उद्धवहंसाख्यान - पंचवटींत हरिकीर्तन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सद्‌गुरु करुणाकारा । शिष्यवत्साचिया माहेरा । मूर्तिमान् धरोनिया अवतारा । जगदुद्धार करितसा ॥१॥

जेथें कर्म कैचें कैंचें ज्ञान । कैंचे उपास्य उपासन । परी शिष्याचें कळवळिया लागुन । सर्वही प्रतिष्ठिलें ॥२॥

अमूर्तित्व परि मूर्ति धरितां । संकोचेना किमपि चित्ता । तरी देह स्वधर्मी आचरतां । कोनता बाध ॥३॥

अनामियें नाम धरिलें । अरूपें रूप स्वीकारिलें । अक्रिय क्रियेशीं वर्तू लागलें । हें भाग्य उदेलें शिष्याचें ॥४॥

आतां बाळ श्रोतयांसी म्हणे । सावध असावें एकाग्र मनें । उद्धवहंस्वामीचें आचरणें । बोलिजे यथामति ॥५॥

स्मरणविस्मर होय जेथुनी तो निजांगें स्मरणविस्मरणाचा धनीं । ऐसें असतांही पुर्णपणी । प्रातःस्मरण करितसे ॥६॥

जो शुद्ध बुद्ध असंग । जेथें मायिकाचा न लगे डाग । तोचि शौचाविधि करी अंग । पापपुण्य नातळतां ॥७॥

जेथें मनचि नाहीं उद्धवलें । ज्ञानाज्ञानाही निःशेष गेले । तेणें गंगाजीवनी स्नान केलें । अघमर्षणयुक्त ॥८॥

अघ म्हणजे पापपुण्य दोनी । उद्भवली नसती काळी कवणीं । ऐसें असतां प्रवतें अघमर्षणीं बाह्मक्रियात्मक ॥९॥

जे आदिअंती परिपूर्ण । जेथें उद्भवलेंच नाहीं दोन दोन । तेथें संघीचें काय हो लक्षण । परी संध्या सांग करी ॥१०॥

जेथें क्षराक्षर आटलें । उत्तमपुरुषत्व हार पलें । अकर्तुत्वकर्तुत्व मेलें । परी जप करी अंगें ॥११॥

देव पितर ऋषि समस्त । हे जेथें उद्भव लेचि नाहीं किचिंत् । परी तर्पण तें असे करित । लोकाचारें ॥१२॥

जेथें जन्मलाचि नाही जीव । तेथें कवणा ऐसा असे देव । परी अर्चनाचा सहज गौरव । यथाविधि होतसे ॥१३॥

ध्याता ध्यानेसी निमाला । शून्य पडीलें नामरूपाला । ऐसें असोनि मौन्य ध्यानाला । सावधानता अति ॥१४॥

जेथें वेदवेद प्रणवासहित । उद्भवलाच नाहीं किंचित । तो आदरें पंचमहायज्ञ करित । यथासांग लौकिकी ॥१५॥

जेथें गुरुशिष्यपणाचा अभाव । तेथेंचि गुरुभजनाचा गौरव । तोचि उपदेशासि जाला ठाव । अधिकारियासी ॥१६॥

जेथें ज्ञान विचार आचार । तेथें कदा नव्हें एकंकार । समुदायिकां प्रीति उपजे थोर । कथाश्रवणमननीं ॥१९॥

कित्येक भावार्थें गुरुसेवा करिती । कित्येकं पुरश्चरणें तपोबल साधिती । कित्येक श्रवणमननी ॥२०॥

कित्येक भावार्थें गुरुसेवा करिती । कित्येक पुरश्चरणें तपोबल साधिती । कित्येक निस्पृहत्व अवलंबिती । देहलोभाभावें ॥२१॥

ऐसा वाढला परमार्थमार्ग । संप्रदायें दाटला भूमीचा भाग । जेथें अलौकिकाचा डाग । लागेना सहसा ॥२२॥

उदंड संप्रदायी जहाले । गुप्त कित्येक विख्यात प्रगटले । परी मुख्य ज्ञानियांत निवडिले । माधवहंसस्वामी ॥२३॥

सद्गुरुउद्धवहंसांची प्रतिमा । दुजी प्रगटली भेद मांत्र रूपनामा । तया माधवस्वामींची कथा महात्मा । तृतीय अष्टकी ॥२४॥

असो उद्धवस्वामी टाकळीसी असतां । केव्हां समर्थदर्शना जाती तत्वतां । कवणें काळी समर्थ येउनी समस्तां । भेटी असती देत ॥२५॥

एकदा समर्थांची शिवाजीनें । पूजा केली अलंकारभूषणें । झगा एक लेवविला अति आवडीनें । तेव्हा सर्वांसी संतोष ॥२६॥

तया पूजनाचिये प्रसंगें । उद्धव हंसाचें स्मरण जालें अंगें । तैसेंचि उठिलें लागवेगें । जनस्थानासी चालिले ॥२७॥

मार्गी जातां अति त्वरित । वस्त्रालंकार पडिले समस्त । एक झगा उर्वरित । राहिला अंगी ॥२८॥

तैसेचि आले टाकळीभुवनीं । ते दिवशी होतीक हरिदिनी । उद्धवासि देखतां म्हणती दर्शनी । श्रीरामाच्या चालत जाऊं ॥२९॥

समर्थासी नयनी देखतां । घातिलें साष्टांग दंडवता । तैसेंचि चालिले उभयतां । पंचवटिकेसी ॥३०॥

राममूर्तीचें घेऊन दर्शन । बैसलें मंडपामाजी येऊन । उद्धवहंसा म्हणती करी कीर्तन । हरीदिनी आजी ॥३१॥

अंगीचा झगा तो काढिला । उद्धवंसासी लेवविला । आतां कीर्तन करी बापा वहिला । मनोरंजन मजपुढें ॥३२॥

तेव्हा करोनियां नमस्कारा । प्रेमाल त्यारीती बोलेन गिरा । परी टाळ वाजवावया दुसरा । न दिसे कोणी ॥३३॥

समर्थ म्हणती वाजवील कोणी । तूं उभा राहे निःशंकपणी । तेव्हा वंदोनि प्रवर्तलें भजनी । तो टाळ वाजवी मारुती ॥३४॥

मुर्ति कवणालागी तरी न दिसे । परी टाळाची ध्वनि श्रवणी होतसे । निरूपण आरंभितां उद्धवंहंसे । जनसमुदाय मीनला ॥३५॥

निरूपणाचा प्रवाह चालिला । देहभाव कवणा नाहीं उरला । एकतान रंग अवघा माजला । दुसरी वार्ता नेणती ॥३६॥

हे असो इतरांची मति । मारुती समर्थासी नाही स्मृति । तैसेंच उद्धवहंसाही प्रति । बोलतों हें स्मरेना ॥३७॥

ऐशा पंधरा घटका लोटल्यावरी । समर्थे अवलोकिला मारुती नेत्रीं । स्वेदबिंदु आलें मुखावरीं । प्रेम नेत्री पाझरें ॥३८॥

मग कळवळोनि समर्थ म्हणती । उद्धवा कीर्तनाची करी समाप्ति । माझिया उपास्थ मूर्ती । प्रति श्रम बहुत जाले ॥३९॥

आज्ञा होतांच विना ठेवून । साष्टांग करिते जाले नमन । समर्थ म्हणती पाहे परत्न । झगा अंगीचा ॥४०॥

पाहतां सर्व शेंदुरें भरला । मारुती पाठी उभा तो देखिला । तत्क्षणीच दंडवत घातिला । मागुती समर्थ बोलती ॥४१॥

आजपासून न करावें कीर्तन । आम्हीं आतां करितसों गमन । इतुकें बोलून समर्थ आपण । सज्जनगडा गेले ॥४२॥

इकडे उद्धव हंस टाकळीसी आले । पुर्वरीती वर्तणुक चाले । एवं अल्पमात्र चरित्र निरोपिलें । द्वितीय अष्टकी ॥४३॥

आतां तिसरिये अष्टकी । माधवहंसांची कथा निकी । चिमणें बाळ बोबडिया मुखीं । बोलेलं तें अवधारा ॥४४॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । उद्धवसंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . ५०९

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP