श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय दुसरा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीम्हाळसाकांताय नमः । जय जय सदगुरु पूर्णानंदा । कल्याण निवासी सहजानंदा । शरण येता पादारविंदा । द्वंद्व दुष्काळ सहज हरसी ॥१॥

त्याचे द्वंद दुष्काळ टळे । अद्वय सुखाचे करिसी सुकाळे । नमन मात्रेची सुख कल्लोळे । देसी दयाळु सदगुरुवर्या ॥२॥

निज कल्याणी करुनी मिराशी । सर्वांतरी तूच राहसी । सहजानंद कृपा विशेषी । सिध्दांत पुरविशी वरांशे ॥३॥

तुजपाशी नसे पंचांग । तरी उकलूनि दाविशी पांचही अंग । वितळऊनि तूची विश्वालिंग । भक्त प्रसादार्थ नटलासी ॥४॥

अभिनव ऐसा ग्रामजोशी । एकचि लग्नांश सर्व साधीशी । नोवरीसह मिरवितोशी दशदिशी । परमानंद भक्तादर्शनिये ॥५॥

तुज म्हणता सिध्दांती । सिध्दांतासी न कळे तुझी गती । वेदांता परते परंज्योति । सहजानंदा सर्वेशा ॥६॥

यापरि तुझा हा सिध्द सिद्धांतयोग । उकलुनि माझे अंतरंगिय विभाग । पूर्ण भरुनि कृपातरंग । तुझे चरित्र तूची बोलविशी ॥७॥

प्रथमाध्यायी निरुपण । लग्न समारंभाचे संभाषण । ग्रहस्थे करीत दिक्षीता लागोन । ती कथा परिसलेती सप्रेमे ॥८॥

आता पुढील कथेचे अनुसंधान । पूर्णानंद स्वरुपी श्रोते आपण । स्वये परिसोत एकाग्रमन । आपुले चरित्र आपणचि ॥९॥

असो ग्रहस्थाचि प्रार्थना ऐकोन । दीक्षित बोले काय संतोषोन । आम्ही केवळ वैदिक ब्राह्मण । आपण श्रीयांशी भाग्यवंत व्यावहारिक ॥१०॥

आपुल्याशी समानता । आंम्हास कैसे वाहण्या घडेल यथावता । यालागी चिंत्ती चिंतेची व्यग्रता । व्यवहारी समानता मज न दिसे ॥११॥

परिसोनी दीक्षिताचे वचन । बोले काय ग्रहस्थ सहजपण । आपण साक्षात वेदोनारायण । आम्हीं पामर सामान्य जाणिजे ॥१२॥

जेथे लक्ष्मी -नारायणाचा संयोग । तेथ चिंतेचा काय उपयोग । सकळ सिध्दीचा संयोग । आपुले आपण पडतील ते ॥१३॥

आपण कांही चिंता न कीजे । आमुचे विनंतीस मान्यता दीजे । सकळ साहित्य सहजे । धाडूनि देईल श्रीहरी ॥१४॥

याप्रकारे बोलोन । स्वयंवराचे साहित्य जाण । आपुले अधिकारा अनुसरण । करविला पै जाणावे ॥१५॥

आपुले घरी मंडप उभे केले । तदनुसार त्याचे घरीही करविले । सकळ साहित्य पाठविले । कारकुना समवेत कीं ॥१६॥

परवा सुवेळ सुलग्न । आंम्ही नेमिलासे जाण । पुत्रासह मंगलस्नान । करुनि देवता प्रतिष्ठिजे ॥१७॥

याप्रकारे सांगून पाठविता । दीक्षिते पुत्र भार्या सहिता । मंगलस्नान करुनि कुळदैवता । प्रतिष्ठापना पै केली ॥१८॥

दुसरे दिवशी सीमांत पूजा । यथासांग केलीसे ग्रहस्थे सहजा । त्या समयी फार प्रजा । उत्साहार्थ मिळालेती ॥१९॥

तिसरे दिवशी सालंकृत कन्यादाना । करुनि लक्ष्मी अर्पिली नारायणा ॥ ॐ पुण्याहं वचने चरणा । ऐक्यलग्न श्रीपरिमंगल वर्धिले ॥२०॥

च्यारी दिवस पर्यंत । समारंभ जाहाला यथास्थित । संभावनादि समस्त । ब्राह्मणालागी पै दीधले ॥२१॥

आंदण दिल्हे अपार । यथाप्रकारी लग्नानंतर । दीक्षितास राहविले एक संवत्सर । कुटुंबासह वर्तमानांशी ॥२२॥

मग दीक्षित काय बोले । आम्हांस फार दिवस जाहाले । कनिष्ठ बंधूच्या भेटण्यासी इच्छिले । प्रयाण देशास करणे असे ॥२३॥

आपुले जामात नारायण । यासी ठेवीजे आपुल्या संन्निधान । आंम्ही आपुले कुटुंब घेवोन । ग्रामाकडे मार्गा अनुसरतो ॥२४॥

मग ग्रहस्थ काय बोलिला । नारायणास येथ ठेविला । तरी विद्याभ्यास त्याजला । कोण्या प्रकारे होईल ॥२५॥

उभय पक्षीचे भूषण । त्यास व्हावी विद्या संपूर्ण । सांगणार पाहिजे सांतःकरण । तरीच विद्या येईल ॥२६॥

आपण समागमे न्यावे । संपूर्ण विद्याशि शिकवावे । पाहिजे तरी लक्ष्मीसी न्यावे । समागमे आपुलिया ॥२७॥

आता ही वस्तु आपुली जाहाली । बाळपण पर्यंत येथे राहिली । मग प्रौढ दशेस तरी धाडीली । पाहिजे कीं श्वशुरा घरा ॥२८॥

ऐसे ऐकता वचन । मग लक्ष्मी सहित नारायण । दीक्षित समागमे घेवोन । येवोन पोंचले स्वग्रामा ॥२९॥

बंधूस भेटून दीक्षित । वर्तमान सांगितला साद्यंत । नारायणाचे लग्न । यथास्थित जाहाले रे बंधुराया ॥३०॥

ऐकताच हे वर्तमान । गहिवरे न साठवे तया लागुन । संतोषोन काय बोले वचन । आमुचे कुळी सौभाग्यश्री ही उदयलीसे ॥३१॥

या नारायणा कडून । आमुचे कुळासी दशा आत्मी पूर्ण । दिवसेंदिवस जाण । चढेल ऐसेची ऐश्वर्यता ॥३२॥

येणे प्रकारे बोलोन वचन । उभयता बंधू हर्षयुक्त परिपूर्ण । त्याच्या विद्येची चिंता चित्ती धरुन । अध्यायनाशी आरंभीले ॥३३॥

सप्तवर्ष न होता जाण । ग्रंथत्रय प्राप्त झाले तया लागुन । कांहीच सायास न करिता पूर्ण । पंचग्रंथी पै जाहले ॥३४॥

याउपरी दीक्षिताचे मनी । इच्छा जाली जावे महायात्रे लागुनि । ऐसे चित्ती चिंतुनि । बंधुलागी काय बोले ॥३५॥

आपुली आज्ञा जालिया जाण । मी प्रयाण करितो यात्रे लागुन । जवळी घेऊनी नारायण । विद्याभ्यास सारावे कीं ॥३६॥

याप्रकारे बोलोन त्यासी । समागमे घेवोन कुटुंबासी । निघाले महायात्रेसी । मार्ग क्रमीत ते चालले ॥३७॥

मग पोहोचून काशीपुरा । विधीयुक्त करुन यात्रा । तीनवर्ष पर्यंत त्यानगरा । वास्तव्य करुन राहिले ॥३८॥

तेथे होते महाराज ब्रह्मानंद । पूर्णब्रह्म आनंदकंद । तो सांप्रदायिक सहजानंद । समाधी ज्याची कल्याणी ॥३९॥

श्रीबिंदु माधव मंदीर । त्यालगत आनंदमठ परिसर । त्या मंदिरासह सेविती विश्वेश्वर । काशिक्षेत्रि पुरातन ॥४०॥

पूर्वापार पीठांकिता । सहजानंद प्रथम पीठस्था । त्याची समाधी काशीत । एकेचाळीसाव्या पीठांकित ॥४१॥

आनंदाम्नाय आनंदमठक्षेत्र । काशिस्थली मान्य सर्वत्र । त्या सेवेत ब्रम्हानंद विव्ददसत्र । नित्यसेवा परिवहती ॥४२॥

तिम्मण दीक्षित । पारंपरी कल्याणा पीठा सेवित । प्रतिवर्षी यात्रा वाहात । गुरुपीठी महनीय ॥४३॥

त्यांचाची हा मठ पाहुनी श्रद्धेनी । सत्समागमांशासी जाणुनी । सदा सतश्रवण समाधानी । दीक्षित राहिले त्याठायी ॥४४॥

इकडिल व्यवस्था समाचारी । लक्ष्मीस पाठविले माहेरी । नारायण पितृव्य आज्ञाप्रमाण स्थीरी । राहुन विद्या अभ्यासिति ॥४५॥

नारायणाची सेवा पाहुनी । पितृव्याचा आशिर्वाद पूर्णी । होतसे या बाळा लागुनि । पाहुति समाधान चुलतीसी न वाटे ॥४६॥

आधीच हा बुध्दिवंत । आणि सासरा मिळाला भाग्यवंत । आता याची कीर्ति अदभूत । होईल लोका माझारी ॥४७॥

ऐसे भेद कल्पुनि चित्ती । किरकिर मांडिली नारायणा प्रति । ऐसे होताच त्याची वृत्ती । असमाधानता वाढली ॥४८॥

हे वास्तव्य चुलत्या लागुन । बोलता न ये ऐसे जाणून । आपुले मनीच खेद मानुन । राहता जहाला त्याकाळी ॥४९॥

ऐसा रहात असता । तेथे एक ग्रहस्थ अवचिता । महागाव वोहळ समीपता । डेरा देऊनि उतरला ॥५०॥

अग्रोदका करिता । नारायण त्या ओहळास येता । पाहुनिया त्या ग्रहस्था । डेरेमाजी प्रवेशला ॥५१॥

मुल तेजस्वी दैदिप्यमान । आणि वय पाहुनि लहान । ग्रहस्थे मुला लागुन । हर्षयुक्त पुसतसे ॥५२॥

तू कवणाचा कोण आहेसी । तुज पाहताच मानसी । माझी वृत्ती उल्हासी । कवण्या कारणी पै वाटत ॥५३॥

तू वैदिक कि व्यापारी । तुझा पिता कोण निर्धारी । तू राहतोस कवण्या ग्रामांतरी । सांग लवकरी याकाळी ॥५४॥

ग्रहस्थाचे वचन ऐकोन । त्यासी बोलिले प्रतीवचन । आमुचा जन्म वैदिकाचे उदरी जाण । विद्या विधानी घातले श्रीहरी ॥५५॥

येरु म्हणे अध्ययन कांही । येत असलिया पाही । या स्नान संध्येचे समयी । आरंभ आता पै कीजे ॥५६॥

मग यातिक्रम ब्राह्मण आदि करुन । वर्ग दोन वर्ग अध्ययन । करुन ग्रहस्थास जाण । तोषविले ते काळी ॥५७॥

मग नारायण पुसे त्यासी । आपुले येणे या देशासी । कोणत्या प्रयोजनांशी । ते सांगावे कृपा करुनि ॥५८॥

ग्रहस्थ म्हणे आंम्हास । जाणे आहे महायात्रेस । म्हणून या देशास । आमुचे येणे पै जाहाले ॥५९॥

माहायात्रेची गोष्ट ऐकता कानी । मातापित्यासी आठऊनि मनी । काय बोले ग्रहस्था लागुनी । नम्र मधुर दृढ बोली ॥६०॥

पुण्य प्रबळ माहयात्रीय विधी विधानांशी । जोडाल श्रीहरिकृपे तीर्थीय दानधर्मांग विशेषी । तयातही द्विगुण लाभ जोडला सहधर्माशी । कोणत्या रीतीस स्वीकाराल ॥६१॥

आपणास एक यात्रेचे फळ । किंवा पाहिजे दोन यात्रेचे फळ निश्चळ । ऐसे वदता बाळ बोल । अर्थ त्यासी न उमजे ॥६२॥

तेणे ग्रहस्थ बोले बाळासी । दोन यात्रेचे फळ लाभ कैसी । ते सांगावे विस्तार विशेषी । तरीच आम्हां कळेल ॥६३॥

येरु म्हणे माझे मातापिता । गेले महायात्रार्थकी तत्वता । त्याचे भेटीची मनी चिंता । मज बाळामनी लागली असे ॥६४॥

आपण जाता अनायासी । मजही न्यावे समागमे ब्राह्मणासी । मी वंदीन पितृ चरणासी । वास्तव्य चित्ती निवेदु ॥६५॥

नेऊनि मज अनाथ बाळा । दावाल पितरांचे चरणकमळा । तरी दोन यात्रेच्या फळा । प्राप्त होईल निर्धारेची ॥६६॥

मी बाळ केवळ दुर्बळ । मज नाही स्वारी अनुकूल । आपणापासी आहे अनुकूल पुष्कळ । मजला समागमे पै न्यावे ॥६७॥

मग त्यासी काय बोलिले । तुमचे कोण आहे वडील । तयांनी येऊन मज जरी सांगितले । तरी समागमे मग तुंम्हा नेऊ ॥६८॥

नारायण बोले हर्षयुक्त । वडिलासी आणतो येथ । त्यांनी बोललिया आपणास । समागमे मज न्यावे ॥६९॥

ऐसे बोलुनि तयेवेळी । उदकपात्र घेऊनि जवळी । घरासी येऊनि तात्काळी । अग्रोदक दीधलेसे ॥७०॥

पितृव्य पुसे तयास । कारे इतुका उशीर जाहलासे तुंम्हास । कारण काय आंम्हास । सांग झडकरी ये काळी ॥७१॥

मग येरु म्हणे वोहळात । लोक उतरले असे तेथ । बहुत लोकांची दाटणी होत । यास्तव उशीर पै जाहाला ॥७२॥

याप्रकारे बोलोन त्यासी । मंत्रा वाचित बैसला त्यापासी । होताच तीन प्रहर निशी । चुलता उठवी वाचाया ॥७३॥

मग याने काय केले । समागमे पुस्तक घेतले । शौचा निमित्त बाहेर निघाले । येऊन पोहचले ग्रहस्था जवळी ॥७४॥

ग्रहस्थ करुनि सिध्दता । तेथुन पुढे निघाला होता । येरु म्हणे जी पातलो आता । समागमे यावया ॥७५॥

त्यांनी पुसले वडील तुझे । कोण आहेत दाखवी मज । मग संपादनी सहज । केली याचना त्याकाळी ॥७६॥

वडीलांचे डोळे मंद दिसत । मजला आज्ञापिले जाय तूं तया समागमे त्वरीत । निघुन जातील गृहस्थ । असे म्हणता मी आलो ॥७७॥

त्यास जाण्याची तातडी पुढती । तयाचे कारण शोध न करिता निघती । तयास समागमे घेऊनि त्वरिती । तेथून मार्गास चालणे पै केले ॥७८॥

इकडे पितृव्यांनी । हुडका हुडकी त्या लागुनि । चहुकडे करता थकुनि । चिंता करीत राहिले ॥७९॥

गृहस्थ चौदा कोशी । कूच केला त्याच दिवशी । मग जाऊनि ग्रामा समीपेसी । नदितटाकी उतरिले ॥८०॥

मग बाळ तेव्हा काय केले । आधि स्नान संध्याते सारिले । आंगवस्त्र फाडुनि झोळी केली । सिध्दान्न मागावया कारणे ॥८१॥

परान्ने सुकृत हानी । परान्ने बुध्दिस उणी । ऐसे जाणुनि मनी । भिक्षेस सिध्द पै जाला ॥८२॥

ॐ भवती भिक्षांदेही । ऐसे वदता प्रतिसिबिके पाही । अन्न मिळऊन लवलाही । ग्रहस्थ सिबिकेसी पातला ॥८३॥

पाहताच त्या ग्रहस्थाने । म्हणे हे काय नारायणे । त्वा मांडिले मूर्खपणे । अन्नास उणे तुज काय ॥८४॥

येरु म्हणे ग्रहस्थराये । मज अन्न दे याचे काय आश्चर्य । परंतु अध्यायनाचा वीर्य । राहात नाही परान्नी ॥८५॥

आणखी ऐकावे धर्मशास्त्र । भिक्षान्न जाणा परमपवित्र । हे जाणूनि मी आत्म तृप्तीय सत्र । ऐसा धर्मयोग मी साधियेला ॥८६॥

ऐकता ऐसी विवेकवाणी । हर्षायमान झाला गृहस्थ सदमनीं । म्हणे बाळा यालागुनि । कोण म्हणावे हा तपस्वी असे ॥८७॥

हा पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट । किंवा अवतारी पुरुष वरिष्ठ । पुढे होईल ब्रह्मनिष्ष्ठ । ऐसे मनी बिंबले तया ॥८८॥

येरु आणून भिक्षान्न । मेळविले दहा ब्राह्मण । तयासह भीक्षान्न भोजन आपण । दत्तप्रसाद संपन्न विधीसी सारिले ॥८९॥

नित्य याच प्रकारे करुन । भिक्षावृत्तीय नित्याचरण । अध्ययनासही खंड पडूनये हा नियम । समागमे त्यांचे जातसे ॥९०॥

येणे प्रकारे पंथ क्रमण । पातले काशिक्षेत्र महापट्टण । गृहस्थासी चिंता पडली महान । यात्रावळीतील तपस्वी बाळाची ॥९१॥

मायबाप त्याचे कोणे ठिकाणी । असतील कळेना मज लागुनी । हुडकावे कोठे महापट्टणी । आंम्हास कैसे भेटतील ॥९२॥

ऐसे करित असता चिंता । एके दिनी अवचिता । मणिकर्णिकेचे स्नाना जाता । नारायण पितयासि ओळखिला ॥९३॥

नारायण ग्रहस्थास बोले काय । हाच आमुचा पिता होय । आज्ञा जाहलिया त्याचे पाय । जाऊन मी वंदीतो ॥९४॥

आता पुढलिया प्रसंगी कथा । नारायण भेटतील मातापिता । त्या ग्रहस्थयोगे तत्वतः । ते परिसिजे काय घडले पुढती ॥९५॥

हे पूर्णानंद चरित्र भांडार । त्या निजधनाचे तुम्हीं सेवन हार । तुमच्या दारीचा मी याचक पामर । श्रवणधना देऊनि सुखवि जे ॥९६॥

पुढील कथेची मती । तुम्हीं द्यावे श्रोतेसंती । तरीच वाढेल निगुती । चरित्र सहज यापरिनी ॥९७॥

दिगंबर राजाचे चरणकमळा । वाहून माझे शिरकमळा । प्रार्थित चरणी वेळोवेळा । हनुमदात्मज मनोभावे ॥९८॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । द्वितीयोध्याय गोड हा ॥९९॥

इति श्रीसदगुरु पूर्णानंद शिवराम चरणारविंदे प्रस्तुयते संपूर्ण ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP