अध्याय चवतीसावा - श्लोक १५१ ते २११

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


माझी स्तुति मांडिली दयाळा ॥ परी मी काय तुजवेगळा ॥ ऐसें श्रीराम बोलतां ते वेळां ॥ वदता जाहला कमलोद्भव ॥५१॥

म्हणे क्षीराब्धिवासिया नारायणा ॥ मधुकैटभारी भवभंजना ॥ अनंतवेषा अनंतवदना ॥ अनंतनयना अनंता ॥५२॥

परमात्मया तूं माझा तात ॥ नाभिकमळी जन्मलों यथार्थ ॥ सृष्टि रचिली हे अद्भुत ॥ तुझें आज्ञेंकरूनियां ॥५३॥

सृष्टीमाजी माजले असुर ॥ रावणकुंभकर्णादि क्रूर ॥ मग तुवां धरिला अवतार ॥ अयोध्येमाजी या रू पे ॥५४॥

पितृआज्ञेचें करूनि मिष ॥ वना आलासी परमपुरुष ॥ सीतेचे निमित्त राक्षसांस ॥ वधोनि भक्त रक्षिले ॥५५॥

राघव म्हणे कमळासना ॥ विश्वजनका वेदपाळणा ॥ सकळललाटपट्टलेखना ॥ जाणसी खुणा सर्वही तूं ॥५६॥

तुम्हां आम्हांसी वेगळेपण ॥ मुळापासूनि नाहीं पूर्ण ॥ परस्परें ठाउकी खूण ॥ तरी बाहेर स्तुति किमर्थ ॥५७॥

पौर्णिमेस उचंबळे समुद्र ॥ तैसा बोलता जाहला देवेंद्र ॥ हे अयोध्यानाथा जगदुद्धारा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥५८॥

आम्हांसी उपकार केले बहुत ॥ ते वेदांसही नव्हे गणित ॥ बंधच्छेदक तूं रघुनाथ ॥ अपरिमित गुण तुझे ॥५९॥

तरी माझे मनी एक आर्त ॥ ते तूं पूर्णकर्ता रघुनाथ ॥ कांही आज्ञा मज त्वरित ॥ केली पाहिजे ये काळीं ॥१६०॥

मी दासानुदास अनन्य ॥ मज काही सांगावें कारण ॥ तुझी आज्ञा मस्तकीं वंदीन ॥ मुकुटमणि जयापरी ॥६१॥

ऐसें बोलतां देवेंद्र ॥ परम सुखावला रामचंद्र ॥ म्हणे सहस्राक्षा तूं चतुर ॥ समयीं उपकार केलासी ॥६२॥

रणीं पाठविला दिव्य रथ ॥ तो आम्हांसी उपकार बहुत ॥ आम्हीं जय पावलो अद्भुत ॥ त्याच रथीं बैसोनियां ॥६३॥

इंद्र म्हणे श्रीरामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ तुझियां प्रसादें मंगळधामा ॥ आम्ही स्वपदीं सुखीं असो ॥६४॥

रथ पाठविला कल्पद्रुमा ॥ रथ पाठविला समयासी ॥ म्हणोनि उपकार मानिसी ॥ चकोरांनीं काय चंद्रासी ॥ तृप्त करावें कवण्या गुणें ॥६५॥

चातकें तृप्त केला जलधर ॥ चक्रवाकांनीं दिवाकर ॥ समुद्राची तृप्ति थिल्लर ॥ कोण्या गुणें करील पैं ॥६६॥

वैरागरापुढें ठेविली गार ॥ क्षीराब्धिपुढें ठेविलें तक्र ॥ परम धनाढ्य कुबेर ॥ त्यासी कवडी समर्पिली ॥६७॥

आतां असो हे शब्दरचना ॥ मज कांहीं करावी आज्ञा ॥ म्हणोनि इंद्र लागला चरणा ॥ प्रेमादरेंकरूनियां ॥६८॥

मग इंद्रास तेव्हां उठवून ॥ बोले रामचंद्र सुहास्यवदन ॥ जेणेंकरूनि कर्ण ॥ तृप्त होती सकळांचे ॥६९॥

म्हणे वेदशास्त्रें बहुत ॥ धर्माधर्मी निवडिती पंडित ॥ परी एकचि गोष्टींत समस्त ॥ पापपुण्य निवडिलें ॥१७०॥

परोपकार ते पुण्य अद्भुत ॥ परपीडा तेंचि पाप यथार्थ ॥ शोधावे किमर्थ ग्रंथ बहुत ॥ मुख्य इत्यर्थ हाचि पैं ॥७१॥

तरी ऐसा जो परोपकार ॥ वानरां घडला अपार ॥ मज साह्य होऊनि समग्र ॥ यश बहुत जोडिले ॥७२॥

समरांगणीं दिधले प्राण ॥ असंख्य पडले प्रेतें होऊन ॥ परी त्यांचीं कुटुंबे आप्तजन ॥ शोकार्णवीं बुडतील ॥७३॥

तरी ते माझे सखे वानर ॥ पुनः जीववावे समग्र ॥ कोणाची अंगावरी अणुमात्र ॥ घाय क्षत न दिसावें ॥७४॥

अवघे आरोग्य होऊन ॥ सुखी असोत बहुत दिन ॥ त्यांचें जें वसंतें वन ॥ सदा सुफल पैं असो ॥७५॥

तरी हीच आज्ञा सत्वरा ॥ सिद्धी पाववी अमरेश्वरा ॥ ऐसें बोलतां परात्परसोयरा ॥ आनंद जाहला समस्तांसी ॥७६॥

इंद्रे चरणीं माथा ठेवून ॥ म्हणे जीववितों न लागतां क्षण ॥ याउपरी सीतारमण ॥ आज्ञा देत सकळांसी ॥७७॥

देव बैसोनि चालिले विमानीं ॥ धडकती दुंदुभीच्या ध्वनी ॥ दिव्य घंटा वाजती गगनीं ॥ आनंद मनीं न समाये ॥७८॥

शक्रआज्ञा होतां सत्वरी ॥ पीयूषमेघ वोळंबला अंबरीं ॥ गंभीर गर्जना ते अवसरीं ॥ करितां जाहला बलाहक ॥७९॥

पश्चिमेचा ढग उठत ॥ तैशा सौदामिनी लखलखत ॥ रणमंडळ लक्षोनि समस्त ॥ पीयूषवृष्टि जाहली ॥१८०॥

एक घटिका पर्यंत ॥ अपार वर्षलें अमृत ॥ वानर उठविलें समस्त ॥ निद्रिस्थ जागे होत जैसे ॥८१॥

श्रीरामापुढें जाऊन ॥ समस्त घालिती लोटांगण ॥ पर्जन्य गेला उघडोन ॥ सहस्रनयन आज्ञेनें ॥८२॥

आक्षेप घेती श्रोते चतुर ॥ वानर आणि रजनीचर ॥ एके ठायीं पडिले समग्र ॥ तरी असुर कां न उठवी ॥८३॥

वक्ता म्हणे नाटकरामायण ॥ तेथें ही कथा आहे संपूर्ण ॥ स्वयें बोलिला अंजनीनंदन ॥ अप्रमाण कोण म्हणे ॥८४॥

तें समस्त पाहूनि साचार ॥ प्रत्युत्तर देत श्रीधर ॥ तरी शंकरें भूतावळी समग्र ॥ आधींच होत्या पाठविल्या ॥८५॥

त्यांसी आज्ञापिलें शंकरें ॥ न भक्षावीं कपींचीं शिरें ॥ परी राक्षसांचीच कलेवरें ॥ तुम्ही निवडून भक्षिजे ॥८६॥

खोट्यांतून खरें निवडे ॥ कीं तांदुळांतून काढिले खडे ॥ हिऱ्यांमधूनि गारतुकडे ॥ परीक्षक निवडती ॥८७॥

तैसी भूतावळी निश्चिती ॥ राक्षसकलेवरें भक्षिती ॥ सागरीं भिरकाविल्या समस्त अस्ति ॥ न उरे क्षितीं कांहींच ॥८८॥

पीयूषवृष्टि होतां अपार ॥ उठिले अवघेही वानर ॥ ऐसें ऐकतां प्रत्युत्तर ॥ श्रोते पंडित सुखावती ॥८९॥

म्हणती वक्ता होय अति चतुर ॥ शोधकदृष्टी तुझी अपार ॥ संशय निरसला समग्र ॥ अंधार सूर्योदयें ॥१९०॥

ग्रासांमाजी हरळ काढून ॥ पुढें चाले जैसे भोजन ॥ तैसा संशय निरसला पूर्ण ॥ अनुसंधान ऐका पुढें ॥९१॥

रघुनाथ म्हणे बिभीषणा ॥ आतां आम्हांस देई आज्ञा ऐसें बोलतां रामराणा ॥ बिभीषण दाटला गहिंवरें ॥९२॥

तो नूतन लंकानाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि तेव्हां रडत ॥ श्रीरामचरणीं मिठी घालित ॥ पद क्षाळित नयनोदकें ॥९३॥

म्हणे लंकाराज्य मज देऊन ॥ श्रीरामा तूं जातोसी टाकून ॥ अनंत राज्य ओंवाळून ॥ चरणावरूनि टाकावीं ॥९४॥

तुझिया भजनावरून ॥ मोक्ष सांडावा ओंवाळून ॥ तेथें लंकेचे राज्य तृण ॥ मज काय हे करावें ॥९५॥

मी अयोध्येसी येईन सांगातें ॥ सेवा करून राहीन तेथें ॥ ऐसें बोलतां रघुनाथें ॥ हृदयी धरिलें बिभीषणा ॥९६॥

प्राणसखया तुझे हृदयीं ॥ मी वसतों सर्वदाही ॥ परी तूं अयोध्येस येईं ॥ समागमें बोळवित ॥९७॥

अयोध्येचा सोहळा पाहून ॥ तूं आणि मित्रनंदन ॥ मग तेथून परता दोघेजण ॥ आपापल्या राज्यांसी ॥९८॥

परम संतोषे बिभीषण ॥ आणविलें पुष्पकविमान ॥ अत्यंत विशाळ गुणगहन ॥ आज्ञा पाळीन प्रभूची ॥९९॥

चंद्राहूनि प्रभा अत्यंत ॥ मुख्य सिंहासन विराजत ॥ दिव्य नवरत्नीं मंडित ॥ झालर शोभत मुक्तांची ॥२००॥

पृथ्वी सांठवे संपूर्ण ॥ ऐसें क्षणें होय विस्तीर्ण ॥ इच्छा होतांचि संकीर्ण ॥ धाकुटें होय तेव्हांचि ॥१॥

ऐसें विमान ते काळीं ॥ सेवकंें आणिलें रामाजवळी ॥ तर्जनी लावूनियां भाळीं ॥ रघुत्तमें वंदिले ॥२॥

सीतेची अंगुली धरून ॥ दिव्य हिऱ्यांचे सोपान ॥ त्याचि मागें रघुनंदन ॥ वरी चढला ते काळीं ॥३॥

सीतेसमवेत रघुनाथ ॥ मुख्य सिंहासनी बैसत ॥ अष्टादशपद्में समस्त ॥ वानर वरी चढिन्नले ॥४॥

छप्पन्न कोटी गोलांगूल ॥ बाहात्तर कोटी रीस सकळ ॥ बिभीषणाचें असंख्य दळ ॥ वरी आरूढलें तेधवां ॥५॥

अष्टादश महाअक्षौहिणी ॥ लागली वाद्यांची ध्वनी ॥ अष्ट जुत्पती अष्ट कोणीं ॥ राघवापाशीं उभे राहिले ॥६॥

मृगांकवर्ण चामरे घेऊन ॥ अंगद आणि लक्ष्मण ॥ वरी विराजती दोघेजण ॥ समसमान दोहींकडे ॥७॥

असो आतां रघुनाथ ॥ लक्षूनियां अयोध्येचा पंथ ॥ राजाधिराज समर्थ ॥ जाता झाला ते काळीं ॥८॥

रामविजय रत्नखाणीं ॥ उत्तरकांड हे मुकुटमणि ॥ पुढें श्रवण करावें सज्जनीं ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥

ब्रह्मानंद यतीश्वर ॥ पूर्णज्ञानाचा समुद्र ॥ त्याच्या चरणाब्जीं श्रीधर भ्रमर ॥ अभंग रुंजी घालितसे ॥२१०॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चतुस्त्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२११॥

अध्याय ॥३४॥ ओव्या ॥२११

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP