श्रीनागझरी माहात्म्य - अध्याय तिसरा

श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन , श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे .


श्रीगणेशाय नमः ॥

हे भक्तवत्सला श्रीहरी । कृपा करी रे मजवरी । मी तुझ्या पातलों द्वारीं । विन्मुख मला लावूं नको ॥१॥

ज्यांनी ज्यांनी तुझें दार । पाहिलें आहे आजवर । त्याचा त्याचा उद्धार । केलास कीं रे नारायणा ॥२॥

तो इतिहास आठवावा । गणू न परत पाठवावा । वरदहस्त शिरीं ठेवा । हेंचि आहे मागणे ॥३॥

श्रोते एक समयासी । जाऊं लागला शेगांवासी । कुकाजी कांहीं कामासी । आपुल्या त्या प्रपंचाच्या ॥४॥

तैं महाराज वदले त्यासी । येधवां न जाई शेगांवासी । पडत आहेत बहुवसी । बोराएवढ्या गारा तेथ ॥५॥

घटकाभर थांबून जावें । अगोचरपण ना करावें । निसर्गाला भीत जावे । हाच धर्म मानवाचा ॥६॥

ऐसें ऐकून स्वस्थ बसला । कुकाजी त्या माळाला । तों इतुक्यांत एक आला । शेगांवाहून माणूस ॥७॥

तो म्हणे गोमाजीला । माझा मृत्यु खराच टळला । त्याचें कौतुक आपणाला । काय सांगूं दयानिधे ! ॥८॥

मी गेलों बाजारासी । मंगळवारच्या शेगांवासी । तो घडती झाली गोष्ट ऐशी । ती सर्व परिसा हो ॥९॥

घतकेत व्योमीं । आभाळ आलें । सोसाट्याचे वारे सुटले । लोक पळूं लागले । आपुला जीव वांचविण्या ॥१०॥

बोराएवढ्या गारा । वर्षू लागल्या एकसर । धीर ना निघवे ढोरां । त्यांनीं दावें तोडिलीं ॥११॥

कापड दुकानांची पालें भलीं । व्योमीं पतंगवत उडतीं झालीं । ठाणीं आंतील भिजून गेलीं । त्या वर्षावें गारांच्या ॥१२॥

गुरें वासरें कित्येक मेलीं । मानवा तीच स्थिति आली । बाजाराची राड केली । अवघा बाजार उधळला ॥१३॥

मीही त्यांत सांपडलों । तुमच्या कृपेनें वांचलों । गारा पडतां पळत सुटलो । करीत भजन मुखीं तुमचें ॥१४॥

एखादी कोठेंतरी । बारिक गार अंगावरी । पडूं लागली साजिरी । भोंवताली विशेष ॥१५॥

एक मैलपर्यंत । गारा पडल्या अतोनात । पुढे पहाता आकाशांत । ढग एकही दिसेना ॥१६॥

भयंकर वारे बंद झाले । मंद मंद वाहूं लागले । सूर्याचें तें ऊन पडलें । नागझरीच्या बाजूला ॥१७॥

ही ऐकून माहिती । कुकाजीस वदले गुरुमूर्ती । झाली असती ऐशी स्थिती । तुझीही तेथे गेल्यास ॥१८॥

ऐसे चमत्कार पाहिले । कुकाजीचें प्रेंम जडलें । गोमाजीचे ठायीं भलें । अवर्णनीय विबुधहो ॥१९॥

एके दिवशीं जोडून कर । कुकाजी बैसला समोर । आदरानें मधुरोत्तर । करितां झाला गोमाजीसी ॥२०॥

ही अवघी प्रपंचमाया । ओखटी आहे गुरुराया । सोडवा तिच्यापासूनीया । या आपुल्या अर्भकाते ॥२१॥

जगीं कुणाचें कुणी नाहीं । क्षणिक आहे सर्व कांहीं । अखेर कामा एकही । ये न कीं हो यांतून ॥२२॥

म्हणून प्रपंचाला मिठी । मारुं तरी कशासाठीं । सर्व कांहीं शेवटीं । भूचें भूवरी राहील ॥२३॥

ऐसें वदतां महाराज हंसले । म्हणती उसनें वैराग्य तुला झालें । हें मुळींच नाहीं चांगले । याचा विचार पोक्त करी ॥२४॥

जेवीं वळवाचा पाऊस । ये न कामा पिकास । तो उलट करी नाश । ऐसा न्याय तयाचा ॥२५॥

तैशीच बैराग्याची तर्‍हा । आहे ध्यानीं धरी जरा । जरि साडिलें घरदारा । तरी न तो खरा त्याग ॥२६॥

हें उसनें वैराग्य चित्तांत । क्षणक्षणा उत्पन्न होत । आणि सवेंच कीं विलया जात । ऐशी विचित्र तर्‍हा याची ॥२७॥

चित्तीं उत्पन्न होतां क्षणीं । नकोशी वाटे कामिनी । मुलें माणसें टाकुनी । पाहे भटकत फिरावया ॥२८॥

वैराग्याचें भरांत । कांहीं वेळ तो भटकत । परि तें भटकणें नाहीं टिकत । उसनें होतें म्हणूनी ॥२९॥

वैराग्य ना टिकण्याचें । कारण आहे हेंच साचें । नियमन त्याला इंद्रियांचें । करितां ना आलें येतुलेंही ॥३०॥

म्हणून उसण्या वैराग्यांत । जो चालला असे वहात । अर्थ ना अशा वांचण्यांत । तेंच बुडवी तयाला ॥३१॥

सशास्त्र वैराग्य उपजावें । तें अक्षय चित्तीं रहावें । पूर्ण विचारें पहावें । जगदस्थितीते कुकाजी ॥३२॥

प्रपंचीं ना अर्थ किंचित । हें जरी आहे सत्य । परी तोअमलांत । आणण्याचा हा मार्ग नसे ॥३३॥

ज्या वैराग्याचें बरोबरी । विवेक नुपजेल अंतरीं । तें त्याज्य सर्वतोंपरी । आहे हें विसरुं नको ॥३४॥

नुसता विवेक बापा तोही । फलद्रूप होत नाहीं । सदवासना त्याच्या ठायीं । असली पाहिजे जागृत ॥३५॥

तूं जरी संसार सोडिला । परी न सुटे कदां तुला । तो कधीं ना कधीं पाहिजे केला । या जन्मीं वा अन्य जन्मीं ॥३६॥

पूर्वजन्मींचें पापपुण्य । भोगण्या प्राणी पावे जनन । न सुटे तें भोगल्यावीण । पापपुण्य केव्हांही ॥३७॥

ही नित्याची प्रचिती । आहे अवघ्या लोकांप्रती । येथेच मानव विसरती । त्या भगवत्संकल्पाला ॥३८॥

अगणीत पुण्य करावें तेंव्हा श्रीमंत कुली जन्मावें । पापाचें फल भोगावें । दारिद्र्य अथवा हीन जाती ॥३९॥

जन्म होता मागचे । पापपुण्य सरें साचें । येथें दुमत कोणाचें । होणेंच नाहीं बापा रे ॥४०॥

राजकुलीं जन्मला । तो राजाच होईल महितला । जो मजुराच्या पोटाला । आला तो मजुरी करी ॥४१॥

धनकनकसंपन्न । जे जे का असती जन । त्यांची संतती भोगील चैन । आपुल्या इच्छेप्रमाणे ॥४२॥

मजुरांचीं पोरें खरीं । करुं लागतील मजुरी । जे शेतकर्‍याचे आले उदरीं । ते हांकतील नांगर ॥४३॥

परी ह्या अवघ्या स्थिती । तंतोतंत सारख्या असती । फरक नाहीं तिळरती । तयामाजीं पडणार ॥४४॥

राजे , श्रीमंत , मजुरांचें । व्यापारी भिक्षुक शेतकर्‍यांचें । चित्त निर्विषय झाल्या साचें । सुखदुःख हे नाहीं तया ॥४५॥

पहा जनक भूपती । सुदामा दरिद्रि निश्चिती । परि या दोघांप्रती । समाधान होते सारखे ॥४६॥

जाणिवेच्याठायीं सुख । जाणिवेच्याठायीं दुःख । अवघ्या कल्पना भ्रामक । जाणिवेच्याठायीं उठती ॥४७॥

पहा जाणीव सर्वतोंपरी । आहे की जगणारी । सर्वस्वी त्या नेणिवेवरी । पोक्त याचा विचार करा ॥४८॥

दुःख तेंही भ्रामक । सुख तेंही भ्रामक । प्रत्यक्षाचा अभाव देख । आहे ठायी दोहीच्या ॥४९॥

कडू आहे म्हणून । गोडाचा राही मान । तेवी हें चोरटेपण । साहूपणा टिकविती ॥५०॥

कुकाजी ही सापेक्ष स्थिती । मानवा भ्रमी पाडिती । वासना त्याला सहाय्य करिती । सुखदुःखें भोगावया ॥५१॥

तरी प्रपंचासी टाकून । तूं गेलास निघून । परी बापा तुजलागून । पोट फिरवील दरोदारीं ॥५२॥

तीन दगड ज्याचे घरीं । मांडिले बापा त्याचे द्वारीं । याचकांची गर्दी खरी । होत असे पहा रे ॥५३॥

याचक होऊन उभे राहणें । हे सर्वदा लाजिरवाणें । तें कुकाजी कधी न करणें । प्रपंचभान टाकूं नको ॥५४॥

प्रपंच कैसा करावा । हे मी सांगतों ऐक बरवा । सर्व ठायीं असावा । भाव आपुला समान ॥५५॥

परी व्याख्या समानत्वाची । तारतम्यानें करी साची । पशू आणि मानवाची । जोडी समान मानूं नये ॥५६॥

मानव तोही जीव आहे । पशू तोही जीव आहे । परी दोहोंत फरक आहे । खाणें पिणें वागण्याचा ॥५७॥

मानव अतिथी आल्या घरीं । त्यास घालावी भाकरी । पशूचिया समोरी । पेंडी आणून घालणें ॥५८॥

आय व्यय आपुला । प्रथमतः पाही चांगला । उगीच बळी पडून औदार्यांला । संकट भोगण्या जाऊं नको ॥५९॥

बहीण कांता भावजय । मामी मावशी आणि माय । परी उपयोगाचें कार्य । प्रत्येकाचें निराळें ॥६०॥

कांता ती उपभोगावी । भावजय सौजन्यें सांभाळावी । माय मावशीची करावी । पुत्रापरी सेवा रे ॥६१॥

बहीण आपुली सहोदर । मित्रापरी तिचा आदर । ठेवावा कीं निरंतर । फरक यांत करुं नये ॥६२॥

उगीच कर्जबाजारी । व्हावें न जगामाझारीं । ऐपतीप्रमाणें करी । दानधर्म याचकाला ॥६३॥

संग्रहाचें लक्षण । तळ्यापरी असावें जाण । होऊं न द्यावें अधिक न्यून । तयाठायीं केव्हांही ॥६४॥

बहुतांचें साधेल हित । ऐसें जें का असेल कृत्य । तयालागी सढळ हात । करुन मदत करावी ॥६५॥

स्वजातीचें प्रेम वाहणें । परी दुसर्‍याला ना तुडविणें । शक्य असल्या मदत देणें । ऐपतीप्रमाणें थोडी बहूत ॥६६॥

रक्कम उगी न पडूं द्यावी । ती व्याजीं लावावी । परी जाचक नसावी । व्याजपद्धती बापा रे ॥६७॥

शेत नांगरल्यावांचून । पेरुं नये कदा जाण । शेतीं ठेवावें राखण । शेतीं पीक आल्यावरती ॥६८॥

मळकट वस्त्र नेसूं नये । छानछोकीचें घेऊं नये । अस्थानीं विश्वास ठेवूं नये । कितीही जिवलग वाटला जरी ॥६९॥

सदा सन्मार्गी रत । संतती करावी आपुली खचित । दुष्ट कृतघ्न असल्या जंत । मानावें त्या संततीला ॥७०॥

आप्तवर्ग सोयरे धायरे । त्यांस मानी ऐशा प्रकारें । हें जरी क्षणिक सारें । परी आदर करावा ॥७१॥

जेवीं काष्टें पुरांत । एके ठायीं येती वहात । तैशी प्रपंचप्रवाहांत । ही काष्टें मिळालीं ॥७२॥

जा आतां शेगांवाला । प्रपंच तो करायाला । अहर्निशी बाळा तुला । मी कुकाजी सांभाळीन ॥७३॥

एकदम ना भाग्य येतें । तें हळूहळू वाढतें । जैसें पाणी महानदीते । चढतसे हळूहळू ॥७४॥

दुसर्‍यानें दुखविलें जरी । डाव त्याचा अंतरीं । ठेवूं नये तिळभरी । कृपाच आपण करावी रे ॥७५॥

जैसे का तें चंदन । त्यासमान ठेवी मन । घाव केला म्हणून । चंदन दुर्गंध प्रसवेना ॥७६॥

क्रोधवश होऊं नये । उणे पराचें पाहूं नये । सत्पथाची करुं नये । टवाळी ती केव्हांही ॥७७॥

धर्मश्रद्धा अंतरीं । जागृत असावी बापा खरी । पुण्यकृत्यें निज करीं । करावीं कीं वरचेवर ॥७८॥

परी दंभ तयाचा । वाहूं नये मुळीं साचा । तो वाहिल्या कायमचा । घात होईल बापा रे ॥७९॥

कांतेसी हितगुज करुं नये । परी तिला दुखवूं नये । कोणांत वाकडे आणूं नये । लावालावी करुन ॥८०॥

विश्वासून माझेवर । जा शेगांवा साचार । तेथें लहानशी घागर । तुझ्या घरांत पुरली असे ॥८१॥

ती उत्तरेच्या बाजूला तूं जाऊन काढ तिला । शिक्के सालार रुपयाला । घेई बापा मोजुनी ॥८२॥

आतां नागझरीस न रहावे । शेगांव जवळ करावें दर सोमवारी मात्र यावें । मजलागी भेटावया ॥८३॥

तुझा पठीराखा आहे हरी । दोघे बंधू एक विचारी । असावें की सर्वतोंपरी । फूट न पडो द्या दोघांत ॥८४॥

ऐसें बोलून नारळाचा । प्रसाद त्या दिला साचा । वर्षांव केला कृपेचा । निजदृष्टीनें तयावरी ॥८५॥

कुकाजीच्या समान । कडताजीचें होतें मन । हे केवळ रामलक्ष्मण । बंधू होते विबुधहो ॥८६॥

कुकाजी गेला शेगांवासी । घेऊन आपल्या बंधूसी । बोलल्याप्रमाणें सदनासी । घागर सांपडली तयाला ॥८७॥

रुपये होते एक हजार । श्रोते त्याच भांडवला वर । कुकाजीनें व्यवहार । आपुला की वाढविला ॥८८॥

गृहस्थिति पालटली । हळूहळू त्याची भली । तशीच वाढूं लागलीं । गांवीं मानमान्यता ॥८९॥

शेती सावकारी व्यापार । कुकाजीनें वाढविली फार । बहुतेक गांव कर्जदार । झाला कुकाजी पाटलाचा ॥९०॥

पाटलाचें वैभव पाहून । देशमुख मंडळी झाली खिन्न । ते सारेच मनांतून । द्वेष करिती कुकाजीचा ॥९१॥

पाटील नुसता वतनदार । देशमुख होते जमेदार । पाटलापेक्षां अधिकार । थोर होता तयांचा ॥९२॥

वरचेवरी बोलाचाली । दोघांत होऊं लागली । कुकाजी झाला भाग्यशाली । श्रीगोमाजीच्या कृपेनें ॥९३॥

त्या निरर्थक कटकटीला । कुकाजी तो त्रासून गेला । अखेर येऊन गोमाजींला । करिता झाला निवेदन ॥९४॥

आपल्या कृपेनें चांगलें । माझें जें कां असें झालें । तेंच खुपूं लागलें । शेगांवीच्या जमेदारा ॥९५॥

म्हणून वाटते पहिल्यापरी । सोडूं नये नागझरी । येथें भाजीभाकरी । मिळेल ती खाऊं हो ॥९६॥

वागणें मिळून मिसळून । मला समर्था आहे मान्य । परीं ते देशमुखांकारण । पटत नसे काय करुं ? ॥९७॥

गोमाजी तें ऐकून । बोलते झाले त्याकारण । वेड्या अजून तुझें मन । खंबीर नाहीं जाहलें ॥९८॥

एक हरी बळकट धरी । म्हणजे तुला कोणी न वैरी । रहील या भूमिवरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९९॥

एके ठायीं असल्यावर । भांड्यास भांडे वरच्यावर । आहे कीं लागणार । त्याचा विचार करुं नको ॥१००॥

ढेकणाच्या त्रासानीं । बिछाना कां सोडी कोणी । घूस घरा लागे म्हणूनी । काय सदन सोडावें ? ॥१०१॥

मूळ पापांत संपत्तीचें । तें न सोवळें व्हावयाचें । परी टिकणें धनाचें । होत योगें पुण्याच्या ॥२॥

तुला सामान्य सिद्धान्त । सांगतों मी आज येथ । तें पूर्ण ध्यानांत । ठेवून वर्तन करावें ॥३॥

जुवा जुगार खेळूं नये । लुच्च्या सौद्यांत बसूं नये । लुच्च्यांची संगत धरुं नये । कांहीं केल्या ॥४॥

संत साधू सज्जनांची । संगत आदरें धरणें साची । दुष्ट दुर्जन नास्तिकांची । साउलीही घेऊं नये ॥५॥

मागचा पुढचा विचार । करुन करावा व्यापार । सर्व कृत्यें वेळेवर । शेंतकीचीं करावीं ॥६॥

नास्तिक ज्ञान ऐंकूं नयें । भावभक्तीस सोडूं नये । चोरासंगती जाऊं नये । प्रवासास केव्हाही ॥७॥

राजकृपा संपादावी । परि न शाश्वती धरावी । निदास्तुतीनें न होऊं द्यावी । चित्ताची ती चलबिचल ॥८॥

यश , लौकिक संपत्ती । ही मिळेल तुजप्रति । कडताजीला संतती । होईल वंश चालवावया ॥९॥

एक विचारें दोघे रहा । हरीभक्तीची मजा पहा । वैदर्भदेशीं तुमची चहा । होईल की रे सर्वत्र ॥११०॥

सांसर्गिक पापें सारीं जाया युक्ति ही खरी । धरा पंढरीची वारी । म्हणजे सर्व साधेल ॥११॥

चंद्रभागे केल्या स्नान । दोष पळती रानोरान । ऐसें आहे एक वचन । श्रीतुकाराम साधूचें ॥१२॥

पंढरीच्या वारीस । दृढ पाहिजे विश्वास । तेथें केल्या तर्कटास । क्षीण मात्र पदरीं पडे ॥१३॥

श्रद्धायुक्त वारी । जो जो मानव करी । तयाला तो श्रीहरी । क्षणभरही उपेक्षीना ॥१४

दांभिकपणें केल्या वारी । रौरवाची प्रप्ती खरी । थोडाबहूत भूमिवरी । जरी वाढला मान त्याचा ॥१५॥

तो मान त्याचा नव्हे । तो वारीचा आहे पाहे । नर्काडी ती झाकली जाये । शालजोडीच्या खालीं पहा ॥१६॥

वारी ही शालजोडी । वर्तन त्याचे नर्काडी । जेव्हा ती होईल उघडी । तेव्हा न कोणी चहाती तिला ॥१७॥

तैसाच हा प्रकार । दांभिकाचा साचार । वारी वस्त्र अंगावर । घेऊन तो वावरतसे ॥१८॥

परी त्या वस्त्राखालीं काय । हें जाणें एक पंढरीराय । शुद्ध वर्तनें धरणें पाय । पांडुरंगाचें हेंच बरें ॥१९॥

अशा भक्तांचा परिहार । मागील होय साचार । पुढें ना शीण होणार । भाविकाला केव्हांही ॥१२०॥

पुण्य जन्मजन्मींचें फळास आले ज्याचें । तयालाच पंढरीचें । प्रेम उपजले विबुधहो ॥२१॥

तें प्रेम उपजलेलें । सदवर्तन टिकवी भलें । म्हणजे तुझे कार्य झालें । हे वत्सा कुकाजी ॥२२॥

जा आतां शेगांवासी । न भ्यावें कटकटीसी । सोसाट्याचे वार्‍यासी । वृक्ष मोठा न डगमगे ॥२३॥

ऐसें भाषण ऐकून । कुकाजी भावास घेऊन । गेला शेगांवाकारण । आनंदीत वृत्तींनें ॥२४॥

ही दासगणू वर्णित कथा । नाहीं गप्पेचा खचित गाथा । विश्वास ठेवूनिया वरता । अनुभवाची वाट पहाणें ॥१२५॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP