अध्याय सव्वीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


महाबळी भक्तराज परम ॥ तेणें वश केला पुरुषोत्तम ॥ तैसाच तुम्हीं श्रीराम ॥ आपणाधीन करावा ॥१॥

यावरी म्हणे दशकंधर ॥ प्रिये बोलसी सारांशोत्तर ॥ परी मी पुरुषार्थी असुरेश्वर ॥ राम मित्र कदा न करी ॥२॥

आतां जाऊन समरांगणीं ॥ नर वानर आटीन रणीं ॥ तेव्हां तूं ऐकशील कर्णीं ॥ पुरुषार्थ माझा कैसा तो ॥३॥

कैलास हालविला बळें ॥ बंदीस सकळ देव घातले ॥ आतां पाहे शिरकमळें ॥ शत्रूंची आजि आणीन ॥४॥

मयजा म्हणे जी उदारा ॥ बळेंच अनर्थ आणितां घरा ॥ हिरा सांडोनियां गारा ॥ संग्रहीतां कासया ॥५॥

कल्पवृक्ष उपडून ॥ कां वाढवितां कंटकवन ॥ राजहंस दवडून ॥ दिवाभीतें कां पाळावीं ॥६॥

सुधारस सांडोनि देख ॥ कांजी पितां काय सार्थक ॥ सुरभि दवडूनि सुरेख ॥ अजा कासया पाळावी ॥७॥

वृंदावन दिसे सुंदर वहिले ॥ परी काळकू ट आंत भरलें ॥ तरी ते न सेविजे कदाकाळे ॥ विवेकीयानें सहसाही ॥८॥

फणस फळासमान ॥ कनकफळ दिसे पूर्ण । परी ते भुलीस कारण ॥ विवेकीयानें ओळखावें ॥९॥

सर्पमस्तकींचा मणि ॥ घेऊं जातां प्राणहानि ॥ तैसी श्रीरामाची राणी ॥ समूळ कुळ निर्दाळील ॥११०॥

मग बोले लंकापति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥ मृगजळीं बुडेल अगस्ति ॥ कल्पांतीही घडेना ॥११॥

क्रोधें खवळला मृगनायक ॥ त्यासी केवी मारील जांबुक ॥ वडवानळासी मशक ॥ विझवी घृत घेऊनियां ॥१२॥

तरी आतां वल्लभे आपण ॥ गृहाप्रति जावें उठोन ॥ स्वस्थ असों द्यावें मन ॥ चिंता काही न करावी ॥१३॥

मंदोदरीची सारवचनें ॥ जी विवेकनभीची भगणें ॥ सुबुद्धिसागरींची रत्नें ॥ परी रावणें ती उपेक्षिली ॥१४॥

कमळसुवास परम सुंदर ॥ परी तो काय जाणे दर्दुर ॥ मुक्तफळांचा आहार ॥ बक काय घेऊं जाणे ॥१५॥

कस्तुरीचा अत्यंत सुवास ॥ परी काय सेवूं जाणे वायस ॥ तत्त्वविचार मद्यपियास ॥ काय व्यर्थ सांगून ॥१६॥

जन्मांधापुढें नेऊन ॥ व्यर्थ काय रत्नें ठेवून ॥ कीं उत्तम सुस्वर गायन ॥ बधिरापुढे व्यर्थ जैसे ॥१७॥

पतिव्रतेचे धर्म सकळ ॥ जारिणीस काय सांगोनि फळ ॥ धर्मशास्त्रश्रवण रसाळ ॥ वाटपाड्यासी कायसें ॥१८॥

तैसीं मयजेचीं उत्तरें ॥ उपेक्षिलीं पौलस्तिपुत्रें ॥ मग ते पतिव्रता त्वरें ॥ निजगृहासी चालिली ॥१९॥

चित्तीं झोंबला चिंताग्न ॥ गोड न वाटे भोजन शयन ॥ भूषणें भोगविलास संपूर्ण ॥ वोसंडून टाकीत ॥१२०॥

असो संग्रामसंकेतभेरी ॥ परम धडकल्या ते अवसरीं ॥ दशकंठ सहपरिवारीं ॥ युद्धालागीं निघाला ॥२१॥

सर्व प्रधान आणि कुमर ॥ अवघा लंकेतील दळभार ॥ निघता जाहला अपार ॥ सेनासमुद्र ते काळीं ॥२२॥

लंकेची महाद्वारें ॥ ती उघडिलीं एकसरें ॥ दळ चालिलें थोर गजरें ॥ जेवी प्रळयीं समुद्र फुटे ॥२३॥

पायदळ निघालें अपार ॥ पर्वतासमान प्रचंड वीर ॥ कांसा घातल्या विचित्र ॥ अभेदकवचे अंगी बीद्रें ॥२४॥

आपादमस्तकपर्यंत ॥ खेकटे विशाळ झळकत ॥ असिलता शक्ति कुंत बहुत ॥ शूल तोमर आयुधें ॥२५॥

लोहार्गळा खड्गें मुद्रल ॥ कोयते कांबिटें गदा विशाळ ॥ फरश यमदंष्ट्रा भिंडिमाळ ॥ घेऊनि चपळ धांवती ॥२६॥

तयांपाठीं विचित्र लोटले तुरुंगाचे भार ॥ कीं तें अश्वरत्नांचें भांडार ॥ एकसरें उघडिले ॥२७॥

असंख्य अश्व श्यामसुंदर ॥ पुच्छ पिवळे आरक्त खुर ॥ डोळे ताम्रवर्ण सुंदर ॥ तिहीं लोकीं गति जयां ॥२८॥

सूर्यरथीं चिंतामणी ॥ त्याचि वेगें क्रमिती अवनी ॥ एक नीळ पिंवळे हिंसती गगनीं ॥ प्रतिशब्द उठताती ॥२९॥

एक पारवे परम चपळ ॥ एक मणिकाऐसे तेजाळ ॥ सांवळे निळे चपळ ॥ चांदणें पडे अंगतेजें ॥१३०॥

एक सिंहमुख सुंदर ॥ चकोरें चंद्रवर्ण सुकुमार ॥ क्षीर केशर कुंकुम शेंदूर ॥ वर्णांचे एक धांवती ॥३१॥

जांबूळवर्ण परम चपळ ॥ हे जंबुद्वीपींच निपजती सकळ ॥ क्रौंचद्वीपींचे श्वेत वेगाळ ॥ शशिवर्ण हंसत ते ॥३२॥

शाल्मलिद्विपींच सुकुमार ॥ शाकलद्वीपींचे चित्रविचित्र ॥ नागद्वीपीचें परिकर ॥ कुशद्वीपींचे सबळ पैं ॥३३॥

पुष्करींचे श्यामकर्ण ॥ ते उदकावरी जाती जैसे पवन ॥ जबडा रुंद आंखूड मान ॥ ते बदकश्याम निघाले ॥३४॥

रणांगणीं परम धीर ॥ ते आरबी वारू सुंदर ॥ कपिचंचळ सुकुमार ॥ समरी धीर धरिती जे ॥३५॥

खगेश्वरासमान गती ॥ पक्ष्यांऐसे अंतरिक्षी उडती ॥ खुणावितां प्रवेशती ॥ परदळीं पवनासारिखे ॥३६॥

जैसी कां अलातचक्रे ॥ तैसे राऊत फिरती त्वरें ॥ असिलता झळकती एकसरें ॥ चपळऐशा तळपती ॥३७॥

अश्व खङ्ग क्षेत्री पूर्ण ॥ तिहींचे होय एक मन ॥ रावणाचें तैसेंचि सैन्य पूर्ण ॥ असंख्य वारु चालिले ॥३८॥

अश्वपंजरीं पाखरिलें बहुत ॥ अलंकार घातले रत्नखचित ॥ विशाळमुक्तघोंस झळकत ॥ जाती नाचत रणभूमी ॥३९॥

नेपुरें गर्जती चरणीं ॥ पुढील खुर न लागत अवनीं ॥ रत्नखचित मोहाळी वदनीं ॥ झळकती चपळेसमान ॥१४०॥

वज्रकवचेंसी बळिवंत ॥ वरी आरूढले चपळ राऊत ॥ त्यांचे पाठीसीं उन्मत्त ॥ गजभार खिंकाटती ॥४१॥

जैसे ऐरावतीचे सुत ॥ चपळ श्वेत आणि चौदंत ॥ झुली घातल्या रत्नजडित ॥ पृष्ठ उदरीं आंवळिले ॥४२॥

रत्नजडित चंवरडोल ॥ ध्वज भेदिती निराळ ॥ घंटा वाजती सबळ ॥ चामरें थोर रूळती पैं ॥४३॥

वरी गजआकर्षक बैसले ॥ सुवर्णचंचुवत अंकुश करी घेतले ॥ संकेत दावितां चपबळें ॥ परमचमूंत मिसळती ॥४४॥

त्यांचे पाठी दिव्य रथ ॥ चपळे ऐसीं चक्रें झळकत ॥ वरी ध्वज गगनचुंबित ॥ नानावर्णीं तळपती ॥४५॥

धनुष्यें शक्ती नानाशस्त्रें ॥ रथावरी रचिलीं अपारें ॥ कुशळ सूत बैसले धुरे ॥ वाग्दोरें हाती धरूनियां ॥४६॥

असो सुवेळपंथे अपार ॥ चालिले चतुरंग दळभार ॥ तेथें रणवाद्ये परम घोर ॥ एकदांचि खोंकाती ॥४७॥

शशिवदना भेदी धडकती ॥ वाटे नादे उलेल जगती ॥ शंख वाजतां दुमदुमती ॥ दिशांची उदरे तेधवां ॥४८॥

ढोल गिडबिडी कैताळ ॥ त्यांत सनया गर्जती रसाळ ॥ श़ृंगें बुरंगें काहाळ ॥ दौंडकीं दुटाळ वाजती ॥४९॥

रामास दावी बिभीषण ॥ आजि सकळ सेना घेऊन ॥ युद्धासी आला जी रावण ॥ पुत्रपौत्रांसहित पैं ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP