विवेकसार - अष्टम वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥श्री निर्जराधिपतये नमः॥

स्थूलं सूक्ष्मं कारणं वा शरीरं किं तदात्मनः ।

विलक्षणत्वमेतेभ्यः किंवेत्येतद्विचिंत्ये ॥१॥

आत्मा शरीर त्रयविलक्षण म्हणुन बोलिला ॥ शरीरत्रयाचे स्वरूप जंववर कळले नाही ॥ तोपर्यंत आत्मा शरीरत्रयविलक्षण म्हणून जाणता नये ॥ म्हणुन शरीरत्रययाचे स्वरूप कोणते ॥ त्याचा विचार करितो ॥ शरीरत्रय जे ते कोणते म्हणाल तरी स्थूळ सूक्ष्म कारण म्हणुन तीनि शरीरे ॥ यामध्ये स्थूळशरीर कोणते तरि करचरणादिक अवयेवेकरून युक्त स्तंभाचेवाणी दिसते जे ते स्थूळशरीर ॥ सूक्ष्म शरीर कोणते म्हणाल तरि सन्नाअवयवेकरून युक्त ते सूक्ष्म शरीर । कारणशरीर कोणते म्हणाल तरी अज्ञान ॥ यास शरीरनाम काशास्तव आलें म्हणाल तरि ॥ जीर्ण होते म्हणून शरीर नाम आले ॥ जीर्ण होते काय जीर्ण होतच आहे ॥ कैसे तरि ॥ हे स्थूळशरीर तीप्रकारे जीर्ण होते ॥ तीनिप्रकार कोणते म्हणाल तरि ॥ अन्न नाही तरि जीर्ण होते ॥ अन्न मिळालिया व्याधिकरून जीर्ण होते ॥ अन्न मिळुन व्याधि नसता वृद्धप्येकरून जीर्ण होते ॥ आता सूक्ष्म शरीरास जीर्णत्व वृद्धिपूर्वक सांगु ॥ त्सासि वृद्धि कैसी म्हणाल तरि रागद्वेषाकारे परिणामाते पावणे ॥ वृद्धि ॥ त्याचा संकोच जीर्णत्व ॥ कारणशरीराचे वृद्धिजीर्णत्व बोलुं ॥ अहंममाद्याकारेकरून परिणामाते पावते ते वृद्धि ॥ त्याचा संकोच जीर्णत्व ॥ सूक्ष्मकारणशरीरास वृद्धिसंकोच कोठे देखिला ॥ म्हणाल तरि अज्ञानाचेठाई वृद्धि दिसते ॥ मुमुक्षु जो त्याचे ठाईं संकोच दिसतो म्हणुन त्यास शरीर म्हणून नाम आले ॥ यास देह म्हणून कैसे नाम आले म्हणाल तरि जळून जाताहि म्हणून देह ऐसे नाम आले ॥ जळताहेत काय म्हणाल तरि ॥ जळताहेत ॥ कैसे तरि अग्निकरून भस्म होताहेतकीं ॥ ते शरीरे याप्रकारे जळताहेत व अवधीही जळत नाहीत की ॥ तरी सर्वदा तापत्रयेकरून जळताहेत ॥ सूक्ष्म कारण शरीरास जळणे कैसे म्हणाल तरि ॥ ज्ञानाग्निकरून जळताहेत ॥ याकरितां तीही शरीरास देह म्हणुन नाम आले ॥ पूर्वशरीरास स्थूळशरीर ऐसे नाम का म्हणाल तरि ॥ स्तंभासारिखे प्रत्यक्ष दिसते म्हणून स्थूळ शरीर ऐसे नाम आले ॥ मध्यम शरीरास सूक्ष्म शरीर ऐसे नाम का आले म्हणाल तरि पूर्वशरीरासारिखे प्रत्यक्ष दिसत नाही म्हणोन सूक्ष्म ऐसे नाम आले ॥ यासच लिंगशरीर ऐसे नाम का आले म्हणाल तरि लीन ऐसे जे शब्दादिकविषय यास भासविते म्हणून आणि लक्षणाद्वाराआत्म्यास जाणविते म्हणून यास लिंगशरीर ऐसे नाम आले ॥ पश्र्चिम शरीरास कारण ऐसे नाम कैसे म्हणाल तरि दोही शरीरास उत्पन्न करिते म्हणून कारण शरीर म्हणून नाम आले ॥ ऐसे तरि हे स्थूळशरीर प्रत्यक्ष दिसते याकरिता आहे म्हणून बोलू नये ॥ स्थूळासारिखे प्रत्यक्ष सूक्ष्म दिसत नाही म्हणून स्थूळव्यतिरिक्त सूक्ष्म आहे म्हणून कैसे जाणावे ह्मणाल तरि ॥ सत्राकार्याकरून सूक्ष्म आहे ऐसे जाणू ये ॥ हे सत्राप्रकारिची कार्ये स्थूळशरीरेकरून होते म्हणून बोलु तरि सुषुप्तिमरणूर्छावस्थेचेठाई आहे जे स्थूळ तेणे करून हे कार्य जाली पाहिजेत ॥ तैसे होत नाही म्हणून स्थूळाचे कार्य ऐसे बोलता नये ॥ तरि कोणाची कार्ये बोलावे तरि स्थूळव्यतिरिक्त सूक्ष्माचे कार्य ऐसे बोलावे ॥ ऐसे जरी सूक्ष्मशरीर स्थूळाते टाकुन स्वतंत्र येकही कार्य करू सकत नाही ॥ यकरिता सूक्ष्माचे कार्य म्हणून कैसे जाणावे ॥ तरि जाणु येते ॥ ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्णक निरोपितो ॥ अग्नि जो तो काष्टाते आश्रयुन दाहपाकादिक्रिया केली ॥ जरी ते क्रिया काष्ठाची नव्हे काष्ठव्यतिरिक्तअग्निचीच क्रिया जैसी ॥ तैसे सूक्ष्मही स्थूळाते आश्रायुन सत्राप्रकारिचे कार्य केले । जरीही ते कार्य केवळ स्थूळ शरीराची नव्हेत ॥ स्थूळव्यतिरिक्त सूक्ष्माची म्हणून जाणूये ॥ तरि सत्रा कार्य कोणती म्हणाल तरि ॥ कारणपूर्वकनिरूपण सांगतो ॥ सप्तदश अवएव कोणते म्हणाल तरी बोलु ॥ ज्ञानेंद्रियपंचक कर्मेंद्रियपंचक प्राणादिपंचक ॥ चित्तासहीत मन ॥ अहंकारासहीत बुद्धि हे सत्राहि मिळोन सूक्ष्म शरीर ॥ ज्ञानेंद्रियपंचक म्हणिजे श्रोत्रत्वक्चक्षुजिव्हाघ्राण यांस ज्ञानेंद्रिय म्हणोनि नाम ॥ किंनिमित्य तरी शब्दादिविषयज्ञान जनकें म्हणोन ॥ ज्ञानेंद्रिये हे ज्ञानजनके का जाली म्हणाल तरि सत्वगुणापासुन उत्पन्न झाली म्हणुन ज्ञानजनकें ॥ कर्मेंद्रियपंचक म्हणिजे वाक्पाणीपादपायुउपस्थ ॥ यास कर्मेंद्रिये म्हणुन नाम किंनिमित्य ॥ तरि वचनादि क्रियेते निर्माण करिताहेत म्हणुनि कर्मेंद्रिये नाम ॥ हे क्रियाजनकें किन्निमित्य म्हणाल तरी राजोगुण कार्ये करून क्रियाजनकें जाली ॥ प्राणादि पंचक म्हणिजे प्राणअपानव्यानउदानसमान ॥ यास प्राण म्हणून नाम किन्निमित्य तरि ॥ स्थूळशरीराते जीववीत आहेत म्हणुन प्राण नाम ॥ मनोबुद्धिअंतःकरण विशेष ॥ हे लिंगशरीराचे सत्रा अवयव ॥ त्यांचि कार्ये उत्पत्ति बोलु ॥ श्रोत्रइंद्रिय म्हणिजे शब्द अवघे जेणेकरून ग्रहणकीजेते ते श्रोत्रेंद्रिय ॥ हे शब्दादिकि त्याचप्रकारिचे ॥ लौकीक वैदिक म्हणुन दोनप्रकारिचे ॥ लौकिकप्राकृत अष्टदशभाषा ॥ वैदिक म्हणिजे संस्कृतरूप वेदशास्त्रें ॥ ते जे लौकिक वैदिकहीं अनंतप्रकारिचें ॥ इतके शब्दे जेणेकरून ग्रहण होते ते श्रोत्रेंद्रिये ॥ हे श्रोत्रेंद्रिये कोठें आहे म्हणाल तरि कर्णशष्कुल्यवछिन्न ॥ नभोदशाते आश्रायुन आहे तो नभोदेशच श्रोत्रेंद्रिय म्हटलें ॥ तरि सुप्तमृतमूर्छितशरीराचेठाईं आहे कर्णशष्कुल्यवछिन्न नभोदेश जो तो तेणे शब्दग्रहण केले पाहिजे ॥ ग्रहण होत नाहीकी ॥ याकरितां त्या नभोदेशव्यतिरिक्त शब्दग्रहणशक्तिसमंत होत्साते सूक्ष्म येकवस्तु त्या नभोदेशाते आश्रायुन आहो ॥ त्यास श्रोत्रेंद्रिय ऐसे नाम ॥ त्या दिशा अधिष्ठान देवत त्या अधिष्ठानदैवतेकरून प्रेरणेते पावले होत्साते शब्दग्रहण करिते ॥ त्वगेंद्रिय कोणते म्हणाल तरि येकेक अनंत शीतोष्ण तीक्ष्ण आणि मृदु कठिण ऐसे पांच प्रकार इतुके स्पर्श जेणे करून ग्रहण होते ते त्वगेंद्रिय ॥ त्वगेंद्रिय कोठे आहे तरि नखखिखापर्यंत त्वचेते व्यापुनि आहे ॥ ते त्वचाच त्वगेंद्रिय म्हणू तरि सुप्तमृत मूर्च्छितशरीराचेठाई आहे जे त्वचा तीने करून ही विषय ग्रहण जाले पाहिजे ॥ याकरिता त्वचेव्यतिरिक्त स्पर्श ग्रहण शक्तिमंत सूक्ष्म येकवस्तु त्या त्वचेते आश्रयुन आहे त्याचे नाम त्वगेंंद्रिय ॥ त्यास वायू अधिष्ठानदैवत त्या दैवतेकरून प्रेरणेते पाऊन स्पर्श अवघे ग्रहणकरित होत्साते आहे ॥ चक्षुरिंद्रिय म्हणिजे येकेक अनंतप्रकारचे पांढरे तांबडे काळे पिवळे हिरवे चित्र ऱ्हस्व दीर्घ स्थूळ सूक्ष्म हे दाहा प्रकारिची इतुकीही जेणेकरून ग्रहण करिजेते तेच चक्षुरिंद्रिय ।ं हे इंद्रिय कोठे आहे म्हणाल तरि काळ्या बुबळाते आश्रयून आहे ॥ काळ्याबुबळासच चक्षुरिंद्रिय म्हणावे ॥ तरि पूर्विल्यासारिखे दूषण येतें ॥ त्या बुबुळाव्यतिरिक्त रूपग्रहणशक्तिमंत सूक्ष्म येकवस्तु त्या काळ्या बुबुळाते आश्रयुन आहे ॥ त्याचे नाम चक्षुरिंद्रिय ॥ यास सूर्य अधिष्ठान दैवतकरून प्रेरणेते पाऊन रूपग्रहण करिजेत आहे ॥ रसनेंद्रिय कोणते म्हणाल तरि येक येक अनंतविध ऐसे खारट तुरट अंबट तिकट गोड कडु ऐसे सा प्रकार ॥ हे इतके रस जेणे करून ग्रहण होते ते रसनेंद्रिय कोठे आहे म्हणाल तरि याचे स्थान जिव्हेचा सेंडा ॥ त्या जिव्हेचे सेंड्यासच रसनेंद्रिय म्हणावे ॥ जरि पूर्वि बोलियेले दोष येतील याकरिता जिव्हेच्या सेंड्या व्यतिरिक्त रसग्रहणशक्तिमंत जिव्हेच्या सेंड्यास आश्रायुन सूक्ष्म येक वस्तु आहे त्याचे नाम रसनेंद्रिय ॥ त्यास वरुण अधिष्ठानदैवत त्या अधिष्ठानदैवतेकरून प्रेरणेते पाऊन रसमात्र ग्रहण करिताहे ॥ घ्राणेंद्रिय कोणते म्हणाल तरि येक अनंतप्रकार ऐसे सुगंध दुर्गंध मिश्र गंध तीन प्रकार ॥ इतकें गंध जेणेंकरून ग्रहण हाते ते घ्राणेंद्रिय ॥ त्याचे स्थान नासिकाग्र ॥ ते नासिकाग्रच घ्राणेंद्रिय म्हणावे पूर्वोक्त दोष येतील याकरिता नासिकाग्र व्यतिरिक्त होत्साते गंधग्रहणशक्ति मत सूक्ष्म येतवस्तु त्या नाशिकाग्राते आश्रायुन त्यास घ्राणेंद्रिय नाम ॥ आधिष्ठान दैवत अश्र्विनिदेव ॥ जे तेणेहीकरून प्रेरणेते पावत होत्साते घ्राणेंद्रिय जे ते गंधमात्रग्रहण करित असतें ॥ कर्मेंद्रियामध्ये वागेंद्रिय कोणते म्हणाल तरि येक येक अनंतविध ऐसी अष्टदशभाषारूप लौकिकशब्द शास्त्ररूप वैदिकशब्द जेणेकरून उच्चरिजेते ते वागिंद्रिय ॥ याचे स्थान जिव्हा ताळु मूळ उत्तरोष्ठ अधरोष्ठ दंत कंठ हृदय ब्रह्मगंध्र हे आठ स्थाने आश्रयून आहे ॥ या आठासच वागेंद्रिय म्हणावे तरि पूर्वोक्त दोष येत असेत ॥ याकरिता येकवस्तु अष्टस्थानाव्यतिरिक्त होत्साते वचनग्रहणशक्तिमंत सूक्ष्म याचे नाम वागेंद्रिय ॥ याचे अधिष्ठान दैवत अग्नि तेणेकरून प्रेरणेते पावत होत्साते शब्दमात्रच उच्चार करितें ॥ पाणींद्रिय कोणते म्हणाल तरि तळहाताते आआयुन आधिष्ठानदैवत जो इंद्र तेणेकरून म्हणावे तरि पूर्वोक्त दोष येत असेत याकरिता तळहाता व्यतिरिक्त होत्साते हानोपादानादिशाक्तिमंत सूक्ष्म पाणेंद्रिय ॥ पादेंद्रिय म्हणिजे तळपायाचा आश्रय करून तळपायादिव्यतिरिक्त होत्साते गमनादिक्रियाशक्तिमंत सूक्ष्म ऐसे ॥ अधिष्ठानदैवत उपेंद्र जो तेणे करून प्रेरणेते पाऊन गमनागमनादिक्रिया करिते जे ते पादेंद्रिय ॥ तळपायाते पादेंद्रिय म्हणावे तरि पूर्वोक्त प्रकारे दोष येताहेत ॥ पायुरिंद्रिय म्हणिजे गुदाते आश्रायुन गुदव्यतिरिक्तहोत्साते पुरीषादि विसर्जनादि क्रियाशक्तिमंत होत्साते सूक्ष्म ऐसे ॥ आधिष्ठानदैवत नैऋत्य तेणेकरून प्रेरणेते पावत होत्साते पायुरिंद्रिय पुरीषविसर्जनक्रिया करित होत्साते आहे ॥ गुदासच पायुरिंद्रिय म्हणावे तरि पूर्वोक्त दोष येत असेत ॥ उपस्थेंद्रिय म्हणिजे योनिलिंगाते आश्रयून योनिलिंगाहुन व्यतिरिक्त ऐसे ॥ आधिष्ठानदैवत प्रजापति जो तेणे करून प्रेरणेते पावत होत्साते शुक्ल मुत्र विसर्जन क्रियाशक्तिमंत होत्साते आहे जे त्याचे नाम उपस्थेंद्रिय ॥ त्या योनि लिंगाते उपस्थेंद्रिय म्हणावे तरि पूर्वोक्त दोष येतिल ॥ पांच प्राणामध्ये प्राणवायु जो तो हृदयस्थानी राहुन विश्र्व जो अधिष्ठानदैवत तेणेकरून प्रेरणेते पाऊन स्वासव्यापार करितो ॥ आपानवायु गुदस्थानि राहुन आधिष्ठानदैवत विश्र्वकर्त्ता जो तेणे करून प्रेरणेते पाऊन निश्र्वासव्यापार करितो ॥ व्यानवायु सर्वशरीरी व्यापुन अधिष्ठानदैवतविश्र्वयोनि ते करून प्रेरणेते पाऊन इंद्रियास बळ देऊन शरीरनिर्वाह करीत असे ॥ उदानवायु कंठस्थानिराहुन अधिष्ठानदैवतअज जो तेणेकरुन प्रेरणेते पाऊन सुषुप्तिकाळाचेठाई सकळेंद्रियाचा उपसंहार करून आपणास कारण ऐसे जे अज्ञान त्याचे ठाई लयाते पाववीत होत्साता जाग्रदवस्थेचाठाई परतुन त्या त्या इंद्रियाच्या गोळकी त्या त्या इंद्रियास ठेवितो उत्क्रमणकाळी सकळेंद्रियास घेऊन परलोकास जातो ॥ समानवायु नाभिस्थानि राहुन आधिष्ठानदैवतजय जो तेणेकरून प्ररेणेते पाऊन जठराग्निस मिळुन भक्ष्य भोज्य लेह्य चोष्य ऐशा चौ प्रकारिच्या अन्नाते पाचन करून अवघा अन्नरस शरीरास व्यापुन शरीरपुष्टि करितो ॥ हे जे वायु याची स्थाने आहेत येविषयई संमतिवचने ॥ प्राणोपानः समानश्र्चौदानव्यानौचवायवः ॥ नव्हे हो श्रुतीचेठाई दाहावायु बोलिले असता पांचवायु बोलुये काय म्हणाल तरि ते वायु कोण म्हणाल तरि नाग कूर्म कृंकर देवदत्त धनंजय पांच उपवायु ॥ याचे व्यापार कोणते म्हणाल तरि ॥ नाग ढेकर देणार ॥ कूर्म वोठ आणि डोळ्याच्या पांपण्या झाकणे उघडणे व्यापार करणार ॥ कृकर तो सिंकणार ॥ देवदत्त जो तो जांभई देणार ॥ धनंजय शरीरपोषण करणार ॥ त्या प्राणादिवायुमध्ये हे उपवायु अंतर्भूत म्हणून त्याची जे स्थाने आधिष्ठानदैवते ॥ अंतःकरणचतुष्टयामध्यें मन जें तें गळांतीं राहुन अधिष्ठान दैवत चंद्र जो तेणेकरून प्रेरणेते पाऊन संकल्पादिक करित राहते ॥ बुद्धि म्हणिजे मुखामध्ये राहुन आधिष्ठानदैवत जे तो चतुर्मुख तेणेकरून प्रेरणेते पाऊन निश्र्चयमात्र करित राहतो ॥ अहंकार जो तो हृदयाचे ठाई राहुन आधिष्ठानदैवत रुद्र तेणेकरून प्रेरणेते पाऊन धारणादिक करीत राहतो ॥ हे बोलिलेलिंगशरीर षोडशकलात्मक म्हणून श्रुति बोलते ॥ त्यापक्षी अंतःकरणमात्राचि बोलिजेत आहे ॥ सप्तदशकला लिंगशरीर म्हणुन येक श्रुति बोलते ॥ त्या श्रुतीचे तात्पर्य म्हणाल तरी ॥ मनामध्ये चित्तास अंतर्भूंतकरून ॥ बुद्धिमध्ये अहंकार अंतर्भूत करून ॥ सत्रा अवयव म्हणुन बोलताहेत ॥ आता येकुणीस अवयव म्हणुन बोलणार श्रुतीचे तात्पर्य मन बुद्धि अहंकार चित्त हे च्यार मिळुन येकोणीस म्हणुन बोलिजे ते ॥ कैसेही बोलिले तरिही विरोध नाही ॥ हे सांगितले सत्रा प्रकारिची कार्ये जे त्यावरून सप्तदशावयवात्मक येकलिंगशरीर आहे म्हणुन निश्र्चय केला ॥ कारणशरीर येक आहे म्हणोन कैसे जाणावे म्हणाल तरि दोही शरीरे कार्यरूपे होऊन दिसत आहेत ॥ त्यावरून यास येक कारण आहे म्हणोन तर्क करिजेते ॥ कार्यावरून कारण तर्किजेते काय म्हणाल तरि तर्किजेत आहे ॥ ते कैसे म्हणाल तरि कार्यरूप जो धूम त्यावरून जैसा कारण अग्नि तर्किजेतो ॥ तैसे कार्यरूप स्थूळ सूक्ष्म शरीरावरून कारण येक आहे म्हणून तर्किजेताहे ॥ इतकेच नव्हे ॥ मी अज्ञ म्हणुनही अज्ञान प्रत्यक्ष अनुभविजेते आहे याकरिता कारणशरीर आहे म्हणून बोलूं ये ॥ याप्रकारे शरीरत्रय आहे म्हणुन निश्र्चय करून त्यानंतर आत्म्यास शरीरत्रयविलक्षणत्व कैसे म्हणाल तरि ॥ आत्मलक्षणशरीराचेठाई शरीरत्रयलक्षण आत्म्याचे ठाई नसणे ॥ हेच शरीरत्रयविलक्षणता तरि आत्म्याचे लक्षण कोणते म्हणाल तरि ॥ सच्चिदानंदरूपत्व आत्मलक्षण ॥ अनात्म्यास लक्षण कोणते म्हणाल तरि ॥ अनृतजड दुःखरूपत्व ॥ या लक्षणास अन्योन्यविलक्षणत्व आहे काय म्हणाल तरि ॥ पुरुषलक्षण स्त्रियेचेठाई स्त्रीलक्षण अंधकाराचेठाई अंधःकाराचे लक्षण प्रकाशाचे ठाई नाही ॥ तैसे चित्त्लक्षण जडाचेठाई जडलक्षण चिदाचे ठाई नाही ॥ चंद्रिकालक्षण आतपाचेठाई आतपलक्षण चंद्रिकेच्याठाई जैसे नाही ॥ तैसे आनंदलक्षण दुःखाचेठाई दुःखलक्षण आनंदाचे ठाई नाही ॥ याप्रकारे सच्चिदानंदास अनृतजडदुःखास अन्योन्यविलक्षणत्व ॥ सत् असताचे चिज्जडाचे आनंददुःखाचे जंवपर्यंत लक्षण कळले नाही तव अन्योन्यविलक्षणत्व कळेना ॥ याकरिता याचे लक्षणत्व सांगतो ॥ सदाचे लक्षण कोणते म्हणाल तरि काशाहीकरून नाशाते न पाऊन काळत्रइं भूतभविष्यवर्तमानकाळाचेठाइं येकरूप असणें हे सत् लक्षण ॥ असल्लक्षणा कोणते म्हणाल तरि ॥ कालत्रइ नसुन अविचारकाळि दिसणे इतरेकरून बाधेते पावणे ॥ असल्लक्षण यास दृष्टांत ॥ रज्जुचेठाई अरोपितसर्प ॥ त्या रज्जुचेठाई सल्लक्षण आहे काय म्हणाल तरि आहे ॥ त्या रज्जुचेठाई सर्प आणि माळादिक त्यामध्ये येकेही करून तो रज्जु नाशाते न पाऊन भ्रांतिकाळि भ्रांतासि पूर्वकाळी भ्रांतिस उत्तरकाळी येकरूप जो आहे रज्जु त्याचेठाई सल्लक्षण आहे ॥ रज्जुचे ठाई आरोपिला सर्प त्याचे ठाईं असलक्षण आहे काय म्हणाल तरि आहे तो सर्पभ्रांतिकाळि भ्रांतिपूर्वकाळि या तीकाळी आपण नसताही दिसतो आणि येकेकरून बाधेतेही पावतो ॥ म्हणुन सर्पाचेठाई असलक्षण आहे ॥ रज्जु लक्षण सर्पाचेठाई सर्पलक्षण रज्जुचेठाई नाही ॥ त्यारज्जुसि सर्पासीं शब्देंकरून अर्थेकरून व्यवहारेंकरून प्रतीतीकरून लक्षणेकरून जैसी विलक्षणता आहे ॥ तैसी सल्लक्षण जे ते असत्देहोंद्रियादिक प्रपंच जो याचे ठाई असलक्षण सत् जो आत्मा याचेठाई नाही ॥ याकरिता सदसदासिशब्देकरून अर्थेकरून लक्षणेकरून व्यवहारेकरून प्रतीतीकरून चैलक्षण्य आहे ॥ येणेकरून कोणता अभिप्राय सिद्ध जाला तरि सच्छब्द असच्छब्द नव्हे ॥ असच्छब्दार्थ सच्छब्दार्थ नव्हे ॥ असच्छब्द सच्छब्द नव्हे ॥ सच्छब्दार्थ असच्छब्दार्थ नव्हे ॥ सलक्षण असलक्षण नव्हे ॥ असलक्षण सलक्षण नव्हे ॥ सत्प्रतिती नव्हे ॥ सच्द्यव्यवहार असव्द्यव्यवहार नव्हे ॥ असव्द्यव्यवहार सव्द्यव्यवहार नव्हे ॥ याकरिता जो सद्रुप आत्मा जो यासि असद्रूप देहेंद्रियादिक जे यास रज्जुसर्पादिकाचेवाणि या पंचप्रकारेकरूनही काळत्रयाचे ठाई अन्योन्य विलक्षणता सिद्ध जाली ॥ आता चिज्जडाचे लक्षण सांगु ॥ चिदाचे लक्षण कोणते म्हणाल तरि आणिखी येका साधनाते नापेक्षुन आपण होत्साते आपल्याठाईं अरोपित जे सर्वपदार्थ त्याते भासवणे चिल्लक्षण ॥ जडलक्षण कोणते म्हणाल तरी आपण न भासुन दुसरियाते भासड सकत नाही ॥ ते जडलक्षण ॥ यास दृष्टांत सूर्य आणि सूर्येकरून भास्थ घटादिक हा दृष्टांत ॥ सूर्याचेठाई चिल्लक्षण आहे काय म्हणाल तरि दृष्टांत अवघा येक दशी म्हणुन येकदेशि आदित्याचे ठाई चिल्लक्षण आहे ते कैसे म्हणाल तरि ॥ आदित्यादि जो तो प्रकाशांतराते नापेक्षुन आपण भासता होत्साता आपल्या प्रकाशसंबंधी जे घटादिक त्याते भासवितो म्हणुन स्वप्रकाशसूर्य जो त्याचेठाई चिल्लक्षणा आहे ॥ घटाचेठाई जडलक्षण आहे काय म्हणाल तरि आहे ते कैसे म्हणाल तरि ॥ घट जो तो आपण न भासता दुसरियास भासउ सकत नाही ॥ म्हणुन घटाचेठाई जडलक्षण आहे ॥ म्हणुन आदित्यलक्षण घटाचेठाईं घटलक्षण आदित्याचेठाईं नाही ॥ याकरिता आदित्यास घटास शब्दअर्थलक्षणप्रतिती व्यवहार येणेकरून यास विलक्षणता आहे ॥ तैसे चित्त् लक्षण जडदेहेंद्रियाचेठाई देहेंद्रियाचे जडलक्षण चिद्रूप आत्मा जो याचेठाईं नाही याकरितां चिद जो आत्मा यासि देहेंद्रियादिक जड जे यासि शब्दअर्थलक्षणप्रतितिव्यवहारेकरून चैलक्षणता आहे ॥ येणेकरून कायसिद्धि जाली म्हणाल तरि जडनिष्ठविकार जे तेहीकरून प्रकाशवस्तु जे तेणेसी काळत्रयाचेठाईही संबंध नाही म्हणावयाचे सिद्धजाले ॥ ते कैसे सिद्ध जाले म्हणाल तरी अप्रकाशघटादिनिष्ठ छिद्रत्व अछिद्रत्व स्पृष्टिमत्व अस्पृष्टिमत्व येणेकरून प्रत्यवाय अभ्यूदय श्र्लक्षणत्व अश्र्लक्षणत्वादिकेंकरून आले जे हर्षविषादिक समीचीनत्व असमीचीनत्वादिकेकरून आले अतिशयत्वानतिशयत्वादिके जे ते प्रकाशक जो सूर्य त्यास जैसे स्पर्शत नाही ॥ तैसे अप्रकाशदेहेंद्रियादिनिष्ठविकार जे ते गुणधर्मजातिनामवर्णाश्रमादि क्रियाकर्तृत्वभोक्तवादिक कामक्रोध हे अवघे त्या देहेंद्रियास साक्षी जो प्रकाशक चिद्रूप जो आत्मा त्यास स्पर्शत नाही म्हणायाचे सिद्ध जाहाले ॥ आनंदाचे दुःखाचे लक्षण कोणते म्हणाल तरि ॥ निरूपाधिक निरतिशय नित्य ऐसे सुखरूपत्व आनंदलक्षण ॥ तापत्रयात्मकत्व दुःखलक्षण ॥ यासि दृष्टांत आहे काय म्हणाल तरि बोलु ॥ नव्या मडक्यामधिल सितळ जळ जे ते काशाचे पात्रामधिल चींचेचे लाकडाचे इंगळ दृष्टांत ॥ या उदकाचेठाईं आनंदलक्षण आहे काय म्हणाल तरि उष्णे करून तापाते पाऊन आला जो पुरुष तो सीतळ मडकियाचा स्पर्शे करून नेत्रास हात लाविल्याकरून त्या पुरुषाचा ताप अवघा जातो ॥ ते साक्षात् जळ नव्हे जळाचा आवेश मात्र ॥ त्या आवेशमात्रेकरून तापनिवृत्तिते पावताहेत म्हणायाचा सर्वानुभवसिद्धत्व म्हणुन त्या उदकाचेठाई आनंदलक्षण आहे ॥ त्या चिंचेच्या इंगळाचाठाई दुःखलक्षण आहे काय म्हणाल तरी दाहातापादिरहित जो पुरुष तो चिंचेच्या इंगळेकरून युक्त कांश्यभांड जे त्याचा स्पर्श केला तरि भांडनिष्ठचिंचेच्या इंगळाचा आवेशमात्र जो त्यास दाहातापादिक करायाचे देखिले आहे ॥ हतास फोडही जाणवितसे तो आवेश साक्षात अग्नि नव्हे ॥ अग्नीचा आवेश मात्र ॥ त्या आवेशमात्रास प्रत्यक्ष दाहातापादि करविले ते इंगळ तरि समस्तप्राणियास भस्म करिताहेत ॥ हे सर्वानुभवसिद्ध म्हणुन त्या चिंचेच्या इंगळाच्याठाईं दुःखलक्षण आहे ॥ आणिखी येक शास्त्रसिद्धदृष्टांत ॥ अमृत आणि काळकुट विष ॥ त्या अमृताचे ठाईं आनंदलक्षण आहे काय म्हणाल तरि आहे ॥ ते कैसे म्हणाल तरि अमृत आपण सुखरूप असून आपणास पान करणार जे त्यासही निरतिशय सुख देतसे म्हणुन त्या अमृताचाठाई आनंदलक्षण आहे ॥ काळकुट विषाचेठाई दुःखलक्षण आहे काय म्हणाल तरि आहे ॥ ते कैसे म्हणाल तरी काळकूट आपण तापात्मक असून आपणासमिप आले जे पुरुष त्यास बहुत दुःखरूप प्राणहाणि करिताहे ॥ म्हणुन त्या काळकूटाचेठाई दुःखलक्षण आहे ॥ अमृतलक्षण विषाचेठाईं विषलक्षण अमृताचेठाईं नाही म्हणुन त्या अमृतासि काळकूटविषासि शब्द अर्थ लक्षण प्रतीति व्यवहारयेकहीकरून जैसी वैलक्षण्यता आहे ॥ अग्निचे लक्षण उदकाचे ठाईं उदकाचे लक्षण अग्निचेठाईं नाही म्हणून अग्निस त्या उदकासी शब्द अर्थ प्रतीति व्यवहार लक्षणेकरूनअन्योन्य वैलक्षण्यता जैसी आहे ॥ तैसे आनंदलक्षण दुःखात्मक देहेंद्रियपुत्रभार्यादिप्रपंचाचेठाईही देहोंद्रियादिनिष्ठ दुःखलक्षण जे ते सुखस्वरूप आत्मा जो याचेठाई नाही ॥ म्हणून त्या आनंदासी दुखासी शब्दअर्थ प्रतीति लक्षण व्यवहारे करून अन्योन्यविलक्षणता आहे ॥ येणेकरून काय सिद्ध जाले म्हणाल तरि ॥ काळकूटविषनिष्ठ तापादिक अमृतास जैसे स्पर्शकरु सकत नाही ॥ तैसे देहोंद्रियादि प्रपंचनिष्ठतापत्रय जे ते सुखस्वरूप जो आत्मा त्यास स्पर्श करू सकत नाही ॥ ऐसे सिद्ध जाले ॥ या विचारास फळ काय म्हणाल तरी रज्जूचापरी सद्रूप सूर्याचे परी चिद्रूप जळ अमृताचेपरि आनंद ऐसा आपण ॥ सर्पाचेपरि अनृत घटाचेपरि जड आणि काळकूटविषाचेपरि दुःखरूप ॥ ऐसे देहोंद्रियादिप्रपंच याहून विलक्षण म्हणून जाणने ॥ या विचारास फल ॥ ऐसे जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांतसिद्धांत ॥

श्र्लोकअनेकावयवः स्थूलः शुक्लशोणितसंभवः ॥

देहः सूक्ष्मस्तथा सप्तदशावयवलक्षणः ॥१॥

कारणं ज्ञानसंज्ञानानृतादुःखात्मका अमी ।

एभ्यो विलक्षणः स्वात्मा सत्यज्ञानादिलक्षणः ॥२॥

आत्मलक्षण सत्यादि स्तथा भिन्नोऽनृतादितः ।

पीयूषविषवद्भानु भांडवद्रज्जुसर्पवत् ॥३॥

इति यस्तु विविच्यैवं विजानाति पुनः पुनः ।

सं संसाराद्विमुक्तः स्नान्नान्यथा कर्मकोटिभिः ॥४॥

इति श्रीमननग्रंथे देहत्रय लक्षणपूर्व आत्मलक्षण सच्चिदानंद निरूपणं नाम अष्टम वर्णकं समाप्तम् ॥

॥ श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ॥

॥ श्रीराम जयराम जयजयराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP