उद्धवहंसाख्यान - सज्जनगडास गमन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सदगुरु उद्धवंहस । मार्गस्थ करुनी समर्थास । तया दिशेची वास । समर्थ येती ह्मणोनी ॥१॥

अंतरी समाधान तरी पूर्ण । बाह्म निष्ठेचें भजनपूजन । आणि यथायुक्त सदाचरण । तयाही वरी गुरुभक्ति ॥२॥

तया आचरणाचें निरूपण । पुढिले प्रकरणीं असे कथन । जयाचें पाहतांचि वर्तन । जगदुद्धार सहजीं ॥३॥

ऐसें कांहीं एक काळ लोटले । सज्जनगडी समर्थ बैसले । संप्रदायीही सर्व मिळाले । तेव्हां सर्वां आज्ञापिती ॥४॥

सखे हो उद्धवासी यावें घेऊन । बहुत दिवस जाले दर्शन । तंव हात जोडुनि बोले कल्याण । मज आज्ञा करावी ॥५॥

जनस्थानासी त्वरें जाऊन । ज्येष्ठालागीं येतों घेऊन । तंव समर्थ बोलती वचन । मुसळिया पाठवूं ॥६॥

अरे मुसळिया त्वां त्वरें जावें । समागमें दुजिया एकासी न्यावें । उद्धवालागीं घेऊन यावें । जनस्थानाहुनी ॥७॥

हा दासबोध ग्रंथ न्यावा । तया उद्धवासी अगत्य द्यावा । याच्या निरूपणें म्हणावें करावा । जगदुद्धार ॥८॥

ऐसी आज्ञा घेऊन मुसळ्फ़पाणी । टाकळीसी येता जाला अल्पादिनी । तयासी पाहुन सांगती जाऊनी । स्वामींपाशीं हेर ॥९॥

जी जी समर्थें कोनी पाठविलें । दोघेजण असती आले । तें ऐकतांचि साष्टांग घातिले । उद्धवस्वामीनें ॥१०॥

बाहेर उठोनि जों जावें । तंव ते दोघेही पातले स्वभावें । ज्येष्ठांप्रति साष्टांग भावें । वंदिते जहाले ॥११॥

तया उभयांसी आलिंगून । आपणा सन्निध बैसवून । सर्व कुशल कीं वर्तमान । पुसते जाले ॥१२॥

येरी दासबोध पुढें ठेविला । तुह्मां बोलाविलें सज्जनगडाला । हें पत्र अवलोकून सत्वर चला । आह्मां समागमें ॥१३॥

पत्रासहित दासबोध मस्तकीं । बंदोनि पत्रिका वाचिती निकी । अंतःकरणीं एकाएकीं । ध्यानमुर्ति आठवली ॥१४॥

स्वस्ति श्री कल्याण उद्धवहंसा । अति आवडी दर्शनाची मानसा । दासबोधें जगदुद्धार ऐसा । करावा जनीं ॥१५॥

अति आवडीनें पत्र वाचून । दासबोध ठेविला जतन । मुसळपाणिया बोलती वचन । कीं चला मार्ग क्रमूं ॥१६॥

ऐसेंअ बोलोनि दक्षिणे चालिले । सर्वांसी वर्तमान श्रतु जालें । कीअं उद्धवहंस सज्जनगडा गेले । आज्ञेवरूनी समर्थाच्या ॥१७॥

कित्येक बोळवीत जाती । कित्येक निघालेचि सांगातीं । आणि सेवाधार जे जे होती । ते सामोग्री घेऊन निघाले ॥१८॥

कित्येक लंगोटबंद कुबडी हातीं । हुरमुजी रुमाल शिरीं बांधिती । झोळी मेखळा अति शोभती । चालती शिष्यवर्ग ॥१९॥

आपणही स्वयें पादचारी । चालिले असती सहपरिवारी । सद्‌गुरुहंस भजनाचे गजरीं । टाळ विणे वाजती ॥२०॥

भिक्षा मागून करावें भोजन । प्रतिदिनीं चालावेअं एक योजन । रात्रीं त्या उभयतांसी सन्निध बैसवून । वर्तमान सर्व ऐकावेआं ॥२१॥

कल्याण आणि वेणाबाईचे । भोळाराम आणि शिवाजीचें । साजल्य वर्तमान ऐकोनि सर्वांचें । अति संतोष पावती ॥२२॥

स्वयें गहिंवरुन देती वचन । काय त्या देशाचें भाग्य पूर्ण । धन्य ते तृण जीवन पाषाण । चरण लागती समर्थाचें ॥२३॥

सखे हो आतां कधीं जाऊं । समर्थाचें दर्शन कधीं घेऊं । कल्याणासहित कधीं होऊं । एकत्र मिळणीं ॥२४॥

तंव मुसळपाणी बोले वाणी । तुह्मां जैसी उत्कठां मनीं । तेवी कल्याणबाबा आदिकरोनी । आपुली भेटी इच्छिती ॥२५॥

ऐसिया रीती संवाद करित । पातले कृष्णातीरापर्यंत । इकडे सज्जनगडे पाहत । वाटं सकळही ॥२६॥

समर्थ ह्मणतो गा कल्याणा । तुंवा आडवे जावें ज्येष्ठदर्शन । संगे घेऊन समुदायी जना । होतांचि आज्ञा आनंदें ॥२७॥

वेणी भोळाराम वासुदेव । आणिक जितुका असेल समुदाव । आज्ञा जाली तुह्मी जा सर्व । तेव्हां वंदोनि निघाले ॥२८॥

मागून शिवाजीही धाडिला । तोही ससैन्येसी चालिला । इकडे कृष्णेमाजी स्नानसंध्येला । उद्धव्हंस उतरले ॥२९॥

उभय माहुलीमधयें संगम । तेथें स्नानासंध्यादि सारिलें कर्म । कांहीं फलहार घेऊन सुगम । मार्गीं लगावें ॥३०॥

मुसळपाणीचा हात धरूनी । कृष्णातीरी पाहती नयनीं । शिबिरें लागलीं असतीं गगनीं । कापडाची थोर थोर ॥३१॥

आणि हस्ती उंट शकटें । मिळालीं असती दाटे । हें कवणाचें हो सैन्य गोमटें । पुसतें जालें ॥३२॥

तंव मुसळपाणी ह्मणे जी अवधार । शिवाजी येत असे सामोरा । इकडे हे येताती पहा नेत्र । कल्याणादि समुदाय ॥३३॥

ऐसें ऐकतांचि गहिंवरले । समर्थ काय हो कृपावंत जाले । इतुकें बोलोनि साष्टांग घातलेअ । दंडवत भूमी ॥३४॥

नंतर उठोनि मुसळपाणीचा । हात धरोनि राहती साचा । इकडे कल्याण आदि करुन ज्येष्ठांचा । देह देखते जाले ॥३५॥

उडुगणामाजी उडुन । तेवी दिव्य शोभतसे रूप । सर्व समुदायंत आपेआप । ओळखिशी आल ॥३६॥

मस्तकीं जटा कौपीन अचळा । वरुती हुरमुजी शोभे मेखळा । या ज्येष्ठाचें रूप देखिलें डोळा । समस्तानींही ॥३७॥

कल्याणें घाउनी साष्टांगें नमिलें । ज्येष्ठें उचलोनि गाढ आलिंगलें । वेणाबाईनें चरण वंदिलें । तीसही धरिलें पोटीं ॥३८॥

भोळारामें नमस्कार घालितां । उचलोनि आलिंगिला तत्वतां । नंतर वासुदेवादि समस्तां पृथक् पृथक् भेटले ॥३९॥

सर्वाप्रती सुवचनी । ज्येष्ठ बोलती मधुर वाणी । धन्य तुमचें भाग्य या त्रिभुवनीं । उपमा नसे अन्या ॥४०॥

दिनरात्री समर्थापाशीं । देह तुमचे असती सेवेसी । अखंड प्रवर्तता संवादासी । जेवी जननी पासीं तान्हुलें ॥४१॥

बोलतां गहिंवर दाटला । शब्दही कुंठित जाहला । तंव कल्याण स्वयें बोलता जाला । सप्रेम वाणी ॥४२॥

आपण समर्थाचें परम प्रिय । देह मात्र दिसती द्वय । परी गुरुरूपाचि अखंड अद्वय । असा गुरुशिष्यपणें ॥४३॥

समर्थ वारंवार स्मरण करिती । मुखें ह्मणती माझीच दुजी व्यक्ति । ऐसियाची साम्यता त्रिजगतीं । कवणासी द्यावी ॥४४॥

ऐसें परस्परें एकमेकां । बोलत असती सकौतुका । तंव शिवाजीहि पातला त्या भूमिका । साष्टांगे ज्येष्ठां नमियेलें ॥४५॥

तया राजासी आलिंगून । आतां त्वरे चला करुं गमन । तंव शिवाजी हात जोडुन । विनविता जाहला ॥४६॥

आजिचा दिन येथें कृष्णातीरीं । तुह्मी आह्मीं राहावें हें माझें अतरीं । शिबिरात चलावें झडकरी । बहु बरें ह्मणती ज्येष्ठ ॥४७॥

तेव्हां शिवाजीनें गोप्रादानें । आणि असंख्यात केली दानें । भेटीसारिसी याचकांची मनें । तृप्त केलीं असती ॥४८॥

नंतर मोठे एक शिबिर थोरलें । तेथें उभय समुदायासी नलें । पृथक पृथकासनीं बैसविलें । आणि पूजिलें यथाविधि ॥४९॥

इकडे ब्राह्मणसंतर्पणें होतीं । दक्षिणा तांबूल दिधलें सर्वाप्रती । नंतर सर्व गुरुबंधू बैसती एका पंक्ति । आवडी सारिती भोजन ॥५०॥

तांबूलादि राजोपचार । शिवाजी करितसे आदर । पुढें सायंसंध्यादि सत्वर । कृष्णातीरीं करिती ॥५१॥

रात्रौ दासबोध पंचपदी । करिती मिळोनि सर्व मांदी । पुढें निद्रा करिती आनंदी । सर्वही जणें ॥५२॥

ज्येष्ठें कल्याणा घरोनि हातीं । प्रेमें कुरवाळुनि प्रीती । तुझा अनुभव बोलें म्हणती । आल्हादकारक मना ॥५३॥

तेव्हा वंदोनि कल्याण बोलत । कायहो आमुचें पुर्वाजित । बहुता जन्माचा लाग जो त्वरित । पावलों ये देहीं ॥५४॥

धन्य समर्थांची गांठी पडली । गाई वासरा जेवीं मिळणी जाली । कीं कूर्मिणी गुरुमाय देखतां जाली । आम्हां पिलियां ॥५५॥

कृपादृष्टिसरिसी तृप्ति । हेसद्‌गुरुची सामर्थ्यशक्ति । ब्रह्माकार वाढली वृत्ति । मस्तकी कृपाहस्त पहतां ॥५६॥

ते वृत्ति वाढूच लागली । देहद्वय आधी तिणें चघळिली । अज्ञान कारणाची मुळी खांदिली । निःशेष नुरे कांहीं ॥५७॥

तेवीच ब्रह्मांड हिरण्यगर्भ । अव्याकृताचा गिळिला कोंम । शेवटी मुळमाया विकारारंभ । निःशेष खांदिली ॥५८॥

तरी क्षुद्धा वाढूच लागे । मग स्वकीय अनुभूति भक्षिली वेगें । जीवशिवाची हरपलीं सोंगें । द्वैताद्वैत कैचें ॥५९॥

ऐसें सद्गूरुचें करणे कैसें । तें वाणीमनासी अगोचर असे । अवघा मीपणेवीण विलसे । सद्गुरूनाथ ॥६०॥

ऐसें कल्याणाचें उत्तर । ऐकतां ज्येष्ठांचे निवालें अंतर । धन्य धन्य तुझा निर्धार । साकल्य श्रुत असे ॥६१॥

आतां हें कांहीं जें जालेंपण । तेंही करी सद्गुरु अर्पण । कोणतेंच काळी नव्हें उत्थान । हें आशीर्वचन आमुचें ॥६२॥

तंव वेणी करि तसे प्रार्थना । जी अनुभव घेतां द्वैतपणा । ध्यान सोडितां तरीही मना । संदेह वाटे ॥६३॥

जों काळ वृत्ति स्वानुभवी स्थिर । तों काळ वाटत असे सुखकर । जेघवां वृत्तीस होता विकार । सुख तें हारपे ॥६४॥

ऐसा वेणीचा प्रश्न ऐकिला । म्हणती अवधान असावें निरूपणाला । आत्मया आत्मा जो भेटविला । तो पहिलाच की नूतन ॥६५॥

नूतन जरी भेटला म्हणतां । तरी कधी वियोग जाला होता । पुरातन असे तैसाचि असतां । कवण कवणा भेटे ॥६६॥

तथापि असंग कळे वृत्तीसी । तेचि उद्भवीतसे त्रिपुटीसी । तेणें वेगळीच पडे अपैसी । विकारी म्हणोनी ॥६७॥

वृत्ति तो मुळीच विकारी । स्थिर करितांही नव्हे निर्विकारीं । आत्मा असंग जो निर्धारी । विकारी जालचि नाहीं ॥६८॥

तस्मात् सविकल्प निर्विकल्प । हेही वृत्तीचे संकल्प । त्यागुन अभिन्न जें आत्मरूप । तें अंगोंचि व्हावें ॥६९॥

स्थिरत्वें जें कांहीं सुख वाटें । तें तें व्यर्थचि जाणिजे खोटें जाणतां नुठे न भेटे । तेचि अकृत्रिम सुख ॥७०॥

ऐसा मनीं करावा निश्चय । तिहीकाळींही रूप अद्वय । ध्यानाकार वृत्ति जरी होय । तरी त्रिपूटी न व्हावी ॥७१॥

सहज ध्यान तरीं घडावें । परी ध्याता ध्यान आपण न व्हावें । मग ध्येय नाम त्यजून असावें । एकरस ब्रह्मीं ॥७२॥

ऐसें ज्येष्ठांचे उत्तर ऐकतां । वेणीं अति सुखावे चित्ता । नंतर भोळारामासी धरूनी हाता । बोलती तुझा निश्चय सांगें ॥७३॥

तो म्हणे मी कांहीच नेणें । गुरुपदी अर्पिलें देहादि करणें । कायावाचा मनें प्रानीं । अन्यथा नव्हे ॥७४॥

आतां हे अवघें सद्गुरुचें । मज भय काय बंधमोक्षाचें । अधोगति कीं उत्तमगतीचें । प्रयाजन नाहीं ॥७५॥

ऐकतां ज्येष्ठं म्हणती रे भला । नाम तुजला साजे भोला । सर्व अर्पिलें तुवां गुरुला । परी अर्पितां उरो न दी ॥७६॥

अरे शिवाजी तुझा निश्चय कैसा । येरू बोले मी सेवाधार अपैसा । राज्यादि माझें न म्हणे मी सहसा । सर्व हे स्वामीचें ॥७७॥

ज्येष्ठं म्हणती ऐसाचि भाव । दृढतर असो दे स्वयमेव । येणें रीती रात्र ते सर्व । संवादी गेली ॥७८॥

प्रातःकाळी कृष्णास्नान । करोनि आले सर्वजन । शिवाजी सिद्धता करून । आला भेटी ज्येष्ठांच्या ॥७९॥

शिबिकादि वाहन सिद्ध केलें । ज्येष्ठासी विनवी पाहिजे बैसलें । तंव ते म्हणती समर्थाची पाउलें । चरणचाली अवलोकूं ॥८०॥

मग कल्याणाचा हात धरिला । वामकरी धरिला भोला । वेणी शिवाजीही पाठी चालिला । चरणचाली ॥८१॥

तंव गडाकडोनी वायु आला । म्हणती समर्थे सामोरा पाठविला । साष्टांग दंडवत घातला । उद्धवहंसें ॥८२॥

कल्याणदि सर्व आश्चर्य करिती । ज्ञानाविषयीं तो अकुंठित गति । त्याहीवरी अकृत्रिम गुरुभक्ति । सुवर्णा जेवी सुगंध ॥८३॥

असो तिकडुन कोणीहि आलें । म्हणती समर्थेंचि पाठविलें । म्हणती सद्‌गुरु दयाळ केतुले । बोलोनी घालिती दंडवत ॥८४॥

सातारागड ओलांडिला । तो एकाएकी सज्जनगड देखिला । जयजयकारें दंडवत घातला । साष्टांग भावें ॥८५॥

कांहीएक पुढे चालती । मागुती तेथें साष्टांग घालिती । स्वमुखें बोलती सर्वांप्रति । धन्य हे वृक्ष पाषाण ॥८६॥

येणें काय हो तप आचरिलें । कीं सद्‌गुरु पदांसी प्राप्त जाले । असो या रीती मार्ग चालिले । आले गडा सन्निधान ॥८७॥

इकडे समार्थांसी अति उत्कंठा । माझा उद्धव भेटेल सुभटा । किल्लयाबाहेर निघोन वाटा । लक्षीत बैसले ॥८८॥

सर्वत्रही गडावर वेंधून । आले घालिती साष्टांग नमन । उद्धवस्वामीनें देखतांचि दूरुन । साष्टांग घातले ॥८९॥

तैसेंचि साष्टांग घालित । सन्निधान आले त्वरित । समर्थ उचलून आलिंगित । धेनू चाटीत वत्सा जेवी ॥९०॥

उभयांसी पडतां आलिंगन । तोफा सुटती गडगडून । वाद्येंही वाजती मुस्वर धन । गुढिया पताका उभविल्या ॥९१॥

बहुता दिवसा वासरूं भेटलें । तयापरी समर्थासी जालें । कीं वासरें कामधेनूसी देखिलें । तेवी वाटलें ज्येष्ठांसी ॥९२॥

मग समर्थें तैसाचि हातीं धरुनी । आले नैसले निजासनी । आपुलिया अति सन्निघानीं । उद्धवस्वामीसी बैसविलें ॥९३॥

तेव्हा ज्येष्ठेंही कल्याणा धरिलें । आपुले सन्निध बैसविलें । अन्यही कोणी कोणी बैसले । उभे राहिले कित्येक ॥९४॥

उद्धवहंसे हात जोडोनी । समर्थांसी करिती विनवणी । बहुत काळ आवडी होती मनीं । ते इच्छा पुरविली जी ॥९५॥

तंव समर्थ म्हणती बापा तूतें । गोदातटीं की कृष्णातीरी आवडतेम । तेव्हां करुणावचनीं जाले बोलतें । उद्धवस्वामी ॥९६॥

आवडे नावडे हे धर्म मनाचे । तेथें आत्मयाचें काय वेचें । सद्‌गुरुचरणीं हे परिछेद कैचे । देशादिक ॥९७॥

तथापि देहसंबंधे पाहतां । लाभ नसे गुरुआज्ञेपरता । जेथे ठेवितील स्वामी अंकिता । तेंचि मनासी आवडावें ॥९८॥

ऐकतांचि सद्‌गुरु तुष्टले । शिष्य शिरोमणीसी पोटिशी धरिलें । कल्याणादिकांसी बोलते जाले । कीं पाहिलें कीं गुरुंबंधूसी ॥९९॥

अरे शिवाजी तुवां ऐकावें । सातारियाकडे न वजावें । उद्धव असे तोंवरी रहावें । येथेम सन्निधान ॥१००॥

तथास्तु म्हणोनि शिवाजी राहिला । आनंद सर्व गुरुबंधुसी जाला । कल्याण वेणी आणि राम भोला । हे तरी कदा विसंबिती ॥१०१॥

केव्हां केव्हां समर्थांसि पुसोनी । कल्याणादि संगें घेउनी । जाती वनें पहावयालागुनी । समर्थांची क्रीडास्थानें ॥१०२॥

तें तें कल्याण असे दावित । अमुक स्थळीं अमुक केला वृतांत । चाफळखोरा आदिकरुनी समस्त । ज्येष्ठाप्रति दाविलें ॥१०३॥

ऐसीं सर्व स्थळें अवलोकुनी । मागुती येताती परतोनी । समर्थ बोलती एके दिनीं । अगा अवधारी उद्धवा ॥१०४॥

माझियाचि दृष्टीदेखतां । निरूपणें कारावी वक्तव्यता । दासबोध सांगावया समस्तां । विशद करोनी ॥१०५॥

तथास्तु म्हणोनि चरण वंदिले । आपण बोलवितां मुका बोले । स्वामिकृपेनें भवमय जिंकिले । तेथें हें किती ॥१०६॥

सर्वत्रांसी आनंद जाहला । सादर होताती श्रवणाला । आज्ञेसरिसा आरंभ केला । प्रथम दशका पासोनी ॥१०७॥

मंगलाचरणी सद्‌गुरु देवत । स्तुति स्मरण नमन मंगलयुक्त । आरंभ करोनी अर्थान्वययुक्त । बोलती ओवी वाचुनी ॥१०८॥

जैसा श्रोतयाचा आक्षेप पहावा । तो तो अनेक रीतीनें फेडावा । यथार्थ अर्थ तो बिंबवावा । हरएक युक्ती ॥१०९॥

प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें । तें तें करतळामळ असती सारे । अमुक शंकेसी अमुक अमुक उत्तरे । प्रत्ययें बाणवावीं ॥११०॥

ज्या ज्या तत्वाचें नाम ध्यावें । तें तें रूप बिंबऊन द्यावें । हें समर्थवचन सत्य केलें बरवें । निरूपणसमथीं ॥१११॥

कल्याण आदिकरोनि सुमस्त । आनंदलें अति चित्तांत । असो ऐसें निरुपण चालत । चातुर्मासा ॥११२॥

समर्थ म्हणती अंतःकरणीं । आमुचा आशिर्वाद फळला यालागुनी । गुरुत्व प्रतिष्ठिलें उभयलक्षणी । स्वानुभव आणि प्रबोधशक्ति ॥११३॥

तस्मात् आपुलिया देखतां । राज्य जेवी येतसे सुता । तेवी गुरुत्व शिष्याचें ठायीं उमटतां । आनंदली गुरुमूर्ति ॥११४॥

असो सर्व संपतां निरूपण । लोटलें असे एक अयन । समर्था मनीं जाहलें स्मरण । कीं आतां या मार्गस्थ करावें ॥११५॥

तेव्हा म्हणती सखया उद्धवा । कल्याण असो तुझिया स्वानुभवा । आतां जावें टाकळी गांवा । जगदुद्धारास्तव ॥११६॥

ऐसीं आज्ञा होता क्षणी । तथास्तु वचन नमुन चरणी । समर्थासी प्रदक्षिणा करोनी । मागीलचरणी निघालें ॥११७॥

जेथवरी समर्थाची दिसे व्यक्ति । तेथवरी पाठीकडुन चालती । तेथून दंडवत घालुनी प्रीती । गडाखाली उतरले ॥११८॥

कल्याणादि घालवीत आले । तयांसी संबोखुन माघारा घाडिलें । तंव शिवाजीनें पत्र पुढें ठेविलें । पांचा ग्रामीचें ॥११९॥

आणि हात जोडुनी विनवी । जी जी स्वस्थानासी उप्तन्नता असावी । तरी इतुकी मजुळी स्वीकारावी । कृपा करोनी ॥१२०॥

तंव स्वामीं बोलती त्रैलोक्य आमुचें । त्यांत तुझेंही राज्य काय पराचें । त्यांत ही ग्रामें देसी कैची पांचे । सर्व सत्ता हे त्यागुनी ॥१२१॥

उपजीविका तरी कामधेनु । वोळली आम्हांसी कॄपाधेनु । आम्हांसी नलगे गा एक तृणु । तस्मात् उचली पत्र ॥१२२॥

तेव्हा शिवाजीचें कांहीं न चले । मौनेंचि साष्टांगें नमिले । स्वामीनें कुरवाळुन संबोखिलें । कीं हें राज्य आमुचें ॥१२३॥

नंतर सांगातिया सहवर्तमान । करिते जाले उत्तर गमन । अल्पचि दिनी पावलें जनस्थान । टाकळी संस्थानीं ॥१२४॥

सर्वजन भेटीसी आले । म्हणती बहुत दिवस तिकडे क्रमिलें । आतां दर्शन जेधवा जालें । तेव्हा वियोगदुःख विसरलें ॥१२५॥

ऐसें सर्व जन आनंदले । पुर्ववत् क्रम चालविते जाले । आतां येथून वर्तणुकीस ऐकिलें । पाहिजे पुढें ॥१२६॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानभिव्यक्ति । उधवहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP