अध्याय छ्त्तीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ जो सद्गुरु आद्य निर्विकार ॥

जो ब्रह्मादिकांचे माहेर ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ तो हा रघुवीर रविकुळीं ॥१॥

अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ जो प्रळयकाळाचा शासनकर्ता ॥ तो भरताग्रज तत्वतां ॥ नंदिग्रामीं राहिला ॥२॥

अयोध्येचे जन सकळ ॥ षोडशपद्में राजदळ ॥ सैन्य उतरलें तुंबळ ॥ नंदिग्राम वेष्टूनियां ॥३॥

अष्टादश पद्में वानरदळ ॥ बहात्तर कोटी रीस सबळ ॥ छप्पन्नकोटी गोलांगूळ ॥ उतरलें यथावकाशें ॥४॥

यावरी विश्रव्याचा सुत ॥ बिभीषण जो कां पुण्यपंडित ॥ त्याची असुरसेना अद्भुत ॥ श्रीरघुनाथभक्त उतरले ॥५॥

अष्टादश अक्षौहिणी वाजंत्रें ॥ बिभीषणाचीं गर्जती गजरें ॥ त्याहूनि अयोध्येची परिकरें ॥ अहोरात्र वाजती ॥६॥

शत्रुघ्न आणि सुमंत ॥ हेमांबरें शिबिरे बहुत ॥ उभीं करिते जाहले तेथ ॥ लक्षानुलक्ष ते काळीं ॥७॥

त्यांसी रत्नजडित स्तंभ ॥ वरी खचित कळस सुप्रभ ॥ त्यांच्या तेजेंकरूनि नभ ॥ उजळलें ते काळीं ॥८॥

सुग्रीव बिभीषणादि नृपवर ॥ आणिक कपिराज थोरथोर ॥ त्यांसीही शिबिरगृहे सविस्तर ॥ ठाव दीधला राहावया ॥९॥

कुळाचळांत मेरु थोर ॥ तैसे मुख्य श्रीरामाचे शिबिर ॥ मातागुरुबंधूंसह रघुवीर ॥ तेथें राहता पैं जाहला ॥१०॥

अंतरगृहीं सीता सती ॥ ऊर्मिला मांडवी श्रुतकीर्ती ॥ चवघी जावा तेथें राहती ॥ आनंद चित्ती न समाये ॥११॥

आला ऐकतां रघुवीर ॥ पातला जनकराज श्वशार ॥ संगें दळभार अपार ॥ वाद्यगजरें येतसे ॥१२॥

छप्पन्न देशींचे नृपती ॥ पावले तेव्हां शीघ्रगती ॥ सप्तद्वीपीं नवखंडी जे वसती ॥ धांवती करभार घेऊनियां ॥१३॥

धांवले सकळ ऋषीश्वर ॥ नानासाधनी व्रती थोरथोर ॥ योग याग टाकोनि समग्र ॥ येती रघुवीर पाहावया ॥१४॥

सप्त पुऱ्या गिरिकंदरीं ॥ नानातीर्थी गूढविवरीं ॥ वृक्षाग्रवासी वायुआहारी ॥ आसनें जयांची नानाविध ॥१५॥

शमदमादिक साधनें ॥ अष्टांगयोग देहदंडणें ॥ नाना हठयोग व्रताचरणें ॥ सांडूनि वेगीं धांवती ॥१६॥

तितुक्यांसही रघुनंदन ॥ उठोनि देत आलिंगन ॥ समस्तांसहित सीताजीवन ॥ वस्त्रमंडपी बैसला ॥१७॥

देहीं विदेही रघुवीर ॥ त्यासी भेटी आला विदेही श्वशुर ॥ तो जगन्मातेचा पिता मिथिलेश्वर ॥ पद्मजनकें आलिंगिला ॥१८॥

असो नर वानर नृपवर ॥ वसिष्ठादि सकळ ऋषीश्वर ॥ त्यांसी मंगलस्नान रघुवीर ॥ करविता जाहला ते काळीं ॥१९॥

लक्षानुलक्ष सुवर्ण कढया ॥ उष्णोदकें तापवूनियां ॥ सुगंध तैल लावूनियां ॥ मंगलस्नानें करवीतसे ॥२०॥

सर्वांसी वस्त्रें अलंकार ॥ नानारत्नभूषणें अपार ॥ देऊनियां जनकजावर ॥ रघुवीर सर्वां पाठवी ॥२१॥

बिभीषणादि सुग्रीव वानर ॥ मंगलस्नान करिती सत्वर ॥ अमौल्य वस्त्रें अलंकार ॥ स्वयें रघुवीरें दीधले ॥२२॥

वसिष्ठ नाहतांचि सत्वर ॥ अमौल्य वस्त्रें अलंकार ॥ स्वयें उठोनि रघुवीर ॥ देता जाहला आनंदे ॥२३॥

मणिमय पादुका आणून ॥ गुरुपुढें ठेवी रघुनंदन ॥ त्या वसिष्ठें पायीं घालोन ॥ मग बैसले स्वस्थानीं ॥२४॥

त्रयभगिनींसमवेव सीता ॥ अंतरगृहीं जगन्माता ॥ नाहोनियां समस्ता ॥ लेइल्या वस्त्रें भूषणें ॥२५॥

सकळ अयोध्यावासी जन ॥ नारीनर आदिकरून ॥ अवघ्यांसी गौरव समसमान ॥ जनजामातें दीधला ॥२६॥

मग बंधूंसहित रघुनंदन ॥ करिता जाहला मंगलस्नान ॥ तैल सुगंध लावून ॥ जटा उकलल्या मस्तकींच्या ॥२७॥

चवदा वर्षेंपर्यंत ॥ भरताकारणें धरिलें व्रत ॥ तें आजि विसर्जिले समस्त ॥ सीतावल्लभें तेधवां ॥२८॥

अभ्यंग जाहलिया समग्र ॥ सुमंतें वस्त्रें अलंकार ॥ आणोनियां सत्वर ॥ रघूत्तमासी समर्पिली ॥२९॥

जो लावण्यामृतसागर ॥ लेईला वस्त्र अलंकार ॥ भरतें पादुका सत्वर ॥ मस्तकींच्या पुढें ठेविल्या ॥३०॥

मग रघुनाथआज्ञेंकरून ॥ सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ चौथा सुमंत प्रधान ॥ मंगलस्नान करिते जाहले ॥३१॥

संध्यादि नित्यकर्में सारिलीं ॥ तंव पाकनिष्पत्ति जाहली ॥ सकळ ऋषि नृप ते काळी ॥ भोजनासी बैसले ॥३२॥

बिभीषण सुग्रीव वायुनंदन ॥ नळ नीळ शरभ गंधमादन ॥ बंधूसहित रघुनंदन ॥ भोजनासी बैसले ॥३३॥

मणिमय कनकताटें शोभलीं ॥ रत्नखचित अडणियां तळीं ॥ उदकपात्रें भरूनियां ठेविलीं ॥ समसमान सर्वांसी ॥३४॥

रजताचळाऐसा के वळ ॥ तैसा भात वाढिला निर्मळ ॥ पंचभक्ष्यें परमात्रें सोज्जवळ ॥ शाखा साठी पत्रशाखा शोभती ॥३५॥

दधि मधु दुग्ध घृत ॥ शर्करा पंचामृत वाढित ॥ पंक्तीस जेथें रघुनाथ ॥ तेथें कांहीं न्यून नसे ॥३६॥

तीं अन्नें वर्णावीं समस्त तरी कां व्यर्थ वाढवावा ग्रंथ ॥ सकळ जीवांसहित रघुनाथ ॥ तृप्त जाहला भोजनीं ॥३७॥

हस्त प्रक्षाळून निर्मळ ॥ त्रयोदशगुणी तांबूल ॥ सर्वांसहित तमालनील ॥ घेता जाहला ते काळीं ॥३८॥

राम कोटिमन्मथतात ॥ तीन दिवस राहिला तेथ ॥ वसिष्ठें काढिला दिव्य मुहूर्त ॥ अयोध्याप्रवेश करावया ॥३९॥

पुष्यार्कयोग बहु सुभद्र ॥ रामचंद्रासी उत्तम चंद्र ॥ त्या सुमुहूर्ते गुणसमुद्र ॥ उठता जाहला तेधवां ॥४०॥

लागला वाद्यांचा गजर ॥ भेरी ठोकिल्या चौदा सहस्र ॥ बिभीषणाची वाद्यें समग्र ॥ वाजों लागलीं तेधवां ॥४१॥

बिभीषणसुग्रीवादि नृपती ॥ बैसले तेव्हां दिव्य रथी ॥ वाद्यगजरेंकरूनि क्षिती ॥ हालों लागली तेधवां ॥४२॥

दिव्यरथीं रघुनाथ ॥ बैसला तेव्हां सीतेसहित ॥ शत्रुघ्न आणि भरत ॥ चामरें वरी ढाळिती ॥४३॥

सहस्रांचे सहस्र वेत्रधार ॥ पुढें मार्ग करिती सत्वर ॥ नगरद्वाराजवळी रघुवीर ॥ पावता जाहला तें काळीं ॥४४॥

सप्त पुऱ्यांत अतिश्रेष्ठ ॥ अयोध्यापुरी हे वरिष्ठ ॥ सकळविद्यांमाजी सुभट ॥ अध्यात्मविद्या जैसी कां ॥४५॥

अयोध्येची रचनात ते क्षणी ॥ कपी असुर पाहती नयनीं ॥ देवराजपुरी उपमे उणी ॥ अयोध्येसी तुलितां पैं ॥४६॥

अयोध्येभोंवतें उपवन ॥ उपमेसी उणें नंदनवन ॥ वृक्ष सदा सुफळ संपूर्ण ॥ गेले गगन भेदित ॥४७॥

सूर्यकिरण न दिसे तळीं ॥ ऐसी सघनच्छाया पडिली ॥ कस्तूरीमृग सर्वकाळी ॥ क्रीडा करिती वनांत ॥४८॥

रावे साळया मयूर ॥ चातकें लावे तित्तिर ॥ नानापक्षी निरंतर ॥ रामनामें गर्जती ॥४९॥

स्फटिकनिबद्ध सरोवरें ॥ माजीं रातोत्पलें सुवासकरें ॥ राजहंस आनंदें थोरें ॥ क्रीडा करिती तये स्थानीं ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP