श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय नववा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुभ्योनमः । ॐनमो सदगुरु परमपुरुषा । पूर्णानंदा प्रेमपूर निवासा । अहंमल विध्वंसा । चिद्विलासा दयाळा ॥१॥

दंभमणी रगडून पायातळी । सुखी करिसी द्विज मंडळी । पूर्ण अवतरुन महितळी । प्रेम देसी निजजना ॥२॥

सदवृत्ती घृतमारी करे । इतर दानवाचा करिसी संव्हारा । सप्तकोटी महाजगर । करत राहती उगेउगे ॥३॥

तव विश्व भजन कवडी माळा । तव भक्त घालुन निजगळा । स्वानंद सेविती चरणकमळा । सुख कल्लोळी प्रेममूर्ती ॥४॥

ज्ञानभंडारा लाऊनी भाळी । देहत्रयाची उचलती तळी । अनुहात श्रवणाची आरोळी । देऊन नाचती निजछंदी ॥५॥

अष्टभावाचे ते अष्टतीर्थ । निमज्जुनी भक्तजन आर्त । शरण येता तीभावे परमार्थ । तयांचा होसी कैवारी ॥६॥

चढून तू स्वबोध तुरंग । शांती म्हाळसा घेऊन वामांग । चिरकाळ राहशि माझ्या अंतरंग । तू निज प्रेमरंगी मज रंगविशी ॥७॥

प्राप्त होता प्रेम तुझे । चरित्र पुढे चालले सहजे । सहजानंदा विश्वबीजे । विश्वपालका विश्वात्मा ॥८॥

अष्टमोध्यायीचे निरुपण । पूर्णानंद करुन दिधले कन्यादान । स्वानंदयुक्त गुरुसन्निधान । बापुशास्त्रीस ते वेळी ॥९॥

लग्न जाल्यानंतर । पूर्णानंद राहिले एक संवत्सर । तेव्हा सदगुरु माहेर । पूर्णानंदाप्रती आज्ञापिती ॥१०॥

पूर्णानंदा ज्ञानखाणी । तुझ्या दैवास कोण वाखाणी । ब्रह्म सुखाची शिराणी । पूर्ण भोगिसी स्वानंदे ॥११॥

धन्य धन्य तुझे भाग्य । धन्य धन्यरे तुझे वैराग्य । तुलाच लाभले हे श्लाघ्य । इतरास हे सुख नातुडे ॥१२॥

तुझी दृष्टी ज्यावरी पडे । तत्काळ त्याचे पातक झडे । ब्रह्मज्ञान होय रोकडे । ऐसा तुझा अधिकार ॥१३॥

अधिकार अनाधिकार । न करिता याचा विचार । सहज तारिसी निर्धार । शरणमात्रे भक्ताशी ॥१४॥

लौकिकाची तुज नसे चाड । रस विरहित तु निजस्वरुपी निविड । स्वानंद सुखाची तुज आवड । नावडे इहपर भोग कांहीही ॥१५॥

अगाध की रे भाव । अगाध की रे प्रेम वैभव । भक्तिपाशी घालूनि मज । कारे ओढिसी भक्तिबळे ॥१६॥

सुटता तुझे प्रेमशर । भेदीत गेले ह्रदयमंदिर । ते शर नव्हे अनन्य प्रशर । सप्रेम रत्नी घालिसी ॥१७॥

कंठी घालिशी स्नेह संभार । मकरंद सुटला त्याचा अपार । ते साठवे ह्रदयागार । तरी संग्राहक शक्ति विरघळली ॥१८॥

देऊन आपुले प्रेम अनमोल । मज विकत घेतले । तुज पासूनि निराळे । सुटका आता मज कैंची ॥१९॥

का रे उघडून प्रेममांदुस । त्यामाजी मज साठविलास । त्याची किल्ली तुझ्या अनन्यपणी समरस । केवी सापडली सांग तान्हया ॥२०॥

त्या प्रेमाचा व्यूह रचून । त्यात का कोंडिलास रे मजला नेऊन । त्यातुनि नसे मज मोचन । हे काय उचित रे शिष्यराया ॥२१॥

येता तुझे प्रेमलोट । वाहात चालिले प्रवाही सुभट । वरती तुझे प्रेम अवीट । तेणे माझी वाट ही मोडिली असे ॥२२॥

काय घातलासी ही जीवन मोहनी । तेणे झालो मी तुझ्या स्वाधीनी । हेही नकळे मजलागुनी । ही विद्या तुज कैसी मिळाली ॥२३॥

प्रेमरसा पासुन मजशी । का रे त्वां मात विलासी । यापरि करणे तुजसी । योग्य काय शिष्योत्तमा ॥२४॥

माझा निजबोध समूद्र । त्याचा आल्हाद कारका तू पूर्णचंद्र । चंद्रास असे कलंक अभद्र । तू निष्कळं की रे पूर्णावगाहनी ॥२५॥

मी त्रिकर्ण पूर्वक । विकिलो असे देखा । तुज न देखता क्षण एका । ते युगसमान मजला होतसे ॥२६॥

जेव्हा तू जाशी देशाकडे । माझे चित्त वाहते तिकडे । ऐसे मजला करुन वेडे । का ठेविलास प्रेममूर्ती ॥२७॥

तुज पाहता प्रेममूर्ती । हर्ष न माये माझे चित्ती । निजसुखाच निरंजन चरिती । सुखमय मजला तू खेळविशी ॥२८॥

याव्वज्जन्म तुझे वय । तू वेचिलास कीरे गुरुकार्य । तुझ्या सेवेचा निर्णय । कोण्या शास्त्री होईल ॥२९॥

शास्त्री असे खटपट । तुझी सेवा ती चोखट । चोखटामाजी वैकुंठपीठ । सहजासहज पै भेटते ॥३०॥

आता तू राहसी ज्याधामी । त्यापुढे हे वैकुंठ शून्य उघडे संभ्रमी । मायामय जाणून सद्धर्मी । या धामा इच्छिती ब्रह्मादिक ॥३१॥

ऐसी चोखट करुनी सेवा । मजला जिंकिलासी सावेवा । या सेवेच्या वैभवा । उत्तीर्ण मजला होता नये ॥३२॥

तू म्हणशी आपण गुरु समर्थ । आपुले योगे जाहलो कृतार्थ । ऐसीच दशा माझी येथ । यातूनि अन्य उपाय मज नाही ॥३३॥

तुझ्या उपकाराच्या ओझे । विरुनि गेलो आंतरी निजे । केवी फेडू म्हणून विच्यार मनी उपजे । चिंता पडली भक्तोत्तमा ॥३४॥

सेवोदक डोही उत्कृष्ट । त्यात बुडोनि गेलो अफाट । वरती निघता नये स्पष्ट । मजला मार्ग कांही दिसेना ॥३५॥

तुझ्या सेवेचा मेरु पर्वत । चढून बैसलो येथ । खाली उतरण्या असमर्थ । अंगी बळ कांही दिसेना ॥३६॥

गुरुकृपेचे फळ । तुजसी मिळाले असे पूर्ण निर्मळ । तू निजानंदी अढळ । शिष्य शिखामणी सर्वज्ञा ॥३७॥

तू ज्यापरि केलासि सेवा । मजला तदनुसार वागून घेसी आघवा । तरीच कांही वाट भेटेल पाहावा । तुझे सेवेतची गुंतलो ॥३८॥

यापरि वदती कृपाघन । सदगुरुराज माऊली आपण । ते प्रेमभूषण सर्वांगी लेवून । बोले काय पूर्णानंद ॥३९॥

जयजय सदगुरु उदारा । ब्रह्मानंदा परात्परा । पूर्ण ब्रह्माद्वया साकारा । मजकरिता आपण साकार जाहला कीं ॥४०॥

मी पामराहूनी पामर । आपले चरणीच्या पादुका शिरावर । पादुकांचा जो अधिकार । तदनुसार आज्ञा व्हावी ॥४१॥

पायपोशास देऊनी रंग । जरी घडविले चांग । तरी त्याचे जिणे पाद तळांग । त्यावीण त्याला स्थान नसे ॥४२॥

आपुल्या पादुकेची योग्यता । मज नसे जी समर्था । आपण कृपाळु कृतार्थ भक्ता । मज दीनासी उध्दारिले ॥४३॥

रंकासी राव पण । पाप्यासी इंद्र सिंहासन । देसी मजला उदार पूर्ण । सामर्थ्य आपुले असे गुरुवर्या ॥४४॥

आपण निर्गुण निराकार । सच्चिदानंद सर्वेश्वर । मज पामरालागी साकार । होऊनी तारिले हे दयाघना ॥४५॥

माझे अवखळ जीवपण । दीधले त्याला शिवपण । शेवटी जीवशिव भेद ग्रासुन । पूर्णब्रह्मी पै साठविले ॥४६॥

आपण असता ब्रह्मानंद । मजहि केले पूर्णानंद । संपूर्ण ग्रासुनी द्वंदाद्वंद । सच्चिदानंदी पद दिले ॥४७॥

केला हा ही शब्द बोल । बोलच जाहले अबोल । अबोलाचे मौन बोल । कवण्यामुखी बोलावे ॥४८॥

सर्वस्व आपण माझे माहेर । चरणी ठेवावे मज निरंतर । पादुका वाहूनी निर्धार । पडोनि राहीन महाद्वारी ॥४९॥

वारी करिता तुझ्या चरणि । पार तरलो भवसिंधु याक्षणी । चुकवुनी यमयातना जन्ममरणी । पायीच स्थान मज राहो ॥५०॥

ऐकोनि पूर्णानंद वचन । सदगुरु काय बोले संतोषून । आपुले जीविची खुण । ते ऐकावे भाविक हो ॥५१॥

अरे पूर्णानंदा सांगतो तुज । माझे जीविचे जे निजगुज । तू ऐकता सहज । फिटेल संशय चित्ताचे ॥५२॥

पूर्वी अवतरले शंकराचार्य । जे मूर्तीमंत शिवराय । तेची भाषा मराठी निश्चय । ओळखी खूण मनी वाही ॥५३॥

त्यांनी केले जे जे ग्रंथ । लोकास नकळे गभीरार्थ । त्याचा शुध्द वेदार्थ । प्राकृती जनासी बोलेन मी ॥५४॥

यास्तव ते त्या ग्रंथार्था । वदेन भाषे प्राकृता । पुनरपि अवतार निश्चिता । घेणे असे मजलागी ॥५५॥

आता या देहाची समाप्ती । गुरुचरणी अर्पीन निश्चिती । येईन तुझ्या उदाराप्रती । जाण निश्चये शिष्यराया ॥५६॥

आता तुम्ही करावे प्रयाण । लक्ष्मीचे गर्भी अवतरुन । ते उदर नोहे कैलास भुवन । येईन सत्य निर्धारे ॥५७॥

लक्ष्मीस होईल ऋतु प्राप्त । वाटेत जाण यथार्थ । त्याचे चौथे दिवशी देह समाप्त । अर्पीन विश्वनाथ तीर्थत्वी ॥५८॥

तिथी वार नक्षत्रे । लिहून दिधले स्वकरे । खूणही दाविली पवित्रे । शिशुस ह्रदयीवत्स लांछनपद्म दिसतील तू पाही ॥५९॥

पूर्ण गुणयुक्त पुत्र । पाहसी जेंव्हा निजनेत्र । मीच म्हणून सुखसूत्र । ओळखी देईन तुझ्यामनी ॥६०॥

आता तुम्ही इकडे न यावे । आपुले ग्रामीही न रहावे । कल्याण ग्रामी वसावे । जे गुरुस्थान माझे निर्धारा ॥६१॥

गुरुस्थान तीच काशी । गुरुतीर्थ तीच वाराणशी । तेथेच तू करुन मिराशी । स्वानंदे रहावे चिरकाळ ॥६२॥

कल्याणी असे सदानंद । कल्याणी विराजे सहजानंद । कल्याणी राहता पूर्णानंद । पूर्णानंद वंदू चरणे पदोपदी ॥६३॥

सहजानंद पीठीर्दोन । सेवा वाहिली आजवरी प्रमाण । एके चाळीसावे प्रथम पद गहन । दूजेसाठी मठि समाधिले ॥६४॥

ऐकता देशिक वचन । कळवळिले पूर्णानंदांचे मन । ही वचन नव्हे विषमंथन । करविले कोणी अवचित ॥६५॥

किंवा वाग्वा वज्र प्रहार । मस्तकी केले अनावर । तेणे जीवन जर्जर । दुःखविले अमृत घटासी ॥६६॥

यापरि पूर्णानंदा प्रती । मनी दुखविले ही वचनोक्ति । पुढे बोलण्याची मती । खुंटित जाली ते काळी ॥६७॥

कंठ जाला सदगदित । नेत्री होतसे अश्रुपात । मुखी न निघे मात । चित्री प्रतिमेपरी स्तब्ध पै जाले ॥६८॥

नेत्री भरुन चालिले जळ । मुखकमल ते कोमाईले सकळ । मग बोले काय धैर्यबळ । ते ऐकावे एकाग्र चित्ते ॥६९॥

जयजय सदगुरु करुणासागरा । आपुले वचनांशी भेदून गेले ह्रदयमंदिरा । काढीता न निघे माघारा । मी अंतरामाजी भारावलो ॥७०॥

आपण होता स्वस्वरुपी लीन । मज रहायचे काय कारण । आपुले आधी हा प्राण । जाईल जाण गुरुवर्या ॥७१॥

प्राण गेलिया कलेवरा । कसे राहील भवी निर्धारा । आपुले वाचुनी या शरीरा । न राहणेजी समर्था ॥७२॥

जळ आटता मीन । कोण राखेल त्याचा प्राण । स्वामी वाचून जीणे शून्य । मज कदाकाळी राहवेना ॥७३॥

आपण माझे प्राणाचे निजप्राण । आपण माझ्या जीवीचे निजजीवन । माझ्या ह्रदय भुवनी आपण प्रकाशधन । आंतरज्योती जी समर्था ॥७४॥

आपण केलिया देह समाप्ती । माझे राहणे कोण पुरुषार्थी । यास्तव माझे चित्त आता थरथरती । ते केवी राहू स्वामिया ॥७५॥

माझे उर्वरित आयुष्य । अर्पण असे स्वामीस । कृतार्थ करुनी दीनास । अंगिकारावी जी याक्षणी ॥७६॥

उदकी विरे लवण । त्यापरी स्वामी चरणी हे जीवन । मी होईन लीन । हीच आवडी ममचित्ती ॥७७॥

यदर्थ अन्यथा करीन भाषण । माझे मस्तक होईल शतचूर्ण । हे सत्य सत्य माझे वचन । जाणावे जी सदगुरुनाथा ॥७८॥

परिसता शिष्याचे निर्वाण वचन । बोले काय सदगुरु आपण । पूर्णानंदा तुझे सत्य वचन । कल्पांतीही अन्यथा नव्हेचि ॥७९॥

आता जे बोलिलास वचन । सत्य प्रतिज्ञा करुन । भविष्यही वहील जाण । पुढे प्रचिती येईल ॥८०॥

आता न करावी खंती । चित्ती ठेवावी परमपद विश्रांती । तुज मज वियोग निश्चिती । कदाकाळी असेना ॥८१॥

आधी सुवर्णाचे मुकुट केले । तेच मोडून कंकण घडविले । दोन्ही आकार सुवर्णी घडले । हेमी तुटेल काय मोल पाही ॥८२॥

तेवी आधी मिरविले गुरुपण । पुढे चालवितो पुत्रपण । यात काय असे दूषण । सांग मजला शिष्यराया ॥८३॥

ज्यास मुळीच नाही जन्म । त्यास मरणाचा काय भ्रम । जे काशीक्षेत्र तेच गुरुक्षेत्र उत्तम । काहीच नसे यात अन्यथा ॥८४॥

तुझे उदरी होऊन पुत्र । सहजानंद कृपे राहीन गुरुक्षेत्र । मी श्रीशांकरीय सेवेत अहोरात्र । जीवनी सेवा परिवाहो ॥८५॥

नित्ययोग असता अनन्य । कासया खेद वाहसी नगन्य । श्रीसदानन्द कृपा असे धन्य । त्याच्या सेवे रमावे ॥८६॥

तू म्हणशी हा देह होता समाप्त । पुनरपि केवी येईल पाहण्यात । हे बोलणे उचित । तुझे कैसे सांगावे ॥८७॥

जीर्ण वस्त्र त्यागून नूतन । परिधान करिती नाना आभूषण । किंवा ठेविता जीर्ण । सांग मजला प्राणसखया ॥८८॥

यास्तव न करता खंती । प्रयाण करावे सत्वर गती । मी येईन तुमच्या उदराप्रती । दावीन संपूर्ण पुत्रधर्म ॥८९॥

एकचि नट वेष घेतो अनेक । त्यापरी जाण सम्यक । येणे जाणे मज नसे देखा । अज अक्षय शाश्वत मी ॥९०॥

यापरि बोलत बोधवचन । सदगुरु स्वानंदघन । वाटले सर्वांग समाधान । पूर्णानंद शिष्यासी ॥९१॥

पुढील कथेचे कौतुक । पूर्णानंद गुरुसी देख । विज्ञापना करतील वंदूनि हरिख । ते परिसावे स्वानंदे ॥९२॥

हे चरित्र पूर्ण सदगुरु । श्रवणरुपी शरण येता निर्धारु । करुन ब्रह्म साक्षात्कारु । स्वनंद धाम देतसे ॥९३॥

यास्तव तुम्ही श्रोते सज्जन । या सदगुरुचे चरण रज जाण । मज प्राप्त व्हावे ऐसे आशिर्वचन । द्यावे म्हणतसे हनुमदात्मज ॥९४॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । नवमोध्याय गोडहा ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP