अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १५१ ते २१७

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


आले देखोनि असुरभार ॥ सेनामुखीं होता वाळिकुमर ॥ तो पर्वत घेऊन सत्वर ॥ क्रोधनावरी धांविन्नला ॥५१॥

बळें पर्वत दिधला टाकून ॥ रथासहित चूर्ण जाहला क्रोधन ॥ तों जंघ प्रजंघ विरूपाक्ष दारुण ॥ आले धांवूनि अंगदावरी ॥५२॥

अंगदें विशाळ वृक्ष उपडोनी ॥ दोघे झोडून पाडिले धरणी ॥ मग विरूपाक्षें निजबाणीं ॥ वानर बहुत खिळियेले ॥५३॥

तों मैंद पर्वत घेऊनि धांविन्नला ॥ अकस्मात विरूपाक्षावरी टाकिला ॥ विरूपाक्ष प्राणासी मुकला ॥ शरभें वधिला शोणिताक्ष ॥५४॥

मग तो कुंभकर्णाचा नंदन ॥ कुंभ पुढें आला धांवोन ॥ धनुष्य ओढोनि आकर्ण ॥ नव बाण सोडिले ॥५५॥

त्या नव शरप्रहारेंकरूनि ॥ मैंद कपी खिळिला समरांगणीं ॥ शरभ विंधिला दोन बाणीं ॥ मूर्च्छित धरणीं पडियेला ॥५६॥

तों धांवे वाळिसुत ॥ घेऊन विशाळ पर्वत ॥ त्याचे कुंभे खिळिले हस्त ॥ अचळासहित रणभूमीं ॥५७॥

संकट पडियेलें बहुत ॥ अंगद राहिला तटस्थ ॥ वानरीं हांक केली त्वरित ॥ राघवापासीं ते काळीं ॥५८॥

ऐकोनि गजकिंकाट देख ॥ आवेशें चपेटे मृगनायक ॥ यापरी किष्किंधापाळक ॥ कुंभहृदयीं आदळला ॥५९॥

कुंभाचें चाप घेतले हिरून ॥ मोडून कुटके केले पूर्ण ॥ मल्लयुद्धास दोघेजण ॥ प्रवर्तले ते काळीं ॥१६०॥

एक मुहूर्तपर्यंत ॥ मल्लयुद्ध दोघांशी अद्भुत ॥ अर्कजे हृदयीं मुष्टिघात ॥ कुंभासी बळें दिधला ॥६१॥

तेणें हृदय शतचूर्ण ॥ कुंभाचा तात्काळ ॥ गेला प्राण ॥ तंव तो निकुंभ आवेशोन ॥ सुग्रीवावरी धांविन्नला ॥६२॥

तों पर्वत सबळ उचलून ॥ वेगें धांवे सीताशोकहरण ॥ अचल दिधला भिरकावून ॥ निंकुंभें तो चूर्ण केला ॥६३॥

तेणें हनुमंत परभ क्षोभला ॥ विशाळ तरु त्यावरी टाकिला ॥ तोही निकुंभें तोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥६४॥

निकुंभें परिघ लवलाही ॥ घेऊन ताडिला मारुतिहृदयीं ॥ पळमात्र मूर्च्छना ते समयीं ॥ आली हनुमंतास ते काळीं ॥६५॥

सवेंचि धांवे अंजनीबाळ ॥ शतश़ृंगाचा उपटिला अचळ ॥ निकुंभावरी टाकिला तात्काळ ॥ चूर्ण जाहला निकुंभ ॥६६॥

घायाळें पळती लंकेत ॥ रावणासी वर्तमान करिती श्रुत ॥ ऐकतांचि तो चिंताक्रांत ॥ दशवक्र जाहला पैं ॥६७॥

मग विंशतिनेत्र तिघे वीर ॥ परम प्रतापी समरधीर ॥ खराक्ष विशालाक्ष असुर ॥ मकराक्ष तो तिसरा ॥६८॥

तिघांसी म्हणे दशवदन ॥ तुम्हीं माजवावें रण ॥ ते तात्काळ रथारूढ होऊन ॥ सेनेसहित निघाले ॥६९॥

रणतुरें गर्जती अपार ॥ रणमंडळीं पातले सत्वर ॥ तों शिळा द्रुम घेऊन वानर ॥ एकदांचि उठावले ॥७०॥

येरयेरां पाचारिती ॥ उसणे घाय सवेंच देती ॥ असुरांची पोटें फाडिती ॥ वानर नखे घालोनियां ॥७१॥

कुंत असिलता परिघ ॥ असुर टाकिती शस्त्रें सवेग ॥ तेणें विदारूनि आंग ॥ कपी पडती समरांगणी ॥७२॥

कपींवीरीं केलें आगळें ॥ असुरभार मागें लोटले ॥ देखोन मकराक्ष ते वेळे ॥ बाण वर्षत धांवला ॥७३॥

जैशा पर्जन्यधारा अपार ॥ तैसा मकराक्ष वर्षे शर ॥ अपार भंगले वानर ॥ पाहे रघुवीर दुरूनी ॥७४॥

मान तुकावी सीतारमण ॥ म्हणे हा वीर प्रवीण ॥ कोदंड चढवोनि आपण ॥ जगद्वंद्य ऊठिला ॥७५॥

कोदंड ओढिता तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघु किंकिणी ॥ एकचि बाण ते क्षणीं ॥ दशकंठरिपूनें सोडिला ॥७६॥

मकराक्षाचें बाणजाळ ॥ एकेचि शरें छेदिलें तत्काळ ॥ जेवीं उगवता सूर्यमंडळ ॥ भगणे सकळ लोपती ॥७७॥

एक उठतां विनायक ॥ असंख्य विघ्नें पळती देख ॥ कीं सुटतां चंडवात सन्मुख ॥ जलदजाल वितुळे पैं ॥७८॥

एक विष्णुनामेंकरून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥ कीं चेततां कृशान ॥ असंख्य वनें दग्ध होती ॥७९॥

कीं मूर्खाचे शब्द बहुुत ॥ एकाच शब्दें खंडी पंडित ॥ कीं सिंहनादें गज समस्त ॥ गतप्राण होती पैं ॥१८०॥

हृदयी प्रकटतां बोध ॥ सहज पळे काम क्रोध ॥ कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद सर्व विरती ॥८१॥

तेवीं रामबाणें एकेंचि सबळ ॥ तोडिलें मकराक्षाचें शरजाळ ॥ मग त्यास मुक्ति द्यावया तत्काळ ॥ दिव्य शर काढिला ॥८२॥

मकराक्षाचा कंठ लक्षून ॥ शर चालिला जैसा सुपूर्ण ॥ क्षणमात्रें कंठ छेदून ॥ आकाशपंथें उडविला ॥८३॥

तों विशालाक्ष आणि खराक्ष ॥ त्यांहीं पाचारिला कमलदलाक्ष ॥ जो सर्वात्मा सर्वसाक्ष ॥ विरूपाक्ष ध्याय जया ॥८४॥

असुर धांवती लवलाहे ॥ म्हणती सर्वदा तुज कैंचा जय ॥ अकस्मात काकतालन्याय ॥ मकराक्ष तुवां मारिला ॥८५॥

ऐसें बोलून दोघेजण ॥ सोडिती रामावरी प्रचंड बाण ॥ जैसें मृगेंद्रापुढें येऊन ॥ मांडिलें ठाण मार्जारे ॥८६॥

कीं सज्ञान पंडितापुढें ॥ बोलावया आलीं मूढें ॥ कीं जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रापुढें दावितसे ॥८७॥

कीं उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ तैसें राक्षसी संधान ॥ रामापुढें आरंभिलें ॥८८॥

दोघांही शर सोडिले अपार ॥ तितुके निवारूनि श्रीरघुवीर ॥ प्रळयचपळेऐसे थोर ॥ दोन शर काढिले ॥८९॥

ते धनुष्यावरी योजून ॥ अकस्मात सोडी रघुनंदन ॥ दोघांची कंठनाळे छेदून ॥ निराळमार्गे पैं नेलीं ॥१९०॥

कळला रावणासी समाचार ॥ परत्र पावले त्रय असुर ॥ तत्काळ महावीर ॥ सेनेसहित धांविन्नला ॥९१॥

होम करूनि रणमंडळी ॥ त्यांतून एक कृत्या निघाली ॥ रथीं बैसोन ते वेळीं ॥ अकस्मात उडाली ॥९२॥

त्या कृत्येआड बैसोन ॥ शक्रारि सोडी तेव्हां बाण ॥ म्हणे सर्वांसी खिळिन ॥ वानरगण भयभीत ॥९३॥

मग लोकप्राणेश येउनी ॥ सांगे जगद्वंद्याचे कर्णीं ॥ म्हणे अंगिरास्त्रेंकरूनी ॥ कृत्या छेदोनि टाकिजे ॥९४॥

कृत्येआड बैसोन ॥ इंद्रजित करी संधान ॥ रामें तात्काळ मंत्र जपोन ॥ अंगिरास्त्र सोडिलें ॥९५॥

तेणें कृत्या भस्म झाली झडकरी ॥ जैसा बोध प्रवेशतां अंतरीं ॥ दुर्वासना पळे बाहेरी ॥ तृष्णा कल्पना घेउनियां ॥९६॥

कीं प्रकटतां वासरमणि ॥ तम निरसे मूळींहूनी ॥ तैसा कृत्या छेदितां धरणीं ॥ इंद्रजित उतरला ॥९७॥

रणीं प्रकट उभा राहूनी ॥ अपार शर सोडी रावणी ॥ तो दुरात्मा देखूनि तत्क्षणीं ॥ वानर सर्व क्षोभले ॥९८॥

घेऊनियां महापर्वत ॥ रागें धांवे अंजनीसुत ॥ गदा घेऊनियां त्वरित ॥ बिभीषण चौताळला ॥९९॥

परिघ हातीं घेउनी ॥ मैंद धांवे क्रोधें करूनी ॥ कौमोदकी आकळोनी ॥ धन्वंतरीं पुढं जाहला ॥२००॥

शतघ्नी घेऊन सत्वर ॥ धांवे तो ऋषभ वानर ॥ शरभ धांवे घेऊनि चक्र ॥ गंधमादन शक्ति पैं ॥१॥

जांबुवंत घेऊनि गिरि थोर ॥ अंगदें उपडिला महातरुवर ॥ नीळ घेऊनियां तोमर ॥ शत्रूवरी धांविन्नला ॥२॥

नळें उचलोनि महाशिळा ॥ सुग्रीव पर्वत घेऊन धांविन्नला ॥ कुमुद हांक देऊनि पुढें जाहला ॥ लोहपट्टिश घेऊनियां ॥३॥

सौमित्रें चाप ओढून ॥ टाकिले तेव्हां तीन बाण ॥ शत शत दारुण ॥ रघुत्तमें टाकिले ॥४॥

इतुकी शस्त्रवृष्टि होत ॥ परी ते न गणीच इंद्रजित ॥ शस्त्रें तोडून समस्त ॥ बाण बहुत सोडिले ॥५॥

अष्टादश पद्में वानर ॥ निजबाणीं केले जर्जर ॥ लक्षोनियां रामसौमित्र ॥ दारुण शर सोडिले ॥६॥

रामलक्ष्मणांसहित सकळ ॥ कपिदळ इंद्रजितें केले विकळ ॥ पुरुषार्थ करून तत्काळ ॥ इंद्रजित परतला ॥७॥

जयवाद्यें वाजवित ॥ लंकेत प्रवेशे शक्रजित ॥ पितयास करूनी प्रणिपात ॥ वार्ता समूळ सांगितली ॥८॥

रावण म्हणे शक्रजितासी ॥ तूं क्षणक्षणां शत्रु मारिसी ॥ दिनांती नक्षत्रें आकाशीं ॥ मागुती तैसे ऊठती ॥९॥

वरि वरि जळे तृण ॥ परि अंकुर फुटती भूमीतून ॥ त्यावरी शक्रजित प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥२१०॥

म्हणे आतां रामलक्ष्मण ॥ सेनेसहित येतों वधून ॥ तरीच तुम्हां दावीन वदन ॥ प्रतिज्ञा पूर्ण माझी हे ॥११॥

हे न घडे जरी गोष्टी ॥ तरी तुमची आमची हेचि भेटी ॥ मम पितयासी नमून उठाउठीं ॥ इंद्रजित चालिला ॥१२॥

सिद्ध करूनि चतुरंग दळ ॥ युद्धासी चालिला उतावीळ ॥ जैसा सरितापूर ॥ तुंबळ ॥ वर्षाकाळीं धांवतसे ॥१३॥

तीन वेळ संग्राम करूनि ॥ इंद्रजित गेला जय घेऊनि ॥ मागुती आला चौथेनि ॥ रणमेदिनी माजवावया ॥१४॥

युद्धकांड परम सुरस ॥ जेथें थोर माजे वीररस ॥ तें चतुर श्रोते सावकाश ॥ अत्यादरें परिसोत ॥१५॥

रणरंगधीरा रामचंद्रा ॥ सुवेळाचळवासी प्रतापरुद्रा ॥ श्रीधरवरदा आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा जगद्रुरो ॥१६॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टविंषतितमाध्याय गोड हा ॥२१७॥

॥अध्याय २८॥ ॥ओंव्या २१७॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP