अध्याय पस्तीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

देहबुद्धिलंका घेऊन ॥ मारिला अहंकृति रावण ॥ स्थापूनि भाव बिभीषण ॥ छत्र धरिलें तयावरी ॥१॥

ज्ञानकळा जनकतनया ॥ भेटली येऊन रघुराया ॥ मग स्वानंदविमानीं बैसोनियां ॥ आत्माराम चालिला ॥२॥

लागला वाद्यांचा गजर ॥ राघवकीर्ति गाती वानर ॥ योजनें दोन सहस्र ॥ विमान तेव्हां उंचावलें ॥३॥

जैसा पोर्णिमेचा रोहिणीवर ॥ पश्चिमेस जाय सत्वर ॥ कीं समुद्रीं जहाल थोर ॥ लोटित समीर वेगेंसी ॥४॥

तैसें वेगीं जात विमान ॥ घंटा वाजती घणघण ॥ दिव्यमणिमयप्रभा घन ॥ उत्तरपंथें जातसे ॥५॥

ऐसा जात रविकुळमंडण ॥ जो असुरकुळकानन -दहन ॥ वामांगीं अवनिजागर्भरत्न ॥ सौदामिनी मेघीं जैसी ॥६॥

तयेप्रति बोले रघुनंदन ॥ कांते खाली पाहें विलोकून ॥ लंका दिसे दैदीप्यमान ॥ हेमवर्ण विशाळ ॥७॥

पैल पाहें निकुंभिला ॥ येथें शक्रजित सौमित्रें मारिला ॥ आम्ही राहिलों होतों तेच सुवेळा ॥ प्राणवल्लभें विलोकी ॥८॥

पैल पाहे रणमंडळ ॥ येथें युद्ध जाहलें तुंबळ ॥ आटिले राक्षस सकळ ॥ महासबळ पराक्रमी ॥९॥

वज्रदंष्ट्री विरूपाक्ष अकंपन ॥ मत्त महामत्त प्रहस्त प्रधान ॥ भयानक विशाळ कुंभकर्ण ॥ येथेंच आटले इंदुवदने ॥१०॥

देवांतक नरांतक महोदर ॥ कुंभ निकुंभ त्रिशिरा महाअसुर ॥ ते येथें आटले समग्र ॥ जनकतनये पाहें पां ॥११॥

युद्ध करूनि सप्त दिन ॥ येथेंच पडला दशवदन ॥ हा समुद्र पाहें विलोकून ॥ सेतु नळें बांधिला ॥१२॥

पैल उत्तरतीरीं दर्भशयन ॥ येथें समुद्र भेटला येऊन ॥ पुढें मलयाचळ विंध्याद्रि पूर्ण ॥ किष्किंधा पाहें राजसे ॥१३॥

पैल पाहे पंपासरोवर ॥ येथें भेटला वायुकुमर ॥ पैल स्थळीं वाळिवीर ॥ सुग्रीवकैवारें वधियेला ॥१४॥

येथें शबरीचा केला उद्धार ॥ येथें कबंध वधिला साचार ॥ पैल दिसे गोमतीतीर ॥ खर दूषण वधिले येथें ॥१५॥

पुढें पंचवटी पाहें गजगमनें ॥ तेथूनि तुज नेलें द्विपंचवदनें ॥ ऋषीचें आश्रम पद्मनयने ॥ पाहं गौतमीतटींचे ॥१६॥

शरभंग सुतीक्ष्ण मंदकर्णीं ॥ हा सिंहाद्रि राजसे पाहें नयनीं ॥ येथें दत्तात्रेय अनुसूया अत्रिमुनि ॥ भेटलीं होती पाहे पां ॥१७॥

हा अगस्तीचा आश्रम पाहें ॥ पुढें चित्रकूटी दिसताहे ॥ भारद्वाजआश्रम जनकतनये ॥ पुढें तीर्थराज प्रयाग ॥१८॥

पैल नंदिग्राम दिसत ॥ तेथें प्राणसखा आहे भरत ॥ पैल श्रृंगेवरीं महाभक्त ॥ किरात गुहक वसतसे ॥१९॥

खंजनाक्षी पाहें सदर ॥ शरयूतीरीं अयोध्यानगर ॥ घवघवीत परम सुंदर ॥ वास्तव्य स्थळ आमुचें ॥२०॥

परमस्नेहादरेंकरूनी ॥ जानकीस दावी चापपाणी ॥ तों अगस्तीचे आश्रमीं मोक्षदानी ॥ क्षणएक राहूं इच्छित ॥२१॥

रामें आज्ञापितां विमान ॥ खालीं आलें न लगतां क्षण ॥ पद्माक्षीरमण तेव्हां वचन ॥ पद्माक्षीरप्रति बोलत ॥२२॥

आम्हां भेटेल घटोद्भवमुनि ॥ तुज लोपामुद्रा नेईल सदनीं ॥ आणिकही ऋषिपत्न्या मिळूनी ॥ तुज पुसतील साक्षेपे ॥२३॥

रावणें तुज नेले कैसे रीतीं ॥ कैसा लंकेसी आला रघुपति ॥ पुसेल कुंभसंभवसती ॥ कथा जैसी जाहल ते ॥२४॥

सांगे सकळ वर्तमान ॥ परी जें केलें सागर बंधन ॥ ही कथा तियेलागून ॥ सर्वथाही सांगू नयेचि ॥२५॥

हे कथा सांगशील पूर्ण ॥ तुज ती आणील हीनवण ॥ ऐसे सांगोन राघवें विमान ॥ ऋषिआश्रमीं उतरिले ॥२६॥

होतसे वाद्यांचा गजर ॥ दणाणलें तेणें अंबर ॥ शिष्य धांवून सत्वर ॥ अगस्तीप्रति सांगती ॥२७॥

स्वामी विमान आलें पृथ्वीवरी ॥ भरलें रीसवानरीं ॥ तों अगस्ति उठिला झडकरी ॥ म्हणे रघुवीर पातला ॥२८॥

मग शिष्य घेऊन अपार ॥ रामासी सामोरा जाय सत्वर ॥ लवलाहीं आश्रमाबाहेर ॥ कलशोद्भव पातला ॥२९॥

ऋृषिमेळा राम देखतां ॥ उतरला विमानाखालता ॥ पुढें येतां कमलोद्भवपिता ॥ कलशोद्भवे देखिला ॥३०॥

अगस्तीस न धरवें धीर ॥ भूमंडळ क्रमीत सत्वर ॥ तंव रघूत्तमें नमस्कार ॥ साष्टांग घातला ऋषीतें ॥३१॥

अगस्तीनें धांवोनि त्वरित ॥ हृदयीं धरिला रघुनाथ ॥ जैसा वाचस्पति आलिंगित ॥ शचीवरासी आदरें ॥३२॥

सवेंच सौमित्रासी दिधलें आलिंगन ॥ तों रघूत्तम बोले हांसोन ॥ आजि आश्रम सोडून ॥ कां स्वामी आलेत बाहेरी ॥३३॥

मागें अरण्यकांडीं कथा गहन ॥ सीता घेऊनि गेला द्विपंचवदन ॥ तेव्हां परतोन रामलक्ष्मण ॥ अगस्तिआश्रमा पैं आले ॥३४॥

ते वेळीं अगस्तीनें जाणोन ॥ घेतले नाहीं रामदर्शन ॥ परतविलें दारींहून ॥ दोघे दशरथी ते काळीं ॥३५॥

ती गोष्ट आठवूनि रघुपति ॥ म्हणे तोच मी राम तूं अगस्ति ॥ तैं अनादर आतां प्रीति ॥ विशेष दिसे विप्रोत्तमा ॥३६॥

ऐसें बोलता सीताधव ॥ प्रत्युत्तर देत कलशोद्भव ॥ तैं स्त्रीरहित तूं राघव ॥ नाहीं वैभव तेधवां ॥३७॥

तो विपरीत काळ जाणोन ॥ नाहीं घेतले तुझे दर्शन ॥ आतां तूं स्त्रीयुक्त सीतारमण ॥ आलों म्हणोन सामोरा ॥३८॥

स्त्रीस अवघे देती मान ॥ तूं निर्विकार रघुनंदन ॥ मानापमानाविरहित जाण ॥ सच्चिदानंद परब्रह्म तूं ॥३९॥

तूं अज अजित आप्तकाम ॥ निरुपाधिक निर्गुण अनाम ॥ नाना विकार सम विषम ॥ स्त्रीचे सर्वही राघवा ॥४०॥

ऐकोनि अगस्तीचें उत्तर ॥ आनंदमय झाला रघुवीर ॥ मग आश्रमाप्रति सीतावर ॥ कलशोद्भव नेता जाहला ॥४१॥

तों ते लोपमुद्रा येऊन ॥ जनकजेसी करीं धरून ॥ गेली आश्रमांत घेऊन ॥ करूनि पूजन पुसतसे ॥४२॥

विदेहहतनये तुजसी प्रीती ॥ अत्यंत करितो रघुपती ॥ किंवा विरक्त असे चित्तीं ॥ सांग स्थिति कैसी ते ॥४३॥

वनीं विचरतां रघुनंदन ॥ तोषवीत असें की तुझें मन ॥ तूं भागलीस म्हणोन ॥ समाधान करितो कीं ॥४४॥

याउपरी विदेहराजनंदिनी ॥ त्रिभुवनपतीची पट्टराणी ॥ श्रीरामप्रताप वाखाणी ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥४५॥

म्हणे परम दयाळु रघुनाथ ॥ मजवरी स्नेह करी अत्यंत ॥ तूं म्हणसी स्त्रीलंपट बहुत ॥ जनकजामात तैसा नव्हे ॥४६॥

तरी अत्यंत दयाळु श्रीराम ॥ मजवरी स्नेह करी परम ॥ विरक्त सदा निष्काम ॥ रूप नाम नाही तया ॥४७॥

मज घेऊन गेला रावण ॥ दयासागर तो रघुनंदन ॥ करूनियां नाना प्रयत्न ॥ मज सोडविलें श्रीरामें ॥४८॥

तों लोपामुद्रा म्हणे सीते ॥ तुज कैसे नेलें लंकानाथें ॥ मग येऊन जनकजामातें ॥ सोडविलें कवणें रीतीं ॥४९॥

हर्षें सांगतसे जानकी ॥ म्यां इच्छिली मृगकंचुकी ॥ तें जाणोनि एकाएकीं ॥ अयोध्याप्रभु धांविन्नला ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP