सुश्रुत संहिता - मूढगर्भनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘मूढगर्भनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो , जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

मैथुन , रथादिकांतून किंवा घोड्यावरून प्रवास , पायाने प्रवास , पाय घसरणे किंवा खोलात पडणे , उंचावरून पडणे , गर्भावर दाब बसणे , धावणे , पोटावर आघात होणे , वाकडेतिकडे निजणे किंवा बसणे , उपास करणे , मलसूत्रादिकांचे वेग धारण करणे , अतिरूक्ष , तिखट व कडु पदार्थ खाणे , शोक , क्षार पदार्थ फार खाणे , अतिसार , वांती किंवा ढाकळाचा प्रयोग करणे , झोके घेणे किंवा हिंसक बसणे , अजीर्ण होणे व गर्भपातकारक पदार्थ खाणे इत्यादि विशेष कारणांनी , ज्याप्रमाणे धोंड्याचा वगैरे तडाका लागल्याने देठापासून अपक्वफळ पडते , त्याप्रमाणे गर्भ हा बंधनापासून सुटतो .

तो बंधनापासून सुटलेला गर्भ गर्भाशयाला ओलांडून यकृत , प्लीहा व आतड्याचा पोकळभाग ह्यातून खाली घसरून सर्व कोष्ठभाग क्षुब्ध करितो . त्यामुळे त्या स्त्रीचा विगुण झालेला अपानवायु कुशीत शिरून कुशी , बस्तिशीर्ष , उदर व योनी ह्या ठिकाणी शूल , आनाह किंवा मूत्रावरोध ह्यापैकी कोणतीही पीडा उत्पन्न करतो . आणि रक्तस्राव उत्पन्न करून अपक्व गर्भाला स्थानभ्रष्ट करितो . तो गर्भ फार मोठा असला तर सरळपणाने अपत्या मार्गाकडे न येता वाकडा होऊन आला असता बाहेर पडत नाही . अशा प्रकारे विगुण झालेल्या अपानवायूने संमोहित (वाकडा आलेला ) अशा गर्भाला ‘मूढगर्भ ’ असे म्हणतात .

तो मूढगर्भ कील , प्रतिखुर , बीजक व परीघ अशा चार प्रकारचा आहे .

त्यापैकी जो मूढगर्भ हात , मस्तक व पाय वर करून योनिमार्ग बंद करितो त्याला ‘‘कील ’’ असे म्हणतात . जो हात , पाय व मस्तक पुढे करून बाकीच्या अंगाने मार्गरोध करितो त्याला प्रतिखुर म्हणतात . जो एक हात व मस्तक पुढे करून येतो त्याला बीजक असे म्हणतात . जो परिघाप्रमाणे (अडसराप्रमाणे ) अपत्यमार्ग बंद करून राहतो त्याला ‘‘परीघ ’’ असे म्हणतात . ह्याप्रमाणे मूढगर्भ चार प्रकारांनी येतो असे काही वैद्य म्हणतात . पण ते योग्य दिसत नाही ; कारण तो ज्यावेळी विगुण झालेल्या अपानवायूने पिडित होऊन अपत्यमार्गाने अनेक तऱ्हेने येतो , तेव्हा त्याला अमूक एक प्रकारांनी येतो असा संख्येचा नियम राहात नाही ॥३ -४॥

१ एकादा मूढगर्भ दोन्ही मांड्यांनी (तंगड्यांनी ) जननमार्गाच्या तोंडाशी येतो . २ एकादा एक तंगडी आखडून एकाच तंगडीने येतो . ३ एकादा तंगड्या व कमरेवरील भाग आखडून ढुंगणाकडून आडवा येतो . ४ एकदा ऊर , कूस व पाठ ह्यापैकी कोणत्यातरी एका भागाने योनिद्वार बंद करून राहतो . ५ एकादा कुशीमध्ये डोके घालून एकच हात पुढे करून येतो . ६ एकादा मस्तक आखडून दोन हात पुढे करून येतो . एकादा मध्यभाग (कंबर ) वाकवून हात , पाय व मस्तक ह्यांनी योनीद्वार बंद करितो . ८ एकादा एक तंगडी पुढे करून योनिद्वार बंद करितो व दुसरीने गुदमार्गाचा रोध करितो . ह्याप्रमाणे ह्या गर्भाच्या आठ गति संक्षेपाने सांगितल्या .

त्यापैकी शेवटचे दोन असाध्य आहेत . आणि इंद्रियांना आपले विषय ग्रहण करिता न येणे , आक्षेपक (झटके येणे ), योनिभ्रंश , योनिसंकोच , मक्कलशूळ , श्वास , खोकला व भ्रम ह्या विकारांनी पीडित स्त्रियांचे बाकीचेही मूढगर्भ असाध्य म्हणून सोडावे ॥५ -६॥

झाडावरील फळ त्याचा वाढीचा काळ पूर्ण झाल्यावर (पक्व होऊन ) स्वाभाविक रीतीने देठापासून सुटून खाली येतो एरव्ही येत नाही . त्याप्रमाणे गर्भाच्या वाढीचा काल पूर्ण झाल्यावर गर्भाशयांतील गर्भ नाडीबंधनापसून स्वभावतःच मुक्त होऊन जन्मास येतो .

कृमीच्या उपद्रवाने किंवा वार्‍याच्या वगैरे तडाक्याने ते फळ पक्क होण्यापूर्वी जसे अकाली पडते , त्याप्रमाणे वर सांगितलेल्या कारणांनी अपक्व गर्भाचा पात होतो .

गर्भाला चार महिने पूर्ण होईपर्यंत जर तो पडला तर तो स्राव रूपाने स्रवतो (त्याला गर्भस्राव म्हणतात ), आणि त्यापुढे पाच व सहा महिन्यात त्याच्या शरीराला घनत्व आलेले असते . त्यावेळी जर त्याचा पात झाला तर त्याला गर्भपात म्हणतात .

जी मूढगर्भा स्त्री आपले मस्तक सारखे हालविते , तसेच जिचे शरीर थंडगार झाले आहे , जिची लज्जा नष्ट झाली आहे , जिच्या अंगाच्या शिरा काळ्य़ा व मोठ्या दिसते आहेत , अशा स्त्रीचा गर्भही मृत होतो आणि तो त्या स्त्रीलाही मारतो .

पोटात गर्भ मृत झाल्याचे लक्षण - गर्भाचे हालणे बंद होते , वेणा बंद होतात , गर्भिणीच्या अंगावर काळिमा व पांढुरकी येते , तिच्या श्वासोच्छावासाला घाण येते . आणि पोटात अतिशय दुखतेही लक्षणे पोटात मूल मृत झाले असता होतात .

आईला मानसिक व आगांतुक अशा कारणानी अत्यंत त्रास झाला असता त्या योगाने किंवा आईला झालेल्या एखाद्या रोगाने पीडित झालेला गर्भ देखील पोटात नाश पावतो .

गर्भवती स्त्री जर प्रसूत होताना मृत झाली , पण तिची कुस हालत आहे असे असेल तर प्रसुसमयी त्या स्त्रीचे तात्काळ पोट फाडून त्वरित मूल काढून घ्यावे ॥७ -१४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP