नासिकेतोपाख्यान - अध्याय ९

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

जय सद्गुरु चैतन्यरुपा ॥ स्वामी कृपाघना अरुपा ॥ सुंदररामरुपस्वरुपा ॥ स्मरणमात्रे पाप दहन करी ॥१॥

पूर्वाध्यायी निरुपण ॥ दारुण मार्ग परम कठिण ॥ पातकी भोगिती आपण ॥ कोण कोण ते ऐका ॥२॥

नासिकेत म्हणे आपण ॥ महर्षि ऐका समाधान ॥ कोण्या पापास्तव कवण ॥ दुःख प्राणिगत भोगिती ॥३॥

गौघाती ब्रह्मघाती ॥ पितृघाती पापमूर्ती ॥ सुरापानी मातृघाती ॥ भ्रूणहत्या बाळघातकी ॥ स्त्रीहत्यारी वृद्धघातकी ॥४॥

निरपराधे वधी देख ॥ कृतघ्न आणि गुरुतल्पग ॥ आणिक पातकी ते ऐका ॥५॥

स्वामीघातकी अतिदुष्ट ॥ परपीडा पातकी नष्ट ॥ तयांसी दक्षिणद्वारींची वाट ॥ परमसंकटदायक जी ॥६॥

कोणाचा सन्मार्ग सांडवी ॥ अधर्माचा जो पंथ लावी ॥ तेणे दुष्टभोगांच्या गांवी ॥ केली जाणावी मिरासी ॥७॥

परद्रव्य परवनिता ॥ यांचा अभिलाषी जो पुरता ॥ तो तयां भोगां समस्तां ॥ भोगितो जाण निष्टंक ॥८॥

ब्राह्मणाचा परित्याग ॥ करी बंधुस्त्रियेसी संग ॥ तयालागी तो भोग ॥ भोगणे सांग लागेल ॥९॥

निरपराधे त्यागी स्त्री ॥ वृद्धबंधूचा त्याग करी ॥ मित्रघ्न जो दुराचारी ॥ तो त्या भोगकुहरी देखिला ॥१०॥

आणि परनिंदा करी जो मूर्ख ॥ यातीचा जो धर्मछेदक ॥ सदा चंचल स्वाभाविक ऐका ते अनेक महादोषी ॥११॥

पशुहंता जीवघातकी ॥ कूटसाक्षी परम चेटकी ॥ कुटिळधर्म बोले लोकी ॥ तो तये नरकी देखिला ॥१२॥

आणिकही पापलक्षणे ॥ ऐका मुनि हो नासिकेत म्हणे ॥ जे म्यां देखिले येणे नयने ॥ त्रास झणी मानाल ॥१३॥

पराचे झाले गोमटे ॥ देखोनि जयासी सौख्य न वाटे ॥ पराव्याचे दुःख मोठे ॥ देखोनि वाटे सौख्य जया ॥१४॥

सत्य शौचविवर्जित ॥ पातकी रत जयाचे चित्त ॥ पराचे गुणदोष पाहत ॥ ते नरकी नांदतां देखिले ॥१५॥

सूचक आणि अमंगळ ॥ क्षुद्रे काढीत जो खळ ॥ आणिहि पातकियांचे मेळ ॥ सांगतो सकळ परियेसा ॥१६॥

गुरुची आज्ञा उल्लंघन ॥ जो कोणी करी दैवहीन ॥ तयासी नरक भोग दारुण ॥ देखिला जाण यमालयी ॥१७॥

आणिकही जयाची परी ॥ पराची वृत्ति बळेंचि हरी ॥ सीमा मोडूनि भूमी चोरी ॥ तो असिपत्री ताडिती ॥१८॥

गृह फोडी चोरी रत्न ॥ मार्ग पाडी घाली खाण ॥ देवद्रव्य हरी जो आपण ॥ देवद्रव्य हरी जो आपण ॥ करी विघ्न अनाथासी ॥१९॥

वट पिंपळ बिल्व छेदी ॥ वेदविहित मार्ग निंदी ॥ अल्पज्ञाने बहुवादी ॥ तो नरकनदीमाजी असे ॥२०॥

दया नाही जयाचे हृदयी ॥ षंढ नष्ट दांभिक पाही ॥ अभक्त आळसी देवद्रोही ॥ सर्वस्वे असे दुरात्मा जो ॥२१॥

स्वधर्मकर्मी परांगमुख ॥ देवपितरांसी जो विमुख ॥ धूर्तवादी बहुदेख ॥ आणि वंचक विश्वासघातकी ॥२२॥

नाइके जो पितृवचन ॥ स्वप्नी नेणे विहिताचरण ॥ शास्त्र चोरी जो दुर्जन ॥ पातकी संपूर्ण तो एक ॥२३॥

आणि शिश्नोदरपरायण ॥ विषयासक्त जयाचे मन ॥ दुराचारी आणि कृतघ्न ॥ तो हाहाकारी जाणावा ॥२४॥

ऐसे पातकी असंख्यात ॥ जे सत्यशौचविवर्जित ॥ कार्पण्यवृत्ति सदा कुत्सित ॥ जे कां मूर्तिमंत दोषाढ्य ॥२५॥

यापरी पातकीजन अपार ॥ तयांसी मार्ग दक्षिणद्वार ॥ नानाभोग महाघोर ॥ ते ते नर भोगिती पै ॥२६॥

एवं हे दक्षिणद्वारी ॥ म्यां देखिली भोगपुरी ॥ तेथे पूयनदीच्या तीरी ॥ यातना भारी होतसे ॥२७॥

यापरी दक्षिणमार्ग गहन ॥ अतिघोरांदर महापतन ॥ ते पातकियांचे भोगायतन ॥ सत्य आपण देखिले ॥२८॥

यालागी नरदेहाची प्राप्ती ॥ पावोनि धर्माते अव्हेरिती ॥ ते नर आकल्प नरकगती ॥ जाणा भोगिती ते भोग ॥२९॥

वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ म्हणोनि पावोनि नरकाया ॥ अति दुस्तर रचिली माया ॥ धर्मकार्या साधावे ॥३०॥

यापरी स्वर्गीचा वृत्तांत ॥ सांगे महाऋषि नासिकेत ॥ यावरी जे देखिले तेथ ॥ तेही समस्त अवधारा ॥३१॥

तुका सुंदरनामी शरण ॥ यमयातना त्यांसी दारुण ॥ जे न करिती हरिहरभजन ॥ नामस्मरण जयां नाही ॥३२॥

॥ इति श्रीनासितोपाख्याने नरककीर्तनं नाम नवमोऽध्यायः ॥९॥

॥ इति नासिकेतोपाख्याने नवमोऽध्यायः समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP