अध्याय बत्तीसावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


एक घटिका न भरतां पूर्ण ॥ गेला सप्तद्वीपें ओलांडून ॥ तों द्रोणाचळाआलीकडे जाण ॥ मंदराचळ देखिला ॥५१॥

प्रभा त्याची चंद्रासमान ॥ कीं कैलासपीठ श्वेतवर्ण ॥ कीं तो कर्पूराचा संपूर्ण ॥ घडिला असे शीतळ ॥५२॥

कीं क्षीरसागर मंथोनि सबळ ॥ काढिला हा नवनीतगोळ ॥ कीं शोषशायी तमालनील ॥ तेणें ठेवणें ठेविलें ॥५३॥

कीं निर्दोष यश आपुलें ॥ क्षीरसिंधूनें तेथें ठेविलें ॥ कीं पृथ्वीतून नूतन उगवलें ॥ श्वेतोत्पल जयापरी ॥५४॥

असो त्या आलीकडे एक योजन ॥ कालनेमी जाहला ब्राह्मण ॥ राक्षसातें शिष्य करून ॥ आश्रम तेथें रचियेला ॥५५॥

वृक्ष अवघे सदाफळ ॥ सरोवर भरलें असे निर्मळ ॥ यज्ञशाळा तेथे विशाळ ॥ कुंड वेदिका यथाविधि ॥५६॥

यज्ञपात्रें असती बहुत ॥ कुंडाभोंवती विराजित ॥ समिधा दर्भ यथायुक्त ॥ करूनि सिद्ध ठेविले ॥५७॥

घातलें असे अन्नसत्र ॥ ऐसा तो कालनेमी निशाचर ॥ बकध्यान धरून साचार ॥ वाट पाहे मारुतीची ॥५८॥

वरिवरी शोभे वृंदावन ॥ कीं दंभिकाचें शुष्क ज्ञान ॥ कीं कासारें प्रतिमा ठेवून ॥ विकावया बैसला ॥५९॥

तो इतक्यांत वायुसुत ॥ तृषाक्रांत पातला तेथ ॥ तंव तो कपटी पुढें धांवत येत ॥ नमन करितसे कपीसी ॥१६०॥

म्हणे माझे भाग्य धन्य ॥ जाहले महापुरुषाचें दर्शन ॥ म्हणे स्वामी दया करून ॥ आजि येथें क्रमावें ॥६१॥

आजि तुमचे दर्शन दुर्लभ सत्य ॥ राहावें एक दिनापर्यंत ॥ अथवा निरंतर रहावें एथ ॥ ऐकतां हनुमंत संतोषला ॥६२॥

हनुमंत बोले रसाळ ॥ पुढें कार्य आहे बहुसाल ॥ आतां उदग द्या जी शीतळ ॥ सकळ उपचार पावले ॥६३॥

कालनेमी बहुत प्रार्थी ॥ परी कदा न राहे मारुती ॥ विटोनियां परम चित्तीं ॥ शिष्यांप्रति सांगतसे ॥६४॥

म्हणे उदक द्या रे मर्कटासी ॥ दुसरें न मागे कोणासी ॥ तों सरोवर दाविती मारुतीसी ॥ जेथें विवसी वसतसे ॥६५॥

ते विवसी परम दारुण ॥ देह तिचा पर्वतासमान ॥ करूं जातां जलप्राशन ॥बहुत जीव भक्षिले ॥६६॥

तेथें उदक घ्यावया पूर्ण ॥ बैसला अवनिजाशोकहरण ॥ तंव जळदेवता येऊन ॥ पाय धरी मारुतीचा ॥६७॥

हनुमंतें कंठीं धरून ॥ बाहेर काढिली ओढून ॥ लत्ताप्रहार हृदयी देऊन ॥ मारिली तेथें ते काळीं ॥६८॥

तिच्या शरीरातून ते वेळीं ॥ दिव्य देवांगना निघाली ॥ मारुतीचे चरणीं लागली ॥ वार्ता आपुली सांगतसे ॥६९॥

म्हणे मी स्वर्गीची देवांगना ॥ रूपाभिमानें न मानीं कोणा ॥ हांसलें मी एका तपोधना ॥ तेणें मज शापिलें ॥१७०॥

म्हणे तूं विवसी होईं पापमति ॥ मग उःशाप मागतां तयाप्रति ॥ तो म्हणे द्रोणाचळ न्यावया मारुति ॥ रातोरातीं येईल ॥७१॥

तो तुज उद्धरील निश्चिती ॥ तें आजि आली प्रचीती ॥ आणिक गोष्ट असे मारुती ॥ ती तुजप्रति सांगत्यें ॥७२॥

सहसा नव्हे हा मुनीश्वर ॥ कपटी कालनेमी असुर ॥ रावणें प्रेरिला साचार ॥ त्याचा संहार करीं तूं ॥७३॥

ऐसें मारुतीस सांगोन ॥ स्वर्गपंथें गेली उद्धरून ॥ मारुति आला परतोन ॥ कालनेमीजवळी पैं ॥७४॥

मनांत म्हणे हनुमंत ॥ हा दुरात्मा बैसला येथ ॥ याचा करावा निःपात ॥ तों कपटी बोले तेधवां ॥७५॥

म्हणे आम्हां भल्या ब्राह्मणा ॥ काय देतोसी गुरुदक्षिणा ॥ हनुमंतें मुष्टि वळोनि जाणा ॥ हृदयावरी दिधली ॥७६॥

तों पांच योजनें शरीर ॥ उभा ठाकला युद्धासी असुर ॥ कपी म्हणे आतां उशीर ॥ कासया येथें लावावा ॥७७॥

पायीं धरून आपटिला ॥ कालनेमी प्राणासी मुकला ॥ वरकड शिष्य ते वेळां ॥ पळूनि गेले लंकेसी ॥७८॥

कालनेमी आपटितां तो ध्वनि ॥ गंधर्वीं ऐकतांच श्रवणीं ॥ चौदा सहस्र धांवूनि ॥ हनुमंतावरी लोटले ॥७९॥

काग मिळोनियां बहुत ॥ धरावया धांवती आदित्य ॥ कीं मूर्ख मिळून समस्त ॥ वाचस्पतीसी जिंकू म्हणती ॥१८०॥

असो हनुमंतें तये क्षणीं ॥ गंधर्वांचा भारा बांधोनी ॥ फिरवून आपटिले मेदिनी ॥ प्रेतें करून टाकिले ॥८१॥

तेथून उडाला हनुमंत ॥ सौमित्राची मनीं चिंता बहुत ॥ द्रोणादीसमीप त्वरित ॥ त्वरेंकरून पातला ॥८२॥

जैसें बावनकसी सुवर्ण ॥ तैसा द्रोणाद्रिपर्वताचा वर्ण ॥ वरी वल्ली दैदीप्यमान ॥ तेजें गगन उजळलें ॥८३॥

दृष्टीं देखतां हनुमंत ॥ द्रोणादि जाहला भयभीत ॥ म्हणे हा मागुती आला येथ ॥ मजलागीं न्यावया ॥८४॥

कैंचा राम कैंचा रावण ॥ एकदां गेला घेऊन ॥ मागुती उभा ठाकला येऊन ॥ आयुष्यांती मृत्यु जैसा ॥८५॥

उपाधीच्या गुणें बहुत ॥ नसतीं विघ्नें दाटून येत ॥ वल्लीयोगें हा अनर्थ ॥ क्षणक्षणां होतसे ॥८६॥

असो हनुमंतें पर्वतासी नमून ॥ प्रार्थीत उभा कर जोडून ॥ म्हणे शक्तीनें भेदला लक्ष्मण ॥ आकांत पूर्ण मांडला ॥८७॥

त्रिभुवननायक रावणारी ॥ त्यावरी तूं उपकार करीं ॥ औषधी दे झडकरी ॥ अथवा तेथवरी तूं चाल ॥८८॥

संतोषेल अयोध्याधीश ॥ त्रिभुवनीं वाढेल तुझें यश ॥ बोलतां आतां विशेष ॥ उशीर कार्या होतसे ॥८९॥

द्रोण म्हणे मर्कटा पामरा ॥ कां करिसी घडीघडी येरझारा ॥ औषधी नेदीं वानरा ॥ मी तंव तेथें न येचि ॥१९०॥

हनुमंत म्हणे रे गिरी द्रोणा ॥ निर्दया खळा महा मलिना ॥ तुज क्षणांत बुद्धिहीना ॥ उचलोनि नेईन लंकेसी ॥९१॥

पुच्छ पसरोनि ते वेळे ॥ पर्वतातें तीन वेढे घातले ॥ उपडोनियां निजबळें ॥ तोलोनि हातीं घेतला ॥९२॥

अंतरिक्ष जातां हनुमंत चंद्र पाहे चकित ॥ म्हणे काय हें अद्भुत ॥ आकाशमार्गें जात असे ॥९३॥

तों नंदिग्रामीं भरतें जाण ॥ देखिलें परम दुष्ट स्वप्न ॥ एक काळपुरुष येऊन ॥ दक्षिणबाहु गिळियेला ॥९४॥

गजबजोनी उठिला भरत ॥ म्हणे विपरीत जाहला दृष्टांत ॥ क्षेम असो रघुनाथ ॥ सीतासौमित्रासहित पैं ॥९५॥

गुरु म्हणे दुष्ट स्वप्न ॥ करावें शांतिक हवन ॥ तत्काळ होमद्रव्यें आणून ॥ कैकयीनंदन हवन करी ॥९६॥

आहुती टाकी जों भरत ॥ तों अंतरिक्ष जात हनुमंत ॥ केवळ अग्निकल्होळ पर्वत ॥ पडेल वाटे खालता ॥९७॥

वसिष्ठ जाहला भयभीत ॥ त्यास धीर देत भरत ॥ म्हणे हें अनिष्ट अकस्मात ॥ विंधोनि पाडितों एकीकडे ॥९८॥

तुम्ही स्वस्थ असावें समस्तीं ॥ कीजे हवनाची पूर्णाहुती ॥ ऐसें बोलून त्वरितगती ॥ चाप भरतें चढविलें ॥९९॥

ज्याचे बाण सतेज बहुत ॥ रामनामबीजांकित ॥ आकर्ण ओढूनि त्वरित ॥ सोडिता जाहला तात्काळीं ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP