॥२८॥

मरणसमयीं पंढरींत । त्या कुकाजी पाटलाप्रत । आषाढी एकादशीस सत्य । ऐशापरी स्वप्न पडलें ॥२९॥

हे कुकाजी भक्तवरा । तुझा मृत्यु पंढरपुरा । आहे चतुर्दशीसी खरा । आतां तो टळणें नसे ॥३०॥

म्हणून मृत्युपत्र करावें । त्यांत लिहून ठेवावें । माझ्या वंशजानें चालवावें । व्रत पंढरीच्या वारीचें ॥३१॥

शेतें संपत्ती वांटून द्यावी । अवघ्या मुलांकारणें बरवी । थोडी राखून ठेवावी । सार्वजनिक हितास्तव ॥३२॥

ऐसें स्वप्न पाहिलें । कुकाजीचें मन आनंदलें । मृत्युपत्र त्यानें केलें । पंढरीक्षेत्रामाजीं पहा ॥३३॥

त्या मृत्यूपत्रावरुन । नागझरीचें संस्थान । झालें असें स्थापन । सुकदेवाच्या हातानें ॥३४॥

हा सुकदेव नातू कुकाजीचा । दत्तक नारायण पाटलाचा । जन्मदाता बाप याचा । गणपती पाटील असें की ॥३५॥

यानें " कुकाजी महादाजी ट्रस्ट केला " । त्या नागझरी ग्रामीं भला । तो उत्तम प्रकारें चालविला । हें खरोखर भुषण तया ॥३६॥

या सुकदेव पाटलाला । विषमज्वर होता झाला । बुधहो पहा शेगांवाला । पन्नाशी ती उलटल्यावर ॥३७॥

वैद्य डॉक्टरांचे उपचार । जो जो करावे वरच्यावर । तो तो वाढूं लागला जोर । व्याधीचा कीं तया काळीं ॥३८॥

सुकदेव म्हणे आप्तांसी । तुम्ही न्या मला नागझरीसी । गोमाजींचे पायापाशी । तेथें बरा होईन मी ॥३९॥

तो डॉक्टरांचाही डाक्टर । वैद्यांचाही वैद्य थोर । गोमाजींचा अधिकार । आगळा आहे सर्वांहुनी ॥४०॥

जिवलग मित्र सुकदेवाचा । लाडूशेट नांवाचा । मुदलीआर जातीचा । मद्रासी गृहस्थ एक ॥४१॥

तो पुसे डॉक्टरास । न्यावे का हो नागझरीस । आम्ही सुकदेव पाटलास । त्यांचा हट्ट विशेष असे ॥४२॥

डॉक्टर म्हणे ऐका ऐका । नागझरीस नेऊं नका । सुकदेव पाटलाप्रती देखा । अहो लाडूशेट तुम्ही ॥४३॥

हालचाल बिछान्यावरची । तीही त्या न सोसवे साची । या टायफाईड रोगाची । तर्‍हा आहे विचित्र ॥४४॥

मलोत्सर्ग बिछान्यांत । करविणें या रोग्याप्रत । तोच तुम्ही नागझरीप्रत । नेता म्हणता काय हें ? ॥४५॥

ऐसें डॉक्टरांचे पडे मत । तें न पटे यत्किंचित । सुखदेवाकारणें सत्य । सचिंत झाले लोक सारे ॥४६॥

खामगांव अकोला उमरावती । येथून डॉक्टर आणविले अती । आयुर्वेद जाणते सन्मती । वैद्य तेही आणविले ॥४७॥

परी न झाला उपयोग कांहीं । रोग हटेना अंशेंही । समाचारास जो जो येई । मनुष्य सुकदेव पाटलाच्या ॥४८॥

त्याला त्यांनी म्हणावें । मला नागझरीस न्यावें । एवढे वचन ऐकावें । माझे तुम्ही बाप हो ॥४९॥

एक दिवस निकराचें । बोलणें त्यांनीं केलें साचें । श्रीगोमाजीं पदाचें । दर्शन म्हणे घडवा मला ॥५०॥

डॉक्टरांचें ऐकूं नका । मला शेगांवी ठेवूं नका । उगीच सबबी सांगूं नका । त्या न मी ऐकणार ॥५१॥

ऐसें सांगून अवघ्यांला । सुकदेव पाटील उठून बसला । म्याना आप्तांनीं तयार केला । नागझरीसी नेण्याते ॥५२॥

सुकदेव बसला म्यानांत । आला नागझरीप्रत । गोमाजीसी दंडवत । साष्टांग त्यांनी घातिले ॥५३॥

समर्था तुझी चाकरी । होऊं दे या माझ्या करीं । उपयुक्त कामाची हौस भारी । आहे माझ्या मनांतून ॥५४॥

वैद्यशाळा शास्त्रशाळा । चालविणें आहे या स्थळा । अनाथाच्या लेंकराला । उपयुक्त शिक्षण देणें असे ॥५५॥

नागझरीस आल्यावर । पडूं लागला उतार । पाटलासी वरचेवर । व्याधी सर्व झाली बरी ॥५६॥

साधूचिया पायापुढें । औषध काय सांगा रडे । साधूचरण रोकडे । अमृत भाविका निःसंशय ॥५७॥

सुकदेव पूर्ण बरा झाला । आश्चर्य वाटलें लोकांला । वैद्य आणि डॉक्टरला । हें निराळें सांगणें नको ॥५८॥

श्रोते अवघ्या श्रीमंतांनी । नागझरीस येवोनी । या संस्थेस पाहूनी । ऐसेंच काहीं करावें ॥५९॥

तरीच उपयोग श्रीमंतीचा । योग्य आहे व्हावयाचा । ख्यालीखुशालींत पैशाचा । खर्च न करा येतुलाही ॥६०॥

ऐसें सर्वांनीं केल्यास । राष्ट्र येईल उदयास । होत चालला जो कार्‍हास । तोही थांबेल धर्माचा ॥६१॥

ऐसें हें स्थान जागृत । गोमाजीचें वर्‍हाडांत । सुखी झाले असंख्यात । लोक यांच्या कृपेनीं ॥६२॥

अजूनही अनुष्ठाना । लोक येती तेथे जाणा । कुंडामाजीं करुन स्नाना । प्रदक्षिणा घालिती ॥६३॥

गुरुचरित्र वाचती कोणी । निराहारी राहती कोणी । कोणी उभे राहोनी । करिती हरीचा नामगजर ॥६४॥

ज्ञानेश्वरीचें पारायण । कोणी करिती येथें येऊन । कोणी जावळें काढिती जन । येथें येऊन मुलांचें ॥६५॥

कोणी गोर्‍हे सोडिती । कोणी गाई अर्पिती । कोणी रुपये खेळवती । समर्थांच्या द्वारावरी ॥६६॥

ऐसें गोमाजीचरित्र थोर । करील पापांचा संहार । मनींची चिंता होईल दूर । दर्शन घेतां समाधीचें ॥६७॥

आधी सभ्दाव ठेवावा । पुढे त्याचा अनुभव घ्यावा । पोकळ कधीं न करावा । वादविवाद येविषयीं ॥६८॥

श्रीगोमाजी साधूवर । कुबेराचाही कुबेर । वैद्याचाही वैद्य थोर । येविषयीं शंका नसे ॥६९॥

जो या पंचाध्यायासी । स्नान करुन कुंडासी । वाचित जाईल प्रतिदिवशीं । त्याच्या कामना पुरतील ॥७०॥

रोगी होतील निरोगी । जे जे असतील अभागी । ते ते होतील याच जागीं । भाग्यवान निःसंशय ॥७१॥

या ग्रंथाची अनुक्रमणिका । सांगतो मी आतां ऐका । अभक्तिलेश ठेवूं नका । चित्तीं श्रोते प्रथमतां ॥७२॥

प्रथम अध्यायीं मंगलाचरण । स्वामी नरसिंहसरस्वतीचें आगमन । झालें नागझरी माळाकारण । आपुल्या सप्त शिष्यांसह ॥७३॥

त्यांनी नागझरी माळावरी । प्रगटविली गोदावरी । विभांडक झाला अधिकारी । मननदीच्या स्नानानें ॥७४॥

द्वितीय अध्यायाचे ठायीं । निंबाजीची कथा पाही । मोकळें केलें लवलाही । तिर्थ श्रोते बुजलेलें ॥७५॥

कुकाजीला उपदेश । केला तृतीय अध्यायास । घागर सांपडली कुकाजीस । निजसदनीं रुपयांची ॥७६॥

चतुर्थामाजीं अभिनव कथा । वांझ गाईची तत्त्वतां । गोमाजी बैसले दोहण्याकरिता । वांझ गाईकारणें ॥७७॥

दूध निघाले चार शेर । आश्चर्य झालें जनां फार । काय न करी सांगा कर । खर्‍या साधुपुरुषाचा ॥७८॥

कळसाध्याय पांचवा । समाधीचा असे बरवा । उदेगिरास करण्या सेवा । जमीन इनाम मिळाली ॥७९॥

हें नागझरी महात्म्याचें सार । कथियलें मीं साचार । याचा पोक्त करा विचार । विनवीतसे दासगणू ॥८०॥

दासगणू जोडून कर । म्हणे हे गोमाजी गुरुवरा । कृपेची ती पाखर करा । मजवरी दयानिधे ॥८१॥

संतकृपा झाल्यावर । मग कशाचा राहील दर । तो सुखी राहील निरंतर । सत्य सत्य त्रिवाचा ॥८२॥

शके अठराशे अडुसष्टासी । फाल्गुन शुद्ध द्वादशीसी । नागझरीचें कुंडापाशी । नागेश्वरासन्निध ॥८३॥

मंगळवार दिवस खरा । प्रहर पहा होता तिसरा । त्यावेळीं ग्रंथ पुरा । केला दासगणूनें ॥८४॥

ही दासगणू वर्णित कथा । नाहीं गप्पेचा खचित गाथा । विश्वास ठेंवूनिया वरता । अनुभवाची वाट पहाणें ॥८५॥

॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP