अध्याय तीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


शरीर उभें आहे रणीं ॥ शिर पाहूं गेलें चापपाणी ॥ तुज मूळ धाडिला पाणी ॥ वेगेंकरून येईं कां ॥५१॥

मायानदी उल्लंघूनि दुर्घट ॥ पाहें पैलतीरीं तुझी वाट ॥ प्राणवल्लभे येऊनि भेट ॥ सत्वर आतां मजलागीं ॥५२॥

दुःखरूप परम संसार ॥ रामचरणीं सुखी अपार ॥ हें जाणोनि धाडिला कर ॥ येई सत्वर प्राणप्रिये ॥५३॥

असो ते धराधरकुमरी ॥ पत्र वाचूनि ते अवसरीं ॥ शरीर टाकूनि धरित्रीवरी ॥ शोक करी अपार ॥५४॥

आजि बळाचा समुद्र आटला ॥ कीं धैर्याचा मेरु खचला ॥ प्रतापवृक्ष उन्मळला ॥ समरभूमींसीं अकस्मात ॥५५॥

इंद्रजितसूर्याच्या किरणें ॥ मावळती शत्रुतारागणें ॥ तो आजि सौमित्राहूनें ॥ खग्रास केला समूळीं ॥५६॥

रणसरोवरी शत्रकमळें ॥ तूं वारणें छेदिलीं निजबळें ॥ सौमित्रासिंहें कुंजरा बळें ॥ विदारून नेलें शिरमुक्त ॥५७॥

ऐरावतीसमवेत पाकशासन ॥ समरीं पाडिला उलथोन ॥ तो आजि मानव लक्ष्मण ॥ तेणें रणीं मारिलासे ॥५८॥

माझें सौभाग्यभांडार ॥ त्यावरी पडिला तस्कर ॥ माझिया भाग्याचा समुद्र ॥ सौमित्रअगस्तीनें प्राशिला ॥५९॥

इंद्रजित माझा रोहिणीवर ॥ सौमित्रप्रतापराहू थोर ॥ कलांसहित न दिसे चंद्र ॥ पुनः मागुता सहसाही ॥६०॥

वृत्रारिशत्रूची अंतुरी ॥ नानाप्रकारें विलाप करी ॥ पशुपक्षी ते अवसरीं ॥ रुदती करुणा ऐकोनियां ॥६१॥

सखिया म्हणती सुलोचने ॥ आतां किमर्थ शोक करणें ॥ आपुलें परत्रसाधन देखणें ॥ संसारमाया त्यजोनियां ॥६२॥

जें जें दिसे तें तें नाशिवंत ॥ मुळीं मिथ्या अहिकुंडलवत ॥ पदीं नेपुरें बांधोनि नाचत ॥ मीन भूमीसी मिथ्या पैं ॥६३॥

उदिमा गेला वंध्यासुत ॥ रात्रीं मृगजळीं मत्स्य धरीत ॥ गंधर्वनगर वाटत ॥ मिथ्या समस्त तैसें हें ॥६४॥

असो नगारिशत्रूची गृहिणी ॥ प्रवेशोनि आत्मसदनीं ॥ नानासंपत्ति देखोनी ॥ मनीं विटे तत्काळ ॥६५॥

परापवादें विटती सज्जन ॥ कीं चिळसी ये देखतां वमन ॥ कीं सुंदर ललना देखोन ॥ विटे जैसा विरक्त ॥६६॥

तैसी नानासंपदा देखतां ॥ विटली शक्रारीचा कांता ॥ शुकपिकादि द्विजां समस्तां ॥ मुक्त केलें स्वहस्तें ॥६७॥

सदनासी नमन करूनी ॥ शिबिकेंत भ्रतारहस्त घालोनी ॥ चपळ अश्विनीवरी बैसोनी ॥ लंकेसी तेव्हां चालिली ॥६८॥

तों पुढे दूत येऊन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥ मग लघु कपाटें उघडून ॥ सुलोचना प्रवेशली ॥६९॥

अस्ता गेला वासरमणी ॥ प्रवर्तली घोर रजनी ॥ रजनीचर ते क्षणीं ॥ नगददुर्गींचे गजबजिले ॥७०॥

सभेत बैसला लंकानाथ ॥ तों स्नुषा देखे अकस्मात ॥ गजबजिला मयजानाथ ॥ चिन्ह विपरीत देखोनियां ॥७१॥

सुलोचना सद्रद होऊनी ॥ मस्तक ठेवी श्वशुचरणीं ॥ रावण म्ण्हे वो साजणी ॥ माये किमर्थ आलीस ॥७२॥

तों भुजेसहित पत्र ॥ श्वशुरापुढें ठेविलें सत्वर ॥ म्हणे स्वर्गा गेले भ्रतार ॥ त्यां समागमें जाईन मी ॥७३॥

ऐसें ऐकतांचि रावण ॥ घेत वक्षःस्थळ बडवून ॥ खालीं पडे सिंहासनावरून ॥ महाद्रुम उन्मळे जेवीं ॥७४॥

मृत्तिका घेऊनि लंकानाथ ॥ दाहीं मुखीं तेव्हां घालित ॥ वर्तला एकचि आकांत ॥ नाहीं अंत महाशब्दा ॥७५॥

गजर ऐकोनि तये वेळीं ॥ मयकन्यां तेथें पातली ॥ वार्ता पुत्राची ऐकली ॥ मूर्च्छित पडली धरणीये ॥७६॥

ऐशीं सहस्र राजअंगना ॥ आल्या महामंडपस्थाना ॥ शोकार्णवीं पडली मयकन्या ॥ सर्वही तियेसी सांवरिती ॥७७॥

मंदोदरी म्हणे स्नेहाळा ॥ मेघनादा माझिया बाळा ॥ मज न पुसतां रणमंडळा ॥ सखया कैसा गेलासी ॥७८॥

त्रिभुवन शोधितां समग्र ॥ न देखो तुजऐसा धनुर्धर ॥ बंदीं घातले समस्त सुरवर ॥ शत्रु समग्र खिळिले शरीं ॥७९॥

पूर्वीं मी व्रते तपें आचरलें ॥ पूर्ण न होता मध्यें सांडिलें ॥ म्हणूनि तुजऐसें निधान गेलें ॥ आड ठाकलें पूर्वकर्म ॥८०॥

कीं म्यां केला पंक्तिभेद ॥ संतांस बोलिल्यें दोषशब्द ॥ कीं शिव आणि मुकुंद ॥ वेगळे दोघे भाविले ॥८१॥

हरिकीर्तन रंग मोडिला ॥ क्षुधार्थी पात्रींचा उठविला ॥ कीं परद्रव्याचा अभिलाष केला ॥ किंवा घडला गुरुद्रोह ॥८२॥

कीं परलाभाची केली हानी ॥ कीं दोष ठेविला गंगेलागुनी ॥ की कुरंगिणी पाडसा वनीं ॥ बिघड पूर्वीं म्यां केला ॥८३॥

कीं भिक्षा न घालितां साचार ॥ द्वारींचा दवडिला यतीश्वर ॥ म्हणोनि इंद्रजिताऐसा पुत्र ॥ गेला निश्चित त्या दोषें ॥८४॥

असो काद्रवेयकुलभूषणकुमारी ॥ दशकंठजाया तिसी हृदयीं धरी ॥ दोघीं शोक करिती तेणें धरित्री ॥ कंपित झाली तेधवां ॥८५॥

मग शेषकन्या बोले वचन ॥ मज द्यावें आजि शिर आणून ॥ वाट पाहतां पतीचे नयन ॥ शिणले जाईन सांगातीं ॥८६॥

ऐसें बोलतां सुलोचना ॥ परम क्रोध चढला दशवदना ॥ घाव घातला निशाणा ॥ म्हणे सत्वर सेनां सिद्ध करा ॥८७॥

आजि संग्राम करीन निर्वाण ॥ रामसौमित्रांचीं शिरें आणीन ॥ अथवा पुत्रपंथ लक्षून ॥ मी जाईन आतांचि ॥८८॥

दशमुख कोपला देखोनी ॥ मयजा सांगे सुनेच्या कर्णीं ॥ म्हणे तूंचि तेथे जाऊनी ॥ शिर मागून घेईं कां ॥८९॥

मंगळजननीकुमरीवर ॥ तयापासीं तूं मागें शिर ॥ तो भक्तवत्सल परम उदार ॥ दयासिंधु दीनबंधु ॥९०॥

जो या चराचराचें जीवन ॥ जनकजा वेगळी करून ॥ सकळ स्त्रिया मातेसमान ॥ एकबाणी एकवचनी ॥९१॥

दुःखामाजी हे सुख थोर ॥ दृष्टीं पाहें वैदेहीवर ॥ इतुकेन तुझा सार्थक संसार ॥ इह -परत्र सर्वही ॥९२॥

पुण्यपरायण श्रीरामभक्त ॥ सुग्रीव जांबुवंत हनुमंत ॥ न्यायसिंधु बिभीषण तेथ ॥ पाठिराखे सर्वस्वें ॥९३॥

ऐसें बोलतां मयकन्या ॥ आलें सुलोचनेचिया मना ॥ मग श्वशुरासी मागे आज्ञा ॥ सुवेळाचळीं जावया ॥९४॥

दशद्वयनेत्र बोले ॥ तुज जरी त्यांही ठेवून घेतलें ॥ कैसे करावें तये वेळे ॥ सांग वहिलें आम्हांतें ॥९५॥

उरग बैसला धुसधुसित ॥ तया मुखीं केवीं घालिजे हात ॥ यावरी शेषकन्या बोलत ॥ दशकंठासी तें ऐका ॥९६॥

परसतीचा अभिलाष समूळ ॥ करी ऐसा कोण चांडाळ ॥ त्याचा वंश भस्म होईल ॥ विपरीत कर्म आचरतां ॥९७॥

पतिव्रतेचा अभिलाष धरून ॥ कोण पावला जय कल्याण ॥ रावण बोले अधोवदन ॥ तरी अवश्य जाइंजे ॥९८॥

तुजसीं विपरीत करितां जाण ॥ शत्रु अवघे भस्म करीन ॥ शेषतनया खरें म्हणून ॥ तत्काळ तेव्हां निघाली ॥९९॥

बृहस्पतीऐसे विचक्षण ॥ घेतले शिष्ट आणि बंदीजन ॥ सहस्रार्ध दासी घेऊन ॥ अश्विनीवरी आरूढली ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP